Showing posts with label knowledge. Show all posts
Showing posts with label knowledge. Show all posts

Wednesday, January 4, 2023

मॅथ्स इज फन

मागील कित्येक वर्षांमध्ये लिनक्समधील httrack चा मी वापर केला नव्हता. या लिनक्स कमांडचा वापर एखादी वेबसाईट पूर्णपणे डाऊनलोड करण्यासाठी केला जातो! अनेक वर्षांपासून अशी पूर्ण डाउनलोड करण्यासाठी कोणतीच वेबसाईट आवडली नव्हती. पण मागच्या आठवड्यामध्ये mathsisfun.com ही वेबसाईट मी पूर्ण डाऊनलोड करून घेतली! न जाणो भविष्यामध्ये ही वेबसाईट बंद झाली तर? अशी शंका मनामध्ये आल्याने पूर्ण वेबसाईटच डाऊनलोड करून ठेवली! आजवर मला आवडलेली ही एक उत्तम वेबसाईट होय.
गणित हा विषय बहुतांश लोकांना आवडत नाही. अगदी बालपणापासूनच त्याची भीती मनामध्ये भरलेली असते. आमच्या इंजीनियरिंगच्या विद्यार्थ्यांनी देखील गणिताचा धसकाच घेतलेला असतो. तसं पाहिलं तर अभियांत्रिकीचा पायाच गणितावर आधारलेला आहे. पण केवळ संख्यांशी खेळत बसणे अनेकांच्या जीवावर येते आणि मेंदू देखील चालत नाही. पण हे गणित जर सहज आणि सोप्या पद्धतीने शिकवले आणि त्याचा व्यवहारिक उपयोग कसा होतो, हे दाखवले तर ते निश्चितच पटकन समजते. अशाच गणितातील जवळपास सर्वच संकल्पना या वेबसाईटवर अतिशय उत्तमरित्या समजावून सांगितलेल्या आहेत. गणित म्हणजे केवळ सूत्र नाही तर तो आपल्या दैनंदिन जीवनाचा भाग आहे. या पद्धतीने हा विषय सोपा करून आपल्यासमोर ठेवलेला आहे. गणितातील सांख्यिकी, बीजगणित, अंकगणित आणि भूमिती या सर्व विषयांवर विस्तृत माहिती या संकेतस्थळावर वाचायला मिळते. प्रत्येक लेख गणितातील ज्ञानाचे भंडार असाच आहे. म्हणून ज्याला कुणाला गणित सोप्या भाषेत समजून घ्यायचे असेल त्यांनी ही वेबसाईट एकदा नक्की पहा. आणि जर भविष्यात ती कधी बंद झाली तर काळजी करू नका. मी ती पूर्ण डाऊनलोड करून ठेवलेली आहे! 



Saturday, December 24, 2022

ज्ञानाची किंमत

झिम्बाब्वेमध्ये एका दरोड्यादरम्यान बँक दरोडेखोर बँकेतील सर्वांना ओरडून म्हणाले: "हलू नका. पैसे देशाचे आहेत. पण जीव तुमचा आहे."

बँकेतील सर्वजण शांतपणे खाली पडले. याला म्हणतात "माइंड चेंजिंग कन्सेप्ट"... परंपरागत विचार पद्धती बदलणे.

जेव्हा एक महिला प्रक्षोभकपणे टेबलावर पडली, तेव्हा दरोडेखोर तिच्यावर ओरडले: "कृपया सभ्यपणे वागा! हा एक दरोडा आहे, बलात्कार नाही!"

याला म्हणतात "व्यावसायिक असणे". फक्त तुम्ही काय करण्यासाठी प्रशिक्षित आहात? यावर लक्ष केंद्रित करा!

जेव्हा बँक दरोडेखोर घरी परतले, तेव्हा धाकटा दरोडेखोर (एमबीए प्रशिक्षित) मोठ्या दरोडेखोराला म्हणाला, "चल आपल्याला किती मिळाले ते मोजू."

यावर मोठा दरोडेखोर म्हणाला: "तू खूप मूर्ख आहेस. इतका पैसा आहे की मोजायला खूप वेळ लागेल. आज रात्री, टीव्हीवरील बातम्या सांगतील की आम्ही बँकेतून किती लुटले!"

याला "अनुभव" म्हणतात. आजकाल कागदी पात्रतेपेक्षा अनुभव महत्त्वाचा!

दरोडेखोर निघून गेल्यानंतर बँक मॅनेजरने बँक सुपरवायझरला त्वरीत पोलिसांना बोलवा असे सांगितले. पण सुपरवायझर त्याला म्हणाले: "थांबा! आपण स्वतःसाठी बँकेतून १ कोटी काढू आणि ते ७ कोटीमध्ये जोडू जे आपण यापूर्वी बँकेतून गहाळ केले होते."

याला "प्रवाहासह पोहणे" असे म्हणतात. प्रतिकूल परिस्थितीला आपल्या फायद्यासाठी रूपांतरित करणे!

सुपरवायझर म्हणाला, "दर महिन्याला दरोडा पडला तर चांगले होईल." याला "किलिंग बोरडम" म्हणतात. तुमच्या नोकरीपेक्षा वैयक्तिक आनंद महत्त्वाचा आहे.

दुसर्‍या दिवशी, टीव्हीच्या बातम्यांमध्ये सांगण्यात आले की, बँकेतून १० कोटी चोरले गेलेत!

दरोडेखोरांनी पैसे मोजले.. मोजले... मोजले, परंतु त्यांना फक्त दोन कोटींच मिळाले होते. दरोडेखोर खूप संतापले, "आम्ही आमचा जीव धोक्यात घालून फक्त २ कोटी चोरले. बँक मॅनेजरने ८ कोटींवर डल्ला मारला. चोर होण्यापेक्षा शिक्षित असणे चांगले आहे, असे दिसते!"

याला म्हणतात "ज्ञानाची किंमत सोन्याइतकी आहे!"

त्या दिवशी बँक मॅनेजर आणि सुपरवायझर सगळे हसत हसत आनंदात होते!!

(संकलित)


 

Saturday, June 18, 2022

विकिपीडियाला मदत करा

इंटरनेट म्हणजे माहितीचा महासागर होय. या महासागराला समृद्ध करणारी वेबसाईट म्हणजेच 'विकिपीडिया'. बहुतांश संज्ञा आपण जेव्हा गुगलमध्ये शोधतो तेव्हा देखील आपल्याला विकिपीडियाच्या पानांची लिंक समोर दिसते. विकिपीडिया हा जगातील अनेक लेखकांनी तसेच संपादकांनी समृद्ध केलेला माहितीचा स्त्रोत आहे. येथील माहिती अगदी नगण्य प्रमाणात अविश्वासार्ह मानली गेली असली तरी बहुतांशी माहिती आपल्याला ज्ञानस्वरूपात प्राप्त होत असते. किंबहुना आम्ही देखील बऱ्याच वेळा विकिपीडिया वरील माहितीचा वापर करत असतो. विशेष म्हणजे बहुतांश माहितीला माहितीचे स्त्रोत व संदर्भ दिलेले असतात. त्यामुळे तिच्या विश्वासार्हतेवर शंका घेता येत नाही.
आजपर्यंत आम्ही देखील मोठ्या प्रमाणात विकिपीडियावरील लेखांचा उपयोग वाचनासाठी व नवीन ज्ञानग्रहण करण्यासाठी केलेला आहे. परंतु काल विकिपीडिया उघडली तेव्हा त्यांचं हे निवेदन समोर दिसलं. विकिपीडिया हा मोफत उपलब्ध करून देण्यात आलेल्या ज्ञानचा स्त्रोत आहे. त्यावरील माहिती वाचण्यासाठी आपल्याला कोणतेही अकाउंट लागत नाही किंवा पैसेही द्यावे लागत नाहीत! आज-काल आपल्या ऑनलाईन वर्तमानपत्रांमध्ये लेख वाचण्यासाठी देखील आपल्याला पैसे द्यावे लागतात, अशी परिस्थिती आहे. याउलट विकिपीडिया मात्र आपल्याला माहितीचा साठा मोफत उपलब्ध करून देते. ही गोष्ट कौतुकास्पद अशीच आहे. परंतु त्या बदल्यात आपण विकिपीडिया ला काय देतो? या प्रश्नाचे उत्तर देखील शोधावे लागेल. विकिपीडियाने दिलेल्या माहितीनुसार केवळ दोन टक्के वाचक हे त्यांना डोनेट अर्थात पैसे दान करत असतात. याच गोष्टींवर विकिपीडिया टिकून आहे. हा आकडा खरोखरच वाढायला हवा, असे आम्हाला देखील वाटते. माहितीचा जगातील सर्वात मोठा स्त्रोत हा टिकून राहायला हवा, त्यासाठी त्यांनी आपल्याकडून आर्थिक मदतीची अपेक्षा केली तर चुकीचे ठरणार नाही. अगदी पन्नास रुपयांपासून आपण विकिपीडियाला डोनेट करू शकतो जेणेकरून माहितीचा हा स्त्रोत टिकून राहील आणि भविष्यामध्ये अधिक समृद्ध होत राहील.
(या पोस्टपूर्वीच आम्ही विकिपीडियाला डोनेशन दिले आहे)