Thursday, May 27, 2010

पाऱ्याचा उच्चांक


मे महिन्यामध्ये भारतातील उष्म्यात मोठ्या प्रमाणत वाढ झाली. ही वाढ इतकी आहे की आत्तापर्यंत उष्माघाताने मृत्यू पडलेल्यांची संख्या ही हजाराच्या घरात गेली आहे. आपल्या विदर्भामध्ये कालच २६ जणांचा उष्माघाताने मृत्यू झाला. शिवाय मागच्या काही दिवसांमध्ये विदर्भातील सर्वच जिल्ह्यांमध्ये मृत्यू पडणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे.

या महिन्यामध्ये विदर्भातील बहुतांश ठिकाणी अधिकतम सरासरी तापमान हे ४५ अंशाच्या वरतीच राहिले आहे. याचवेळी मुंबईचे तापमान हे ३५ च्या वर होते तर पश्चिम महाराष्ट्राचे तापमान ४० च्या वरती होते. विदर्भातील ४५ अंशाचा उष्मा म्हणजे उन्हाचा कहर करणारा आहे. आपण इथे ४० च्या वर तापमान गेल्यावर घामाने भिजून जातो तिथे ४५ अंशात तापमान गेल्यावर काय परिस्थिती होईल, याची कल्पना करता येऊ शकते. गुजरातमध्येही सरासरी अधिकतम तापमान हे ४५ वर बहुतांश ठिकाणी राहिले होते. तिथे मृत्यू पावलेल्यांची संख्या ही १५० च्या घरात पोहोचली आहे. उन्हाचा असा कहर चालू असताना तरी आता सर्वजण मान्सूनची आतूरतेने वाट पाहत आहेत.

ग्लोबल वॉर्मिंगच्या दुष्परिनामांचे चित्रण सध्या चालू झाले असल्याचे दिसू लागले आहे. पृथ्वीवर वातावरणात ॠतूंमध्ये होणारा बदल हा ग्लोबल वॉर्मिंगचीच परिणीती असल्याचे दिसून येते. हिवाळ्यामध्ये कडाक्याची थंडी तर उन्हाळ्यात कडाक्याचा उष्मा ही ग्लोबल वॉर्मिंगची लक्षणे आहेत. उद्या अशा प्रकारच्या ॠतूबदलामुळे पाऊसही वेळेवर पडेल की नाही ते सांगता येत नाही. मागच्या पावसाळ्यामध्ये पावसाचा लहरीपणा आपण अनुभवला. अजुनही जून उजाडला नसल्याने पावसाची प्रगती सांगता येत नाही. अंदमानात मान्सून धडकल्याचे वृत्त आले. मध्येच ’लैला’ नावाच्या वादळाने दक्षिण भारतात उन्हाळ्यातच पूरपरिस्थिती निर्माण केली. त्यात बऱ्याच जणांचा मृत्यू झाला. पूर्वी निसर्गाचा कोप जितका भयानक नव्हता तितका आज होऊ लागल्याचे दिसते.

या सर्व घटनांना मानव स्वत: जबाबदार आहे. पृथ्वीवरच्या वातावरण बदलावर त्यानेच स्वत:च्या कृतीने नियंत्रण आणायला हवे. अन्यथा येणारा काळ खूप भयंकर असणार आहे, हेच निसर्ग सध्या आपल्याला पटवून सांगत आहे...

No comments:

Post a Comment

to: tushar.kute@gmail.com