पायथॉन प्रोग्रामिंगचे पहिले मराठी पुस्तक प्रकाशित झाल्यानंतर महाराष्ट्रातल्या विविध भागांमधून विशेषतः ग्रामीण भागांमधून अनेक विद्यार्थ्यांचा आणि शिक्षकांचा अभिप्राय मला मेलद्वारे तसेच मेसेजद्वारे प्राप्त होत होता. परंतु पुणे पुस्तक महोत्सवाच्या निमित्ताने या सर्वांना प्रत्यक्ष भेटण्याची संधी मला मिळाली. पुस्तक महोत्सवासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून वाचक पुण्यामध्ये येत असतात. सांगली, सोलापूर, धाराशिव, अहिल्यानगर, जळगाव, नांदेड, अमरावती तसेच रत्नागिरीसारख्या विविध जिल्ह्यातील ग्रामीण भागातून अनेक वाचक याप्रसंगी मला भेटले. त्यांनी पायथॉन प्रोग्रामिंगचे मराठी पुस्तक वाचले होते. त्यातूनच त्यांना प्रोग्रामिंग शिकता आली. काही शिक्षकांनी तर स्वतःहून या पुस्तकाची शिफारस विद्यार्थ्यांना केली होती.
आपले पुस्तक वाचकांना आवडते आहे आणि त्यातून ते नवीन तंत्रज्ञान सहजपणे शिकत देखील आहेत. महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागातील ज्या विद्यार्थ्यांसाठी हे पुस्तक लिहिले त्यांना त्याचा फायदा होतो आहे, ही माझ्यासाठी समाधानाची बाब होती. अनेकांनी पुस्तकाविषयीचे अनुभव देखील मला सांगितले. शिवाय अजूनही संगणक क्षेत्रातील विविध तंत्रज्ञानावर मराठीतून पुस्तक नाही, ते तुम्ही लिहाल का? अशी विचारणा देखील केली. आपल्या लिखाणाला असे प्रोत्साहन मिळत असेल तर कोणताही लेखक अतिशय उत्साहाने पुस्तक लिहिल.
सध्या "प्रॅक्टिकल आर्टिफिशिअल इंटेलिजन्स" या पुस्तकश्रृंखलेवर माझे काम चालू आहे. त्यातील चार पुस्तके यावर्षी प्रकाशित होतील. मला आशा आहे की, महाराष्ट्रातील प्रत्येक विद्यार्थ्याला संगणक क्षेत्रातील या तंत्रज्ञानाचे ज्ञान संपादन करण्यासाठी निश्चितच या पुस्तकांचा मोठा फायदा होईल.
--- तुषार भ. कुटे.
Saturday, January 17, 2026
पायथॉन प्रोग्रामिंग आणि वाचकांचा प्रतिसाद
Friday, December 19, 2025
पायथॉन प्रोग्रॅमिंग : नवीन आवृत्ती
"पायथॉन प्रोग्रॅमिंग" या पुस्तकाच्या सुरुवातीच्या आवृत्त्या संपल्यानंतर नवीन पुस्तकामध्ये काही गोष्टी नव्याने समाविष्ट करायच्या होत्या. त्याकरिता सध्या पायथॉन प्रोग्रॅमर म्हणून नव्याने तयार झालेल्या नोकऱ्यांकरता आवश्यक असलेल्या मूलभूत कौशल्यांवर काम करायला सुरुवात केले. आणि त्यातूनच पायथॉन तंत्रज्ञान विकासातील आणखी काही टप्प्यांचा विचार केला. याचाच वापर करून हे नवीन मुद्दे पुस्तकाच्या नव्या आवृत्तीमध्ये समाविष्ट केले. उदाहरणार्थ, विविध प्रकारचे एडिटर्स, पीप, मेन्यू बेस्ड प्रोग्रॅम्स, पॅकेज मॅनेजमेंट अशा विविध संकल्पनांचा या पुस्तकामध्ये समावेश करून नवीन आवृत्ती यंदाच्या पुणे पुस्तक महोत्सवामध्ये प्रकाशित केली आहे. आधीच्या आवृत्त्यांची असणारी तीनशे रुपये किंमत याही आवृत्तीमध्ये तशीच ठेवलेली आहे. पायथॉन ३.१४ प्रकाशित झाल्यानंतर त्यातील नव्या संकल्पनांचा आधार घेऊन या पुस्तकामध्ये आवश्यक ते बदल करण्यात आलेले आहेत.
सध्या तरी पायथॉन प्रोग्रॅमिंगची ही नवीन आवृत्ती पुणे पुस्तक महोत्सवामध्ये बुकविश्वच्या स्टॉल क्रमांक एच ५६ वरच उपलब्ध आहे. पायथॉन शिकण्यासाठी उत्सुक असणारे वाचक या सुधारित नवीन आवृत्तीची या ठिकाणावरून खरेदी करू शकतात.
--- तुषार भ. कुटे
Wednesday, January 18, 2023
प्रा. सोनाली मोरताळे
प्रा. सोनाली मोरताळे म्हणजे पिंपरी चिंचवड तंत्रनिकेतन मधील माहिती तंत्रज्ञान विभागाच्या विभाग प्रमुख होय. मागील पाच ते सहा वर्षांपासून विविध कार्यशाळेच्या निमित्ताने मॅडमचा आणि आमचा संवाद होतच असतो. त्यांची विद्यार्थ्यांना सातत्याने नवीन तंत्रज्ञान ओळख करून देण्याची तळमळ मला माहिती आहे. याच कारणास्तव माहिती तंत्रज्ञान विभागातील विद्यार्थी अन्य महाविद्यालयांपेक्षा विशेष कामगिरी करताना दिसतात. माझ्या "पायथॉन प्रोग्रॅमिंग" या पुस्तकासाठी मोरताळे मॅडमने आपला अभिप्राय देखील दिला होता. आज त्यांना प्रत्यक्ष पुस्तक भेट म्हणून दिले. त्या स्वतः पायथॉन प्रोग्रॅमिंग शिकलेल्या आहेत. शिवाय मी मराठीतून पुस्तक लिहिल्याबद्दल त्यांनी माझे विशेष अभिनंदन देखील केले.
Monday, January 9, 2023
प्रा. मंगला माळकर
पिंपरी चिंचवड तंत्रनिकेतनमधील संगणक अभियांत्रिकीच्या विभागप्रमुख म्हणजे प्रा. मंगला माळकर होत. त्या महाविद्यालयाच्या तसेच महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाच्या अनेक अनुभवी शिक्षकांपैकी एक आहेत. मागील सहा ते सात वर्षांपासून आमची ओळख आहे. माहिती तंत्रज्ञान क्षेत्राची व त्यातील बदलांची विद्यार्थ्यांना ओळख व्हावी म्हणून त्या नेहमी कार्यरत असतात. तंत्रनिकेतनमध्ये शिकवत असून देखील त्यांच्या या दृष्टिकोनामुळे अनेक अद्ययावत तंत्रज्ञानाची माहिती विविध तज्ज्ञांची व्याख्याने आयोजित करून विद्यार्थ्यांना त्या देत असतात. मला देखील त्यांचे मार्गदर्शन सातत्याने मिळत आलेले आहे. काही कारणास्तव त्यांना माझ्या 'पायथॉन प्रोग्रॅमिंग' या पुस्तकासाठी अभिप्राय देता आला नाही. पण प्रत्यक्ष पुस्तक पाहिल्यानंतर त्यांची सकारात्मक प्रतिक्रिया सूचक अशीच होती. आज त्यांना मी माझे पुस्तक भेट दिले. एका विद्यार्थीभिमुख शिक्षकास पुस्तक दिल्याचा आनंद मला मिळाला.
Friday, December 9, 2022
डॉ. संजय तलबार
"अलार्ड अभियांत्रिकी महाविद्यालय, मारुंजी" चे प्राचार्य डॉ. संजय तलबार म्हणजे एक दिलखुलास व्यक्तिमत्व. सहा वर्षांपूर्वी नांदेडच्या श्री. गुरु गोविंद सिंहजी तंत्रज्ञान संस्थेमध्ये ते कार्य करत असताना माझी त्यांच्याशी ओळख झाली. ते स्वतः इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन मध्ये 'पीएचडी' आहेत. शिवाय अनेक विद्यार्थ्यांनी त्यांच्या मार्गदर्शनाखाली 'पीएचडी' देखील पूर्ण केली आहे. वेगळ्या शाखेचे प्राध्यापक असून देखील सरांना प्रोग्रामिंग मध्ये विशेष रुची आहे. ते सातत्याने नवीन गोष्टी शिकत असतात. म्हणूनच माझ्यासाठी ते प्रेरणास्थानी आहेत. पायथॉन प्रोग्रामिंगवर लिहिलेल्या माझ्या पहिल्या मराठी ई-पुस्तकासाठी सरांना अभिप्राय देण्यासाठी विनंती केली. तेव्हा त्यांनी लगेचच होकार कळविला आणि काही दिवसांमध्येच आपल्या अभिप्रायाचा व्हिडिओ बनवून देखील मला पाठविला. त्या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यामध्ये आम्ही या व्हिडिओचा समावेश केला होता. त्या त्यातीलच सारांशरुपी अभिप्राय पुस्तकाच्या प्रिंट आवृत्तीमध्ये देखील घेण्यात आलेला आहे. आज सरांना हे पुस्तक स्वहस्ते देताना होणारा आनंद अवर्णनीय होता. माझ्या नवनवीन कार्याला त्यांची त्यांचा सदैव पाठिंबा असतो. या भेटीत देखील त्यांनी दिलेल्या शुभेच्छा व सूचना बहुमूल्य अशा होत्या!
Thursday, December 8, 2022
पायथॉन प्रोग्रामिंगवर कार्यशाळा
नुकतीच पिंपरी चिंचवड तंत्रनिकेतन, पुणे येथे पायथॉन प्रोग्रामिंगवर कार्यशाळा घेतली. यामध्ये द्वितीय वर्ष माहिती तंत्रज्ञानाच्या मुलांनी सहभाग घेतला होता. संगणक प्रोग्रामिंग अनेकांना अतिशय अवघड वाटते. परंतु ती रंजकपणे शिकवल्यास त्यातील रुची वाढण्यास मदत होते. शिवाय कमी वयामध्ये आकलनक्षमता अतिशय उत्तम असते, याची प्रचिती या कार्यशाळेमध्ये आली. विद्यार्थ्यांनी भरभरून प्रतिसाद दिला. तसेच त्यांच्या परीक्षणांवरून मलादेखील पुन्हा नव्या गोष्टी शिकविण्यासाठी ऊर्जा प्राप्त झाली. धन्यवाद!
Saturday, December 3, 2022
एक भेट
मागील आठवड्यामध्ये जुन्नर मधील बेल्हे इथल्या समर्थ महाविद्यालयामध्ये पायथॉन प्रोग्रामिंगच्या व्याख्यानाच्या निमित्ताने जाणे झाले. समर्थ शैक्षणिक संकुलाचे विश्वस्त श्री. वल्लभ शेळके यांची देखील त्यादिवशी भेट झाली. खरंतर या औपचारिक भेटीचे अनौपचारिक संवादामध्ये कसे रूपांतर झाले, ते आम्हाला देखील समजले नाही. वल्लभ शेळके हे इतिहासाचे एक गाढे अभ्यासक होय. त्यांनी इतिहासामध्ये मास्टर्स पदवी देखील प्राप्त केली आहे, हे त्यादिवशी आम्हाला पहिल्यांदाच समजले. आम्ही देखील ऐतिहासिक पुस्तकांचे प्रकाशक आहोत, हे ऐकल्यावर त्यांचा आनंद द्विगुणित झाला. त्यांनी इतिहासातील विविध विषयांवर, ऐतिहासिक व्यक्तिरेखांवर आणि इतिहास संशोधकांवर आमच्याशी सखोल चर्चा केली. यातूनच त्यांच्या एकंदरीत अभ्यासू व्यक्तिमत्त्वाचा आम्हाला देखील अंदाज आला. शिक्षण संस्थेच्या व्यवस्थापन मंडळातील सदस्य इतका अभ्यासू असू शकतो, याचे उदाहरण म्हणजे वल्लभ शेळके होत. वाचनाची आवड असलेल्या या व्यक्तिमत्वाला मी माझे पुस्तक दिले याचा मला देखील मनस्वी आनंद झाला.
Wednesday, June 15, 2022
एक विशेष संवाद
'पायथॉन प्रोग्रॅमिंग' या मराठीतील माझ्या पुस्तकाची 'लिंक्डइन'वर मी पोस्ट केली होती. अनेक मराठी तसेच अमराठी तंत्रज्ञांकडून त्यावर लाईक, कमेंट्स आणि शेअर्सचा पाऊस पडला. त्यामुळे ती अधिकाधिक लोकांकडे पोहोचण्यास मदत झाली. मराठी लोक आपल्या भाषेतून तंत्रज्ञान शिकण्यास व समजावून घेण्यास उत्सुक आहेत, ही बाब समाधानाची होती. परंतु काही अमराठी लोकांनी देखील आमच्या या प्रयत्नाची प्रशंसा केली.
बंगळुरूमधील 'डेटा सायन्स'मध्ये काम करणाऱ्या एका कन्नड अभियंत्याशी झालेला संवाद मला विशेष महत्त्वाचा वाटतो. त्याने आग्रहाने माझ्याकडून माझा मोबाईल नंबर घेतला होता आणि मी दिलेल्या वेळेवरच मला फोन केला. त्याने युरोपमधील फ्रान्स आणि जर्मनी सारख्या देशांचे दौरे केले होते. तिथल्या विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी व तंत्रज्ञान शिक्षण हे त्यांच्याच भाषेमध्ये दिले जातं. इंग्रजी भाषा ते वेगळी ट्युशन लावून शिकत असतात. याच कारणास्तव तंत्रज्ञानातील अनेक मूलभूत तत्वे त्यांची पक्की झालेली असतात. परंतु भारतात मात्र परिस्थिती अगदीच उलटी आहे. आपण अभियांत्रिकी असो व मेडिकल असो कायदा, वाणिज्य, विज्ञान असो किंवा औषधनिर्माणशास्त्र असो सर्वच गोष्टीत इंग्रजीमधून शिकवत असतो. इंग्रजी ही जगाची भाषा आहे, असं आपल्याला वाटतं. त्यात खोटं काहीच नाही. ती एक संवादाची भाषा आहे. परंतु ज्ञानग्रहण करायची असल्यास स्वभाषा हीच सर्वोत्तम भाषा होय. ज्यामधून आपल्याला सर्व गोष्टी नीट समजतात. परंतु भारतात असं कुठेही होताना दिसत नाही, याबद्दल त्याने खंतही व्यक्त केली. आपल्यासारख्या तंत्रज्ञांनी यासाठी पुढाकार घ्यायला हवा. अधिकाधिक ज्ञान भारतीय भाषांमध्ये यायला हवं. याविषयीही तो आग्रही होता. इंग्रजीमध्ये बहुतांश जणांना समजत नसल्याने ते केवळ रट्टा मारून परीक्षा देतात व पास होतात. आज अभियांत्रिकी शिक्षण घेणारे सत्तर टक्क्यांपेक्षा अधिक विद्यार्थी केवळ प्रश्नांची उत्तरे पाठ करूनच परीक्षा देत असतात. अशी परिस्थिती भारतातील सर्वच राज्यांमध्ये आहे. याच कारणास्तव भारतामध्ये मनुष्यबळ पुरेसे असले तरी ज्ञानाधारित पिढी तयार होताना दिसत नाही. उलट भारतीय भाषांमधून शिकवले तर ते अधिक उत्तमरीत्या समजू शकतात, असेही त्याला वाटत होते. मी देखील त्याच्या या मताशी शंभर टक्के सहमत आहे. आज भारतातील अभियांत्रिकी व तंत्रज्ञान संस्थांमधील बहुतांश विद्यार्थी ज्ञानग्रहण करतच नाही. त्यामुळे अशा विद्यार्थ्यांच्या पदव्यांना केवळ एक प्रिंट केलेला एक आकर्षक कागदी तुकडा म्हणता येईल. आणि मग आम्हाला नोकरी का मिळत नाही? या प्रश्नाचे उत्तर ते दुसऱ्या कुणावर तरी सोपवून मोकळे होतात. यातून सुयोग्य मार्ग काढण्याची गरज आहे. शासनाने देखील थोडे सर्वेक्षण केले तरी त्यांना चांगला मार्ग सापडू शकतो.
(टीप: आमचा हा पूर्व संवाद इंग्रजीतून झाला!)
Ⓒ Ⓐ तुषार भ. कुटे
Thursday, May 26, 2022
मराठीतून पायथॉन
मागच्या
सहा-सात वर्षांपासून पायथॉन नावाची नवी संगणकीय भाषा वेगाने पुढे यायला
लागली होती. परंतु इंटरनेटवर ही भाषा शिकण्यासाठी हवे तितकेच स्त्रोत
उपलब्ध नव्हते. हळूहळू तेदेखील इंग्रजीद्वारे उपलब्ध व्हायला लागले. परंतु
मराठी भाषेतून मात्र ही संगणकीय भाषा शिकवण्यासाठी कोणताही स्त्रोत उपलब्ध
नव्हता. मग आम्ही ठरवलं की, पायथॉन शिकवण्यासाठी मराठी भाषेतून व्हिडिओज
तयार करायचे. मग हळू हळू एकेक व्हिडीओ तयार होत गेला आणि मी ते आमच्या
अधिकृत युट्युब चॅनेल वर अपलोड करत गेलो. सुरुवातीच्या काळामध्ये फारसा
प्रतिसाद नव्हता. परंतु काही महिन्यांमध्येच आमच्या चॅनेलच्या सर्वाधिक
पाहिल्या जाणाऱ्या व्हिडिओज मध्ये मराठीतून पायथॉन शृंखलेतील सर्वच व्हिडिओ
यायला लागले! या व्हिडिओजला मिळणारे व्ह्यूज मोठ्या प्रमाणात वाढत गेले.
त्यावर प्रेक्षकांच्या व विद्यार्थ्यांच्या येणाऱ्या कमेंट्स वाचून आपण
प्रगत तंत्रज्ञानाचा नवीन स्त्रोत मराठी भाषेतून उपलब्ध करून दिल्याची
मनोमन जाणीव झाली. खरंतर आम्हाला मिळणारे हे एक प्रोत्साहन होतं.
आज
युट्युबवर असणारे व्हिडिओ दोन टप्प्यांमध्ये आम्ही तयार केले आहेत. विशेष
म्हणजे गुगल किंवा युट्युबवर जरी तुम्ही python in marathi असं टाईप केलं
तरी हेच व्हिडीओ तुम्हाला सर्वप्रथम दिसून येतील! इतकी लोकप्रियता त्यांनी
मिळवलेली आहे. मागच्या दोन वर्षांपासून मोठ्या प्रमाणात कमेंट्स, ई-मेल्स
तसेच व्हाट्सअप मेसेजेस आम्हाला प्राप्त झालेले आहेत. जवळपास ३५ चे ४०%
चॅनेल सबस्क्राईबर हे याच व्हिडिओजमुळे आम्हाला मिळाले आहेत. याउलट
इंग्रजीतून बनवलेल्या व्हिडिओजला फारसा प्रतिसाद मिळत नाही. कारण
इंग्रजीतून याच विषयावर हजारो व्हिडीओ उपलब्ध आहेत. परंतु मराठीतून नाही.
याचाच फायदा आमच्या चॅनेलचे रँकिंग वाढवण्यास आणि चॅनेल मॉनेटाईझ करण्यास
देखील झाला. मराठी भाषेला स्कोप नाही, असं म्हणणाऱ्यांसाठी ही एक चपराक
होती.
दीड वर्षांपूर्वी पायथॉन प्रोग्रॅमिंगवर मी मराठीतून पहिले
पुस्तक ई-बुक स्वरूपात प्रकाशित केले. कोणत्याही प्रकारची जाहिरात न करता
देखील या पुस्तकाचा ऑनलाइन पद्धतीने विक्रमी खप झाला. अजूनही त्याची विक्री
थांबलेली नाही. यावरूनच मराठीला ज्ञानभाषा म्हणून आजही मोठा स्कोप
असल्याचे दिसते. लोकांना आपल्या मातृभाषेतून शिकायचं आहे. परंतु संसाधने
इंग्रजीतून उपलब्ध असल्यामुळे त्यात अनेक अडचणी येतात. याच अडचणींवर उपाय
शोधण्यासाठी यापुढेही आमचे प्रयत्न अविरत चालू राहतील. फक्त तुमचा पाठिंबा
गरजेचा आहे.
पुढील काही दिवसांमध्ये 'मराठीतून पायथॉन' ही युट्युब व्हिडीओ शृंखला आणखी दहा व्हिडिओजने वाढवण्यात येणार आहे.
YouTube Link: https://www.youtube.com/playlist?list=PL9D-kb1y7d4cL3xI0Wk1krRjjiPE4IPUd
Ⓒ Ⓐ तुषार भ. कुटे
Saturday, August 22, 2020
पायथॉन प्रोग्रॅमिंग : पहिले मराठी ई-बुक
कुणालाही आपल्या भाषेतून शिकायला मिळणे, हे आनंददायी व अधिक आवडीचे असते. त्याचाच हा परिणाम म्हणूनच पायथॉन प्रोग्रॅमिंगचे मराठीतून पुस्तक लिहावे, हा विचार मनात आला व लगेच त्यावर काम करायला आम्ही सुरुवात केली. मागच्या सहा वर्षांपासून या संगणकीय भाषेवर प्रभुत्व निर्माण झाले होते. त्यामुळे त्यातील संकल्पना सहजपणे मराठीतून मांडायला सोपे जाऊ लागले. पुस्तकाची संकल्पना दोन महिन्यांपासून आकार घेऊ लागली होती आणि तंत्रज्ञानाच्या सहकार्यानेच इतक्या कमी कालावधीत पुस्तक तयार झाले. आज त्याची पहिली झलक इथे प्रदर्शित करीत आहोत. त्यासाठी माझी पत्नी रश्मी हिचा मोलाचा सहभाग आहे. म्हणूनच तिच्या वाढदिवशी या पुस्तकाची घोषणा करत आहोत. हे माझे तिसरे पुस्तक होय! तसेच ते पहिलेच व्यवसायिक ई-बुक आहे. त्याचे प्रकाशन ५ सप्टेंबर अर्थात शिक्षकदिनी होणार आहे. तेव्हाच त्याची आवृत्ती ऑनलाईन ई-वितरणासाठी उपलब्ध होईल. तसेच १५ सप्टेंबर अर्थात अभियंता दिनापासून ते अमेझॉन व गूगल बुक्स वरही उपलब्ध केले जाईल.
अधिक माहितीसाठी खालील लिंक वर क्लिक करा.
https://mitu.co.in/python-programming-in-marathi-e-book
Monday, July 27, 2020
डेटा सायन्स आणि पायथॉन प्रोग्रॅमिंग
जसं संगणक तंत्रज्ञान बदलत चाललं आहे, तसंच इथे वापरण्यात येणाऱ्या प्रोग्रामिंग लँग्वेजेस सुद्धा बदललेल्या आहेत. एकेकाळी सी आणि सी प्लस प्लस अथवा जावा सारख्या प्रोग्रॅमिंग लँग्वेजेस आल्या तरी आपल्याला संगणक क्षेत्रांमध्ये सहज प्रवेश करता येऊ शकत होता. पण आजची परिस्थिती तशी नाही. आज कॉम्प्युटर प्रोग्रामिंगचे विश्व पायथॉन प्रोग्रामिंग लँग्वेज व्यापू पाहत आहे. मागच्या दहा वर्षांचा आलेख पाहिला तर ध्यानात येईल की, जावा प्रोग्रामिंग लैंग्वेज पेक्षा पायथॉन ही दोन पावले पुढे चालणारी लँग्वेज आहे. सन २०१६ मध्ये पायथॉन प्रोग्रामिंग लँग्वेजने जावाला माहिती-तंत्रज्ञान विश्वात मागे टाकले आहे. त्यामुळे येणारे जग हे पायथॉन प्रोग्रामिंग लँग्वेजवर आधारित असेल, यात शंका नाही. महत्त्वाचे असे की, पायथॉन ही आज वापरण्यात येणाऱ्या संगणकातील डेटा सायन्स, आर्टिफिशिअल इंटेलिजन्स, मशीन लर्निंग, नॅचरल लैंग्वेज प्रोसेसिंग, इंटरनेट ऑफ थिंग्स, ब्लॉकचेन सारख्या अद्ययावत तंत्रज्ञानात प्रामुख्याने वापरली जाते. त्यामुळे संगणक तंत्रज्ञान जसजसे विकसित होत जाईल तस-तशी पायथॉन प्रोग्रामरची सुद्धा गरज माहिती-तंत्रज्ञान विश्वाला भासणार आहे.
या दोन्ही तंत्रज्ञानांचे प्रशिक्षण देण्यासाठी आमच्या कंपनीतर्फे मागच्या चार वर्षांपासून दोन निरनिराळे कोर्सेस चालवले जातात. त्यापैकी डेटा सायन्सचा कोर्स हा २५००० रुपये किमतीचा होता आणि पायथॉनचा कोर्स दहा हजार रुपये किंमतीचा होता. परंतु लॉकडाऊन मध्ये आम्ही दोन्ही कोर्सेस ऑनलाइन पद्धतीने सुरू केलेले आहेत. ज्यांना संगणक व माहिती तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये वरील तंत्रज्ञानावर काम करायचे असेल, त्यांना डेटा सायन्स चा कोर्स ८० टक्के डिस्काउंटसह रुपये ४९९९ मध्ये तर पायथॉन प्रोग्रामिंग लँग्वेजचा कोर्स ९० टक्के डिस्काउंटसह रुपये ९९९ मध्येच आम्ही उपलब्ध करून दिलेला आहे. सदर कोर्सद्वारे अधिकाधिक तंत्रज्ञ नव्या तंत्रज्ञानासह माहिती तंत्रज्ञान क्षेत्राला उपलब्ध व्हावेत व नवीन मनुष्यबळ विकसित व्हावे, यासाठी इतकी मोठी सूट आम्ही दिलेली आहे. तरी यांची माहिती घेण्यासाठी खाली दिलेल्या क्रमांकावर किंवा वेबसाईटवर तुम्ही संपर्क साधू शकता.
https://mitu.co.in/courses
मोबाईल: 8600829693
















