Saturday, August 21, 2010

मनी वसे ते स्वप्नी दिसे

शाळेत शिकत असताना ’मनी वसे ते स्वप्नी दिसे’ अशी म्हण आमच्या मॅडमनी पाठ करवून घेतली होती. अर्थात त्या काळात सर्वच म्हणींचे अर्थ आम्हाला समजतच असत असे नाही. ज्यांचे समजत नसायचे त्यांपैकी ही एक म्हण होय. दहावीच्या पूर्वपरिक्षेत तर यावर आम्हाला निबंधच लिहायला सांगितला होता. त्याकडे मी ढुंकुनही पाहिले नाही, हा भाग वेगळा. पण, त्याचा मतितार्थ मला वेळोवेळी कालांतराने समजून आला.

स्वप्न हे आपल्या वैज्ञानिकांनाही पूर्णपणे न उमजलेले कोडेच आहे. तरीही मानवाने आपल्या परिने या स्वप्नाचा लावलेला अर्थ सर्वांना पटलेला आहे. जगातील सर्वात वेगवान गोष्ट कोणती तर ते मन होय, असे म्हटले जाते. या क्षणाला मन हे एका ठिकाणी असेल तर ते दुसऱ्या क्षणाला आणखी कोणत्या तरी ठिकाणी असते. त्याच मनाचे एक कोंदण हे स्वप्न रूपात आपल्यामध्ये वावरत असते. मनामध्ये असणाऱ्या भावभावनांना मूर्त रूप देण्याचे काम स्वप्न करते. काही अशक्यकोटितील गोष्टी मनुष्य मनात साठवून ठेवत असतो. त्या प्रत्यक्ष घडू शकत नाहीत, पण स्वप्नात मात्र पाहू शकतो. त्यामुळे स्वप्न ही भावना प्रत्येकालाच हवीहवीशी वाटणारी असते. मानवी भावनांमध्ये समाविष्ट असणाऱ्या अनेक भावनांपैकी स्वप्नरस हाही एक रस आहे.

भारताचे माजी राष्ट्रपति डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांनी स्वप्नाची व्याख्या करताना सांगितले आहे की, स्वप्न म्हणजे अशी गोष्ट नव्हे की जी तुम्ही झोपत असताना पाहता, ती अशी गोष्ट आहे की जी तुम्हाला झोपूच देत नाही. कलाम सरांनी स्वप्न या संकल्पनेची अशी सुंदर व्याख्या केली आहे. आणि ती १०० टक्के बरोबर आहे. आपल्या मनात अनेक इच्छा-आकांक्षा असतात अर्थात त्यांना आपण स्वप्न म्हणतो. स्वप्नाळू व्यक्ति अशी स्वप्ने फक्त झोपेतेच पाहतात परंतु ध्येयवादी व्यक्ति ती स्वप्ने प्रत्यक्षात आणण्यासाठी दिवस खऱ्या अर्थाने प्रयत्न करतात. दिवसभर मनात विचार करणाऱ्यांच्या स्वप्नात फक्त स्वप्नेच दिसू लागतात, त्याशिवाय त्यांना काहीच करता येत नाही. ज्या गोष्टीचा आपण दिवसभर सर्वात जास्त विचार करतो, तीच आपल्याला स्वप्नात परत दिसते. विशेष म्हणजे आपल्या शास्त्रज्ञांनी लावलेल्या अनेक शोधांमध्ये काही शोध स्वप्नामध्ये लागले गेले आहेत. कथाकारांना कथा व कवींना कविता ह्या स्वप्नात सुचल्याचेही मी वाचले आहे. अगदी मलासुद्धा या प्रकारचा अनुभव काहीवेळा अनुभवयास मिळाला आहे.

सहजच लिहिता लिहिता आठवलं म्हणून एक गोष्ट सांगतो. सोनी टीव्हीवरच्या ’आहट’ या मालिकेतला एक भाग दहा-बारा वर्षांपूर्वी अशाच स्वप्नाच्या संकल्पनेवर आधारित होता. ’जागते रहो’ असे त्या भागाचे नाव होते. शेवटी ’मनी वसे ते स्वप्नी दिसे’ या संकल्पनेनुसारच या भागात छान शेवट होताने दाखविला होता.

मराठी गीतांमध्ये तर स्वप्न व मन दोन्ही कल्पनांना मोठ्या प्रमाणात साकारले आहे. मन व स्वप्नाची सांगड प्रेमाशी घालून नवकवींनी नवी प्रेरणा मराठी काव्यविश्वात तयार केली. ’नाथा पुरे आता’ या चित्रपटातील सुरेश वाडकर यांनी गायिलेले हे गीत स्वप्नाचे मानवी जीवनातील महत्व प्रतित करते...

या स्वप्नांनो तुमच्यासाठी उघडे माझे रान,

शुष्क जीवनी तुम्ही फुलविता रम्य वसंत बहार....

No comments:

Post a Comment

to: tushar.kute@gmail.com