Showing posts with label mehta publishing. Show all posts
Showing posts with label mehta publishing. Show all posts

Friday, November 6, 2020

पावनखिंड

वीर बाजीप्रभू देशपांडे यांची वीरगाथा महाराष्ट्रातील सर्वांनाच माहित आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची सिद्धी जोहरच्या पन्हाळ्यावरील वेढ्यातून सुटका करण्यासाठी बाजीप्रभूंनी आपले प्राण पणाला लावले होते. पन्हाळ्याच्या वेढ्यातून बाहेर पडल्यावर शिवाजी महाराज थेट खेळणा अर्थात विशाळगडाच्या दिशेने निघाले. परंतु सिद्धी जोहरच्या सैन्याला याची खबर लागताच त्यांनी वेगाने पाठलाग चालू केला. रस्त्यातील घोडखिंडीमध्ये बाजीप्रभू व त्यांचे बंधू फुलाजीप्रभू देशपांडे थांबून राहिले व शिवाजी महाराज विशाळगडावर पोहोचेपर्यंत त्यांनी सिद्धी जोहरच्या सैन्याचा अतिशय प्रखरपणे सामना केला. हजारो गनीम कापून काढले. हीच वीरगाथा रणजित देसाई यांनी "पावनखिंड" या त्यांच्या कादंबरीमध्ये चितारलेली आहे.
शिवरायांवरील प्रत्येक कादंबरीद्वारे त्यांच्या विविध गुणवैशिष्ट्यांचे दर्शन होते. शिवाय त्यांच्यावर जीव ओवाळून टाकणाऱ्या त्यांच्या शिलेदारांची गौरवगाथा ही नव्याने ध्यानात येते. बाजीप्रभू आणि शिवाजी महाराजांची पहिली भेट रोहीडा किल्ल्यावर झाली होती. तिथूनच त्यांचा स्नेह अधिक घट्ट होत गेला. बाजीप्रभूंना शिवरायांमधील खरा जाणता राजा दिसला. त्यामुळे लाख मेले तरी चालतील परंतु, लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे, या उक्तीप्रमाणे त्यांनी शिवाजी महाराजांना सुखरूपपणे गनिमांच्या वेढ्यातून बाहेर काढले. त्यात त्यांना आपले प्राण गमवावे लागले. बाजीप्रभुंसोबतच शिवा काशिद यानेही आपल्या प्राणांची आहुती दिली होती. शिवाजी महाराजांसाठी जीव देणारी ही माणसं इतिहासात अजरामर होऊन गेली. त्यांच्यामुळेच शिवरायांना मराठी माणसांचं स्वराज्य स्थापन करता आले. 


 

Wednesday, June 17, 2020

अंतराळातील मृत्यु - डॉ. संजय ढोले

पुणे विद्यापीठात कार्यरत असणारे डॉ. संजय ढोले यांचे मेहता पब्लिशिंग हाऊसने ५-६ विज्ञान कथासंग्रह प्रकाशित केले आहेत. त्यातीलच 'अंतराळातील मृत्यू' हा एक होय. त्यांच्या डिंभक व अश्मजीव या दोन पुस्तकानंतर वाचलेला हा तिसरा कथासंग्रह होय. त्यांच्या प्रत्येक पुस्तकात लेखक म्हणून त्यांची संशोधक वृत्ती सातत्याने जाणवते. प्रत्येक कथेत मुलविज्ञान अर्थात जीव, भौतिक व रासायन यांचा प्रामुख्याने प्रभाव असतो. विशेष म्हणजे त्या विज्ञान संकल्पनांनी ओतप्रोत भरलेल्या असतात. विज्ञान कशा प्रकारे काम करू शकते? या प्रश्नाचे उत्तर ते आपल्या कथांमधून देत राहतात. हे सर्व कल्पनाविलास असले तरी अशक्यतेचा पल्ला कदाचित गाठू शकणार नाही असेच आहेत.
प्रयोग, संशोधन व शास्त्रज्ञ/प्राध्यापक हे त्यांच्या प्रत्येक कथेत येणारे शब्द. अर्थात त्याची प्रत्येक कथा ही एका प्रयोगात सारखीच असते. तिच्यात विज्ञानाच्या मूल गाभ्याचा प्रकर्षाने समावेश असतो. जयंत नारळीकर, निरंजन घाटे व बाळ फोंडके यांच्या पेक्षा वेगळ्या कथा डॉ. ढोले लिहितात. हे मला प्रामुख्याने सांगावेसे वाटते. त्यांच्या सर्वच कथासंग्रहांमध्ये त्यांची शैली व विज्ञान हे समान धागे आहेत. त्यामुळे मुल विज्ञानाची आवड असणाऱ्यांनी त्यांचे कथासंग्रह निश्चितच वाचावेत.


Thursday, March 26, 2020

फार फार वर्षांपूर्वी

फार वर्षांपूर्वी म्हणजे सुमारे लाखो व कोटी वर्षांपूर्वीची ही गोष्ट आहे. एका गोष्टीत रहस्य आहे, गुढ आहे, विज्ञान आहे, संशोधन आहे शिवाय उत्तरही आहेत. निरंजन घाटे यांचे हे पुस्तक अशाच लाखो-करोडो वर्षांपासून पडलेल्या विविध प्रश्नांची वैज्ञानिक उत्तरे आपल्याला देतं. निरंजन घाटे हे हाडाचे विज्ञानलेखक. त्यामुळे विज्ञानाच्या दृष्टिकोनातून त्यांनी लिहीलेले सर्वच लेख आपल्याला मानववंशशास्त्र, पुराणवास्तुशास्त्र, हवामान शास्त्र व इतिहासाची माहिती करून देतात. पृथ्वीचा इतिहास हा करोडो वर्षांचा असला तरी बहुतांशी तो फक्त मागील दोन हजार वर्षांचाच पुस्तकात मांडलेला दिसतो. परंतु, तत्पूर्वी मनुष्य जीवन कसे होते? व त्यांनी प्रगतीची पावले कशी पुढे टाकली? याचे वर्णन निरंजन घाटे यांनी या पुस्तकात केले आहे. मानववंशशास्त्र व पुरातनवास्तूशास्त्र या विज्ञानशाखा किती सखोल आहे, त्याची प्रचिती हे पुस्तक देतं. संशोधन कसं करावं व त्याला किती विविध पैलू असू शकतात? या प्रश्नांची उत्तरेही आपल्याला विविध घटनांतून मिळतात. पुस्तकातील काही महत्त्वाच्या मुद्द्यांना याठिकाणी मांडत आहे.
  • पुरातन काळी मनुष्य हा मांसाहारी, शाकाहारी होता की प्रेताहरी? याचं सप्रमा स्पष्टीकरण त्यांनी या पुस्तकात दिलं आहे.
  • आदिमानवाचा शेती विषयक, पर्यावरण विषयक, आरोग्यविषयक प्रवास कशा प्रकारे झाला?
  • समुद्रात शेकडो मैलांवर असणाऱ्या इस्टर आयलँड वरील पुतळ्यांचं गूढ काय?
  • चंद्रावती नावाचं अतिसुंदर शहर भारतात होतं. परंतु परकीय आक्रमकांनी त्याची नासधूस करून विद्रूप करून टाकलं.
  • उत्खननात सापडलेली हाडे ही मानवशास्त्रात अभ्यास करण्यासाठी सर्वात मोठा पुरावा मानले जातात. त्यांचे महत्त्व व रोमांचकारी इतिहास इथे मांडला आहे.
  • चिली व दक्षिण अमेरिकेत अनेक प्राचीन कलाकृती आहेत. माया संस्कृतीत बनवलेल्या या कलाकृतींचे रहस्य काय?
  • ऑस्ट्रेलियातील डायनासोर्स संशोधन.
  • डायनासोर, ट्रायनोसॉर म्हणजे काय?
  • चीनमधल्या ड्रॅगनच्या हाडांच्या शोधामागचा रोमांचकारी प्रवास.
  • युरोपातल्या प्राचीन अटलांटिस शहराच्या समृद्धीतेची वर्णने आजही केली जातात. ते पाण्याच्या तळाशी स्थित आहे.
  • वृक्षवर्तुळावरून वृक्षांचे वय व त्या काळची हवामान स्थिती ओळखण्याची अचूक शास्त्र.
  • व्हिएतनाम, कंबोडिया मध्ये एकेकाळी हिंदू राजे राज्य करीत होते. परंतु परकीय आक्रमकांमुळे त्यांची संस्कृती लयास गेली. आजही त्यांच्या सांस्कृतिक पाऊलखुणा दोन्ही देशात सापडतात.
  • मानवशास्त्रज्ञ डग्लस औसली यांनी आजवर सर्वाधिक अचूकतेने या विज्ञानाचा वापर करून दाखवला आहे.
  • रेण्विक पुरानशास्त्र म्हणजे काय? त्याचा वापर कसा करता येतो?
  • आदिमाता अर्थात आपल्या सर्वांच्या एकमेव मातेचा शोध कसा घेतला गेला याची कहाणी.
  • आपण सारे होमोसेपियन एकाच आईची लेकरे आहोत. पण आज लाख वर्षानंतर आपापसात कितीतरी भेदभाव तयार झालेत.
  • आफ्रिके पासून अलिप्त असणाऱ्या अमेरिका खंडात मानव पोहोचला कसा? याचे शास्त्रीय उत्तर.
अशा विविध प्रकारची माहिती व त्याची उत्तरे निरंजन घाटे यांनी या पुस्तकात दिली आहेत. पारंपरिक इतिहास व विज्ञानापलीकडे जाऊन वाचण्यासारखे हे निश्चितच वेगळे पुस्तक आहे.