Thursday, December 8, 2022

एआय: द फायनल काउंटडाऊन

इतिहास साक्षीदार आहे की, या पृथ्वीवर एका वेळी केवळ एकाच शक्तिशाली प्राण्याने राज्य केले आहे! ज्याकाळी डायनासोरची या जगावर सत्ता चालू होती, त्या काळात मनुष्यप्राणी अस्तित्वात देखील नव्हता. कदाचित डायनोसॉरच्या विनाशानंतर ही पोकळी भरून काढण्यासाठी होमो सेपिअन्स अवतरले असावेत. मनुष्य प्राण्यांमध्ये देखील कमीत कमी सहा प्रजाती अस्तित्वात होत्या. पण त्यातील केवळ होमो सेपियन्स अर्थात हुशार मानव अर्थात आपण शिल्लक राहिलो आहोत! लाखो वर्षांपूर्वी होमो निअँडर्थल मानव नाहीसा झाला आणि राहिले केवळ होमो सेपियन्स.
एकविसाव्या शतकात मनुष्य स्वतःची नवीन प्रजाती निर्माण करू पाहत आहे, ती म्हणजे होमोनाइड रोबोट्स. आर्टिफिशियल इंटेलिजन्स या तंत्रज्ञानाद्वारे मानवी बुद्धिमत्ता संगणकीय बुद्धिमत्तेमध्ये परावर्तित होताना दिसत आहे. याच कारणास्तव यंत्रे देखील मानवाच्या बुद्धिमत्तेची बरोबरी करायला चालली आहेत. त्यांचा सध्याचा वेग पाहता पुढील काही दशकांमध्येच हुबेहूब मानवासारखा यंत्रमानव तयार होईल, यात शंकाच नाही. एका अर्थाने मनुष्यप्राणी आणि यंत्र प्राणी अशा दोन प्राण्यांचे वर्चस्व पृथ्वीवर तयार होईल. परंतु दोघांमधून राज्य कोण करेल? अर्थात संगणकाद्वारे तयार झालेले यंत्र प्राणी निश्चितच आपल्यापुढे एक पाऊल टाकण्याचा प्रयत्न करतील आणि त्यांची यशस्वी होण्याची शक्यता ९९ टक्क्यांपेक्षा अधिक आहे! म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स लवकरच पृथ्वीवर राज्य करण्याची क्षमता राखून आहे, असं दिसून येतं. या सर्व प्रक्रियेचा उहापोह करणारा हा डॉक्युमेंटरीवजा चित्रपट म्हणजे "एआय: द फायनल काउंटडाऊन".
तसं पाहिलं तर ही एक बोधकथा आहे. या चलचित्रांमधून मनुष्याला बोध घेण्यासारखं बरंच काही आहे. नव्या तंत्रज्ञानामुळे आपण विनाशाकडे तर जात नाही ना? या प्रश्नाचे उत्तर तंत्रज्ञान विकसित करताना शोधण्याची नितांत गरज वाटते. शिवाय कोणतीही गोष्ट नियंत्रणाबाहेर जाऊ नये यासाठी योग्य काळजी घ्यायला हवी, हे देखील तितकेच महत्त्वाचे. तंत्रज्ञानाचा उपयोग मानवी जीवन सुकर आणि सुलभ करण्यासाठी होतो आहे. तरीही त्याच्या वापरातील धोके जर संपूर्ण मनुष्यजगताला विनाशाकडे नेणार असतील तर यावर निश्चितच सखोल विचार करणे गरजेचे आहे.
बाकी चलचित्र आणि त्यातील ॲनिमेशन्स हे उत्तमरीत्या बनवलेली आहेत. एकदा तरी नक्की पहाच!  

Ⓒ Ⓐ  तुषार भ. कुटे


 

No comments:

Post a Comment

to: tushar.kute@gmail.com