माणसाच्या मेंदूमध्ये कोट्यावधी न्यूरॉन असतात. याच न्यूरॉनचा वापर करून
मानवाने इतर प्राण्यांपेक्षा अनेक पावले पुढची बुद्धिमत्ता प्राप्त केली
आहे. प्रत्यक्षात मनुष्यप्राणी आपल्या मेंदूमधील किती टक्के न्यूरान्सचा
वापर करतो? या प्रश्नाचे उत्तर जेव्हा शास्त्रज्ञांनी शोधले तेव्हा त्यांना
समजले की आपण फार-फार तर दहा टक्के मेंदू आजवर वापरलेला आहे! जर आपण
इतक्या कमी प्रमाणात मेंदू वापरलेला असेल आणि अन्य प्राणी जगताला हेवा
वाटेल अशी प्रगती केली असेल तर जेव्हा १००% मेंदू वापरू त्यावेळेस काय
होईल? याची कल्पना देखील करवत नाही. याच संकल्पनेवर आधारित असणारा हा
हॉलीवुडपट म्हणजे "ल्युसी" होय.
ल्युसी ही एक सर्वसामान्य युवती आहे.
चीनमधल्या एका शहरामध्ये ती काम करते. आपल्या प्रियकराने दिलेल्या
धोक्यामुळे ती मोठ्या संकटात सापडते. त्यातून बाहेर येण्याचा ती जीवाच्या
आकांताने प्रयत्न करत असते. परंतु याच घडामोडींमध्ये तिच्या शरीरात
झालेल्या रासायनिक प्रक्रियेमुळे तिच्या मेंदूची क्षमता वाढायला सुरुवात
होते. पहिल्यांदा २०% मग २८% नंतर ४०% नंतर ६०% कालांतराने ८० टक्के आणि
अखेरीस ती आपल्या मेंदूचा शंभर टक्के वापर करते. या प्रत्येक टप्प्यामध्ये
तिचा मेंदू कशा पद्धतीने काम करतो, किंबहुना ती तिच्या मेंदूचा कसा वापर
करते? हे अतिशय रंजकपणे चित्रपटामध्ये दाखवलेले आहे.
जेव्हा मेंदू १००%
कार्यरत होतो त्यावेळेची स्थिती काहीशी अनाकलनीय आहे. पण चित्रपट
विज्ञानातील एक अद्भुतरंजकता आपल्याला दाखवून जातो. विशेष म्हणजे प्रत्येक
टप्प्यागणिक तो खिळवून ठेवतो आणि खरोखरच असं झालं तर काय? या प्रश्नाचे
उत्तर आपल्याला देत राहतो. काही विज्ञान रंजन मनाला सुखवणारे असतात. काही
कल्पना प्रत्यक्षात येण्याजोग्या असतात पण कधी येतील याची खात्री नसते?
त्यातीलच ही विज्ञान रंजक कल्पना होय.
भविष्यामध्ये कदाचित आपण देखील
आपल्या मेंदूचा शंभर टक्के वापर करण्यास यशस्वी होऊ. त्यावेळेस कदाचित
विश्वाची रहस्ये आपल्यासमोर खुली देखील होतील. ...बाकी स्कार्लेट
जोहान्सनने ल्युसीची भूमिका अप्रतिम पार पाडली आहे!
Thursday, December 1, 2022
ल्युसी: मेंदूच्या वापराची कहाणी
Friday, April 16, 2021
अचाट, अफाट, अकल्पनीय आणि अलौकिक : चार्ली चॅप्लिन
चार्ली चॅप्लिन म्हणजे एकेकाळचा हॉलीवूडचा अनभिषिक्त बादशहा होय! शंभर वर्षांपूर्वी त्याने अमेरिकेतल्या मूकपटांवर राज्य केलं. त्याच्याच काळात चित्रपटांचा प्रवास मूकपटाकडून बोलपटांकडे झाला. अचाट, अफाट, अकल्पनीय आणि अलौकिक अशी अनेक विशेषणे चार्ली चॅप्लिनच्या या एकंदरीत जीवन प्रवासाला लावता येतात. त्याची कथा म्हणजे एका अतिसामान्य व अठरा विश्वे दारिद्र्य भोगणार्या, टक्केटोणपे खाल्लेल्या परंतु नैसर्गिक कलागुणांच्या, बुद्धिमत्तेच्या व निरीक्षणशक्तीच्या जोरावर चित्रपटसृष्टीचा बादशहा होण्याची कथा होय.
चार्ली चॅप्लिन हे नाव माहीत नसणारा व्यक्ती म्हणजे विरळाच. आज शंभर वर्षांनी देखील कलेवर प्रेम करणाऱ्या प्रत्येकाचे चार्लीवर अतोनात प्रेम आहे. त्याच्या काळात हॉलिवूड सृष्टी बहरली. चित्रपटांकडे लोक आकर्षिले गेले. चित्रपटांचे मायाजाल तयार झाले, हेही त्याच्याच कारकिर्दीतच. लहानपणी दारिद्र्याचे चटके खाणारा हा अवलिया सर्वोत्कृष्ट अभिनेता व दिग्दर्शक होतो, ही कथाच अकल्पनीय आहे. शिवाय सर्व अर्थाने ती सामान्य माणसासाठी प्रेरणादायी देखील आहे. लोकांचे मनोरंजन करणे, हे सोपे काम निश्चितच नाही. ज्या काळात नाटकांचा जमाना होता, त्याने लोकांना चित्रपटाकडे वळवले. शिवाय एका परक्या देशामध्ये अमाप प्रसिद्धी त्याला मिळाली. जीवनात त्याने अनेक चढ-उतार बघितले. त्याच्या जीवनात अनेक स्त्रिया प्रवेशकर्त्या झाल्या. त्यातील काही त्याच्या जीवनसाथी देखील बनल्या होत्या. हॉलिवूडच्या आजच्या संस्कृतीची पाळेमुळे कदाचित त्याच काळात रोवली गेली होती, असे म्हणता येईल. चार्लीने मात्र या सर्व प्रवासात अनेक दशके चित्रपटसृष्टीवर अधिराज्य गाजवले. त्याने चित्रपटांमधील निरनिराळे प्रयोग करून प्रेक्षकांचे अफाट मनोरंजन केले. त्यामुळेच तो आज प्रत्येकाला माहित आहे. या क्षेत्रातला ध्रुवतारा म्हणून त्याची ओळख आहे. त्याला जेव्हा ऑस्कर पुरस्कार जाहीर झाला, त्यावेळी सर्व प्रेक्षकवृंदाने उभे राहून सलग बारा मिनिटे टाळ्या वाजवल्या होत्या! हेच त्याच्या कारकिर्दीतले सर्वात मोठे यश होय. अशी मानवंदना अन्य कोणत्याही कलाकाराला आजवर मिळालेली नाही. अमेरिकेतल्या त्याच्या अखेरच्या कालखंडामध्ये कम्युनिस्ट म्हणून शिक्का बसल्याने त्याला मायदेशी परतावे लागले. परंतु त्याच्या कर्तृत्वाने आजही त्याची कर्मभूमी त्याची सातत्याने आठवण काढीत असते. असा अमाप यश मिळवणारा व अलौकिक कार्यसिद्धि साधणारा माणूस यापूर्वी कधी झाला, न पुन्हा होईल!
आज त्याच्या जयंतीनिमित्त या अवलियाला विनम्र अभिवादन!
Thursday, July 9, 2020
हिंदी भाषेत डब झालेला पहिला हॉलीवुड पट
१९६९ मध्ये जे. ली. थॉमसन यांनी दिग्दर्शित केलेला "मेकॅनाज गोल्ड" हा हिंदीत डब झालेला पहिला हॉलीवुडपट होय! "मस्तान का सोना" या नावाने तो हिंदीत भाषांतरीत झाला होता. एका हरवलेल्या सोन्याची थरारक कहाणी त्यात चित्रीत करण्यात आलेली होती. या चित्रपटानंतर १३-१४ वर्षांनी भारतात हॉलीवूड चित्रपट डब करण्याची परंपरा वेग घेऊ लागली. "मस्तान का सोना" हा चित्रपट आज कुठेही उपलब्ध नाही. गुगलवर तुम्ही शोधलं तरी सापडणार नाही. परंतु फ्लिपकार्टवर मात्र त्याची डीव्हीडी होती. पण, आता तीही आऊट ऑफ स्टॉक आहे!


