Showing posts with label niranjan ghate. Show all posts
Showing posts with label niranjan ghate. Show all posts

Sunday, January 17, 2021

संभव-असंभव, लेखक निरंजन घाटे, #समकालीन #प्रकाशन

#पुस्तक_परीक्षण
📖 संभव-असंभव
✍️ निरंजन घाटे
📚 समकालीन प्रकाशन

संभाव्यता व असंभाव्यता या पातळीवर विचार करता येणारे घटक म्हणजे देव, आत्मा, साक्षात्कार, ध्यान, आतला आवाज, परामानसिक अनुभव आणि पुनर्जन्म होय. अशा विविध अतिंद्रिय अनुभवांचा वैज्ञानिक वेध घेणारे पुस्तक म्हणजे "संभव-असंभव" होय. निरंजन घाटे हे खरे तर हाडाचे विज्ञान लेखक. त्यामुळे त्यांनी लिहीलेल्या प्रत्येक पुस्तकामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोण रुजवलेला आहे. परंतु अनेक गोष्टींना अजूनही विज्ञानाने १००% उत्तर दिलेले नाही. त्यातीलच एक म्हणजे अतींद्रिय अनुभव होय. असं का घडतं? किंवा असे घडण्यामागे नक्की प्रेरणा कोणती? या प्रश्नांची उत्तरे अनेकदा कोड्यामध्ये टाकतात. कधीकधी मानसशास्त्रामध्ये याचे उत्तर देखील सापडते किंवा अनेकदा सदसदविवेकबुद्धीचा वापर करूनदेखील या या प्रश्नांची उकल होते. असेच प्रश्न निरंजन घाटे यांनी या पुस्तकांमध्ये व्यवस्थितरीत्या हाताळण्याचे दिसतात. शिवाय अनेक ठिकाणी त्यांनी विविध उदाहरणे देऊन वैज्ञानिक रूपाने या विषयांची व्यवस्थित मांडणी केली आहे. यातील अनेक गोष्टी अंधश्रद्धा आहेत, हे निश्चित. परंतु हे सिद्ध कसे करायचे, याचे वैज्ञानिक प्रमाण देखील या पुस्तकामध्ये लेखकाने दिलेले आहे. कदाचित याचमुळे आपल्या वैज्ञानिक दृष्टीकोन अधिक मजबूत होण्यासाठी ते निश्चितच मदत करू शकते. 



Monday, July 6, 2020

विज्ञान भ्रमंती - निरंजन घाटे

ज्येष्ठ विज्ञान लेखक निरंजन घाटे यांच्या विज्ञान बखरीमधलं हे बहुमूल्य पुस्तक होय. विज्ञान हा विषय किती अद्भुत व सखोल आहे, याची जाणीव करून देणारं हे पुस्तक आहे. मंगळावरील पाण्यापासून माणसांच्या मासेमारी पर्यंत, भुताच्या जन्मापासून माकड आणि माणसांपर्यंत आणि आपल्या आदि पूर्वजांपासून गॅलापेगॉसच्या राक्षसी कासर्वांपर्यंत विस्तृत विज्ञान-ज्ञान देणारे पुस्तक म्हणजे "विज्ञान भ्रमंती" होय. विज्ञानात जितके खोलात जाऊ तितके ते अधिक गहन होत जातं. व ही खोलीच ज्ञानाची कवाडं उघडी करतात. याची प्रचिती हे पुस्तक वाचल्यावर निश्चितच येते.
काही प्रश्नांचा आपण विज्ञानाच्या दृष्टीने अजूनही विचार केलेला नाही. डावे-उजवे का व कसे? लिओनार्दो दा विंची, मिडास राजाची कथा अशा विविध विषयांना लेखकाने या पुस्तकाच्या निमित्ताने संशोधनात्मक रूप दिले आहे.
मानववंशशास्त्र हा माझा आवडता विषय. डार्विनशिवाय हा विषय पूर्णच होऊ शकत नाही. यावरच आधारित "सजीवांची जीवघेणी स्पर्धा" हे सर्वात वाचनीय प्रकरण या पुस्तकात लेखकाने विस्तृत पद्धतीने मांडले आहे. त्यामुळे विज्ञानाच्या अमर्याद विश्वाची छोटीशी भ्रमंती ते निश्चितच करून आणते. याशिवाय विज्ञानाचे सोबती असणारे गणित व इतिहास या विषयांचे महत्त्वही जागोजागी ठळकपणे दिसून येते.

 

Thursday, March 26, 2020

फार फार वर्षांपूर्वी

फार वर्षांपूर्वी म्हणजे सुमारे लाखो व कोटी वर्षांपूर्वीची ही गोष्ट आहे. एका गोष्टीत रहस्य आहे, गुढ आहे, विज्ञान आहे, संशोधन आहे शिवाय उत्तरही आहेत. निरंजन घाटे यांचे हे पुस्तक अशाच लाखो-करोडो वर्षांपासून पडलेल्या विविध प्रश्नांची वैज्ञानिक उत्तरे आपल्याला देतं. निरंजन घाटे हे हाडाचे विज्ञानलेखक. त्यामुळे विज्ञानाच्या दृष्टिकोनातून त्यांनी लिहीलेले सर्वच लेख आपल्याला मानववंशशास्त्र, पुराणवास्तुशास्त्र, हवामान शास्त्र व इतिहासाची माहिती करून देतात. पृथ्वीचा इतिहास हा करोडो वर्षांचा असला तरी बहुतांशी तो फक्त मागील दोन हजार वर्षांचाच पुस्तकात मांडलेला दिसतो. परंतु, तत्पूर्वी मनुष्य जीवन कसे होते? व त्यांनी प्रगतीची पावले कशी पुढे टाकली? याचे वर्णन निरंजन घाटे यांनी या पुस्तकात केले आहे. मानववंशशास्त्र व पुरातनवास्तूशास्त्र या विज्ञानशाखा किती सखोल आहे, त्याची प्रचिती हे पुस्तक देतं. संशोधन कसं करावं व त्याला किती विविध पैलू असू शकतात? या प्रश्नांची उत्तरेही आपल्याला विविध घटनांतून मिळतात. पुस्तकातील काही महत्त्वाच्या मुद्द्यांना याठिकाणी मांडत आहे.
  • पुरातन काळी मनुष्य हा मांसाहारी, शाकाहारी होता की प्रेताहरी? याचं सप्रमा स्पष्टीकरण त्यांनी या पुस्तकात दिलं आहे.
  • आदिमानवाचा शेती विषयक, पर्यावरण विषयक, आरोग्यविषयक प्रवास कशा प्रकारे झाला?
  • समुद्रात शेकडो मैलांवर असणाऱ्या इस्टर आयलँड वरील पुतळ्यांचं गूढ काय?
  • चंद्रावती नावाचं अतिसुंदर शहर भारतात होतं. परंतु परकीय आक्रमकांनी त्याची नासधूस करून विद्रूप करून टाकलं.
  • उत्खननात सापडलेली हाडे ही मानवशास्त्रात अभ्यास करण्यासाठी सर्वात मोठा पुरावा मानले जातात. त्यांचे महत्त्व व रोमांचकारी इतिहास इथे मांडला आहे.
  • चिली व दक्षिण अमेरिकेत अनेक प्राचीन कलाकृती आहेत. माया संस्कृतीत बनवलेल्या या कलाकृतींचे रहस्य काय?
  • ऑस्ट्रेलियातील डायनासोर्स संशोधन.
  • डायनासोर, ट्रायनोसॉर म्हणजे काय?
  • चीनमधल्या ड्रॅगनच्या हाडांच्या शोधामागचा रोमांचकारी प्रवास.
  • युरोपातल्या प्राचीन अटलांटिस शहराच्या समृद्धीतेची वर्णने आजही केली जातात. ते पाण्याच्या तळाशी स्थित आहे.
  • वृक्षवर्तुळावरून वृक्षांचे वय व त्या काळची हवामान स्थिती ओळखण्याची अचूक शास्त्र.
  • व्हिएतनाम, कंबोडिया मध्ये एकेकाळी हिंदू राजे राज्य करीत होते. परंतु परकीय आक्रमकांमुळे त्यांची संस्कृती लयास गेली. आजही त्यांच्या सांस्कृतिक पाऊलखुणा दोन्ही देशात सापडतात.
  • मानवशास्त्रज्ञ डग्लस औसली यांनी आजवर सर्वाधिक अचूकतेने या विज्ञानाचा वापर करून दाखवला आहे.
  • रेण्विक पुरानशास्त्र म्हणजे काय? त्याचा वापर कसा करता येतो?
  • आदिमाता अर्थात आपल्या सर्वांच्या एकमेव मातेचा शोध कसा घेतला गेला याची कहाणी.
  • आपण सारे होमोसेपियन एकाच आईची लेकरे आहोत. पण आज लाख वर्षानंतर आपापसात कितीतरी भेदभाव तयार झालेत.
  • आफ्रिके पासून अलिप्त असणाऱ्या अमेरिका खंडात मानव पोहोचला कसा? याचे शास्त्रीय उत्तर.
अशा विविध प्रकारची माहिती व त्याची उत्तरे निरंजन घाटे यांनी या पुस्तकात दिली आहेत. पारंपरिक इतिहास व विज्ञानापलीकडे जाऊन वाचण्यासारखे हे निश्चितच वेगळे पुस्तक आहे.