Friday, December 2, 2022

चंद्र आहे साक्षीला - देवेन्द्र पुनसे

या अनुवादित कथासंग्रहाची प्रस्तावना विशेष भावते. त्यात लिहिलेलं आहे की, जॉन शिवर म्हणतो "शॉर्ट स्टोरी इज डेड, लॉँग लिव्ह दि शॉर्ट स्टोरी". समकालीन जीवनाची अस्वस्थता, अगतिकता, अतिरेक यातून साऱ्यांचा वेध घेणारा हा अमेरिन कथाकार कथा या वाङ्मयाबद्दल असे उदात्तपणे आपले मत मांडतो. कथा मृत झाली आहे. कथा चिरायू होवो, असे विधान करताना तो कथा या वाङ्मय प्रकाराचे चिरंतन सार सांगून जातो. सत्य हे आहे की, या पृथ्वीवर राहणाऱ्या प्रत्येक मानवी जीवनाची स्वतःची एक कथा असते. पृथ्वीवर पहिला मानव अवतरला तो ही स्वतःची एक कथा घेऊनच. तेव्हा मानव व कथा यांचे नाते चिरंतन नाही अतूट आहे! कथा ही मानवाच्या जीवनातील प्राण आहे, असे म्हणणे जास्त संयुक्तिक ठरते. जगाचा प्रारंभ हीसुद्धा कथाच आहे. अगदी पाषाणयुगातील मानवापासून आजच्या महासंगणकीय युगापर्यंत कथा आपली सोबत करीत आहे.
या कथेला किंबहुना जागतिक कथेचे एक सारांशरुपी चित्रण करणारा हा छोटेखानी कथासंग्रह आहे. जागतिक साहित्यामध्ये कथा हा प्राचीन साहित्य प्रकार मानला जातो. पूर्वी कथाकथनाचा रूपात तो नांदत होता. आजचा कथालेखन हा त्यानंतरचा महत्त्वपूर्ण टप्पा. जगातील विविध देशांमधील प्रतिभासंपन्न कथाकारांच्या कथा या कथासंग्रहामध्ये लेखकाने एकवटविलेल्या आहेत. प्रत्येकाची शैली, रचना, मांडणी वेगवेगळी आहे. त्यातून सदर लेखकाच्या अन्य कथा कशा असतील, याची देखील प्रचिती येते. एडगर ॲलन पो, सर आर्थर कॉनन डायल, अंतोन चेखोव तसेच सत्यजित रे यांसारख्या जागतिक दर्जाच्या कथाकारांच्या कथा आपल्याला वाचायला मिळतात. शिवाय अर्नेस्ट हेमिंग्वे, थीन पे मियंत, गी द मोपांसा यांच्या विविध प्रकारच्या कथांचा समावेश या पुस्तकामध्ये केलेला आहे.
या पुस्तकातून शेरलॉक होम्सची कथा मी पहिल्यांदाच वाचली. शिवाय अंतोन चेखोव या रशियन कथा काराची कथा देखील पहिल्यांदाच वाचावयास मिळाली. जागतिक कथा विश्वामध्ये कोणत्या प्रकारचे विषय हाताळले जातात, याची प्रचिती या कथासंग्रहातून निश्चितच येते. त्यामुळे हे पुस्तक काही वाचनीय असे ठरते.


 

No comments:

Post a Comment

to: tushar.kute@gmail.com