Thursday, June 10, 2010

पावसात भिजलेली ती रात्र

’त्या रात्री पाऊस होता’ बद्दल मी यापूर्वीही ऐकले होते. परंतु, प्रत्यक्ष चित्रपट पाहिल्यावर त्याच्या दमदार कथेची व दिग्दर्शनाची अनुभूती आली. गजेंद्र अहिरे यांच्या अप्रतिम दिग्दर्शनाखाली तयार झालेला ’त्या रात्री पाऊस होता’ हा एक सोशिओ-पॉलिटिकल थ्रिलर चित्रपट आहे. सतत कोसळणाऱ्या पावसात त्याची कथा चालू होते. पहिले १५ मिनिटे संथ वाटणारा चित्रपट मग अपेक्षित वेग घेतो.

ही कथा आहे एकच भूतकाळ असणाऱ्या दोघांची. परंतु, त्याबाबत दोघेही नीटसे ज्ञात नाहित. जे काही माहित आहे तेही अर्धवटच. मग त्या पावसाळी रात्रीत दोघेही त्यांचा पुढचा भूतकाळ एकमेकांना सांगतात व तो काय असतो, हे चित्रपटातच पाहण्यासारखे आहे. दिग्दर्शक गजेंद्र अहिरे यांनी त्यांच्या चित्रपटातून आजवर अनेक सामाजिक विषय हाताळले त्याच पठडीतला हा चित्रपट आहे. आजच्या सामाजिक व राजकिय परिस्थितीवर तो नेमके भाष्य करतो. सोनाली कुलकर्णी व अमृता सुभाष यांनी दोन वेगवेगळ्या वृत्तीची स्त्री पात्रे सादर केली आहेत. त्यात दोघीही यशस्वी झाल्याच्या दिसतात. एक सामान्य गृहहितदक्ष गृहिणीची भूमिका सोनालीने साकारलीय. जशी चित्रपटाची कथा पुढे जात जाते तशी तिची बदललेली भूमिकाही लक्षात येते. सामान्य प्रामाणिक माणूस राजकारणात कधीच टिकू शकत नाही, हे तिच्या भूमिकेतून पक्के लक्षात राहते. अमृता सुभाष प्रथमच एका वेगळ्या भूमिकेत दिसली. डोक्यावर कोणाचेही छत नसल्याने स्वैर व खूप लवकर प्रौढ झालेली तरूणी तीने साकारलीय. तीची भूमिकाही लक्षात राहण्यासारखी आहे. सयाजी शिंदेंच्या बाबतीत सांगायचे तर निळू फुलेंनंतर त्याची जागा मराठीत भरून निघल्याचे दिसते. आजचा मुरलेला राजकारणी त्यांनी अतिशय उत्तम साकारलाय. भारतीय राजकारणी कोणत्या स्तरावर विचार करतात, याचेच उत्तम उदाहरण त्यांनी उभे केले आहे. चित्रपटाच्या अंतिम टप्प्यात सामान्य माणूस व राजकारणी यांच्यातील दरीवर त्यांनी दिलेले भाषण खरोखर विचार करण्यासारखे आहे. भारतीय लोकशाही कोणत्या मार्गाने चालली आहे, याचे दर्शन त्यातून घडते. कितीही काही झाले तरी राजकारण्यांचे कोणीही वाकडे करू शकत नाही, हेच खरे. अगदी पत्रकारही नाही. केवळ त्यांच्या मृत्युनेच हे सारे संपू शकते...

सुबोध भावे व संदिप मेहता यांनी त्यांच्या भूमिका चांगल्या निभावल्या आहेत. चित्रपट संपल्यावर मात्र काहितरी चुकल्याची हूरहूर लागून राहते. एक वेळ पाहावा असा हा चित्रपट निश्चितच आहे.

No comments:

Post a Comment

to: tushar.kute@gmail.com