Sunday, August 8, 2010

१०० टक्के प्लेसमेंट...

दैनिक लोकसत्ता मध्ये प्रसिद्ध झालेली ही बातमी वाचा:

विविध प्रकारचे व्यावसायिक अभ्यासक्रम शिकविणाऱ्या खासगी संस्थांच्या जाहिरातींमधील १०० टक्के प्लेसमेंट अशा आशयाचे शब्द वाचून हल्ली मोठया संख्येने तरुण अशा संस्थांमध्ये लठ्ठ फी भरून शिकत असतात. परंतु १०० टक्के प्लेसमेंट याचा अर्थ नोकरी लावण्याची हमी नाही. आम्ही फक्त आमच्याकडून शिकून बाहेर पडणारे विद्यार्थी व त्यांच्या ज्ञान-कौशल्याचा ज्यांना उपयोग होऊ शकतो अशा एम्प्लॉयर्सची गाठभेट घडवून देण्याचे काम करतो. प्रत्यक्षात आमच्या विद्यार्थ्यांचे स्वत:च्या गरजेनुसार मूल्यमापन करून नोकरी द्यायची की नाही, ही बाब त्या एम्प्लॉयरवर अवलंबून असते, हा युक्तिवाद मान्य करून मुंबई उच्च न्यायालयाने आज अशाच एका खासगी शिक्षण संस्थेविरुद्ध त्यांच्या एका माजी विद्यार्थ्यांने पोलिसात केलेली फिर्याद रद्द केली.

एक वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण केल्यावर लठ्ठ पगाराची नोकरी लावून देऊ, असे आश्वासन देऊनही त्याचे पालन केले नाही, असा आरोप करून म्हणून अंधेरी(पू.) येथील क्लीनिकल रीसर्च, एज्युकेशन आणि मॅनेजमेंट अॅकॅडमी (क्रेमा) या खासगी शिक्षण संस्थेविरुद्ध डॉ. दीपक पुरभाजी देवडे या माजी विद्यार्थ्यांने एमआयडीसी पोलीस ठाण्यात नोंदविलेली फिर्याद रद्द करताना न्या. बी. एच. मर्लापल्ले व न्या. श्रीमती रोशन दळवी यांच्या खंडपीठाने म्हटले की, फिर्यादीने नोंदविलेली मूळ फिर्याद व तपासात पोलिसांनी घेतलेले जाबजबाब आम्ही वाचले. त्यावरून फसवणुकीचा गुन्हा उघड होतो, असे आम्हाला सकृद्दर्शनी वाटत नाही. शिवाय आपण ही फिर्याद रागाच्या भरात, इतरांनी भरीला पाडल्याने व गैरसमजुतीपोटी नोंदविली होती. आता समाधानकारक नोकरी मिळाली असल्याने फिर्याद पुढे चालविण्यात आपल्याला स्वारस्य नाही, अशी भूमिका फिर्यादीने प्रतिज्ञापत्र करून मांडली आहे. हे पाहता फिर्याद पुढे नेण्यात काही हशील दिसत नाही. फिर्यादी देवडे यांनी इतर ५४ विद्यार्थ्यांसह क्रेमामध्ये २००८-०९ या वर्षांत पोस्ट ग्रॅज्युएट कोर्स इन क्लीनिकल रीसर्च हा अभ्यासक्रम पूर्ण केला होता. आधी दिलेल्या आश्वासनानुसार संस्थेने आपल्याला नोकरी लावली नाही म्हणून त्याने गेल्या ३० डिसेंबर रोजी पोलिसात फिर्याद नोंदविली होती. फिर्यादी देवडे पशुवैद्यक पदवीधर असून मुळचा नांदेड जिल्ह्यातील आहे. संस्थेविरुद्धची फिर्याद रद्द केली जावी यासाठी क्रेमाचे अध्यक्ष विजय मोझा यांनी याचिका केली होती. डॉ. दीपक देवडे यांनी फिर्याद नोंदविल्यानंतर पोलिसांनी शहानिशा करण्यासाठी त्यांच्यासोबत क्रेमामध्ये शिकलेल्या एकूण २२ विद्यार्थ्यांना जाबजबाबांसाठी बोलाविले होते. त्यापैकी १२ जणांनी हजर राहून जबाब नोंदविले होते. त्यापैकी चौघांचे म्हणणे त्यांची फसवणूक झाली असे होते. आणखी चौघांनी फसवणूक झाली नसल्याचे सांगितले होते. नक्की न सांगता येणारेही चारजण होते. फिर्यादी देवडे याने तडजोड करून फिर्याद पुढे न चालविण्याची भूमिका घेतली असली तरी इतरांनी तपासात फसवणूक झाल्याचे सांगितले असल्याने फिर्याद रद्द न करता आम्हाला पुढे तपास करू दिला जावा, असे पोलिसांचे म्हणणे होते. परंतु फसवणूक झाल्याचे इतर कोणाचे म्हणणे असेल तर ते स्वतंत्रपणे कायद्यानुसार पाठपुरावा करू शकतात. आमचा आजचा निकाल त्यांच्या आड येणार नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले. फसवणुकीच्या आरोपाचा इन्कार करताना क्रेमाचे असे म्हणणे होते की, मुळात आम्ही विद्यार्थ्यांना नोकरी लावून देण्याचे आश्वासन दिले नव्हते. आम्ही फक्त नोकरी मिळावी यासाठी मदत करू, असे प्रॉस्पेक्टसमध्ये म्हटले होते व प्रवेशापूर्वीच्या कौन्सेलिंगच्या वेळीही तसेच सांगितले होते. आमच्या प्रयत्नामुळे फिर्यादी देवडे यांना कॉग्निझन्ट, एक्सेल लाईफ सायन्सेस, निकोलास पिरॅमल आणि एथिका यासारख्या अग्रगण्य कंपन्यांमध्ये मुलाखतीसाठी बोलावले गेले. परंतु त्या कंपन्यांना देवडे त्यांच्या निकषांनुसार योग्य न वाटल्याने त्यांनी देवडे यांना नोकरी दिली नाही. याचा अर्थ आम्ही दिलेला शब्द पाळला नाही, असा होत नाही. वस्तुत: आता देवडे यांना जी नोकरी मिळाली आहे ती आमच्याच प्रयत्नांनी मिळाली आहे.

न्यायालयाने संबंधित खटल्यात दिलेला निकाल हा पूर्णत: योग्य असल्याचे त्यांच्या स्पष्टीकरणावरून दिसून येते. आजच्या स्पर्धेच्या युगामध्ये या घटनेपासून प्रत्येकाने धडा घेणे गरजेचे आहे. १०० टक्के प्लेसमेंट म्हणजे नोकरीची हमी, असे होत नाही. प्लेसमेंट देताना फक्त विविध कंपन्यांमध्ये आपले पदवीधर पाठविण्याचे काम संबंधित संस्था करू शकते. त्यांना तिथे काम मिळेलच याची शाश्वती मात्र ते देवू शकत नाही. नोकरी मिळविणे, हे सर्वस्व विद्यार्थ्यांच्या कौशल्यावर अवलंबून असते. विद्यार्थ्यांना संस्थेने सर्व कौशल्य प्रदान केली असतात व त्यांचा खरा फायदा तो विद्यार्थी करा करून घेतो, हे त्याचे त्याने पाहायचे असते. तो नुसताच मला १०० टक्के नोकरी मिळणार आहे, असा जप करत काहीच कौशल्य आत्मसात करत नसेल तर त्यात संस्थेचा दोष निश्चितच नाही. त्यामुळे प्लेसमेंट ही पूर्णत: त्याच्यावर आधारित असते तर संस्थेवर नव्हे, हे विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवायला हवे...

1 comment:

  1. प्रत्येक विद्यार्थी व त्याच्या पालकांनी वाचलाच पाहिजे असा लेख . धन्यवाद

    ReplyDelete

to: tushar.kute@gmail.com