Friday, December 11, 2009

वृत्तपत्रातील माझं पहिलं नाव.


वृत्तपत्रांमध्ये साधं लिहिणं सोडा, माझे नाव कधी येईल की नाही? या प्रश्नाचे उत्तर मला कोणी दहा वर्षांपुर्वी जर विचारले असते, तर मी खुपच साशंकतेने विचार केला असता. कारण, पेपरमध्ये नाव येणे हे खुप जणांना अप्रूप वाटते. मलाही असेच वाटत होते. दहावीच्या परीक्षेचा निकाल १९९९ साली लागला तेव्हा ठाण्यातल्या कुठच्या तरी एका पेपरमध्ये माझे नाव आले होते. माझा शाळेत तिसरा क्रमांक आला होता. तो पेपर आजही माझ्याकडे जपुन ठेवला आहे.
लेखक म्हणुन माझे नाव सर्वप्रथम २५ नोव्हेंबर २००० रोजी वर्तमानपत्रात छापुन आले. त्यावेळी नुकताच एक महिन्यापुर्वी ’सकाळ’ समुहाने ’युवा सकाळ’ या नव्या दैनिकाची सुरूवात केली होती. नव लेखकांना व विशेषकरुन युवा लेखकांना साहित्य पाठविण्याचे आवाहन ’युवा सकाळ’ मधुन केले जायचे. तेव्हा मी एक छोटा विनोद (जोक) लिहुन पाठवला होता. सातच दिवसांनी तो छापुन पेपरमध्ये आला. त्याच्या खाली माझे नाव व पुर्ण पत्ता देखील होता..! त्या वेळी मला इतका आनंद झाला होता, जो मी इथे शब्दात मांडू शकत नाही. आमच्या आजुबाजुच्या सर्वांना तो पेपर मी दाखवत सुटलो. डिप्लोमाला मी तेव्हा पहिल्याच वर्षात शिकत होतो. वर्गातल्या सर्व मुलांना मी तो दाखवला. मला माझा खुप अभिमान वाटत होता. ’युवा सकाळ’चे त्या दिवशी मी दोन अंक विकत घेतले...!
माझी मराठी फारशी चांगली नव्हती. दहावीलाच मला मराठीत फक्त ६४ गुण होते तिथे हिंदीत ८४ तर इंग्रजीत ८१ गुण होते! पण, वृत्तपत्रीय लेखणाने माझ्यातील लेखक जागवला. मी नंतर ’युवा सकाळ’ मध्ये लिहित राहिलो. हळुहळु मी मोठे लेखही लिहिता झालो. मग पेपरमध्ये नाव येणे याचे काही विशेष वाटु लागले नाही. यामुळे माझी मराठीही सुधारली! मागच्या १० वर्षांमध्ये मी माझ्या मूळ नावांव्यतिरिक्त आणखी तीन नावांचा लिखाणासाठी वापर केला आहे. याची कल्पना बऱ्याच जणांना नाही. त्यामुळेच, नावात काय आहे... आपलं लिखाण प्रसिद्ध होणं आणि ते वाचकांपर्यंत पोहोचणं अधिक महत्वाचं....! असं मला वाटतं.
एक गोष्ट मात्र मी नक्की शिकलो की, प्रत्येकाच्या अंगात काही ना काही गुण असतात. पण ते बाहेर येण्यासाठी त्यांना चालना मिळणे आवश्यक आहे इतकेच.....

1 comment:

to: tushar.kute@gmail.com