इतिहास असं सांगतो की प्रत्येक भाषेला स्वतःची किंमत असते. किंबहुना ती किंमत ती भाषा बोलणाऱ्यांनी ठरवलेली असते. कधीतरी प्रत्यक्ष, कधी अप्रत्यक्ष. मागील दोन हजार वर्षांच्या भाषिक इतिहासामध्ये डोकावलं की कळतं की प्रांताप्रांतागणित भाषा बदलत गेल्या. एका भाषेवर दुसऱ्या भाषेचा प्रभाव दिसून आला. शिवाय भाषांमधील आदान प्रदान देखील होत गेले. विविध भाषिकांच्या मानसिकतेमुळे काही भाषा लयास गेल्या. आणि या पुढील काळात देखील त्या जाऊ लागतील. दुसरी भाषा आपल्यापेक्षा श्रेष्ठ. आणि ती बोलली की आपल्याला भरपूर पैसा मिळेल मान मिळेल अशी अनेकांची समजूत असते. यातूनच भाषेचा ऱ्हास व्हायला सुरुवात होते. आज भारतीय समाजाची मानसिकता बघितली तर याची उत्तम प्रचिती येईल अशी परिस्थिती आहे.
मातृभाषेतील शिक्षण हेच सर्वोत्तम शिक्षण हे सर्वांनाच माहित आहे. पण जेव्हा मातृभाषेचे स्टेटस कमी होतं तेव्हा ती भाषा बोलणाऱ्यांचं स्टेटस देखील त्यांच्या मनात कमी होत असतं. अर्थात ही गोष्ट आपल्या मराठी भाषेला देखील लागू आहे. ज्ञानेश्वरांसारख्या महान प्रज्ञावंताची, शिवरायांसारख्या महान योद्धाची आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांसारख्या अद्वितीय व्यक्तीची भाषा म्हणजे मराठी. लोकसंख्येची आकडेवारी पाहिली तर मराठी भाषिकांची संख्या वाढते आहे. परंतु मराठीवर प्रेम करणाऱ्या आणि खरोखर मराठीमध्ये बोलणाऱ्यांची संख्या वाढते आहे का? या प्रश्नाचे उत्तर शोधणे गरजेचे वाटते.
इंटरनेट युगाचा प्रारंभ झाल्यानंतर इंग्रजी वेगाने वाढायला लागली. कारण तंत्रज्ञानाचे ज्ञान हे इंग्रजीमध्येच उपलब्ध होते. संगणकाची भाषा देखील इंग्रजी होती. आणि याच कारणास्तव इंग्रजीचे भारतातील महत्त्व देखील वाढू लागलं. इंग्रजांनी भारतावर राज्य केलं त्या काळात देखील इंग्रजीचं जितकं महत्त्व होतं त्यापेक्षा कित्येक पटीने अधिक महत्त्व आज भारतामध्ये आहे. त्याचे कारण हेच. मातृभाषेतील मातृभाषेतून शिक्षण घेतलेले ९० टक्क्यांवर अधिक लोक इंग्रजी भाषेशी संबंधित व्यवसायामध्ये आज आहेत. त्यांना वाटतं इथून पुढे आता इंग्रजीत चालणार. पण आमची भाषा तर मराठी. मग आमचा वंश जगाच्या स्पर्धेत कसा टिकू शकतो? या प्रश्नाचे उत्तर नवमराठी पालक स्वतःच्या पद्धतीने शोधताना दिसत आहेत.
पुण्यामधल्या एका उद्यानामध्ये काही लहान मुले खेळत होती. त्यांना बघून जवळूनच आपल्या आई-वडिलांसोबत चालणारी एक छोटी मुलगी पळत आली. आणि तिने इंग्रजीमध्ये विचारले, ‘मी तुमच्याबरोबर खेळू का?’ मुलांना इंग्रजीतल्या त्या वाक्याचा अर्थ समजला नाही. तिने वेगळ्या पद्धतीने विचारले. ही मुलगी कुठल्या ग्रहावरून आली आहे? अशा पद्धतीचे भाव त्या मुलांच्या चेहऱ्यावर होते. तिचा अट्टाहास पाहून मुले तिथून पळून गेली. त्या मुलीच्या चेहऱ्यावर नाराजीची एक छोटीशी छटा दिसून आली. तिचे आई-वडील तिला घेऊन गेले. तेही तिच्याशी इंग्रजीतच बोलत होते. परंतु महत्त्वाची गोष्ट अशी की दोघेही आई-वडील एकमेकांशी मराठीमध्ये बोलताना दिसले. कदाचित मुलीला आपल्या आई-वडिलांच्या मातृभाषेचा अर्थात मराठीचा काहीच गंध नसावा. म्हणजे लहानपणापासूनच ते तिच्याशी फक्त इंग्रजीत बोलत असावेत असं दिसलं. शेवटपर्यंत मी त्यांचं निरीक्षण करत होतो. ती मुलगी एकही शब्द मराठीमध्ये बोलली नाही. तेव्हा माझा समज पक्का झाला.
मागे एकदा एक आजी आजोबा भेटले होते. ते आपल्या नातीबद्दल अतिशय उत्साहाने बोलत होते. आमच्या मुलीला मराठी बोलता येत नाही बरं का! असं अभिमानाने सांगत होते. खरंतर ही अभिमानाची नाही तर लाज वाटण्याची गोष्ट आहे, असं आम्ही मनातल्या मनात म्हटलं. आजी-आजोबांना याचा देखील अप्रूप वाटत होतं की आम्हाला तिच्याशी बोलण्यासाठी इंग्रजीचा वापर करावा लागतो. एकंदरीत याही मुलीची परिस्थिती पहिल्या मुलीसारखी होती. लहान मुलांना त्यांच्या आई-वडिलांच्या मातृभाषेपासून दूर ठेवायचं म्हणजे त्यांची मातृभाषा आपोआपच इंग्रजी होईल, असं काहीसं गणित.
यामध्ये आणखी एक गंमत मला विशेषत्वाने आढळून आली. आई वडील दोघेही मराठी परंतु मुलगी त्यांच्याशी हिंदीमध्ये बोलते. ही गोष्ट अधिक हास्यास्पद वाटत होती. नंतर त्याचं कारण देखील समजलं. दोघांना फारसं इंग्रजी बोलता येत नाही. पण आपल्या मुलीला मोठ्या इंग्रजी शाळेत घातले. त्यामुळे मराठी सारखी गावठी भाषा बोलून कसं चालेल? असा विचार करून इंग्रजी येत नसल्याने ते तिच्याशी बिहारची राज्यभाषा असणाऱ्या हिंदीमध्ये बोलत होते. कधी कधी अशा गोष्टी देखील चिड आणतात. विशेष म्हणजे मुलाच्या शाळेमध्ये देखील शिक्षक त्यांच्याशी हिंदीमध्येच बोलायचे. मला इथे हिंदी आणि मराठी भाषेचं तुलना करायची नाही. पण एकंदरीत इतिहास बघितला तर समृद्धी कोणाच्या वाटेला आहे, हे तुम्हाला देखील समजेल. कोणती भाषा कोणत्या प्रकारच्या प्रांताची आहे? या प्रश्नाचे उत्तर देखील आपल्याला शोधता येईल.
सांगायचं तात्पर्य असं की नवपालक आपल्या मुलाला ‘ग्लोबल सिटीझन’ करायच्या नादात आपल्या मातृभाषेला तुच्छ लेखत आहेत, याची वारंवार प्रचिती येते. इंग्रजी भाषा शिकल्याने प्रगती होते हे खर आहे. पण त्यासाठी आपली मातृभाषा बदलण्याचं जे फॅड आज दिसतय, ते खरोखर हास्यास्पद असंच आहे.
— तुषार भ. कुटे
Saturday, February 8, 2025
मातृभाषा बदलण्याचे फॅड
Sunday, February 2, 2025
सीबीएसई आणि महानगरपालिका
मराठी भाषेतील शिक्षण म्हणजे अतिशय फालतू आणि दुय्यम दर्जाचं, अशा अंधश्रद्धा मागच्या काही वर्षांपासून वेगाने फोफावत आहेत. आणि आता शासकीय यंत्रणा देखील त्याला पद्धतशीरपणे खतपाणी घालताना दिसत आहेत. पैशावाल्याचं पोरग इंग्रजीतून शिकणार आणि गरिबाचं पोरगं मराठीतून शिकणार, ही समाजाची मानसिकता बनत चाललेली आहे. मातृभाषेतील शिक्षण केव्हाही श्रेष्ठच जे हृदयापर्यंत भिडतं असं जवळपास प्रत्येक भाषा तज्ञाचे मत आहे. परंतु आम्हाला त्याचं काहीही घेणं देणं नाही. वारेमात पैसा ओतून मिळवलेलं सीबीएसईतील इंग्रजी भाषेतील शिक्षण म्हणजेच श्रेष्ठ, असं अनेकांना वाटतं. त्यातूनच आता महानगरपालिका देखील तथाकथित गरीब मुलांसाठी इंग्रजी भाषेतलं सीबीएससीतल शिक्षण देण्यासाठी सज्ज होत आहेत.
या शाळांमध्ये आता क्रीडा कक्ष, संगीत खोली, इलेक्ट्रिक खोली, नृत्य कला, हस्तकला, सामान्य विज्ञान, जीवशास्त्र भौतिकशास्त्र, संगणक प्रयोगशाळा, सुसज्ज ग्रंथालय अशा सुविधा महानगरपालिका करून देणार आहे. अशा वेळी एक प्रश्न पडतो की, या शाळा सध्याच्या मराठी शाळांमध्ये त्यांना देता येत नाहीत का? ज्यांनी कोणी या निर्णयासाठी हातभार लावला असेल ते सर्वच जण आपल्या मातृभाषेतून शिकलेले असावेत, याची मला शंभर टक्के खात्री आहे. पण तरी देखील नवीन पिढीला इंग्रजीतून शिकण्याचा हट्टहास का? हा गहण प्रश्न आहे. इंग्रजीतून शिकणं आणि इंग्रजी शिकणं या दोन निरनिराळ्या गोष्टी आहेत. ज्यांची सांगड आपल्या समाजाला कदाचित अजूनही घालता येत नाही. त्यातूनच शासकीय यंत्रणांची देखील अशी भयानक मानसिकता तयार होते. एखाद्या परकीय भाषेतून शिक्षण घेणं किती अवघड असतं तेही अतिशय लहान मुलाला… याची कल्पना कदाचित महानगरपालिकेच्या शिक्षण खात्याला नसावी. मातृभाषेतूनच उत्तम शिक्षण दिलं, इंग्रजीचेही धडे दिले तर मूल चांगली प्रगती करू शकेल. परंतु याचा विचार कोणालाही करायचा नाही. स्वतःची उदो उदो करण्याच्या नादात शिक्षण क्षेत्राचे वाटोळं करायला बहुतांश मंडळी टपलेली आहेत असंच दिसतं. मागील बऱ्याच वर्षांपासून अनेक पालकांनी इंग्रजीतून शिक्षण अतिशय अवघड जातं म्हणून आपल्या पाल्यांना मराठी माध्यमांमध्ये टाकल्याची असंख्य उदाहरणे आहेत. या मागची नक्की कारणे काय? याचे उत्तर महानगरपालिकेच्या तथाकथित शिक्षण तज्ञांनी घ्यायला हवीत. त्यावर विचार करायला हवा. आत्ताची शिक्षणयंत्रणा सुधारण्यासाठी कोणती पावले उचलता येतील, उपाययोजना करता येतील यावर विचारमंथन व्हायला हवे. मराठी शाळेतील शिक्षक कशा पद्धतीने शिकवतात? शिवाय त्यांना कोणत्या प्रशिक्षणाची गरज आहे? याचा विचार व्हायला हवा. जर मराठी भाषेतूनच शिक्षकांना समस्या असतील तर इंग्रजीतून काय होणार? या प्रश्नाचे देखील उत्तर शोधायला हवे. शाळा इंग्रजी केली आणि सीबीएससी बोर्डाला जोडली की शिक्षण दर्जेदार होत नाही. फक्त स्वतःचा उदो उदो होतो. यातून महानगरपालिका काही शिकेल, याची सध्यातरी शाश्वती वाटत नाही.
--- तुषार भ. कुटे
#मराठी #शिक्षण #इंग्रजी #मातृभाषा
Saturday, February 1, 2025
साहित्यिकांची वंशज आणि इंग्रजी
मागच्या आठवड्यामध्ये बहुतांश मराठी वर्तमानपत्रांमध्ये एक बातमी ठळकपणे प्रसिद्ध झाली होती. मराठीतील एका सुप्रसिद्ध साहित्यिकांच्या वंशजाने लहान वयातच स्वतःचा इंग्रजी काव्यसंग्रह प्रकाशित केला. आणि त्याचे भरभरून कौतुक अनेक मान्यवरांकडून करण्यात आले होते. ही बातमी वाचून अतिशय वाईट वाटले. आपल्या मराठी भाषेला ज्यांनी समृद्ध केले त्यांचेच वंशज आता इंग्रजीची कास धरण्यास व्यस्त होत आहेत. मायबोलीची वाट सोडून स्वतःला ग्लोबल सिद्ध करण्यासाठी आंग्लभाषेची गोडवी गात आहेत. ही बाब कोणत्याही मराठीप्रेमीसाठी निश्चितच राग आणणारी आहे. अनेकांना वाटतं की, आमची मुलं इंग्रजी शाळेत शिकत असली तरी आम्ही त्यांच्याशी मराठीत बोलतो म्हणजे आपल्या भाषेचा ऱ्हास होणार नाही. ही बाब कितपत सत्य मानायची? हे वरील उदाहरणावरून लक्षात येईलच. या भाषेमध्ये आपण बोलतो त्याच भाषेतील ज्ञान आपल्याला व्यवस्थित समजते, हृदयापर्यंत जाते. परंतु परकीय भाषेतून शिकल्यानंतर स्वभाषेचा कितपत आपण विचार करतो? हाही प्रश्न महत्त्वाचा आहे. इंग्रजीतून शिकत असलेल्या ९९% मुलांना मराठी भाषेचे काहीही घेणे देणे नाही. हे वैश्विक सत्य आहे. त्यामुळे स्वतःचं स्टेटस वाढवण्याच्या नादात, स्वतःला ‘ग्लोबल सिटीझन’ सिद्ध करण्याच्या नादात आणि ‘इंग्रजीशिवाय काही खरं नाही’ या अंधश्रद्धेपोटी आपण मराठी भाषेचा आणखी वेगाने ऱ्हास करू, हे मात्र निश्चित.
--- तुषार भ. कुटे
#मराठी #शिक्षण #marathi
Saturday, July 27, 2024
एक मार्गदर्शन
एका तंत्र शिक्षण कार्यक्रमामध्ये माझे प्रशिक्षण सुरू होते.
जवळपास महिनाभराचा कार्यक्रम होता. बहुतांश विद्यार्थी मन लावून अभ्यास
करताना दिसत होते. त्यातीलच एक विद्यार्थी सकाळी बरोबर वेळेवर वर्गात
पोहोचायचा, अतिशय तन्मयतेने सर्व तासिकांना हजेरी लावायचा आणि दिलेला
अभ्यास देखील वेळेवर पूर्ण करायचा.
एक दिवस दुपारी जेवणाची मधली सुट्टी झाली. मी बाहेर निघत असतानाच त्याने मला थांबवले आणि बोलू लागला,
“नमस्कार सर, मी तुमचं फेसबुक प्रोफाईल बघितलं.”
त्याच्या चेहऱ्यावरील माझ्याबद्दलची उत्सुकता बघून मी देखील चमकलो. तो पुढे बोलू लागला,
“सर
तुमच्या सगळ्या पोस्ट मराठी मधून असतात. खूप भारी वाटतं वाचायला.
आपल्यातलंच कोणीतरी लिहिलेलं आहे असं वाटतं. इथं शिकवताना तुम्ही सर्वकाही
इंग्रजीतून शिकवता. ते पण छान वाटतं आणि सर्वकाही समजतं. तुम्ही कोणत्या
शाळेतून शिकला आहात सर?”
त्याच्या या प्रश्नाने माझ्या चेहऱ्यावर आपोआपच स्मित उमटले. आणि मी त्याला उत्तर दिले.
“अर्थातच
मराठी शाळेत. माझं प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये झालेलं
आहे. आणि दहावीपर्यंत पूर्ण मराठी माध्यमातून शिकलेलो आहे.”
“मग तुम्ही इतकं चांगलं इंग्रजी कसं बोलू शकता?”, त्याचा पुढचा प्रश्न.
“कसं
आहे मित्रा… जर तुमचं तुमच्या मातृभाषेवर प्रभुत्व असेल तर तुम्ही इतर
कोणतीही भाषा अतिशय सहजपणे शिकू शकता. माझंही असंच झालय. इंग्रजी शिकताना,
बोलताना मी इतर कुठल्याही अन्य भाषेचा विचार केला नाही. किंवा पर्याय देखील
शोधला नाही. बाहेरून आपल्या भागात आलेले लोक मराठी कसे बोलू शकतात? कारण
त्यांनी जर मराठी ऐकली तरच हे शक्य आहे. तसेच मी देखील करतो. तुम्ही
इंग्रजी ऐकली तरच तुम्ही ती बोलू शकता. आणि मातृभाषेतून शिकल्यामुळे मला
कोणतीही गोष्ट अतिशय पटकन समजायला लागते. कदाचित याचमुळे मराठी इतकीच
इंग्रजी देखील मला सहज जमत असावी.”
याशिवाय त्याला मार्गदर्शनपर इतर
अनेक गोष्टी मी सांगितल्या. त्याला देखील त्या पटल्या. एक वेगळाच उत्साह
त्याच्या चेहऱ्यावर दिसून येत होता. शिवाय त्याचा आत्मविश्वास वाढविण्यास
माझी मदत झाली, याचे देखील मला समाधान लाभले.
Saturday, November 18, 2023
जगाची भाषा
जगभरात कुठेही गेलं की इंग्रजीच भाषा वापरतात, असा भारतीयांचा गोड गैरसमज
आहे. याच कारणास्तव मागील काही वर्षांपासून इंग्रजी शाळांचं पेव सुटलेलं
दिसतं. जगाची भाषा म्हणून आजकाल प्रत्येक जण आपल्या मुलांना इंग्रजी
शाळेमध्ये घालताना दिसतो. असेच एक जण आमच्या मित्राच्या ओळखीतल्या निघाले.
त्यांचा
मुलगा आयसीएसई नावाच्या आंतरराष्ट्रीय बोर्डाच्या शाळेमध्ये चिंचवडमध्ये
शिकतो. त्याचे वडील एका मल्टिनॅशनल अर्थात बहुराष्ट्रीय कंपनीमध्ये कामाला
आहेत. कदाचित परदेशातच सेटल व्हायचं म्हणून त्यांचे प्रयत्न चाललेले
दिसतात. एकदा देश निश्चित झाला की, आपल्या कुटुंबासह ते त्या देशात स्थायिक
होणार होते. अखेरीस त्यांना युरोपातील क्रोएशिया या देशात जाण्याची संधी
मिळाली. एकंदरीत तिथलं वातावरण उत्तम... पगारही चांगला म्हणून त्यांनी
आपल्या मुलाला आणि पत्नीला इथेच बोलवायचे निश्चित केले होते. परंतु त्यांना
नंतर समजले की, या देशात कुठेही इंग्रजी शाळा नाही. सर्व शिक्षण त्यांच्या
अधिकृत भाषेत अर्थात क्रोएशियन भाषेमध्ये चालते. म्हणूनच आता ते कात्रीत
सापडले आहेत. जगाची भाषा इंग्रजी म्हणून मुलगा चौथीपर्यंत इंग्रजीमध्ये
शिकला, आता क्रोएशियामध्ये स्थायिक व्हायचं म्हटल्यावर इंग्रजी काहीच
कामाची नाही, हे त्यांच्या ध्यानात आलं. अजूनही त्यांचा निर्णय झालेला
नाही!
एकंदरीत काय जगभरातील सर्वच देश मुलांना आपल्या भाषेमध्ये शिक्षण
देत आहेत. आपण मात्र इंग्रजीला कवटाळून बसलेलो आहोत. मुलं इंग्रजीतून रट्टा
मारताहेत, मार्क मिळवत आहेत, पण ज्ञान मिळवत आहेत का? हा मोठा प्रश्न
पडतो. ज्ञानाधारित शिक्षण पद्धतीला जगाने स्वीकारले असतानाही भारत मात्र
आपल्या देशाबाहेर उडण्याची स्वप्ने पाहतो आहे. मुलांना परकीय भाषेमध्ये
शिक्षण देत आहे. ज्ञान जाऊ द्या, फाडफाड इंग्रजी बोलता आले पाहिजे हे
त्यांच्या मनाने ठरवलेले आहे. पण नक्की आपला मार्ग योग्य आहे का? याची
चाचपणी मात्र त्यांनी केलेली नाही. अजूनही अनेकांना हे समजलेले नाही की,
इंग्रजी शिकणे आणि इंग्रजीतून शिकणे यात जमीन आसमानाचा फरक आहे.
Tuesday, January 19, 2021
ज्ञानार्थी विरुद्ध घोकंपट्टीवाले
पुणे विद्यापीठामध्ये अभियांत्रिकी क्षेत्रात प्राध्यापक म्हणून काम करत असताना अनेकदा विद्यार्थ्यांच्या तोंडी परीक्षा घेण्याची वेळ आली. बाहेरच्या महाविद्यालयातून परीक्षा घेण्यासाठी एखादा शिक्षक आला की त्याचा दरारा वेगळाच असायचा. याचा अनुभव मी बर्याचदा घेतला आहे. प्रत्यक्ष तोंडी परीक्षा चालू झाली की, परीक्षा खोलीच्या बाहेर घोळक्या घोळक्याने मुलं अभ्यास करत बसलेली दिसायची. आपल्याला नक्की कोणता प्रश्न विचारला जाईल, या प्रश्नांचे काहूर जवळपास सर्वांच्याच मनात माजलेले असायचे. यात एक गोष्ट निरीक्षणाने मला निश्चितच समजली. काहीसा भेदरलेला चेहरा आणि थोडा आत्मविश्वासाचा अभाव असलेली मुले आपल्या मातृभाषेतून शिकलेली असावी तर चेहऱ्यावर आत्मविश्वास दाखवणारी मुले बहुतांश इंग्रजी माध्यमातून शिकलेली असायची. जेव्हा प्रत्यक्ष तोंडी परीक्षेला सुरुवात होत असे त्यावेळेस मुलांच्या चेहऱ्यावरुनच त्यांची ओळख होत होती. पण आत्मविश्वासात फरक असला तसाच त्यांच्या ज्ञानामध्ये ही त्याच प्रमाणात फरक दिसून यायचा. मराठी माध्यमातून किंवा स्वतःच्या मातृभाषेतून शिकणारी मुले इंग्रजी आत्मविश्वासाने बोलू शकत नव्हती. पण त्यांचे प्रात्यक्षिकाचे ज्ञान मात्र खूप उत्तम असायचे. दुसरीकडे इंग्रजी फाडफाड बोलणारी मुले फक्त आम्हा परीक्षकांना इंग्रजीतले मोठमोठाले शब्द टाकून गोंधळात टाकण्याचा प्रयत्न करायची. समोरचा बसलेला व्यक्ती हा कोणी तरी मूर्ख आहे, ज्याला आपण अस्खलितपणे इंग्रजीत काहीही बोललो तरी तो लगेच प्रभावित होईल, अशा अशा प्रयत्नात ही मुले असायची. अक्कलशून्य पद्धतीने इंग्रजीमध्ये बडबड करत समोरच्याला वेड्यात काढायची कामे ही मुले व्यवस्थित करत होती. परंतु त्यांच्यापेक्षा कित्येक पावसाळे अधिक बघितलेले आम्ही परीक्षेत मात्र त्यांचा डाव व्यवस्थित ओळखून होतो. तेव्हाच मातृभाषेतली ज्ञानार्थी शिक्षण पद्धती व इंग्रजीतली घोकंपट्टीतून आलेली शिक्षण पद्धती यांच्यातला खराखुरा फरक लक्षात आला. मातृभाषेतील शिक्षण घेतलेल्या मुलांना विषय व्यवस्थित समजलेला असायचा, परंतु त्यांना इतरांसारखा तो अस्खलितपणे इंग्रजीमध्ये मांडता येत नव्हता. हाच काय तो फरक. यातून एक गोष्ट मात्र खूप खूप चांगल्या पद्धतीने विश्लेषण करता आली की, मातृभाषेतून शिकलेले मुले उत्तम प्रकारे ज्ञानप्राप्ती करतात किंबहुना त्यांना ती पहिल्यापासूनच सवय झालेली असते. एकदा सवय लागल्यावर मग भाषा बदलली तरी काही फरक पडत नाही. याउलट परभाषेतून शिकलेल्या विद्यार्थ्यांची स्थिती असते. पहिल्यापासूनच अनेक गोष्टी न समजल्याने त्यांना रट्टा मारायची अर्थात घोकंपट्टी करण्याची सवय झालेली असते. हेच शिक्षण आहे, असं कदाचित त्यांना वाटत असतं. पण जसं फाडफाड इंग्रजी बोलणं प्रतिष्ठा मिळवून देतं त्याहीपेक्षा तुमचं ज्ञान तुम्हाला अधिक प्रतिष्ठा मिळवून देतं असं अनुभवावरून मला वाटतं.
आपल्या मातृभाषेतून शिक्षण घेतल्यावर आलेले ज्ञान इंग्रजीत मांडायचे असल्यास त्यावर थोडी मेहनत घेण्याची गरज आहे. माझ्यासारख्या मातृभाषेतून शिक्षण घेतलेल्या अनेकांनी अशी मेहनत घेऊन इंग्रजीवर प्रभुत्व प्राप्त केले आहे. एक मात्र नक्की आहे कि, तुमचा तुमच्या भाषेचा पाया पक्का असेल तर तुम्ही कोणतीही भाषा सहजरित्या आत्मसात करू शकता. आपल्याला इंग्रजी भाषा शिकणे जितके सोपे आहे, त्यापेक्षा एखाद्या इंग्रजाला मराठी भाषा शिकणे अवघड आहे, हेही तितकेच खरे!
Saturday, November 9, 2019
रीवाल्युसीऑन डेल युनिफॉर्मे
काही वर्षांपूर्वी युनिफॉर्ममध्ये टायचा समावेश झाला. सुटाबुटाच्या कपड्यांवर घालण्यात येणारे टाय, आता लहान मुलांच्या गणवेशात येऊ लागले होते. सुरुवातीला जेव्हा मुले काय घालायची, तेव्हा कोणीतरी सतत आपला गळा आवळतोय की काय? असं वाटत राहायचं. अनेकदा पालक मुलांच्या टायला त्यांचं मंगळसूत्र म्हणायचे! या मंगळसूत्रानंतर बुटांचा अर्थात शूजचा समावेश युनिफॉर्ममध्ये झाला. सर्व मुलांचे बूट एकाच काळ्या रंगात दिसायला लागले. जी मुले बूट घालून येत नसत, त्यांना एकतर दंड पडायचा किंवा मार मिळायचा. त्यामुळे बूटसंस्कृतीने पुन्हा पालकांच्या खिशाला गळती लावायला सुरुवात केली. यानंतर थोड्याच कालावधीत सॉक्सचा युनिफॉर्ममध्ये समावेश झाला. त्यामुळे व्हाईट सॉक्स कंपल्सरी झाले. अनेकांकडे सॉक्सची एकच जोडी असल्याने त्याला भोक पडेपर्यंत वापरले जात असत. अजूनही ही परिस्थिती सुधारलेली नाही.
कालांतराने युनिफॉर्ममध्ये आणखी एका नव्या भिडूची भर पडली. पीटीच्या तासाला अर्थात शारीरिक शिक्षणासाठी नवीन वेगळा टी-शर्टचा युनिफॉर्म आला. खेळाच्या तासाला मुले मग एकाच रंगाचा व एकाच प्रकारचा टी-शर्ट घालून यायला लागले. या सर्वांतून किती खेळाडू तयार झाले? या प्रश्नाचे उत्तर सापडले तसं फार अवघड आहे. पण, या टी-शर्ट ने त्याच्यासोबत आणखी एका साथीदाराला सोबत आणले होते, ते म्हणजे स्पोर्ट्स शूज! आता खेळताना रेग्युलर शुज घालणार का? मग खेळासाठी वेगळे शूज युनिफॉर्म बरोबर शाळेच्या प्रांगणात दाखल झाले. पुन्हा तोच प्रश्न, किती खेळाडू तयार झाले?
थंडीच्या दिवसांमध्ये मुलांना फक्त युनिफॉर्ममध्ये यायला अवघड जायचं. म्हणून मुले स्वेटर वगैरे घालून यायचे. परंतु त्यामुळे शाळेचे युनिफॉर्म दिसेनासे व्हायचे. यावरही उपाय शोधला गेला. काय तर, स्वेटर्सचाही अंतर्भाव युनिफॉर्ममध्ये झाला! मग मुलं एकाच प्रकारचा व एकाच रंगाचा स्वेटर घालून यायला लागले. आत्तापर्यंत युनिफॉर्म वर बराच खर्च होत होता. पण पालकांची इनकमही वाढत होती, ही गोष्ट ध्यानात घ्यायला हवी.
पावसाळा आला आणि परिस्थिती पालटली. मुले स्वेटर्स न घालता रेनकोट घालून यायला लागली. पुन्हा शाळेची पंचाईत झाली. मग युनिफॉर्मसाठी रेनकोट असा शोध घेतला गेला व त्याचाही समावेश शाळेच्या नव्या गणवेशात करण्यात आला. आतापर्यंत गणवेषाचा आकार जवळपास संपत आला होता. पुढे काय... पुढे काय... करता करता शाळेच्या (आतापर्यंत स्कूल झालेल्या) एक गोष्ट ध्यानात आली की, मुलं शाळेत येतात तेव्हा प्रत्येकाचे दप्तर (माफ करा... स्कूल बॅग) ही वेगवेगळ्या रंगाची व आकाराची असते. तिथे पण आमच्या झिरमिळ्या लावलेल्या कापडी पिशवी पासून मॉडर्न स्कूल बॅग पर्यंत उत्क्रांती झालीच होती! आता युनिफॉर्ममध्ये तिचा समावेश होणार होता. पण पालकांना काय कारण सांगायचे? मुलं एकमेकांची दप्तरे बघतात व तुलना करतात, त्यांना वाईट वाटते, त्यांच्यात भांडणं होतात... ही कारणं आता पटण्यासारखी होती आणि अखेरीस दप्तराचा समावेशही युनिफॉर्ममध्ये झाला. याच कारणास्तव मुलांची पाण्याची बाटली अर्थात वॉटर बॅग सारख्याच रंगात आली१
अशी ही सर्व गणवेशाची उत्क्रांती प्रक्रिया आहे. कदाचित यापुढे नव्या क्लृप्त्या शोधल्या जातील. जसे जे पालक मुलांना सोडायला शाळेत येतात त्यांचे पण कपडे वेगळे असतात. कदाचित त्यामुळे पण मुलं तुलना करतील व भांडतील, तेव्हा काय करायचं? कधीतरी विज्ञानाच्या प्रयोगाला मुलांच्या गणवेशावर काहीच सांडलं तर काय करायचं? याही प्रश्नांची उत्तरे शोधावी लागतील.
सर्वात महत्त्वाचं या लेखाचे शीर्षक असं का दिले? याचा विचार केला असेल, तर ध्यानात असू द्या गणवेशाची उत्क्रांती हे मी स्पॅनिशमध्ये लिहिलय, फक्त लिपी देवनागरी आहे!!!
© तुषार कुटे