Monday, December 5, 2022

मी, ती आणि चित्रपट

नाशिक मध्ये राहत असताना आम्ही दोघे अर्थात मी आणि आमची पत्नी नियमितपणे प्रत्येक मराठी चित्रपट बघायला जात असू. त्या काळामध्ये एकही मराठी चित्रपट आम्ही चुकवलेला नव्हता. सन २०१५ ची गोष्ट असेल. 'कट्टी-बट्टी' नावाचा मराठी चित्रपट नाशिकच्या सिटी सेंटर मॉल मधील चित्रपटगृहामध्ये लागला होता. सकाळचा खेळ असावा. चित्रपट सुरू होण्याच्या अगदी बरोबर वेळेमध्येच आम्ही चित्रपटगृहासमोर दाखल झालो. परंतु दरवाजा बंद होता. नंतर समजले की आज चित्रपट बघणारे आम्ही दोघेच जण आहोत! त्यामुळे कमीत कमी पाच तिकिटांची विक्री झाल्याशिवाय चित्रपटाचा शो चालू करता येणार नाही, असे आम्हाला सांगण्यात आले. आम्हाला उशीर झाला आहे की काय? अशी धाकधूक वाटत होती ती आता चित्रपट सुरू होईल की नाही? या काळजीमध्ये बदलली गेली. मग वाट पाहण्याशिवाय आमच्यासमोर कुठलाही पर्याय नव्हता.
आमचे नशीब चांगले होते. त्यामुळे आणखी तीन मुलींनी या चित्रपटाची तिकिटे खरेदी केली आणि शो चालू झाला! सर्वात शेवटच्या रांगेमध्ये मध्यभागी आमच्या खुर्च्या होत्या आणि आमच्या बरोबर समोरच्या रांगेमध्ये समोरच्याच खुर्च्यांमध्ये त्या तिघी बसलेल्या होत्या. चित्रपटाचे कथानक फारसे मनोरंजक असे नव्हते. त्यामुळे त्या तिघींची चलबिचल चाललेली आम्हाला दिसली. मध्यंतर झाले आणि त्या तिघीही चित्रपटगृहातून निघून गेल्या व परतल्या नाहीत. आता पूर्ण चित्रपटगृहांमध्ये केवळ आम्ही दोघेच उरलो होतो! त्या स्क्रीनची काळजी घेणारा कर्मचारी एकदा डोकावून बघून गेला. त्याने पाहिले की फक्त दोनच जण हा चित्रपट बघत आहेत. त्यानंतर पूर्ण चित्रपट संपेपर्यंत त्याने चार ते पाच वेळा तरी डोकावले असेल! आता हे दोघे देखील निघून जातील, मग शो थांबवता येईल. या आशेवर तो ये-जा करत होता. पण आम्हाला मात्र चित्रपट पूर्णपणे बघायचाच होता. पूर्ण चित्रपटगृहामध्ये आम्ही दोघे त्या चित्रपटाचा मनमुराद आनंद लुटत होतो. असा अनुभव पुन्हा घ्यायला मिळणार नाही, याची आम्हालाही खात्री होती. म्हणून पूर्णवेळ बसून आम्ही चित्रपट पहिला. तो संपल्यावर बाहेर पडत असताना त्या कर्मचाऱ्याला हास्य वदनाने नमस्कार केला आणि घरी आलो.


 

No comments:

Post a Comment

to: tushar.kute@gmail.com