Sunday, February 21, 2010

व्हॅलेंटाईन डे...


आजच्या तरूणाईचा सर्वात आवडता दिवस म्हणजे व्हॅलेंटाईन डे होय. या दिवशी सर्व तरूण प्रेमी प्रेमिकांची आपल्या प्रेमाचा इज़हार करण्याची जय्यत तयारी असते. मला तर दरवर्षी जवळपास प्रत्येक मराठी वृत्तपत्रात या विषयीची पाने भरभरून लिहिलेली दिसतात. प्रेमाच्या कवितांना तर उधाण आलेले असते. जणू काही सर्वच तरूण हे प्रेमवीर बनून राहिलेले आहेत.
पण, आज खरोखर प्रेम ही भावना शुध्द मनाने शिल्लक आहे का? हा मला पडलेला अनुत्तारित प्रश्न आहे. आजच्या तरूणांना प्रेम म्हणजे काय, हेच समजल्याचे दिसत नाही. पूर्वीच्या सलिम-अनारकली, हीर-रांझा, रोमियो-ज्युलियट ची उदाहरणे देत आजची तरूणाई प्रेम व्यक्त करते. पण, हे प्रेम पूर्णत: क्षणभंगूर असल्याचे दिसून येते. प्रेमविवाहापेक्षा ठरविलेले विवाहच जास्त काळ का टिकतात? यातूनच आजच्या तरूणाईचे प्रेम किती तकलादू आहे, हे दिसून येते. नुसते हिंदी चित्रपट पाहून प्रेम करणारे तरूण-तरूणी प्रेमाच्या भावनेला कसे जाणून घेणार? हाही प्रश्नच आहे. मला तर असे वाटते की, हिंदी चित्रपट हे तरूणाईला प्रेमाचा चूकिचा रस्ता दाखवित आहेत. आजच्या तरूणांसाठी प्रेम ही केवळ एक शारिरिक भावना बनून राहिल्याचे दिसून येते. त्यामुळे प्रेम म्हणजे काय, हे त्यांना फारसे समजलेले दिसत नाही. अशा प्रेमाचे प्रदर्शन करण्यासाठी व्हॅलेंटाईन डे सारखा दिवस तरूणाई शोधत असते. व त्यातच त्यांना प्रेमाच्या स्वर्ग सुखाचे दर्शन घडते.
या वर्षीच्या व्हॅलेंटाईन डे च्या आदल्या दिवशी एका तरूणाने प्रेमभंगातून आत्महत्या केली. खरोखर अशा तरूणांचे मला खूप आश्चर्य वाटते व हसूही येते. एखाद्या पायी आपल्याला आपल्या जीवनाचे मोलही वाटत नाही, याला मूर्खपणा म्हणावा की आणखी काय? प्रेमात आत्महत्या करणाऱ्यांना प्रेम कळत नाही, हेही तितकेच खरे.
हिंदी चित्रपटांच्या बाबतीत बोलायचे झाले तर ’रेनकोट’ हा एक उत्तम चित्रपट आहे. प्रेम ही भावना कशी जाणून घ्यायची असते, हे यात नेमकेपणाने दाखवून दिले आहे. खरोखर खूपच छान असा चित्रपट आहे...

No comments:

Post a Comment

to: tushar.kute@gmail.com