Thursday, December 1, 2022

ल्युसी: मेंदूच्या वापराची कहाणी

माणसाच्या मेंदूमध्ये कोट्यावधी न्यूरॉन असतात. याच न्यूरॉनचा वापर करून मानवाने इतर प्राण्यांपेक्षा अनेक पावले पुढची बुद्धिमत्ता प्राप्त केली आहे. प्रत्यक्षात मनुष्यप्राणी आपल्या मेंदूमधील किती टक्के न्यूरान्सचा वापर करतो? या प्रश्नाचे उत्तर जेव्हा शास्त्रज्ञांनी शोधले तेव्हा त्यांना समजले की आपण फार-फार तर दहा टक्के मेंदू आजवर वापरलेला आहे! जर आपण इतक्या कमी प्रमाणात मेंदू वापरलेला असेल आणि अन्य प्राणी जगताला हेवा वाटेल अशी प्रगती केली असेल तर जेव्हा १००% मेंदू वापरू त्यावेळेस काय होईल? याची कल्पना देखील करवत नाही. याच संकल्पनेवर आधारित असणारा हा हॉलीवुडपट म्हणजे "ल्युसी" होय.
ल्युसी ही एक सर्वसामान्य युवती आहे. चीनमधल्या एका शहरामध्ये ती काम करते. आपल्या प्रियकराने दिलेल्या धोक्यामुळे ती मोठ्या संकटात सापडते. त्यातून बाहेर येण्याचा ती जीवाच्या आकांताने प्रयत्न करत असते. परंतु याच घडामोडींमध्ये तिच्या शरीरात झालेल्या रासायनिक प्रक्रियेमुळे तिच्या मेंदूची क्षमता वाढायला सुरुवात होते. पहिल्यांदा २०% मग २८% नंतर ४०% नंतर ६०% कालांतराने ८० टक्के आणि अखेरीस ती आपल्या मेंदूचा शंभर टक्के वापर करते. या प्रत्येक टप्प्यामध्ये तिचा मेंदू कशा पद्धतीने काम करतो, किंबहुना ती तिच्या मेंदूचा कसा वापर करते? हे अतिशय रंजकपणे चित्रपटामध्ये दाखवलेले आहे.
जेव्हा मेंदू १००% कार्यरत होतो त्यावेळेची स्थिती काहीशी अनाकलनीय आहे. पण चित्रपट विज्ञानातील एक अद्भुतरंजकता आपल्याला दाखवून जातो. विशेष म्हणजे प्रत्येक टप्प्यागणिक तो खिळवून ठेवतो आणि खरोखरच असं झालं तर काय? या प्रश्नाचे उत्तर आपल्याला देत राहतो. काही विज्ञान रंजन मनाला सुखवणारे असतात. काही कल्पना प्रत्यक्षात येण्याजोग्या असतात पण कधी येतील याची खात्री नसते? त्यातीलच ही विज्ञान रंजक कल्पना होय.
भविष्यामध्ये कदाचित आपण देखील आपल्या मेंदूचा शंभर टक्के वापर करण्यास यशस्वी होऊ. त्यावेळेस कदाचित विश्वाची रहस्ये आपल्यासमोर खुली देखील होतील. ...बाकी स्कार्लेट जोहान्सनने ल्युसीची भूमिका अप्रतिम पार पाडली आहे!


 

No comments:

Post a Comment

to: tushar.kute@gmail.com