Thursday, December 10, 2009

थरार…!

हिंदी चित्रपटातील एक प्रसंग...
इन्स्पेक्टर असणारा हिरो खलनायकाला पकडुन आणतो. परंतु, खलनायकाच्या चेहऱ्यावर कोणतीच अपराधीपणाची भावना नाही. त्याला माहीत असते की, त्याचा गॉडफादर का एक मोठा राजकारणी मंत्री आहे, जो त्याची सुटका करुन देईल. पण, हिरोला मात्र आपल्या कर्तव्याशी बांधिलकी आहे. प्रेक्षकांना वाटतं, आता हिरो व्हीलनची खुप धुलाई करणार. प्रत्यक्षात तसे होत नाही. खलनायकाला लॉकअप मध्ये नेत असताना फोनची रिंग वाजते. हिरो तो फोन उचलतो. पलिकडुन होम मिनिस्टरचा किंवा कमिशनर साहेबांचा फोन आवाज येतो...’तुमने अभी जिस को पकडा है, उसे छोड दो...!’. शेवटी हिरोलाही वरिष्ठांचे ऐकावे लागते. व गुंड अर्थात खलनायक हिरोच्या तोंडावर टिच्चुन सुटुन जातो. इथे हिरोच्या तळपायाची आग मस्तकात जाते. त्याला काय करु काय नको, असे होते. प्रेक्षकांनाही आपली ’सिस्टीम’ काय आहे, हे कळायला वेळ लागत नाही. आणि त्यांनाही याचे विशेष अप्रुप वाटत नाही.

ही झाली चित्रपटातील गोष्ट... पण, हा प्रसंग तुम्ही इन्स्पेक्टर नसतानाही तुमच्या जीवनात घडला तर...? काय थरार असेल ना तो...!
हा थरार मी तीन ते चार वेळा माझ्या जीवनात अनुभवलाय. दोन वर्षांपुर्वी माझ्या एका विषयाचे एक्स्टर्नल प्रॅक्टीकल होते. एका ढ मुलाचे सबमिशनही पुर्ण झाले नव्हते. तरीही त्याला मी प्रॅक्टीकलसाठी बसु दिले. पण त्याला मात्र काहीच येत नव्हते. थोड्याच वेळात मला माझ्या एका वरीष्ठांचा फोन आला (कदाचित तो त्यांचा कोणी नातेवाईक लागत असावा किंवा त्याच्या नातेवाईकांशी वरीष्ठांचे हितसंबंध असावेत). आणि त्या ढ मुलाला पास करण्यास सांगण्यात आले. त्यावेळी मात्र माझी तळपायाची आग मस्तकात गेली. त्या हिंदी चित्रपटातील हिरोसारखीच माझी परिस्थिती झाली होती. पण, मी त्याच्यासारखे वागलो नाही. शेवटी चित्रपटात आणि वास्तव जीवनात काही फरक असतो की नाही...? मी माझ्या सद्सदविवेक बुद्धीचे ऐकुन त्या मुलाला पास करण्यास कोणताच हातभार लावला नाही. व त्या कारणाने तो मुलगा नापास झाला. याचा परिणाम अखेरीस व्हायचा तोच झाला. पुढील वर्षीपासुन मला एक्स्टर्नल प्रॅक्टीकल साठी recommend करणे बंद करण्यात आले ते कायमचेच...! यामागे वरीष्ठांचा मला धडा शिकवण्याचा हेतु होता की मला बदलवण्याचा होता, ते मला समजले नाही.
पण मला एक सांगावेसे वाटते....
जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही.....
कुत्र्याचे शेपुट वाकडे ते वाकडेच.....
आणि, कितीही पाय बांधुन ठेवले तरी गाढव लाथ मारणे सोडत नाही.....
(टीप: उपमा योग्य लावल्या नसल्या तरी वाचकांनी सुयोग्य अर्थ काढावा ही नम्र विनंती. शहाण्या सांगणे न लागे हेच खरे....!)

1 comment:

to: tushar.kute@gmail.com