भारतात बऱ्याच भाषांमध्ये चित्रपट तयार होतात. भारतीय चित्रपटसृष्टी ही जगातील सर्वात मोठी चित्रपटसृष्टी मानली जाते. वर्षाला ८०० चित्रपट भारतातील २० भाषांमध्ये तयार केले जातात. इतक्या मोठ्या प्रमाणात चित्रपट तयार होत असल्याने दर वेळी नवी कथा मिळेलच असे नाही. त्यामुळे बऱ्याच कथा एका भाषेतून दुसऱ्या भाषेत चोरी केल्या जातात. हिंदी चित्रपटांमध्ये हे प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे. काही ठराविक दिग्दर्शक सोडले तर अन्य दिग्दर्शक हे कथेची चोरीच करतात. बहुतांशी ही कथा हॉलिवूड व दक्षिण भारतीय चित्रटांमधून ढापलेली असते. जे हॉलीवूड वा दक्षिण भारतीय चित्रपट पाहत नाहीत, त्यांना चित्रपटाची कथा नविन वाटते.
बॉलिवूडने काही चित्रपटांच्या कथा ह्या मराठी चित्रसृष्टीतूनही ढापलेल्या आहेत. मराठी भाषिकच मराठी चित्रपट पाहत नसल्याने ही बाब त्यांच्या लक्षात आलेली नाही. यातील जवळपास सर्वच कथा मराठीत हिट ठरलेल्या आहेत. दोन वर्षांपूर्वी आलेला ’लागा चुनरी मे दाग’ हा चित्रपटाची सुमित्रा भावे न सुनिल सुकथनकर यांच्या ’दोघी’ ह्या महाराष्ट्र राज्य पुरस्कार विजेत्या चित्रपटावरून चोरली होती! १९९० च्या दशकात अशोक सराफ, सचिन व लक्ष्मीकांत बेर्डे यांचे बरेच चित्रपट मराठीमध्ये हिट झाले. त्यांपैकी सचिनने दिग्दर्शित केलेला ’भुताचा भाऊ’ हा चित्रपट ’हॅलो ब्रदर’ या नावाने तयार झाला होता. त्यात सलमान व अरबाज़ ह्या ख़ान बंधूंनी काम केले होते! सचिनचाच ’अशी ही बनवाबनवी’ हा सुपरहिट चित्रपट एक वर्षापूर्वी ’पेईंग गेस्ट’ या नावाने तयार झाला होता. परंतू, त्याला बॉक्स ऑफिसवर फारसे यश मिळाले नाही. १९९७ सालचा सर्वोत्तम मराठी चित्रपट ’बिनधास्त’ ची कथा ’भागम भाग’ या प्रियदर्शन च्या चित्रपटात ढापण्यात आली होती. या चित्रपटाचे निर्माते मच्छिंद्र चाटे यांनी प्रियदर्शनच्या विरोधात कोर्टात दावाही केला होता. परंतू, त्याचे पुढे काय झाले ते समजले नाही. ’बिनधास्त’चा रीमेक असणारा ’फ्रेंडशिप’ हा चित्रपट प्रियदर्शननेच दिग्दर्शित केला होता!
महेश कोठारेंनी ’मासूम’ या चित्रपटाद्वारे हिंदीत पाऊल ठेवले. तो चित्रपट हिट ठरला त्याची कथा त्यांच्याच ’माझा छकुला’ मराठी हिट चित्रपटावर आधारित होती. यानंतर महेश कोठारेंचा हिंदीत मात्र एकच चित्रपट आला. १९९० च्या दशकात हिट झालेला ’बाळाचे बाप ब्रम्हचारी’ हा आणखी एक मराठी मेगाहिट होय. तीन वर्षांपूर्वी तो ’हे बेबी’ या नावाने हिंदीत तयार झाला. अक्षय कुमार व रीतेश देशमुखच्या यात मुख्य भूमिका होत्या. या चित्रपटाने बऱ्यापैकी व्यवसाय केला होता.
महेश कोठारेचा ’झपाटलेला’ हा हिंदीत ’पापी गुडि़या’ या नावाने तयार झाला होता. त्यात करिष्मा कपूर ची मुख्य भूमिका होती. हा चित्रपट मात्र सपशेल आपटला. विशेष म्हणजे, मराठीतून हिंदीत डब झालेल्या चित्रपटांपैकी झपाटलेला हा एक चित्रपट आहे. ’खिलौना बन गया खलनायक’ या नावाने तो हिंदीत भाषांतरीत झाला होता. काही वर्षांपूर्वी आलेला ’टारझन: दी वंडर कार’ ची कथाही लक्ष्मीकांत बेर्डे अभिनीत ’एक गाडी बाकी अनाड़ी’ या चित्रपटावरून चोरली होती. लक्ष्मीकांतचाच ’कुठे कुठे शोधु मी तीला’ हा चित्रपट ’लेडिज टेलर’ या नावाने हिंदीत तयार झाला. यात राजपाल यादवची मुख्य भूमिका होती.
असे अनेक चित्रपट हिंदीत रीमेक झाले आहेत. परंतु, काही कथा हिंदीतून मराठीत आलेल्या दिसतात. सचिनचा ’नवरा माझा नवसाचा’ व ’आम्ही सातपुते’ हे चित्रपट तसेच ’एक डाव धोबीपछाड’, ’तुला शिकविन चांगलाच धडा’ हे चित्रपट हिंदी चित्रपटांचे मराठी रीमेक आहेत! एका भाषेतच कथांची चोरी होत आहे तेव्हा वेगवेगळ्या भाषेत चोरी झाली तर त्यात विशेष काय?
Wow... great information.
ReplyDelete