पायथॉन प्रोग्रॅमिंगचे पुस्तक प्रकाशित झाल्यानंतर अगदी काहीच दिवसांमध्ये तुम्ही डेटा सायन्स चे पुस्तक लिहिणार आहात का? अशी अनेक जणांकडून विचारण्यात आली होती. खरंतर त्याआधीच डेटा सायन्सच्या मराठी पुस्तकावर मी काम चालू केले होते. परंतु प्रशिक्षणाच्या अतिशय व्यस्त वेळापत्रकामुळे पुस्तकावर काम करण्यासाठी फारसा वेळ मिळाला नाही. तरीदेखील अधून मधून छोट्या छोट्या संकल्पनांवर काम करत विविध प्रकारची माहिती मराठीमध्ये लिहून काढत गेलो. पुस्तकाचा असा विशिष्ट साचा ठरला नव्हता. परंतु वेगवेगळ्या प्रशिक्षण कार्यक्रमांमधून आलेल्या अनुभवामुळे पुस्तकाची व्यवस्थित मांडणी करता आली. "प्रॅक्टिकल डेटा सायन्स" या पुस्तकामध्ये कोणकोणत्या संकल्पनांचा समावेश असावा, याची अनुक्रमे सविस्तरपणे मांडणी केली. पायथॉन प्रोग्रॅमिंग प्रमाणेच डेटा सायन्स मध्ये देखील सर्वसामान्य वाचकांना समजेल अशा पद्धतीने मराठीतून लिहीत गेलो. सुमारे ९०% पेक्षा अधिक संकल्पना या पायथॉनद्वारे प्रॅक्टिकलचा आधार घेऊन पुस्तकात मांडल्या. अगदी सिद्धांतिक दृष्टिकोनापासून प्रात्यक्षिकांपर्यंतचा डेटा सायन्सचा प्रवास या पुस्तकामध्ये मांडला. विदा विश्लेषणाच्या तसेच संख्याशास्त्राच्या विविध संकल्पनांना मराठीतून सहज आणि सोप्या पद्धतीत मांडण्याचा अनुभव पहिल्या पुस्तकाप्रमाणेच विलक्षण होता. आणि अखेरीस दोन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पुस्तकाची सविस्तर मांडणी पूर्ण झाली. विदा विज्ञान म्हणजे काय पासून या विषयातील प्रकल्प व्यवस्थापनापर्यंतचा प्रवास "प्रॅक्टिकल डेटा सायन्स" या पुस्तकांमध्ये मी सविस्तरपणे मांडण्यात यशस्वी ठरलो, असे मला वाटते.
बऱ्याच दिवसांनी म्हणजे तब्बल तीन वर्षानंतर तंत्रज्ञान विश्वातील माझे पुढचे पुस्तक तयार झाले आणि प्राकृत प्रकाशनाने ते प्रकाशित देखील केले. आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या क्षेत्रात प्रवेश करण्यासाठी पाया मांडल्या गेलेल्या डेटा सायन्सची प्रात्यक्षिकांद्वारे या पुस्तकातून सखोल मांडणी केली आहे. सध्या तरी हे पुस्तक पुणे पुस्तक महोत्सवांमध्ये केवळ बुक विश्वच्या स्टॉल क्रमांक H५६ वर उपलब्ध आहे.
या विषयाचा सखोल अभ्यास करण्यासाठी "प्रॅक्टिकल डेटा सायन्स"चा निश्चितपणे नवतंत्रज्ञांना चांगला उपयोग होईल, तेव्हाच या पुस्तकाचे सार्थक झाले असे मी समजेल.
--- तुषार भ. कुटे
Thursday, December 18, 2025
प्रॅक्टिकल डेटा सायन्स
Subscribe to:
Post Comments (Atom)

No comments:
Post a Comment
to: tushar.kute@gmail.com