Saturday, June 18, 2022

विकिपीडियाला मदत करा

इंटरनेट म्हणजे माहितीचा महासागर होय. या महासागराला समृद्ध करणारी वेबसाईट म्हणजेच 'विकिपीडिया'. बहुतांश संज्ञा आपण जेव्हा गुगलमध्ये शोधतो तेव्हा देखील आपल्याला विकिपीडियाच्या पानांची लिंक समोर दिसते. विकिपीडिया हा जगातील अनेक लेखकांनी तसेच संपादकांनी समृद्ध केलेला माहितीचा स्त्रोत आहे. येथील माहिती अगदी नगण्य प्रमाणात अविश्वासार्ह मानली गेली असली तरी बहुतांशी माहिती आपल्याला ज्ञानस्वरूपात प्राप्त होत असते. किंबहुना आम्ही देखील बऱ्याच वेळा विकिपीडिया वरील माहितीचा वापर करत असतो. विशेष म्हणजे बहुतांश माहितीला माहितीचे स्त्रोत व संदर्भ दिलेले असतात. त्यामुळे तिच्या विश्वासार्हतेवर शंका घेता येत नाही.
आजपर्यंत आम्ही देखील मोठ्या प्रमाणात विकिपीडियावरील लेखांचा उपयोग वाचनासाठी व नवीन ज्ञानग्रहण करण्यासाठी केलेला आहे. परंतु काल विकिपीडिया उघडली तेव्हा त्यांचं हे निवेदन समोर दिसलं. विकिपीडिया हा मोफत उपलब्ध करून देण्यात आलेल्या ज्ञानचा स्त्रोत आहे. त्यावरील माहिती वाचण्यासाठी आपल्याला कोणतेही अकाउंट लागत नाही किंवा पैसेही द्यावे लागत नाहीत! आज-काल आपल्या ऑनलाईन वर्तमानपत्रांमध्ये लेख वाचण्यासाठी देखील आपल्याला पैसे द्यावे लागतात, अशी परिस्थिती आहे. याउलट विकिपीडिया मात्र आपल्याला माहितीचा साठा मोफत उपलब्ध करून देते. ही गोष्ट कौतुकास्पद अशीच आहे. परंतु त्या बदल्यात आपण विकिपीडिया ला काय देतो? या प्रश्नाचे उत्तर देखील शोधावे लागेल. विकिपीडियाने दिलेल्या माहितीनुसार केवळ दोन टक्के वाचक हे त्यांना डोनेट अर्थात पैसे दान करत असतात. याच गोष्टींवर विकिपीडिया टिकून आहे. हा आकडा खरोखरच वाढायला हवा, असे आम्हाला देखील वाटते. माहितीचा जगातील सर्वात मोठा स्त्रोत हा टिकून राहायला हवा, त्यासाठी त्यांनी आपल्याकडून आर्थिक मदतीची अपेक्षा केली तर चुकीचे ठरणार नाही. अगदी पन्नास रुपयांपासून आपण विकिपीडियाला डोनेट करू शकतो जेणेकरून माहितीचा हा स्त्रोत टिकून राहील आणि भविष्यामध्ये अधिक समृद्ध होत राहील.
(या पोस्टपूर्वीच आम्ही विकिपीडियाला डोनेशन दिले आहे)



 

2 comments:

to: tushar.kute@gmail.com