Tuesday, June 22, 2010

रंगीबेरंगी प्रेमकथा: ’क्षणभर विश्रांती’


’क्षणभर विश्रांती’चा रीव्ह्यु लिहायला घेतला तेव्हा महाराष्ट्र टाईम्स मध्ये वैष्णवी मानविंदे यांनी त्याचा रीव्ह्यु लिहिल्याचे ध्यानात आले. यापेक्षा वेगळे मत माझे निश्चितच नाही. त्यांनी चित्रपटाची छान समीक्षा केली आहे. मी त्याच्याशी १०० टक्के सहमत आहे. त्यांचा हा रीव्ह्यु इथे लिहित आहे
सौजन्य: महाराष्ट्र टाईम्स....

रंगीबेरंगी प्रेमकथा
वैष्णवी कानविंदे

उन्हाळ्याने आपला प्रताप दाखवायला सुरुवात केलीय. जीव अक्षरश: नकोसा झालाय आणि अशातच कुठूनतरी एखादी हलकीशी झुळूक येते. भले त्या झुळुकीत अख्खं वातावरण बदलायची क्षमता नसेल; पण त्याक्षणी मात्र ती नक्कीच सुखावून जाते. सचित पाटीलचा नुकताच प्रदर्शित झालेला 'क्षणभर विश्रांती' हा सिनेमा या झुळुकीसारखाच आहे... हळुवार आणि हलका फुलका.

या सिनेमात खूप काही घडणारं नाही. त्यातनं सामाजिक, मानसिक, वैचारिक वगैरे स्थित्यंतरांची फारशी अपेक्षाही करता येत नाही. क्षणभरच्या कथानकाचा जीव तसा अगदी छोटासा असला तरी फॅमिली किंवा फेंडस आऊटिंगसाठी हा सिनेमा चपखल आहे.

या सिनेमाची कथा... त्यापेक्षा प्लॉट म्हणू या; तर क्षणभर विश्ाांतीचा प्लॉट म्हणजे तरुण वयाची स्पंदनं टिपणारी हलकी फुलकी प्रेमकथा. चार तरुण. त्यातला प्रत्येकजण आत्ताच्या पिढीचा प्रतिनिधी. कोणाला अभिनयाची आवड, तर कोणी कवी मनाचा. कोणी रोजी रोटीसाठी भुजीर्ची गाडी लावणारा, तर कोणी पांढरपेशा समजल्या जाणाऱ्या आयटी प्रवाहातला... कॉलेजचा काळ संपल्यानंतरही आपली आवड जिवंत ठेवत समाजात खंबीरपणे पाय रोवायची धडपड करणारे चार पातळीवरचे चार जिवलग मित्र जुन्या दिवसांना उजाळा देण्यासाठी, धकाधकीच्या जीवनातून क्षणभर विश्ाांतीसाठी सहलीला जातात. तिथे गाठ पडते, सहलीसाठीच आलेल्या चार मैत्रिणींशी. मग अर्थातच चार मुली, चार मुलं आहेत म्हटल्यावर त्यातनं भांडणं, मतभेद, प्रेम वगैरे घडून येणं साहजिकच. पण सगळं दिसतं तितकं सहज नसतं. हळूहळू काही गोष्टी उलगडतात आणि मग....?

मग जे घडतं ते म्हणजे हा सिनेमा. साध्यासरळ वाटणाऱ्या या रंगीबेरंगी प्रेमकथेत अडचणी त्या काय येतात आणि मजा, मस्ती अशी संकल्पना घेऊन जगणारा तरुण आयुष्यातल्या प्रश्नांना कसं सामोरं जातो हे या सिनेमातनं सांगायचा प्रयत्न केलाय. अर्थात त्यात विशेष झणझणीतपणा नाही, अनेक गोष्टी अगदी ठरवल्याजोग्या, सहज घडत जातात... गांभीर्याची हलकीशी किनार असणाऱ्या या सिनेमाची धाटणी मात्र संपूर्ण विनोदी आहे. पण सुदैवाने त्या विनोदाचा सूर कुठेही अचकट विचकट होत नाही, ही जमेची बाजू. आणि त्यासाठी सिद्धार्थ जाधवला शंभर टक्के मार्क द्यावे लागतील. त्याची एक टिपीकल स्टाईल घडतेय. पण या सिनेमात अथपासून इतिपर्यंत विनोदाचं बेअरिंग पेलणाऱ्या सिद्धार्थची व्यक्तिरेखा कुठेही बटबटीत होत नाही. उलट त्याच्या ठायी उपजत असणाऱ्या टायमिंग सेन्सचा उत्तम वापर करून घेतल्याने संवाद अधिक फुलले आहेत. मराठी इंडस्ट्रीतला चॉकलेट हिरो म्हणून सचितचं व्यक्तिमत्त्व चपखल आणि त्याने ते पेललंयदेखील छान. त्याच्या आत्तापर्यंतच्या भूमिकांपेक्षा वेगळी, पण तरीही त्याच्या व्यक्तिमत्त्वाला तंतोतंत जुळणारी व्यक्तिरेखा त्याने चांगली उभी केलीय. मौलिक भट आणि हेमंत ढोमे या दोन नव्या चेहऱ्यांच्या दिसण्यात किंवा अभिनयातही ठसा उमटवण्याजोगा प्रभाव नसला तरी सिनेमातल्या प्रवाहात ते मिसळून जातात. सोनाली, मनवा नाईक, कादंबरी कदम आणि पूजा सावंत या अतिशय सुंदर, युथफूल दिसल्या आहेत. भारतीय आणि पाश्चात्त्य संस्कृतीच्या अधेमधे जगणाऱ्या तरुणींचं प्रतिनिधित्व करणाऱ्या या चौघींच्या रंगीबेरंगी वावरामुळे सिनेमाला टवटवी आलीय हे नक्की. आणि स्वत:च्या इतकी वर्षं जोपासलेल्या हिरो प्रतिमेतून प्रयत्नपूर्वक बाहेर पडत कॅरॅक्टर रोल्सकडे वळल्याबद्दल भरतचं विशेष कौतुक. 'शिक्षणाच्या आयचा घो...'नंतरचा त्याचा हा पुढचा प्रयत्न खरंच वाखाणण्याजोगा आहे. आणि विशेष म्हणजे जरी हिरो म्हणून त्याचा वावर नसला, तरी त्याने साकारलेली ही भूमिका अतिशय उत्तम पेलली आहे. शुभांगी गोखलेचा सहज अभिनय आणि जयराम नायकच्या वाट्याला आलेली भूमिका छोटीशीच असली तरी लक्षवेधी.

या सिनेमाची दोन महत्त्वाची शक्तिस्थळं म्हणजे ऋषीकेष कामेरकरचं सुमधूर संगीत आणि संजय जाधवचा कॅमेरा. तसंच लूकवर घेतलेली मेहनतही छान आहे. अशा प्रेमकथेला फुलवण्यासाठी संगीत अतिशय महत्त्वाचं होतं. शब्द, आवाज, संगीत दिग्दर्शन या सगळ्याच जुळून आलेल्या सरंजामाला तोड नाही. अर्थात फ्रेम्स घडवताना रंग दे बसंती, दिल चाहता है, थ्री इडियटस अशा आमीरी सिनेमांचा चिक्कार प्रभाव दिसतो. अशा अनेक गाजलेल्या फ्रेम्स एकत्र करून या सिनेमात सढळ हस्ते वापरल्या आहेत. पण त्यात थोडा कृत्रिमपणा आलाय. पण संधिप्रकाशात घेतलेल्या समुदाच्या सगळ्याच फ्रेम्स अप्रतिम. ही प्रेमकथाच असल्यामुळे चौघांची एकमेकांशी प्रेमं जमणं साहजिकच. पण चौघांच्याही जोड्या आधीच ठरवून दिल्यासारख्या घडून आल्या आहेत. सिनेमातली प्रेमं फुलवताना त्यात कुठेतरी सरप्राईज एलिमेण्ट किंवा रोचकता अपेक्षित होती. पण त्या चारही कथा अतिशय सरळसोट घडून आल्या आहेत. सिनेमाचा शेवटही खूपच अपेक्षित झालाय. त्यात थोडा ट्विस्ट आणणं आणि आधीचा वेळ थोडा कमी करून शेवटाकडे प्रेक्षकाची उत्सुकता ताणणं शक्य होतं...

पण अर्थातच संगीतमय हलक्या फुलक्या धाटणीची रंगीबेरंगी प्रेमकथा अशा साच्याचा विचार केल्यावर निर्माण होणाऱ्या अपेक्षा पूर्ण करायचा दिग्दर्शकाने प्रामाणिक प्रयत्न केलाय. एक चेंज म्हणून हा रंगीबेरंगी आस्वाद घ्यायला काहीच हरकत नाही.

निर्माता : संदीप शिंदे, मौलिक भट, दिग्दर्शक : सचित पाटील, संगीत : ऋषिकेश कामेरकर, कथा : सचित पाटील, हेमंत ढोमे, गायक : ऋषिकेश कामेरकर, शिल्पा पै, जान्हवी प्रभू अरोरा, अवधूत गुप्ते, गीते : गुरू ठाकूर, कलाकार : सचित पाटील, पूजा सावंत, भरत जाधव, सिद्धार्थ जाधव, सोनाली कुलकर्णी, हेमंत ढोमे, मौलिक भट, मनवा नाईक, कादंबरी कदम, शुभांगी गोखले

No comments:

Post a Comment

to: tushar.kute@gmail.com