Saturday, December 19, 2009

तो थरारक सामना


अन्य भारतीयांप्रमाणे मीही क्रिकेटचा चाहता आहे. शाळेत शिकत असताना भारतीय संघाच्या तसेच इतर संघांच्याही मी बऱ्याच मॅचेस पाहील्या आहेत. परंतु, भारत व पाकिस्तान मध्ये झालेला तो सामना मला मी पाहिलेला आजवरचा सर्वात थरारक सामना वाटतो.
१९९८ सालच्या शेवटच्या कालावधीमध्ये हा सामना झाला होता. या वर्षी भारत, बांगलादेश, पाकिस्तान, व श्रीलंका या देशांतील आशिया कप बांगलादेशात भरविण्यात आला होता. श्रीलंका व बांगलादेश मात्र अंतिम फेरीपुर्वी बाद झाले. व भारत आणि पाकिस्तानमध्ये फायनल झाली होती. ढाक्यामध्ये हा सामना खेळविण्यात आला. या काळात भारत व पाकिस्तानचे राजकीय संबंध फरसे चांगले नव्हते. त्यात दोन्ही देश पारंपारीक प्रतिस्पर्धी असल्याने निश्चितच हा सामना चुरशीचा ठरला.
पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करताना ३१७ धावा केल्या होत्या व त्याही केवळ ४८ षटकांमध्ये! या काळात ३०० च्या वर धावा करणे म्हणजे प्रतिस्पर्ध्यांवर मातच करण्यासारखे होते. या सामन्यापर्यंत केवळ एकदाच तिनशेच्या वर धावा केल्यावरही नंतर फलंदाजी करणाऱ्या संघाने विजय मिळवला होता. ५-६ वर्षांपुर्वी श्रीलंकेलेच झिम्बाब्वे संघाला ३१६ धावा करुन मात दिली होती. त्यामुळे अशिया कपच्या अंतिम सामन्याच्या दिवशी पहिल्या डावानंतर पाकिस्तानचे पारडे निश्चितच जड झाले होते. भारताच्या विजयाबद्दल बहुतांश जण साशंकच होते. पण, आमच्यासारखे क्रिकेटप्रेमी मात्र आज भारतीय संघ चमत्कार करु शकतो अशी आशा बाळगुन होते! सामना खुपच चुरशीचा झाला. सलामीचा फलंदाज सौरव गांगुलीने कमी चेंडुंमध्ये १२४ धावा तडकाविल्या. त्याची खेळी मात्र जिगरबाज होती. शिवाय त्याला रॉबिन सिंगची ८२ धावांची उत्तम साथ लाभली. दोघांची पुर्ण इनिंग्ज पाहताना मी जागचा हाललो देखील नव्हतो. पण, सामन्याच्या अंतिम चरणात दोघेही बाद झाले. तेव्हा भारत हा सामना हरणार असे वाटु लागले.
भारतीय फलंदाजीचे केवळ शेपूट बाकी असताना शेवटच्या षटकात ११ धावा हव्या होत्या. व सकलेन मुश्ताक़ हा पाकिस्तानी फिरकी गोलंदाज गोलंदाजीसाठी आला. पाच चेंडू टाकुन झाल्यावर शेवटच्या चेंडुवर तीन धावा भारताला विजयासाठी हव्या होत्या. आणि फलंदाजीसाठी हृषिकेश कानिटकर उभा होता. आता केवळ एकाच बॉलमध्ये निकाल लागणार म्हणुन माझ्या हृदयाचे ठोके खुपच वाढले होते. अखेर सकलेनने बॉल टाकला व कानिटकरने तो मिड ऑफच्या डोक्यावरुन थेट सीमापार धाडला. तेव्हा माझ्या आनंदाला पारावार उरला नाही. तेव्हापासुन आजवर मी त्याइतका थरारक सामना पाहिला नाही....! भारताने सर्वोच्च धावा पार करुन विजयाचा नवा उच्चांक गाठला होता.

7 comments:

to: tushar.kute@gmail.com