फार वर्षांपूर्वी म्हणजे सुमारे लाखो व कोटी वर्षांपूर्वीची ही गोष्ट आहे.
एका गोष्टीत रहस्य आहे, गुढ आहे, विज्ञान आहे, संशोधन आहे शिवाय उत्तरही
आहेत. निरंजन घाटे यांचे हे पुस्तक अशाच लाखो-करोडो वर्षांपासून पडलेल्या
विविध प्रश्नांची वैज्ञानिक उत्तरे आपल्याला देतं. निरंजन घाटे हे हाडाचे
विज्ञानलेखक. त्यामुळे विज्ञानाच्या दृष्टिकोनातून त्यांनी लिहीलेले सर्वच
लेख आपल्याला मानववंशशास्त्र, पुराणवास्तुशास्त्र, हवामान शास्त्र व
इतिहासाची माहिती करून देतात. पृथ्वीचा इतिहास हा करोडो वर्षांचा असला तरी
बहुतांशी तो फक्त मागील दोन हजार वर्षांचाच पुस्तकात मांडलेला दिसतो.
परंतु, तत्पूर्वी मनुष्य जीवन कसे होते? व त्यांनी प्रगतीची पावले कशी पुढे
टाकली? याचे वर्णन निरंजन घाटे यांनी या पुस्तकात केले आहे.
मानववंशशास्त्र व पुरातनवास्तूशास्त्र या विज्ञानशाखा किती सखोल आहे,
त्याची प्रचिती हे पुस्तक देतं. संशोधन कसं करावं व त्याला किती विविध पैलू
असू शकतात? या प्रश्नांची उत्तरेही आपल्याला विविध घटनांतून मिळतात.
पुस्तकातील काही महत्त्वाच्या मुद्द्यांना याठिकाणी मांडत आहे.
- पुरातन काळी मनुष्य हा मांसाहारी, शाकाहारी होता की प्रेताहरी? याचं सप्रमा स्पष्टीकरण त्यांनी या पुस्तकात दिलं आहे.
- आदिमानवाचा शेती विषयक, पर्यावरण विषयक, आरोग्यविषयक प्रवास कशा प्रकारे झाला?
- समुद्रात शेकडो मैलांवर असणाऱ्या इस्टर आयलँड वरील पुतळ्यांचं गूढ काय?
- चंद्रावती नावाचं अतिसुंदर शहर भारतात होतं. परंतु परकीय आक्रमकांनी त्याची नासधूस करून विद्रूप करून टाकलं.
- उत्खननात सापडलेली हाडे ही मानवशास्त्रात अभ्यास करण्यासाठी सर्वात मोठा पुरावा मानले जातात. त्यांचे महत्त्व व रोमांचकारी इतिहास इथे मांडला आहे.
- चिली व दक्षिण अमेरिकेत अनेक प्राचीन कलाकृती आहेत. माया संस्कृतीत बनवलेल्या या कलाकृतींचे रहस्य काय?
- ऑस्ट्रेलियातील डायनासोर्स संशोधन.
- डायनासोर, ट्रायनोसॉर म्हणजे काय?
- चीनमधल्या ड्रॅगनच्या हाडांच्या शोधामागचा रोमांचकारी प्रवास.
- युरोपातल्या प्राचीन अटलांटिस शहराच्या समृद्धीतेची वर्णने आजही केली जातात. ते पाण्याच्या तळाशी स्थित आहे.
- वृक्षवर्तुळावरून वृक्षांचे वय व त्या काळची हवामान स्थिती ओळखण्याची अचूक शास्त्र.
- व्हिएतनाम, कंबोडिया मध्ये एकेकाळी हिंदू राजे राज्य करीत होते. परंतु परकीय आक्रमकांमुळे त्यांची संस्कृती लयास गेली. आजही त्यांच्या सांस्कृतिक पाऊलखुणा दोन्ही देशात सापडतात.
- मानवशास्त्रज्ञ डग्लस औसली यांनी आजवर सर्वाधिक अचूकतेने या विज्ञानाचा वापर करून दाखवला आहे.
- रेण्विक पुरानशास्त्र म्हणजे काय? त्याचा वापर कसा करता येतो?
- आदिमाता अर्थात आपल्या सर्वांच्या एकमेव मातेचा शोध कसा घेतला गेला याची कहाणी.
- आपण सारे होमोसेपियन एकाच आईची लेकरे आहोत. पण आज लाख वर्षानंतर आपापसात कितीतरी भेदभाव तयार झालेत.
- आफ्रिके पासून अलिप्त असणाऱ्या अमेरिका खंडात मानव पोहोचला कसा? याचे शास्त्रीय उत्तर.
अशा
विविध प्रकारची माहिती व त्याची उत्तरे निरंजन घाटे यांनी या पुस्तकात
दिली आहेत. पारंपरिक इतिहास व विज्ञानापलीकडे जाऊन वाचण्यासारखे हे
निश्चितच वेगळे पुस्तक आहे.
No comments:
Post a Comment
to: tushar.kute@gmail.com