Friday, December 30, 2022

काळजुगारी - ऋषिकेश गुप्ते

ही आहे अट्टल जुगारी असणाऱ्या चंदू जुगाऱ्याच्या मुलाची अर्थात काली जुगारी याच्या प्रवासाची गोष्ट. जुगारामध्ये सर्वच गोष्टी अनपेक्षित असतात. अनेकदा नशिबाची साथ लागते. म्हणूनच निकाल माहित असून देखील फासे टाकणाऱ्याला प्रत्येक क्षेत्रात जुगारी म्हटले जाते.
या कथेचा नायक हा एक सर्वसामान्य मुलगा आहे. ज्याची आई अनेक वर्षांपूर्वी घरातून पळून गेलेली आहे आणि बापाने लहानपणापासूनच त्याला 'काळजुगारी' व्हायचय, असं मनामध्ये ठसवायला सुरुवात केली आहे. पण 'काळजुगारी' व्हायचं म्हणजे नक्की काय? हे त्यालाही अजून उमजलेले नाही. त्याच्या बापाने देखील त्याला काही सांगितलेले नाही. तो अनेकदा अनाकलनीय प्रसंगातून जातो. नक्की काय चाललंय, कशासाठी चाललय? याचा उलगडा त्याला होत नाही. परंतु जसजसा काळ पुढे सरकत जातो तसतसे जुगारी आणि 'काळजुगारी' म्हणजे काय, याची माहिती त्याला होत जाते. त्याचा बाप एक अट्टल जुगारी होता आणि त्याचं काळजुगारी होण्याचं स्वप्न होतं. पण ते पूर्ण झाले नाही. म्हणूनच आपल्या मुलाने आपला वारसा पुढे चालवावा व काळजुगारी होण्यासाठी आयुष्य पणाला लावावं, अशी त्याची इच्छा होती.
काली जुगारीचा एका सामान्य मुलापासून काळजुगारी होण्यापर्यंतचा प्रवास लेखक ऋषिकेश गुप्ते यांनी थरारकरित्या या लघुकादंबरीमध्ये चितारला आहे. ही एक विस्मय कथा आहे. वाचायला सुरुवात केल्यावर आपण तिच्यामध्ये पूर्णतः गुंतून जातो. एकंदरीत कथेचं चित्र आपल्यासमोर उभं राहतं. सर्व गोष्टी काल्पनिक असल्या तरी खऱ्याखुऱ्या वाटायला लागतात. यातच या विस्मय-कादंबरीचं आणि लेखकाचंही खरं यश आहे. 



No comments:

Post a Comment

to: tushar.kute@gmail.com