Saturday, May 22, 2010

खेळ सत्तेचा...

भारतीय जनतेने आजवर आपल्या राजकीय पटलावर घडलेले अनेक खेळ पाहिले आहेत. हे सर्व खेळ आता आम्हा सर्वसामान्य नागरिकांच्या अगदीच ओळखीचे झाले आहेत. आमच्या महाराष्ट्रातील राजकारणी पडद्याआड खेळ खेळतात. तर उत्तर-मध्य भारतातले जनतेसमोर स्वत:च्या नालायकिचे प्रदर्शन मांडतात. असाच खेळ सध्या झारखंड नावाच्या एका राज्यात चालू झाला आहे.
शिबू सोरेन म्हटलं की झारखंड व झारखंड म्हटलं की शिबू सोरेन असं त्यांचं जन्मोजन्मीचं अतूट नातं आहे. दहा वर्षांपूर्वी बिहारमधून झारखंडची निर्मिती झाली तेव्हापाहून सोरेन गुरूजी या राज्याच्या राजकारणात धिंगाणा घालत आहेत. बिहारमधून वेगळं होऊन त्याची परिस्थिती सध्या बिहारपेक्षा वाईट होऊ लागली आहे. मागच्या आठवड्यात बिहारी मुख्यमंत्री नितिशकुमार यांनी झारखंड आता बिहार मध्ये विलीन करा असे सुचविले होते. आता एखादे राज्य बिहारमध्ये विलीन करण्यासारखी परिस्थिती असेल तर ती किती वाईट परिस्थिती समजावी!

जवळपास मागच्या दहा वर्षात शिबू सोरेन चार-पाच वेळा या राज्याचे मुख्यमंत्री झाले. या काळात त्यांनी झारखंडला खाऊन टाकले. मधल्या काळात मधू कोडाने स्वत:चे हात साफ करून घेतले होते. आता शिबू सोरेन पुन्हा ताव मारायला सज्ज झाले आहेत. कॉंग्रेस सरकारच्या मंत्रिमंडळात मंत्री असणारे शिबू खूनाच्या आरोपार दोषी ठरले आहेत. ही गोष्ट आज बहुतांश जण विसरूनही गेले असतील. अगदी पत्रकारसुद्धा...! शिबूला शिक्षा झाली पण अंमलबजावणी झाली नाही. प्रकाश झा च्या चित्रपटातील टिपिकल राजकारणी शोभतो असा शिबू सोरेन आहे. त्याचे सर्व कारनामे माहित असूनही केवळ सत्तेसाठी राहूल गांधींचा कॉंग्रेस पक्ष व वाजपेयी, गडकरींचा भाजप हे स्वत:ला राष्ट्रीय म्हणविनारे पक्ष शिबूला पाठिंबा देत आहेत. भारतीय राजकारणातील ही एक लाजिरवानी बाब आहे. राहूल गांधी वा गडकरी कितीही विकास-विकास बोंबलत असले तरी खरी तल्लफ ही सत्तेचीच आहे, हे यातून सिद्ध होते. भारतीय राजकारण स्वच्छ करायला कोणीही पाठिंबा देत नाही. आपलीच वट आहे, हे पाहून शिबूने पुन्हा मुख्यमंत्रीपदाचा मुकूट स्वत:च्या डोक्यावर घातला आहे. येत्या पाच वर्षांमध्ये मला कोण मुख्यमंत्रीपदावरून हटवते, तेच बघतो अशी धमकी त्याने अन्य राजकीय नेत्यांना आता दिलीय. त्यासाठी तो ३० जूनपर्यंत पुन्हा निवडणूक लढविणार आहे. त्यात तो जिंकणार हे निश्चित. परंतू, जनतेच्या मनात आपल्या राजकारणाबद्दल चांगली प्रतिमा आता अत्यंत धूसर होत चालली आहे. ती यापुढे सुधारणे आता निव्वळ अशक्य आहे...

1 comment:

  1. आपल्या देशात इथुन पुढे राजकारणी लोक काय काय करतील ते सांगता येत नाही. शेवटी जनताच मरणार आहे....

    ReplyDelete

to: tushar.kute@gmail.com