Wednesday, December 16, 2009

सुटकेचा नि:श्वास

मी पुर्णपणे मराठी माध्यमातुन शिकलो असल्याने आंग्लभाषेचा अर्थात इंग्रजी व त्या वरील प्रभुत्वाचा फारसा काही संबंध नव्हताच. पण, आज मला जी काय इंग्लिश समजते वा जी काय मी ही भाषा बोलतो त्यात मला आठवी ते दहावी इंग्रजी शिकवणाऱ्या खाडे सरांचा मोठा वाटा आहे.
आठवी व नववीला असताना मी ’क’ तुकडीमध्ये शिकत होतो. ही ’क’ तुकडी म्हणजे सर्व ढ मुलांची तुकडी मानली जायची. त्यामुळे या तुकडीतील मुलांकडे बघण्याचा सर्वच शिक्षकांचा दृष्टीकोण वेगळा होता. आम्हाला तेव्हा इंग्लिश खाडे सर शिकवायचे. पण, ’अ’ तुकडीला दुसरे सर शिकवत असत. ’क’ वर्गातली मुले ढ आहेत याची कल्पना खाडे सरांना देखील होती. ते शिकवण्यास मात्र उत्तम होते. त्यांच्यामुळेच मला या परकीय भाषेचे मुलभुत ज्ञान चांगले मिळाले. सातवीला असताना मला इंग्रजीत केवळ ४८ गुण होते, त्याचे आठवीला ६८, नववीला ७९ तर दहावीला ८१ झाले! दहावीला असताना मी ’इंग्रजी’मध्ये आमच्या शाळेत पहिला आलो होतो! त्या काळात म्हणजेच सन १९९९ मध्ये ८१ गुण मिळविणे व तेही इंग्रजीसारख्या विषयात ही एक अपुर्व गोष्ट होती. याचे बहुतांशी श्रेय मी माझ्या खाडे सरांना देईल.
नववीला असताना सर एकदा इंग्रजीतल्या काळांची उजळणी घेत होते. इंग्रजीमध्ये बारा काळ असतात हे सर्वांनाच माहीत आहे. त्यातील नऊ काळ जे मराठीतही आहेत, हे मला पुर्ण समजले होते; परंतु मराठीत नसणाऱ्या ’चालु पुर्ण’ प्रकारातले काळ मला फारसे समजले नव्हते. काळांची उजळणी घेत असताना त्यांनी ’चालु पुर्ण वर्तमानकाळातील’ एक वाक्य वर्गाला सांगितले व ते एकएकाला उभे करुन विचारु लागले. सरांनी एखाद्याला उभे करुन उत्तर जर नाही आले, तर सर छडीचे फटके हातावर द्यायचे हे सर्वांनाच माहीत होते. उत्तर मात्र कोणालाच माहीत नव्हते. त्यामुळे एकेक जण ओळीने उभा राहु लागला. सरांनी पहिल्या बेंचपासुन एकेकाला विचारायला सुरुवात केली होती. माझा नंबर तिसऱ्या बेंचवर होता. मीही या प्रश्नाच्या उत्तराबाबत गोंधळात पडलो होतो. खुप दिवसांनी खाडे सरांचा मार बसणार, याची मनात कल्पना आली. शिवाय सरांसमोर माझी प्रतिमाही घसरेल, याची मला भीती वाटली. शेवटी माझा नंबर आला. मी उभा रहिलो. मी ’मला उत्तर येत नाही’ असे सांगणार तेव्हढ्यात सर म्हणाले, ’तु बैस खाली’. कदाचित त्यांना वाटले की, मला उत्तर येत आहे आणि मी सांगणार होतो. मला अगदी कसेकसेच झाली. मनातली भीती आता आणखीच वाढली होती. सरांनी अखेरीस सर्वांनाच उभे केले. पण, कोणालाच त्याचे उत्तर आले नाही.
आता सर मलाच विचारणार; याची मला पुर्ण खात्री होती. काय करावे काही सुचेनासे झाले. सर इतर मुलांना बोलत असताना मनात ठरविले की, आता उत्तर फेकायचे. अखेरीस सरांनी मला उभे केले व विचारले, ’सांग तुषार कोणता काळ आहे ते?’ मी बोललो, ’चालु पुर्ण वर्तमानकाळ.....’.
आणि माझे उत्तर बरोबर आले! मला या गोष्टीची अपेक्षाही नव्हती. सरांनी सर्व मुलांसमोर माझी पुन्हा एकदा प्रशंसा केली. यी घटनेमुळे खाडे सरांचा माझ्यावरील विश्वास आणखीच भक्कम झाला. पण, त्यांना माहीत नव्हते की, मोठ्या संकट काळातुन मी माझी सुटका केली होती.......!

No comments:

Post a Comment

to: tushar.kute@gmail.com