कॉलेजची पदवी (degree) एकेकाळी चांगल्या नोकरीची हमी होती, पण आता तिचं महत्त्व कमी होत चाललंय. 'बर्निंग ग्लास इन्स्टिट्यूट'ने केलेल्या 'नो कंट्री फॉर यंग ग्रॅड्स' या नवीन अभ्यासातून असं दिसून आलं आहे की, आता पदवी घेतल्यावर चांगली नोकरी मिळेलच याची खात्री राहिलेली नाही.
आजचे नवीन पदवीधर नोकरीसाठी अर्ज करतात, पण त्यांना 'तीन वर्षांचा अनुभव नाही' म्हणून नाकारलं जातं. त्यामुळे त्यांना पुन्हा शिक्षण घेण्याकडे किंवा अभ्यासक्रमांमध्ये जाण्याकडे ढकललं जात आहे. हा काही तात्पुरता मंदीचा परिणाम नाहीये, तर नोकरीच्या बाजारपेठेची रचनाच बदलत आहे, ज्याचं मुख्य कारण जनरेटिव्ह्ह एआय (Generative AI) आहे, असं हा अहवाल सांगतो.
याचा परिणाम खूप मोठा आहे. २०२३ मध्ये, पदवी घेतलेल्या ५२% पेक्षा जास्त तरुणांनी अशा नोकऱ्या स्वीकारल्या, ज्यासाठी पदवीची गरजच नव्हती. पूर्वी पदवीधरांना नोकरी देणारे फायनान्स, टेक आणि प्रोफेशनल सर्व्हिसेस यांसारख्या क्षेत्रांमध्ये, कंपन्यांचा नफा वाढत असतानाही, नवीन मुलांसाठी नोकरीच्या संधी कमी होत आहेत. 'व्हेन्चर कॅपिटलिस्ट' विनोद खोसला यांच्या मते, "पदव्या आणि पदवी देणाऱ्या संस्था आता जुन्या झाल्या आहेत." ते म्हणतात की, 'एआय ट्युटर्स' लवकरच उच्च शिक्षण देणाऱ्या संस्थांपेक्षा सरस ठरतील आणि एआय हे 'समाजासाठी समानता आणणारे' साधन आहे.
आकडेवारीवरून हे स्पष्ट होतंय की, नवीन मुलांसाठीच्या नोकरीच्या संधी कमी होत आहेत. 'सिग्नलफायर'नुसार, मोठ्या टेक कंपन्यांमध्ये आता फक्त ७% नवीन पदवीधरांना नोकरी मिळतेय आणि २०१९ पासून ही संख्या ५०% पेक्षा जास्त कमी झाली आहे. भारतातही आयटी क्षेत्रातली नोकरभरती मागील वर्षाच्या तुलनेत ७% ने कमी झाली आहे. त्यामुळे अनेक मोठ्या कंपन्यांनी कॅम्पसमधून भरती थांबवली आहे. यामुळे चांगले गुण मिळवून पास झालेले कॉम्प्युटर सायन्सचे पदवीधरही नोकरी मिळवण्यासाठी संघर्ष करत आहेत. 'बर्निंग ग्लास' आणि 'हार्वर्ड बिझनेस स्कूल' यांच्या एका अहवालात म्हटलं आहे की, "जे काम आधी कमी अनुभवी लोकं करायचे, ते आता स्वयंचलित (ऑटोमेट) केलं जात आहे." यामुळे नोकरीच्या ठिकाणी 'उलट्या पिरॅमिड'सारखी परिस्थिती निर्माण झाली आहे – जिथे कमी अनुभवी लोकं कमी, तर जास्त अनुभवी लोकांची मागणी जास्त आहे. आता ज्या नोकरीच्या संधींना 'एंट्री-लेव्हल' म्हटलं जातं, तिथेही ३ ते ५ वर्षांचा अनुभव मागितला जात आहे.
'ब्राइटचॅम्प्स'च्या अहवालानुसार, भारतातील ३८% विद्यार्थ्यांना भीती वाटते की त्यांची नोकरी एआयमुळे जाईल, तर ७५% विद्यार्थ्यांना 'एआय' एक आवश्यक कौशल्य म्हणून शिकायचं आहे. आजच्या विद्यार्थ्यांसाठी, पदवी ही फक्त एक पायरी नसून एक आवश्यक पात्रता (credential) बनली आहे – ती गरजेची आहे, पण आता फक्त ती पुरेसी नाहीये.
(संदर्भ: अनॅलिटीक्स इंडिया मॅगझीन)
--- तुषार भ. कुटे
No comments:
Post a Comment
to: tushar.kute@gmail.com