Wednesday, August 4, 2010

न्यायालयात सचिनचा दाखला...

सचिन तेंडुलकर... बस नाम ही काफ़ी है, असं म्हटलं तर वावगं ठरू नये. अखिल क्रिकेट जगताचा देव म्हणजे सचिन तेंडुलकर. परवा दैनिक सकाळ मधल्या सचिनसंबंधीच्या बातमीने माझे लक्ष वेधले. न्यायालयामध्ये न्यायाधीशांनी निकाल देताना सचिनचा दाखला दिला. महिला कुस्तीगीरांनी सराव सामन्यात जाण्यास नकार दिल्याने त्यांची संघातून गच्छंती झाली होती. त्याचा निकाल देताना न्यायालयाने सांगितले की, सचिनसारखा महान खेळाडू कधीही सराव चुकवत नाही. त्यामुळे तुम्हीही सराव चुकवायला नको. न्यायालयाच्या या दाखल्याने सचिनच्या महानतेवर पुनश्च शिक्कामोर्तब झाले आहे.

एक खेळाडू म्हणून सचिनने क्रिकेटविश्वाला दिलेले योगदान हे खूप अधिक मोठे आहे. त्याहीपेक्षा तो एक आदर्श व्यक्ती आहे. गेल्या वीस वर्षांच्या आपल्या काराकिर्दित त्याने आपल्या कृतीतूनच आपल्या मोठेपणाची प्रचिती पूर्ण क्रीडाविश्वाला दिली आहे. आदर्श खेळाडू कसा हवा? या प्रश्नाचे उत्तर सचिनकडे पाहिल्यावर मिळते. याच कारणामुळे भारतातील सर्वात लोकप्रिय व्यक्तीमत्व म्हणून सचिन देशवासियांना ज्ञात आहे. अन्य खेळातील खेळाडू स्वत:च्या खेळाकडे दुर्लक्ष होते म्हणून बोंबा मारत असतात. तेव्हा स्वत: त्यांनी आपल्या खेळासाठी किती मोठे योगदान दिले, याचा विचार करत नाही. सर्वच जण क्रिकेटच्या नावाने बोटे मोडत असतात. स्वत:ला काही करता येत नाही, म्हणून दुसऱ्यांच्या नावाने खडी फोडायची, ही अन्य भारतीय खेळाडूंची सवयच बनू लागली आहे. १९९६ च्या विश्वचषकातील दारूण पराभवानंतर भारतीय क्रीडाप्रेमींनी क्रिकेटपासून दूर जाण्याचा मार्ग निवडला होता. पण, सचिननेच या देशात क्रिकेटला पुन्हा प्रतिष्ठा मिळवून देण्यात मोठा हातभार लावला होता. सौरव गांगुली व राहुल द्रविड सारखे खेळाडू सचिनच्याच कर्णधारपदाच्या कारकिर्दित पुढे आले. त्यावेळी भारतीय क्रिकेटला भरारी मिळवून देताना त्याने कुणाच्या नावाने खडी फोडली नाही. स्थितप्रज्ञासारखा तो आपले कार्य करत होता. संस्कृतमधील एक वचन सचिनला तंतोतंत लागू पडते.

कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदचन।

मा कर्मफलहेतुर्भूर्मा ते सङ्गोस्त्वकर्मणि॥

सचिनने आपल्या कारकिर्दित कधीही कोणत्याही फळाची अपेक्षा ठेवली नाही. तो कधीच विक्रमासाठी खेळला नाही. विक्रमासाठी खेळण्यासाठी खेळण्यासाठी रवी शास्त्री वा संजय मांजरेकर सारखी वृत्ती त्याच्या अंगात दिसलीच नाही. त्याच्या खेळानेच सर्व विक्रम घडवून आणले. त्याची आजवरची कारकिर्द म्हणजे नवोदितांसाठी एक दिपस्तंभ आहे. तो ’जंटलमेन्स गेम’ मध्ये खऱ्या अर्थाने जंटलमन बनून राहिला.

खरोखर, खेळाडू असावा तर सचिनसारखाच. ’असतील बहु, होतील बहु, परंतु या सम हाच’ ही पंक्ती सचिनला पूर्णपणे लागू पडते. यापुढीही केवळ न्यायालयातच नव्हे तर सर्वच ठिकाणी सचिनचे दाखले ऐकायला मिळाले, तर आश्चर्य वाटायला नको...!

5 comments:

 1. सहमत आहे ! तेंडल्या खरोखर सर्वच बाबतीत एकमेकाद्वितीय आहे, मग ते नव नवीन विक्रम करणे असो किंवा नियमांचे नीट पालन करणे असो. म्हणून तर तो आज धृवपदाला पोहोचला आहे. खरोखर विक्रमादित्या, आम्हाला तुझा प्रचंड अभिमान वाटतो.

  सुरेख लेख, धन्यवाद.

  ReplyDelete
 2. योग्य आणी दखल घेण्याजोगा मुद्दा..धन्यवाद!

  ReplyDelete
 3. सचिनसारखा खेळाडू या देशाला लाभने, हे आपले मोठे भाग्यच आहे. प्रत्येक प्रकारच्या खेळाडूसाठी तो एक आदर्शच बनून राहिला आहे. तुमच्या लेखात तुम्ही अगदी नेमके मुद्दे मांडले आहेत. एक माणूस म्हणून सचिन माझ्यासाठीही आदर्शच आहे...
  धन्यवाद...

  ReplyDelete
 4. Agree with you Prem....
  सचिनसारखा सचिनच...! त्याच्यासारखा पुन्हा होणार नाही. सचिन जेव्हा निवृत्त होईल तेव्हा कदाचित भारतीय क्रिकेटचे बरेच प्रेक्षक कमी होतील....!

  ReplyDelete

to: tushar.kute@gmail.com