Sunday, December 18, 2022

अमेरिकन राष्ट्रपतींना पुरून उरलेला झुंजार क्रांतीकारी

सुमारे वीस वर्षांपूर्वी एका प्रश्नमंजुषा स्पर्धेमध्ये आम्हाला प्रश्न आला होता की, सर्वाधिक काळ राज्य करणारा राज्यकर्ता कोण? याचे उत्तर म्हणजे 'फिडेल कॅस्ट्रो' यांचे नाव मी पहिल्यांदाच ऐकलं. तेव्हापासूनच कॅस्ट्रो बद्दलची उत्सुकता मनामध्ये तयार झाली होती. आज अनेक वर्षांनी त्यांच्यावर लिहिलं गेलेलं हे पुस्तक वाचायला मिळालं आणि एका अद्भुत व्यक्तिमत्त्वाचा परिचय झाला. या पुस्तकाच्या शीर्षकामध्येच "अमेरिकन राष्ट्रपतींना पुरून उरलेला झुंजार क्रांतीकारी" असं लिहिलेलं आहे. यातूनच फिडेल कॅस्ट्रो या नावाची महती प्रकट होते. 


क्युबा हा सुमारे एक कोटी लोकसंख्या असलेला आणि जवळपास १०० चौ. किमी क्षेत्रफळाचा देश. परंतु तरीदेखील आपल्या जवळच असणाऱ्या अमेरिकेला फिडेल कॅस्ट्रोच्या मदतीने पाच दशके शह देण्याचे काम त्याने केले. अमेरिकेच्या विरोधात थेट भूमिका घेणाऱ्या लोकांचे आणि देशांचे काय झाले? हे इतिहासामध्ये आपण पाहिलेच आहे. परंतु फिडेल कॅस्ट्रो हा त्याला अपवाद होता. क्युबाच्या सहा दशकांहून अधिक काळ चाललेल्या संघर्षाचा कप्तान तो होता. एका क्रांतिकारकापासून क्युबाचा सर्वेसर्वा बनलेल्या कॅस्ट्रोची ही कहाणी खरोखर प्रेरणादायी अशीच आहे. त्याने सहा दशके क्युबावर केवळ राज्यच केले नाही तर अमेरिकेला नामोहरम केले आणि जगासमोर एका अद्वितीय संघर्षाचे उदाहरण देखील त्याने ठेवले. त्याला अनेकदा मारण्याचा प्रयत्न झाला. त्यातून तो अनेकदा सुदैवाने बचावला देखील. तरीसुद्धा त्याने आपल्या संघर्ष तसूभर देखील कमी केला नाही. त्याच्यातील हे गुणच त्याला इतिहासामध्ये अजरामर करून गेले. कॅस्ट्रोच्या कालखंडामध्ये जवळपास दहा अमेरिकी राष्ट्रपती होऊन गेले. प्रत्येकाचा दृष्टिकोन व नेतृत्वगुण निरनिराळे होते. त्या प्रत्येकाशी झालेल्या संघर्ष देखील वेगवेगळा होता. परंतु फिडेल कॅस्ट्रोने तो अतिशय चलाखीने हाताळण्याचे काम केले.
त्याचा आयुष्याचा प्रवास हा सर्वसामान्यांना आवाक करणार आहे आणि त्याची ही कथा अचंबित करणारी!

No comments:

Post a Comment

to: tushar.kute@gmail.com