Showing posts with label childhood. Show all posts
Showing posts with label childhood. Show all posts

Tuesday, March 16, 2021

गोष्ट लहानपणीच्या पुस्तकांची

९० च्या दशकामध्ये जुन्नरच्या ग्रामीण भागात आमचे प्राथमिक शिक्षण झाले. त्याकाळात अभ्यासात येणाऱ्या पुस्तकाव्यतिरिक्त अन्य पुस्तके कधी वाचायला मिळत नसत. त्यामुळे मराठीमध्ये अजूनही बरीच पुस्तके लिहिलेली आहेत, हे आम्हाला माहीत नव्हते. पण पुण्यामधल्या कुठल्याश्या प्रकाशनाने प्रकाशित केलेली छोटी छोटी मनोरंजक गोष्टींची पुस्तके पहिल्यांदाच वाचायला मिळाली. माझा आतेभाऊ आणि बालमित्र सुशांत, दिवाळीच्या आणि उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये पुण्याहून गावी आला की अशी छोटी छोटी गोष्टींची पुस्तके घेऊन यायचा. तेव्हा मीही ती उत्सुकतेने वाचायचो. त्यातल्या जादूगाराच्या, राजा-राणीच्या, राजपुत्राच्या, परीच्या अशा अनेक गोष्टी मन भारावून टाकायच्या. गोष्टीमध्ये लिहिलेल्या सर्व घटना व पात्रे खरोखरच कुठेतरी अस्तित्वात असतील, असं वाटायचं. अनेक कथा आजही मला चांगल्या आठवतात. कदाचित लहानपणीच्या याच वाचनामुळे आज कथा लेखनाची आवड मनात जागृत आहे. त्याचे बरेचसे श्रेय लहानपणी वाचलेल्या या पुस्तकांना देता येईल. त्यावेळी दूरदर्शनवर बघितलेल्या "अलिफ लैला" सारख्या कल्पनारम्य कथाही मी वहीमध्ये लिहून ठेवायचो. त्यातूनच लिहिण्याची सवय व्हायला लागली. आपल्यालाही असे काही लिहिता येईल का? हा प्रश्न मनात यायचा. कसंबसं धडपडत लिहून ठेवायचो. परंतु, यात मधल्या काळामध्ये बराच खंड पडला. आज रहस्य व भयकथा लिहिताना या पुस्तकांची पुनश्च आठवण येते. ती वाचावीशी वाटतात. त्यातून लहानपणीची ती प्रेरणा पुन्हा जागृत होते. पुन्हा नव्या कथा सुचतात. कल्पनारम्य जगात रममाण व्हावेसे वाटते. सृजनशीलता अशीच जागृत ठेवावी व वाढवावी वाटते. त्याचे मूळ या पुस्तकांमध्ये दडलेले आहे. आजही लहान मुलांना भेट देण्यासाठी मी अनेक अशी पुस्तके जपून ठेवली आहेत.