Wednesday, June 9, 2010

एक विचित्र चायनामन

चायनामन’ हे नाव ऐकले की मला नेहमी पॉल ऍडम्स ची आठवण येते. हा पॉल ऍडम्स दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघातील एक विचित्र शैलीचा गोलंदाज होता. त्याच्या शैलीच्या बाबतीत तो एकमेवाद्वितीय होता म्हटले तर निश्चितच वावगे ठरणार नाही. जरा शेजारचे पॉल ऍडम्स चे छायाचित्र पाहा. त्यातून त्याच्या गोलंदाजाची शैली लगेच कळून येईल. sporting-heroes.net वरून मला त्याचा इथे दाखविण्यायोग्य फोटो मिळला. त्याबद्दल त्यांचे धन्यवाद.

यूट्यूब वर मला त्याच्या बॉलिंग ऍक्शनचा हवा तसा व्हिडिओ मिळाला. त्यावरून त्याची विचित्र गोलंदाजी पाहता येईल. कुणीही त्याची गोलंदाजी प्रथम पाहिली की विचित्रच वाटते. पॉल ऍडम्सच्या करियरच्या सुरूवातीच्या काळात त्याच्याबाबतीत असेच घडले. मैदानावरचे खेळाडूच नव्हे तर प्रेक्षकही त्याच्या गोलंदाजीवर हसायचे. पण, या गोलंदाजाने स्वत:ला सिद्ध करून दाखविले. चेंडू टाकताना तो फलंदाजाकडे पाहतच नसायचा. त्याच्यावर अशी टिका अनेकदा झाली होती. हे पॉल ऍडम्सला जेव्हा समजले तेव्हा त्याने सांगितले होते कि, गोलंदाजी करताना एकदा फलंदाजाला पाहिले की, त्याची प्रतिमा माझ्या मनात तशीच राहते त्यामुळे चेंडू कसा व कुठे टाकायचा हे मला निश्चितच समजते. अशी त्याची गोलंदाजी ’चायनामन’ ह्या प्रकारात मोडते. आजच्या घडीला केवळ ऑस्ट्रेलियाचा डेविड हसी हा एकमेव गोलंदाज चायनामन म्हणून प्रसिद्ध आहे.
२० जानेवारी १९७७ ला पॉल रेगन ऍडम्सचा जन्म दक्षिण आफ्रिकेतल्या केप टाऊन येथे झाला. पॉल सुरूवातीला एक फलंदाज म्हणून उदयास आला. डावखुरा पॉल उजव्या हाताने फलंदाजी करायचा. परंतू, त्याच्या शिक्षकांनी त्याला गोलंदाजीस उद्युक्त केले. सर्वप्रथम त्याच्या मित्रांनी त्याची गोलंदाजी पाहिली तेव्हा ते पोट धरून हसले होते. नंतर मात्र जेव्हा त्याने प्रतिस्पर्धी संघाच्या विकेट्स घ्यायला सुरूवात केली तेव्हा मात्र सर्वजण तोंडात बोटे घालून बसले. त्याच्या आयुष्यात अशा घटना अनेकदा घडल्या आहेत. त्याचे सुरूवातीचे करियर घडविण्यात त्याचे शिक्षक अब्राहम्स यांचा मोठा वाटा राहिला होता. नंतरच्या काळात दक्षिण आफ्रिकेचे प्रसिद्ध खेळाडू एडी बार्लो यांनी पॉल मधील गुण हेरून त्याची ’वेस्टर्न प्रोव्हिंन्स’ च्या ब संघाकडून खेळण्यास संधी मिळवून दिली. लवकरच त्याने अ संघातही स्थान मिळविले. याच संघातून उत्तम खेळ केल्याने पॉल ऍडम्स ची निवड १९९५ मध्ये इंग्लंडविरूद्ध दक्षिण आफ्रिकेच्या अ संघात झाली. यानंतर खऱ्या अर्थाने आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळखला जाऊ लागला. इंग्लंडचे आघाडीचे फलंदाज ग्राहम थॉर्प व ग्राहम हिक यांना त्याने एकाच ओव्हरमध्ये बाद करून वाहवा मिळविली. त्याच्या संघातील त्याचा अष्टपैलू सहकारी ब्रायन मॅकमिलन याने त्याला ’गोग्गा’ हे टोपननाव बहाल केले होते. याचा अर्थ किडा असा होतो.
पॉलच्या जबरदस्त खेळीनंतर त्याची राष्ट्रीय संघात निवड पक्की होती. राष्ट्रीय संघात निवड झाली तेव्हा तो फक्त १८ वर्षांचा होता. दक्षिण आफ्रिकेचा तो सर्वात तरूण खेळाडू ठरला. १९९९ मध्ये पॅट सिमकॉक्स या आघाडीच्या ऑफस्पिनरच्या जागेवर पॉल ऍडम्सची संघात निवड करण्यात आली होती. नंतरच्या काळात पॅट सिमकॉक्स व ऍडम्स हे दोघेही बऱ्याचदा एकाच वेळी संघात खेळले आहेत. त्यांना साथ द्यायला निकी बोये हाही दक्षिण आफ्रिका संघात होता. हॅन्सी क्रोनिएच्या नेतृत्वाखाली पॉल ऍडम्स अनेक कसोटी सामने खेळला. भारत एकदा आफ्रिकेच्या दौऱ्यावर असताना पॉलने सौरव गांगुलीचा एका उत्तम गुगलीवर बळी घेतला होता. सहसा गांगुली त्याच्यापुढे कोणत्याही फिरकी गोलंदाजाचे चालू द्यायचा नाही. त्यामुळे त्रिफळाचित झाल्यावर त्याची प्रतिक्रिया ही नेहमीपेक्षा वेगळी वाटली.
सन २००२ मध्ये पॉल ऍडम्सने त्याच्या कारकिर्दीतील १०० बळी पूर्ण केले. ही कामगिरी करणारा तो आफ्रिकेचा सातवा गोलंदाज ठरला. याच वर्षी त्याला दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्डाने सर्वोत्तम क्रिकेटपटूचा प्रदान केला होता. २००४ मध्ये आफ्रिकेच्या राष्ट्रीय संघात तो अखेरचा दिसला होता. ऑक्टोबर २००८ मध्ये त्याने प्रथम श्रेणी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली.
कदाचित यापुढे त्याच्यासारखी शैली असणारा गोलंदाज पुन्हा तयार होणार नाही...

No comments:

Post a Comment

to: tushar.kute@gmail.com