मी महाराष्ट्राच्या सर्व जिल्ह्यांचा एक सर्वसमावेशक डेटासेट तयार केला आहे, जो आता 'Kaggle' या प्लॅटफॉर्मवर सर्वांसाठी विनामूल्य उपलब्ध आहे.
या डेटासेटमध्ये काय खास आहे?
✅ लोकसंख्या (Population - Census 2011)
✅ साक्षरता दर (Literacy Rate)
✅ क्षेत्रफळ (Area) आणि मुख्यालय (Headquarters)
✅ प्रमुख उद्योग आणि अर्थव्यवस्था (Key Industries)
✅ पर्यटन आणि प्रमुख नद्या (Tourism & Major Rivers)
हा डेटासेट कॉलेज प्रोजेक्ट्स, संशोधन किंवा फक्त आपल्या महाराष्ट्राला अधिक जवळून जाणून घेण्यासाठी तुम्ही वापरू शकता!
🔗 Kaggle लिंक: https://www.kaggle.com/datasets/tusharkute/maharashtra-districts
हा डेटासेट वापरून तुम्ही काय नवीन विश्लेषण किंवा प्रोजेक्ट कराल, हे पाहण्यास मी उत्सुक आहे. नक्की डाउनलोड करा!
#महाराष्ट्र #मराठी #डेटासायन्स #कॅगल #शिक्षण #MaharashtraData #DataAnalytics #MarathiTech #Nashik #Nagpur
Sunday, August 10, 2025
महाराष्ट्राच्या सर्व जिल्ह्यांचा एक सर्वसमावेशक डेटासेट
Sunday, March 30, 2025
गौतमीपुत्राचा विजयोत्सव
मराठी नववर्षाचा पहिला दिवस अर्थात गुढीपाडवा. हा दिवस का साजरा केला जातो, याविषयी समाजमाध्यमांवर विविध पोस्टच्या माध्यमातून वेगवेगळी माहिती प्रसारित होताना दिसते. अनेकांनी याला हिंदू नववर्षाचे नाव देखील दिलेले आहे. खरं पाहिलं तर गुढी उभारण्याची परंपरा फक्त महाराष्ट्राच्या अर्थात मराठी भाषिकांच्या प्रदेशांमध्येच दिसून येते. यासाठी कोणतेही धार्मिक कारण नाही. समाजमाध्यमांवरील विविध पोस्टमध्ये नानाविध भोळीभाबडी कारणे दिसून आली. तेव्हा महाराष्ट्राच्या प्राचीन इतिहासावर संशोधन करणाऱ्या काही महत्त्वाच्या संशोधकांच्या पुस्तकांचा मी संदर्भ घेतला. आणि त्यामधील माहितीच प्रमाण मानावी अशी दिसून आली.
सातवाहन राजवंश म्हणजे महाराष्ट्राचा निर्माणकर्ता. त्यांच्या साडेचारशे वर्षांच्या कारकिर्दीमध्ये महाराष्ट्राची सांस्कृतिक जडणघडण झाली. याच राजवंशातील विसावा राजा म्हणजे गौतमीपुत्र सातकर्णी होय. ज्याने इसवी सन ७८ मध्ये शकांचा पराभव केला. त्याच वर्षापासून शालिवाहन शक सुरू झाला. हे इतिहास संशोधकांनी सप्रमाण सिद्ध केले आहे. अर्थात इतिहास संशोधकांच्या प्रत्येक पुस्तकांमध्ये हीच गोष्ट नमूद केलेली दिसते. गौतमीपुत्र सातकर्णीचा विजयोत्सव आपण मागील १९४७ वर्षे साजरा करत आलेलो आहोत. ९९ टक्के पेक्षा अधिक मराठी लोकांना सातवाहनांच्या या राजाचे नाव देखील कदाचित माहीत नसावे. यानिमित्ताने एक गोष्ट मात्र अधोरेखित झाली की, गुढीपाडवा हा मराठी मातीतील खराखुरा मराठमोळा सण आहे.
सर्वांना गुढीपाडव्याच्या मनःपूर्वक शुभेच्छा.
— तुषार व कुटे.
संदर्भ:
१. मुसलमानपूर्व महाराष्ट्र, लेखक वासुदेव कृष्ण भावे, वरदा प्रकाशन, पान क्रमांक १८
२. महाराष्ट्राची कुळकथा, लेखक डॉ. मधुकर केशव ढवळीकर, राजहंस प्रकाशन, पान क्रमांक ८५
३. सातवाहनकालीन महाराष्ट्र ,लेखक रा. श्री. मोरवंचीकर, प्रतिमा प्रकाशन, पान क्रमांक ७१
४. जुन्नरच्या परिसरात, लेखक प्र. के. घाणेकर, स्नेहल प्रकाशन, पान क्रमांक १९९
५. Junnar Inscriptions, Author: Shobhana Gokhale, Page No. 17
Thursday, March 6, 2025
सेतूमाधवराव पगडी यांची पुस्तके
इतिहास हा इतिहासकारांच्या नजरेतून वाचला की तो अधिक चांगला समजतो. त्यांची इतिहासाकडे पाहण्याची शास्त्रशुद्ध दृष्टी आपल्या दृष्टीत देखील बदल घडवून आणते.
त्यातही तटस्थ दृष्टी असणारे इतिहासकार विरळाच. महान इतिहासकार सेतूमाधवराव पगडी हे अशाच इतिहासकारांपैकी एक. महाराष्ट्राच्या इतिहासावर त्यांनी लिहिलेली पुस्तके इतिहासाची रम्य सफर घडवून आणतात. आणि आपल्याला इतिहास शिकवतात देखील. अशीच काही पुस्तके मागच्या काही दिवसांमध्ये वाचनात आली. ती तुम्हाला देखील निश्चित आवडतील. शिवाय आपल्या अज्ञात पण गौरवशाली इतिहासाची ओळख देखील करून देतील.
छत्रपती शिवाजी
https://amzn.eu/d/aVbTAHs
छत्रपती नि त्यांची प्रभावळ
https://amzn.eu/d/2nPiuHy
महाराष्ट्र आणि मराठे
https://amzn.eu/d/iFsOcZr
इतिहासाचा मागोवा
https://amzn.eu/d/gQX5HaW
पानिपतचा संग्राम
https://amzn.eu/d/49epGfA
कावेरी खोऱ्यातील यक्षनगरी
https://amzn.eu/d/bsdlcHJ
बहु असोत सुंदर
https://amzn.eu/d/2itHNys
वरंगलचे काकतीय राजे
https://amzn.eu/d/fdeN4OH
--- तुषार भ. कुटे
#मराठी #इतिहास #मराठा #छत्रपती #छत्रपती_शिवाजी_महाराज #पुस्तक #पुस्तके #महाराष्ट्र
Saturday, April 29, 2023
महाराष्ट्र शाहीर
चरित्रपट ही संकल्पना आता नवी राहिलेली नाही. बहुतांश चरित्रपट हे डॉक्युमेंटरी पद्धतीने सादर केले जातात. परंतु केदार शिंदे दिग्दर्शित हा चरित्रपट खऱ्या अर्थाने "चित्रपट" आहे. शाहीर साबळे यांच्या बालपणापासून ते कारकिर्दीच्या सर्वोच्च टप्प्यापर्यंतचा एकंदरीत प्रवास यामध्ये दाखविण्यात आलेला आहे. लहानपणीचा कृष्णा आणि त्याचा संघर्ष मनाला विशेष भावतो. संघर्षातूनच मार्ग निघत असतो. किंबहुना मनुष्य देखील घडत असतो. हा संदेशच कृष्णा आपल्याला देऊन जातो. स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये शाहीर साबळे यांनी आंतरजातीय प्रेमविवाह केला होता, ही अतिशय आश्चर्यकारक घटना होती! यातूनच त्यांच्या एकंदरीत व्यक्तिमत्त्वाचा अंदाज येतो. त्यांना तोडीस तोड जोडीदार मिळाल्यानंतर खऱ्या अर्थाने यशाचा आलेख प्रगतीच्या दिशेने जातो. आणि मग ते मागे पाहत नाहीत. पण या मागे न पाहण्यामध्ये जवळच्या व्यक्तींचा देखील समावेश होतो. त्यातून नाती तुटली जातात आणि नवी नाती देखील जोडली जातात.
एकंदरीत चित्रपटातून खरेखुरे शाहीर साबळे डोळ्यासमोर उभे राहतात. यात अंकुश चौधरी बरोबरच दिग्दर्शक केदार शिंदे यांचे देखील योगदान आहे. अजय-अतुल यांचे संगीत आणि पार्श्वसंगीत देखील चित्रपटाला एकंदरीत साजेसेच आहे. चित्रपटातील गीते आज बहुतांश मराठी लोकांना पाठ देखील झालेली आहेत. त्याकरिता वेगळे सांगायला नको.
भूतकाळातील अनेक घटना दाखवताना दिग्दर्शकाच्या अतिशय छोट्या चुका झालेल्या आहेत. पण त्या फारशा लक्षात येण्यासारख्या नाहीत. भानुमतीची भूमिका करणाऱ्या सना शिंदेच्या ऐवजी दुसरी एखादी अभिनेत्री चालू शकली असती. तिचा पहिलाच चित्रपट असल्याने काही बाबी आपण दुर्लक्षित करू शकतो. काही घटना वेगाने पुढे सरकतात पण चित्रपटाची लांबी योग्य ठेवण्यासाठी कदाचित तसे केले गेले असावे.
एकंदरीत केदार शिंदे यांनी एक उत्तम चरित्रकृती सादर केलेली आहे. मराठी मातीवर प्रेम करणाऱ्या प्रत्येकाने ती एकदा तरी पहावीच.
Thursday, October 6, 2022
महाराष्ट्रात या आणि हिंदी शिका
ग्रामीण भागातील एका 'एमआयडीसी'मधील कंपनीत आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे माझे दिवसभराचे सत्र होते. संध्याकाळी ते संपले त्यानंतर सहभागी कर्मचाऱ्यांपैकी एक जण मला भेटायला आला. तो केरळमधून अडीच वर्षांपूर्वी कामाच्या निमित्ताने महाराष्ट्रामध्ये आला होता. शिवाय मी त्याच्याशी पूर्णपणे इंग्रजीत बोलत असलो तरी त्याचे माझ्याशी बऱ्यापैकी संभाषण हिंदी भाषेतून चालू होते. याचे मला आश्चर्य वाटले. म्हणून उत्सुकता म्हणून मी त्याला विचारले,
"Generally, Tamil and Malayalam people don't study and understand Hindi language. How can you speak Hindi so well?"
तर तो म्हणाला, "मेरे को केरला मे ढाई साल पहले हिंदी नही आती थी. यहा महाराष्ट्र मे आके हिंदी सीखी है!"
यावर मी त्याला विचारले, "So people around you are North Indians?"
माझा प्रश्न ऐकून तो किंचितसा हसला आणि बोलू लागला, "यहा के सभी लोग मराठी ही है लेकिन वो मुझसे हिंदी मे ही बोलते है. इस वजह से मुझे हिंदी आती है."
त्याचे बोलणे माझ्यासाठी धक्कादायक होते. पुणे जिल्ह्यातल्या एका ग्रामीण भागामध्ये राहणारा दक्षिण भारतीय माणूस अडीच वर्षांमध्ये उत्तम हिंदी बोलू शकतो. परंतु मराठीचा त्याला गंध देखील नव्हता. त्याच्याशी आजूबाजूचे सर्व मराठी लोक हिंदीमध्ये संभाषण साधायचे. ज्या भाषेला मल्याळम लोक काडीचीही किंमत देत नाही, ती भाषा मराठी लोकांनी या व्यक्तीला शिकवली होती.
खरंतर आपल्याच भाषेला तुच्छ समजणाऱ्या मराठी लोकांसाठी हा एक धडा आहे. समोरच्याला मराठी समजत नसेल तर थेट हिंदीत संभाषण करून आपलेच लोक आपल्या भाषेला दुय्यम दर्जा देताना दिसतात. पूर्वी मुंबई शहरामध्ये असणारे मराठीच्या अनासक्तीचे लोन आता हळूहळू महाराष्ट्रात इतरत्र देखील पसरताना दिसत आहे. महाराष्ट्राच्या राजेभाषेच्या भविष्यासाठी ही सर्वात मोठी धोक्याची घंटा आहे.
मराठी लोकांनो वेळीच सावध व्हा आपली भाषा आपल्याच राज्यात मरत आहे. त्याला जबाबदार पण आपणच आहोत.
Saturday, May 28, 2022
जुन्नरच्या परिसरात - प्र. के. घाणेकर
भटकंतीची खरी मजा पावसाळ्यातच येते. महाराष्ट्रात पावसाळ्यामध्ये भटकंती करायची असल्यास अगणित पर्याय उपलब्ध आहेत. सह्याद्रीच्या डोंगररांगांमधील घाटवाटा, धबधबे, धरणे, नद्या, किल्ले ही #महाराष्ट्र पर्यटनाच्या हृदयस्थानी आहेत! पावसाळ्यात महाराष्ट्राबाहेरून देखील पर्यटक मोठ्या प्रमाणामध्ये इथे पर्यटनासाठी येत असतात. आपल्या येथील धार्मिक स्थळ देखील वर्षा पर्यटनस्थळ म्हणून ओळखले जाते.
लवकरच पावसाळा सुरू होत आहे. त्यामुळे पावसात पर्यटनाची अनुभूती घेण्यासाठी पर्यटक पावसाची चातकासारखी वाट पाहत आहेत. #जुन्नर हा आमचा महाराष्ट्राचा पहिला घोषित केलेला पर्यटन तालुका होय. #शिवजन्मस्थान म्हणून जुन्नरची जगभरात ओळख आहेच. परंतु त्याहीपेक्षा महाराष्ट्र संस्कृतीचे दर्शन घडवणारी अनेक ठिकाणे तसेच पावसाळी पर्यटन स्थळे या भागांमध्ये वसलेली आहेत. सुमारे दहा #घाटवाटा, चार धरणे, पाच नद्या, सात किल्ले आणि उंच डोंगरांवरून कोसळणारे असंख्य धबधबे जुन्नरच्या परिसरात पाहता येतात. पावसाळ्यामध्ये जुन्नरचा निसर्ग सह्याद्रीतल्या मनमोहक सौंदर्याची उधळण करीत असतो.
अनेकांना या परिसरामध्ये नक्की कोणकोणती पर्यटन स्थळे आहेत, याची माहिती नसते. शिवाय सोशल मीडियाद्वारे जुजबी माहिती घेऊन अनेक जण भटकंती करतात. या सर्वांसाठी मार्गदर्शक असणारे हे #पुस्तक ज्येष्ठ दुर्ग अभ्यासक प्र. के. घाणेकर यांनी लिहिलेले आहे. जुन्नरच्या परिसरात असणाऱ्या सुमारे ५० विविध पर्यटन स्थळांविषयी त्यांनी या पुस्तकामध्ये विस्तृत माहिती दिलेली आहे. आम्ही स्वतः जुन्नरचे असलो तरी बरेचदा याच पुस्तकाचा संदर्भ घेऊन भ्रमंती केलेली आहे. शिवाय अनेक स्थळांना मधील अगदी छोट्या छोट्या गोष्टी देखील त्यांनी या पुस्तकात नमूद केलेल्या दिसतात.
Ⓒ Ⓐ तुषार भ. कुटे
Thursday, February 13, 2020
प्लास्टिक पासून मुक्ती
Sunday, August 26, 2012
Bits about Nashik
![]() |
Nashik City- Godavari |