Showing posts with label anthropology. Show all posts
Showing posts with label anthropology. Show all posts

Tuesday, August 4, 2026

माउंट एव्हरेस्टवरील जीवाष्म

आज माउंट एव्हरेस्ट हे पृथ्वीवरील सर्वात उंच पर्वत म्हणून ओळखले जाते. समुद्रसपाटीपासून त्याची उंची सुमारे ८,८४९ मीटर आहे. मात्र, त्याच्या शिखराजवळील खडकांवर एक विलक्षण रहस्य सापडते. या खडकांमध्ये प्राचीन समुद्रात राहणाऱ्या सजीवांचे जीवाश्म (फॉसिल्स) आढळतात. हे जीवाश्म सुमारे ४७ कोटी वर्षांपूर्वीचे आहेत. यावरून स्पष्ट होते की, आज एव्हरेस्टच्या शिखरावर असलेले काही खडक एकेकाळी समुद्राच्या तळाशी तयार झाले होते. त्या वेळी हिमालयाचे अस्तित्वही नव्हते.
एव्हरेस्टच्या शिखरावरील खडकांमध्ये ब्रॅकिओपॉड, ट्रायलोबाइट, क्रिनॉइड आणि ऑस्ट्रॅकोड यांसारख्या सागरी जीवांचे अवशेष सापडले आहेत. शिखरावरील चुनखडीच्या खडकांना "कोमोलांग्मा लाइमस्टोन" असे म्हणतात. या खडकांमध्ये सुमारे ४७ कोटी वर्षांपूर्वीच्या समुद्री जीवांचे अवशेष जतन झालेले आहेत. त्या काळी हा भाग उंच पर्वतरांग नसून प्राचीन समुद्राचा तळ होता.
हे जीवाश्म पृथ्वीच्या इतिहासाबद्दल महत्त्वाची माहिती देतात. हे खडक समुद्रातील गाळापासून तयार झाले होते. लाखो-कोट्यवधी वर्षे हा गाळ दाबला गेला आणि त्याचे चुनखडीसारख्या खडकांमध्ये रूपांतर झाले. या प्रक्रियेमुळे त्या काळातील समुद्री जीवांचे अवशेष खडकांमध्ये सुरक्षित राहिले.
यानंतर पृथ्वीच्या टेक्टॉनिक प्लेट्सच्या हालचालींमुळे या प्रदेशात मोठे बदल घडले. त्या काळी भारत आणि युरेशिया यांच्या दरम्यान टेथिस नावाचा विशाल समुद्र होता. भारतीय प्लेट हळूहळू उत्तरेकडे सरकत गेली. त्यामुळे भारत आणि युरेशिया यांच्यामधील टेथिस समुद्र अरुंद होत गेला आणि शेवटी पूर्णपणे बंद झाला.
सुमारे ४ ते ५ कोटी वर्षांपूर्वी भारतीय आणि युरेशियन भूभागांची टक्कर झाली. दोन्हीही खंडीय प्लेट्स असल्यामुळे एक प्लेट दुसऱ्याखाली सहज जाऊ शकली नाही. त्यामुळे पृथ्वीचे कवच दाबले गेले, वाकले आणि जाड झाले. या प्रचंड दाबामुळे मोठमोठे खडक वर उचलले गेले आणि त्यातून हिमालय पर्वतरांग निर्माण झाली.
ही प्रक्रिया लाखो वर्षे सुरू राहिली. त्यामुळे समुद्राच्या तळाशी तयार झालेले खडक हजारो मीटर उंचीवर पोहोचले. त्यांपैकी काही खडक आजच्या माउंट एव्हरेस्टचा भाग बनले. त्यामुळे एव्हरेस्टमध्ये सापडणारे समुद्री जीवाश्म हे समुद्राच्या तळापासून जगातील सर्वात उंच पर्वतापर्यंत झालेल्या या अद्भुत प्रवासाची साक्ष देतात.
हिमालयाची निर्मिती अजूनही पूर्ण झालेली नाही. भारतीय प्लेट आजही उत्तरेकडे सरकत आहे आणि तिची युरेशियन प्लेटशी टक्कर सुरूच आहे. दुसरीकडे हिमनद्या, नद्या, वारा आणि पाऊस यांमुळे पर्वतांचे सतत झिजणेही सुरू असते. त्यामुळे हिमालयाचा आकार हा एका बाजूला पर्वत उंचावण्याच्या प्रक्रियेने आणि दुसऱ्या बाजूला झिजण्याच्या प्रक्रियेने सतत बदलत राहतो.
एव्हरेस्टमध्ये सापडणारे समुद्री जीवाश्म आपल्याला पृथ्वी सतत बदलत असल्याची जाणीव करून देतात. जे खडक एकेकाळी समुद्राच्या तळाशी होते, ते आज कोट्यवधी वर्षांनंतर समुद्रसपाटीपासून जवळपास ९ किलोमीटर उंच पर्वताचा भाग बनले आहेत. जी गोष्ट माणसाला कायमस्वरूपी वाटते, ती भूगर्भशास्त्राच्या दृष्टीने पृथ्वीच्या अत्यंत दीर्घ आणि सतत सुरू असलेल्या इतिहासातील केवळ एक छोटा टप्पा आहे.


 

Monday, March 30, 2026

मानवी उत्क्रांतीचा नवा शोध: एका छोट्याशा दाताने बदलला इतिहास

मानवाची उत्पत्ती कशी झाली आणि माणूस आजच्या रूपात कसा आला, हा नेहमीच आपल्या सर्वांच्या कुतूहलाचा विषय राहिला आहे. नुकताच शास्त्रज्ञांना इथिओपियामध्ये असा एक जुना दात सापडला आहे, ज्याने मानवी उत्क्रांतीच्या इतिहासाबाबतच्या जुन्या समजुतींना पूर्णपणे छेद दिला आहे.


ईशान्य इथिओपियाच्या अफार प्रदेशातील 'लेडी-गेरारू' या ठिकाणी संशोधकांना सुमारे २६ लाख वर्षांपूर्वीचे काही जीवाश्म सापडले आहेत. यात प्रामुख्याने काही दातांचा समावेश आहे. या दातांच्या सखोल अभ्यासातून ऑस्ट्रेलोपिथेकस (Australopithecus) या मानवाच्या पूर्वजांच्या कुळातील एका पूर्णपणे नवीन प्रजातीचा शोध लागला आहे.
या दातांचा आकार, त्यांची ठेवण आणि त्यांची झालेली झीज पाहता, या प्रजातीचा आहार आणि राहणीमान 'लुसी' सारख्या इतर जुन्या प्रजातींपेक्षा खूप वेगळे होते, हे स्पष्ट झाले आहे.
हा शोध केवळ एका नवीन प्रजातीपुरता मर्यादित नाही, तर तो मानवी उत्क्रांतीच्या सिद्धांताला एक नवीन दिशा देणारा आहे. यातील सर्वात आश्चर्यकारक बाब म्हणजे, ही नवीन सापडलेली प्रजाती एकटीच राहत नव्हती, तर ती आपल्या स्वतःच्या म्हणजेच होमो (Homo) कुळातील सुरुवातीच्या मानवी पूर्वजांच्या बरोबरीने जगत होती.
आजवर असा समज होता की मानवी उत्क्रांती एका सरळ रेषेत झाली, म्हणजेच एका प्रजातीतून दुसरी प्रजाती क्रमाने निर्माण झाली. पण या शोधामुळे हा समज खोटा ठरला आहे. सुमारे २६ लाख वर्षांपूर्वी दोन वेगळ्या प्रकारचे मानव-पूर्वज एकाच परिसरात राहत होते आणि जगण्यासाठी तसेच अन्नासाठी एकमेकांशी स्पर्धा करत होते, हे आता सप्रमाण सिद्ध झाले आहे.
'लेडी-गेरारू' या ठिकाणी सापडलेल्या या पुराव्यांनी हे दाखवून दिले आहे की मानवी उत्क्रांतीचे झाड हे एका सरळ खोडासारखे नसून, त्याला अनेक फांद्या होत्या. मानवाचा विकास होण्याचा हा प्रवास अजिबात एकाकी आणि सोपा नव्हता. त्या काळातही वेगवेगळ्या प्रजातींची गर्दी होती, जगण्यासाठी जीवघेणी स्पर्धा होती आणि अनेक प्रजाती एकत्र नांदत होत्या. एका छोट्याशा दाताने उलगडलेले हे रहस्य मानवाच्या जन्माची कथा अधिकच रंजक बनवते.

(आधारित)

--- तुषार भ. कुटे

Sunday, June 19, 2022

'सजीवांचा नामदाता: कार्ल लिनियस' - उमेश करंबेळकर

मानववंशशास्त्राचा अभ्यास करत असताना आपल्याला होमो सेपियन अस हे नाव नक्की कोणी दिले असावं? असा प्रश्न पडला होता. त्याचे उत्तर देखील मी शोधले होते. तो नामदाता होता, कार्ल लिनियस!
परंतु त्याच्याविषयी अगदीच जुजबी माहिती काही पुस्तकांमध्ये उपलब्ध होती. तीदेखील सारांश रूपामध्ये. अच्युत गोडबोले यांच्या 'किमयागार' या पुस्तकामध्ये लिनियसवर एक पूर्ण प्रकरण लिहिलेले सापडले. त्यातून बरीचशी माहिती मिळाली. शिवाय दीपा देशमुख लिखित 'जग बदलणारे ग्रंथ' या पुस्तकामध्ये जग बदलणाऱ्या पन्नास ग्रंथामध्ये कार्ल लिनियस लिखित 'सिस्टिमा नॅचुरी' या पुस्तकाचा समावेश केलेला आढळला. तेव्हा लिनियस नक्की कोण होता? याविषयी कुतूहल जागृत झाले. म्हणूनच डॉ. उमेश करंबेळकर लिखित 'सजीवांचा नामदाता: कार्ल लिनियस' हे पुस्तक वाचायला घेतले आणि लिनियस नावाच्या वादळाची कहाणी समजून आली.
जगामध्ये पशु, पक्षी, कीटक, जलचर, फळझाडे, फुलझाडे, वृक्ष, वेली अशाच प्रकारचे सजीवांचे गट पाडले जातात. परंतु प्रत्यक्षात लाखो प्रकारचे सजीव या पृथ्वीवर अस्तित्वात आहेत. त्यातील अजूनही काही सजीवांशी मनुष्याचा संपर्क झालेला नाही. एवढ्या मोठ्या प्रमाणात असलेल्या सजीवांची वर्गवारी करणारा शास्त्रज्ञ म्हणजे कार्ल लिनियस होय! त्याने सजीवांचा हा पूर्ण पसारा एका सिस्टीममध्ये मांडला. शिवाय त्या प्रत्येकाला नाव दिलं. त्याचं वर्गीकरण केलं. त्यातूनच सजीवांच्या जातीची ओळख झाली. ही नामकरण पद्धत जीवशास्त्राने कायमची स्वीकारलेली आहे. म्हणूनच काल लिनियस याला 'सजीवांचा नामदाता' असे म्हटले जाते.
स्विडन म्हटलं की विज्ञानविश्वाला आठवतो तो 'अल्फ्रेड नोबेल'. याच स्वीडनमध्ये तीनशे वर्षांपूर्वी कार्ल लिनियसचा जन्म झाला. पहिल्यापासूनच तो निसर्ग वेडा होता. त्याने वनस्पती संशोधनासाठी केलेली लॅपलँड या स्वीडनमधील जंगलाची सफर मात्र अद्भुत आणि रोमहर्षक अशीच होती. आजही आपण कोणी भारतातल्या जंगलांमध्ये इतके दिवस एकट्याने सफर करू शकत नाही. त्यामुळे लिनियसची ही भटकंती धाडसी अशीच म्हणता येईल. आपल्या आयुष्यातील अनेक दशके त्याने निरनिराळ्या सजीवांचा शोध घेतला व त्यांचे वर्गीकरण केले. त्यासाठी त्याने भटकंती देखील मोठ्या प्रमाणात केली. एका अर्थाने तो आपल्या जीवनातील ध्येयाने प्रेरित झालेला होता. शिवाय त्याला अनेक संशोधक शिष्यदेखील लाभले. याच शिष्यांनी जगभरामध्ये प्रवास करून विविध देशांतील जंगलांमधून वनस्पतींचे नमुने गोळा करून त्याला दिले. लिनियसचे शिष्य जगातील जवळपास प्रत्येक जंगलांमधून भटकले होते. याच कारणास्तव त्याचे 'सिस्टीमा नॅचुरी' हे परिपूर्ण पुस्तक तयार झाले. त्याची पहिली आवृत्ती १३ पानांची तर तेरावी आवृत्तीत तेवीसशे पानांची तयार झाली होती. अशा या ध्येयवेड्या वनस्पतीशास्त्रज्ञाचा प्रवास सांगणारं हे पुस्तक, 'सजीवांचा नामदाता: कार्ल लिनियस'!


 

Tuesday, June 14, 2022

पृथ्वीवर माणूस उपराच - डॉ. सुरेशचंद्र नाडकर्णी

विज्ञानविश्वामध्ये वाद आणि प्रतिवाद चालूच असतात. जोपर्यंत एखादी गोष्ट पूर्णपणे १००% पुराव्यानिशी सिद्ध होत नाही, तोपर्यंत विज्ञानामध्ये त्या गोष्टीला अनेक अस्पष्ट बाबी घेरलेल्या असतातच. मानवाची पृथ्वीवरील उत्क्रांती हादेखील असाच एक बहुसंशोधनाचा विषय आहे. उत्क्रांतीचा सिद्धांत व त्यातील 'मिसिंग लिंक्स'चा आधार घेऊन इंग्रजीमध्ये तसेच मराठीमध्ये देखील पुस्तके लिहिली गेली आहेत. त्यातीलच डॉ. सुरेशचंद्र नाडकर्णी यांनी लिहिलेले हे पुस्तक, 'पृथ्वीवर माणूस उपराच'.
याच विषयावर बाळ भागवत यांचं देखील पुस्तक उपलब्ध आहे. ते पुस्तक वाचले तेव्हा अनेकांनी मला नाडकर्णी यांच्या या पुस्तकाविषयी देखील सुचवलं होतं. तसं पाहिलं तर दोन्ही पुस्तकांचा गाभा हा एकच आहे. तसेच त्यामध्ये नमूद केलेल्या काही घटना व गोष्टी देखील सारख्याच जाणवतात. पृथ्वीवर आज अतीप्रगत झालेला मानवप्राणी हा मूळचा पृथ्वीवरील नाहीच, या सिद्धांताला पुष्टी देण्यासाठी केलेला अभ्यास या पुस्तकामध्ये विस्कटून सांगितलेला आहे.
पृथ्वीवर फार वर्षांपूर्वी अस्तित्वात असणाऱ्या अनेक संस्कृतींचा तसेच त्या संस्कृतीमध्ये तयार झालेल्या रचनांचा अभ्यास करून अनेक अतिमानवी गोष्टींचा उहापोह या पुस्तकामध्ये केलेला आढळतो. अशा अनेक प्रश्नांची शास्त्रीय उकल आजही मनुष्यप्राण्याला करता आलेली नाही. यामुळेच उत्क्रांतिवादाचा सिद्धांत अजूनही १००% शास्त्रज्ञांनी स्वीकारलेला नाही! हजारो वर्षांपूर्वी पृथ्वीवर तयार झालेल्या किंबहुना तयार केल्या गेलेल्या रचना या आजदेखील प्रगत मानवाला तयार करणे शक्य नाही. मग त्यांचा उगम झाला तरी कसा? या प्रश्नाचे उत्तर लेखकाने अप्रत्यक्षरीत्या दिलेले आहे. माणसाची उत्क्रांती या पृथ्वीवर झालेली नाहीच. तो दुसऱ्या ग्रहावरून पृथ्वीवर आलेला आहे! मानव प्राण्यांमध्ये आणि अन्य प्राण्यांमध्ये असलेले छोटे छोटे फरक व त्यांचे विवेचन यास निष्कर्षापर्यंत पोहोचत असल्याचे लेखक म्हणतात. अर्थात ही संशोधकांची एक बाजू आहे. ती समजून घेणे देखील तितकेच गरजेचे वाटते. हजारो वर्षांपूर्वी इजिप्तमध्ये तयार केले गेलेले पिरॅमिड्स आणि पॅसिफिक महासागरातील ईस्टर आयलँडवर तयार केलेल्या भल्यामोठ्या मानवी आकृती यांचे गूढ अजूनही आजच्या वैज्ञानिकांना शोधता आलेले नाही. याच कारणास्तव हजारो वर्षांपूर्वीचा मानव कसा होता? या प्रश्नाचे उत्तर आजही तंतोतंत मिळत नाही. यावर आणखी खोलात जाऊन संशोधन होणे निश्चितच गरजेचे वाटते. तरच याविषयी अवैज्ञानिकपणे बोलणारी तोंडे बंद होतील!



 

Tuesday, May 24, 2022

मानववंशशास्त्र

आपण अर्थात मानव या पृथ्वीवर कसे आलो व आपली प्रगती नक्की कशी झाली? हा प्रश्न वर्षानुवर्षे जिज्ञासू वृत्ती असणाऱ्या मानवाला पडलेला होता. देव नावाच्या एका संकल्पनेने त्या प्रश्नाचे उत्तर मानवाने स्वतःलाच देऊन टाकले. परंतु काही शतकांपूर्वी चार्ल्स डार्विन नावाच्या व्यक्तीने शास्त्रशुद्ध उत्तर आपल्याला दिले आहे. ते उत्तर म्हणजे 'मानवी उत्क्रांतीचा सिद्धांत'. या सिद्धांतामुळे मानववंशशास्त्र नावाची नवीन विज्ञान शाखा चालू झाली. उत्क्रांती या विषयाभोवती होणाऱ्या संशोधनाला वेग आला. आणि अद्भुत अशी माहिती विज्ञानाने जगासमोर आणली.
शालेय जीवनात शिकत असताना या शास्त्राची माहिती आपल्याला पहिल्यांदा होते. परंतु सारांश इतकाच लक्षात राहतो की, फार पूर्वी माणूस माकड होता आणि आज माकडाचा मानव तयार झाला! यापुढे आपण जात नाही. परंतु, मानववंशशास्त्र ही विज्ञानाची एक अद्भुत अशी शाखा आहे, जी मानवाच्या या उत्क्रांतीचं सविस्तर उत्तर देते. त्याबद्दल आपण जितकं वाचू तितकं कमीच वाटतं. किंबहुना त्याबद्दलची जिज्ञासा अधिक वेगाने वाढू लागते. विज्ञानविश्वामध्ये रमत ठेवण्याची ताकद या शास्त्रामध्ये आहे. मागच्या काही वर्षांमध्ये या विषयांवर भाष्य करणारी व माहिती देणारी विविध लेखकांची पुस्तके वाचून काढली. तरीही जिज्ञासा थांबायचं नाव घेत नाही. या अद्भुत जगापासून अलिप्त देखील राहता येत नाही, अशी सध्या परिस्थिती आहे.

Ⓒ Ⓐ  तुषार भ. कुटे


 

Thursday, March 26, 2020

फार फार वर्षांपूर्वी

फार वर्षांपूर्वी म्हणजे सुमारे लाखो व कोटी वर्षांपूर्वीची ही गोष्ट आहे. एका गोष्टीत रहस्य आहे, गुढ आहे, विज्ञान आहे, संशोधन आहे शिवाय उत्तरही आहेत. निरंजन घाटे यांचे हे पुस्तक अशाच लाखो-करोडो वर्षांपासून पडलेल्या विविध प्रश्नांची वैज्ञानिक उत्तरे आपल्याला देतं. निरंजन घाटे हे हाडाचे विज्ञानलेखक. त्यामुळे विज्ञानाच्या दृष्टिकोनातून त्यांनी लिहीलेले सर्वच लेख आपल्याला मानववंशशास्त्र, पुराणवास्तुशास्त्र, हवामान शास्त्र व इतिहासाची माहिती करून देतात. पृथ्वीचा इतिहास हा करोडो वर्षांचा असला तरी बहुतांशी तो फक्त मागील दोन हजार वर्षांचाच पुस्तकात मांडलेला दिसतो. परंतु, तत्पूर्वी मनुष्य जीवन कसे होते? व त्यांनी प्रगतीची पावले कशी पुढे टाकली? याचे वर्णन निरंजन घाटे यांनी या पुस्तकात केले आहे. मानववंशशास्त्र व पुरातनवास्तूशास्त्र या विज्ञानशाखा किती सखोल आहे, त्याची प्रचिती हे पुस्तक देतं. संशोधन कसं करावं व त्याला किती विविध पैलू असू शकतात? या प्रश्नांची उत्तरेही आपल्याला विविध घटनांतून मिळतात. पुस्तकातील काही महत्त्वाच्या मुद्द्यांना याठिकाणी मांडत आहे.
  • पुरातन काळी मनुष्य हा मांसाहारी, शाकाहारी होता की प्रेताहरी? याचं सप्रमा स्पष्टीकरण त्यांनी या पुस्तकात दिलं आहे.
  • आदिमानवाचा शेती विषयक, पर्यावरण विषयक, आरोग्यविषयक प्रवास कशा प्रकारे झाला?
  • समुद्रात शेकडो मैलांवर असणाऱ्या इस्टर आयलँड वरील पुतळ्यांचं गूढ काय?
  • चंद्रावती नावाचं अतिसुंदर शहर भारतात होतं. परंतु परकीय आक्रमकांनी त्याची नासधूस करून विद्रूप करून टाकलं.
  • उत्खननात सापडलेली हाडे ही मानवशास्त्रात अभ्यास करण्यासाठी सर्वात मोठा पुरावा मानले जातात. त्यांचे महत्त्व व रोमांचकारी इतिहास इथे मांडला आहे.
  • चिली व दक्षिण अमेरिकेत अनेक प्राचीन कलाकृती आहेत. माया संस्कृतीत बनवलेल्या या कलाकृतींचे रहस्य काय?
  • ऑस्ट्रेलियातील डायनासोर्स संशोधन.
  • डायनासोर, ट्रायनोसॉर म्हणजे काय?
  • चीनमधल्या ड्रॅगनच्या हाडांच्या शोधामागचा रोमांचकारी प्रवास.
  • युरोपातल्या प्राचीन अटलांटिस शहराच्या समृद्धीतेची वर्णने आजही केली जातात. ते पाण्याच्या तळाशी स्थित आहे.
  • वृक्षवर्तुळावरून वृक्षांचे वय व त्या काळची हवामान स्थिती ओळखण्याची अचूक शास्त्र.
  • व्हिएतनाम, कंबोडिया मध्ये एकेकाळी हिंदू राजे राज्य करीत होते. परंतु परकीय आक्रमकांमुळे त्यांची संस्कृती लयास गेली. आजही त्यांच्या सांस्कृतिक पाऊलखुणा दोन्ही देशात सापडतात.
  • मानवशास्त्रज्ञ डग्लस औसली यांनी आजवर सर्वाधिक अचूकतेने या विज्ञानाचा वापर करून दाखवला आहे.
  • रेण्विक पुरानशास्त्र म्हणजे काय? त्याचा वापर कसा करता येतो?
  • आदिमाता अर्थात आपल्या सर्वांच्या एकमेव मातेचा शोध कसा घेतला गेला याची कहाणी.
  • आपण सारे होमोसेपियन एकाच आईची लेकरे आहोत. पण आज लाख वर्षानंतर आपापसात कितीतरी भेदभाव तयार झालेत.
  • आफ्रिके पासून अलिप्त असणाऱ्या अमेरिका खंडात मानव पोहोचला कसा? याचे शास्त्रीय उत्तर.
अशा विविध प्रकारची माहिती व त्याची उत्तरे निरंजन घाटे यांनी या पुस्तकात दिली आहेत. पारंपरिक इतिहास व विज्ञानापलीकडे जाऊन वाचण्यासारखे हे निश्चितच वेगळे पुस्तक आहे.