Sunday, March 20, 2011

चाचणी परिक्षा संपल्या, आता अंतिम परिक्षा...

विश्वचषकाचा पहिला टप्पा आजच पार पडला. आणि अपेक्षेप्रमाणे टॉप आठ टीम्स ह्या विश्वचषकाच्या उप उपांत्यपूर्व फेरीत दाखल झाल्या आहेत. विश्वचषकाची खरी रंगत इथुन पुढच्या बादफेऱ्यांमध्येच पाहायला मिळणार आहे. शिवाय एप्रिलला अंतिम लढत कोणकोणत्या संघात होईल, याची उत्सुकता आतापासूनच ताणायला सुरुवात झाली आहे.

पहिल्या राऊंड रॉबिन फेरीचा आढावा घेतल्यास एक गोष्ट लक्षात येते की, कोणत्याही संघाने यंदा निर्भेळ यश मिळविले नाही. १९९२ च्या विश्वचषकात अंतिम विजेत्या पाकिस्तानने बरेच सामने गमावूनही विजेतेपद मिळवले होते. त्यानंतरच्या प्रत्येक विश्वचषकात विजेता हा त्या विश्वचषकातला प्रत्येक सामना जिंकत आला आहे. यंदा मात्र तसे झाले नाही. प्रत्येक सहभागी संघाला एकदा तरी पराभवास सामोरे जावे लागले आहे. १९९९ पासून अपराजित असलेल्या कांगारूंना पाकने पराभवाचे पाणी चाखवले. त्यांच्याशीच भारताचा उप उपांत्यफेरीतील सामना होत आहे. भारतालाही पहिल्या फेरीत १०० टक्के यश मिळेल अशी भारतीय क्रिकेटरसिकांची अपेक्षा होती, परंतु तिही पूर्ण झाली नाही. या फेरीत आफ्रिकेने भारतास पराभूत केले. भारतीय संघ अजुनही आपल्या पूर्ण ताकदीनीशी खेळत आहे, असे दिसून आलेले नाही. पहिल्या फेरीतील सामन्यांची संख्या जास्त होती, अन्यथा २००७ च्या विश्वचषकासारखे चित्र भारतास पाहायला मिळाले असते. अजुनही भारतीय गोलंदाजी ही कमकुवत आहे. उप उपांत्यपूर्व फेरीत आलेल्या संघांपैकी इंग्लंडची गोलंदाजी ही सर्वात कमकुवत मानता येईल. त्यानंतर बहुधा आपलाच क्रमांक लागावा, अशीच परिस्थिती सध्या दिसते. पुढची भारताची गाठ गतविजेत्या कांगारूंशी पडणार आहे. त्यांना भारताच्या कमजोर गोलंदाजीचाजोरनक्कीच माहित असणार, यात शंका नाही. त्यामुळे येत्या तीन दिवसात भारताला आपल्या गोलंदाजीवर अधिक मेहनत, घ्यावी लागणार आहे.

क्वार्टर फायनल्समध्ये सर्वात जास्त मेहनत करून दाखल झालेला संघ म्हणजे इंग्लंड होय. एकाही सामन्यात त्यांना सामन्याच्या शेवटच्या मिनिटापर्यंत सामना जिंकण्याची खात्री नव्हती. आयर्लंड बांग्लादेशसारख्या संघांकडून त्यांना लाजिरवाणा पराभव पत्करावा लागला असला तरी गटातील सर्वोत्तम संघाविरुद्ध अर्थात आफ्रिकेविरुद्ध इंग्लिश संघाने विजय मिळवला होता, हे विसरता येणार नाही. सध्या तरी उप उपांत्यापूर्व फेरीतील सर्वात कमकुवत संघ म्हणून इंग्लिश संघाकडे पाहता येईल. पण, त्यांनी आजवर अनुभवलेली लढाऊ वृत्ती पाहता. शनिवारी कोलंबोमध्ये त्यांच्यादिरुद्ध खेळताना लंकेला अवघड जाणार असेच दिसते.

पहिल्या चार सामन्यांमध्ये जवळपास एकतर्फी विजय मिळविलेले कांगारू यावर्षी नेहमीच्या फॉर्ममध्ये खेळताना दिसले नाहीत. तरीही त्यांची कामगिरी दुर्लक्षून चालणार नाही. न्युझीलंडविरुद्ध त्यांनी अगदी सहजच विजय मिळवला होता. कॅनडा त्यांना थोडेसे जड गेले. त्यांच्या खेळाची ऑसीजने प्रशंसा केली, हेच खूप झाले. आता त्यांचा सामना यजमान भारताविरूद्ध गुरूवारी होत आहे. हा सामना भारतात होत असल्याने त्यांच्यावर दडपण असणार, हे निश्चित. पण, भारतापेक्षा कांगारूंनी दडपणाचा अधिक यशस्वीरित्या सामना केला आहे, हेही तितकेच सत्य आहे. म्हणजे भारताचीच खरी कसोटी लागणार असे दिसते. शिवाय सहजासहजी हार मानणारा हा संघ पाककडून पराभूत होऊन येत आहे. त्यामुळे, विजयश्री प्राप्त करण्यासाठी ते निकराचे प्रयत्न करणार, हे निश्चित.

पाकिस्तानी संघाचे मात्र कौतुक करावे लागेल. विश्वचषकापूर्वी विविध समस्यांनी घेरलेल्या या संघाने चांगलीच मजल मारली. पाकिस्तानचे सहयजमानपद अतिरेकी कारवायांमुळे काढून घेण्यात आले त्यांचे सर्व सामने श्रीलंकेत हलविण्यात आले, स्पर्धेपूर्वी त्यांचे अनेक खेळाडू सामना निकालनिश्चितीमध्ये गुंतल्याचे आढळून आले होते. तसेच त्यांच्या कप्तानाची घोषणाही उशिरा करण्यात आली. असे असूनही या संघाने विश्वचषकात चांगली कामगिरी करूनगटात अव्वल स्थान पटकाविले. कर्णधार आफ्रिदी बॅटपेक्षा बॉलनेच चांगली कामगिरी करतोय. ह्याचा संघाला फायदा होईलच पण त्याने फलंदाजीही जबाबदारीने करावी, अशी पाक क्रिकेटरसिकांची अपेक्षा असणार. भारत पाक पूर्ण स्पर्धेत केवळ अंतिम सामन्यात आमने-सामने येऊ शकतात, अशीच सध्याची स्थिती आहे. तसे झाल्यास यंदाचा विश्वचषक सोहळा अवघ्या क्रिकेटरसिकांच्या चिरस्मरणात राहिल.

यंदाचा सहयजमान श्रीलंकाही भारताप्रमाणे अपेक्षित कामगिरी करताना दिसत नाही. मायदेशात खेळत असल्याने तेगटात अव्वल राहतील ,अशी अपेक्षा होती. पण, तसे झाले नाही. पाककडून पराभव झाल्याने कांगारूंविरुद्धची लढत अनिर्णित राहिल्याने त्यांना दुसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले. त्यांची गोलंदाजी फलंदाजीही बऱ्यापैकीच झाली आहे. अंतिम सामन्यात पोहोचण्यासाठी लंकेला आणखी सुधारणेला वाव आहे. गत-उपविजेत्याला साजेशी कामगिरी त्यांच्याकडून झाली नाही, हे मान्य करावेच लागेल.

दक्षिण आफ्रिका यंदाच्या विश्वचषकासाठी हॉट-फेवरिट आहे. तसा तो नेहमीच असतो. पण, इतकी पसंती लाभूनही त्यांच्या गळ्यात विजयश्री पडलेली नाही. याची खंत बहुधा त्यांना असावी. युरोपप्रमाणे आफ्रिका खंडाचेही तीन संघ यंदाच्या विश्वचषकात सहभागी झाले होते. त्यांपैकी एकच संघ उप-उपांत्यपूर्व फेरीत पोहोचला आहे. मागच्या विश्वचषकांत प्रत्येक वेळी छोट्याछोट्या कारणांमुळे आफ्रिका संघ अंतिम फेरीतही पोहोचला नाही. यंदाही त्यांचा संघ त्याच जोमाने खेळत आहे. तरीही त्यांनी आपलीचोकर्सही उपाधी इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात सार्थ ठरवली पुढे भारताविरूद्ध ती खोटीही ठरविली. पण, पुढील फेरींत ऐनवेळी चुका केल्या नाहीत तरच आफ्रिका संघाला विजयाची यावेळी संधी आहे. अन्यथाये रे माझ्या मागल्याप्रमाणे त्यांची वाटचाल चालूच राहिल.

एकेकाळी बलाढ्य मानला जाणारा वेस्ट इंडिजचा संघ यंदाही हॉटफेवरिट नाही. फार-फार तर ते उप-उपांत्यपूर्व फेरीपर्यंत पोहोतील, एवढीच त्यांची क्षमता दिसून येते. इंग्लंडच्या संघाप्रमाणेच हा संघ आहे. तो दडपणाखाली खेळू शकत नाही. त्यातल्या त्यात उप-उपांत्य फेरीतील पहिलाच सामना त्यांना मीरपूरला पाकिस्तान विरूद्ध खेळायचा आहे. बांग्लादेशचा दणदणीत पराभव ही या संघाची पहिल्या फेरीतील चांगली कामगिरी होती. त्यानंतर ते आता पुन्हा बांग्लादेशात खेळायला जातायेत. बघू त्यांना किती फायदा होतोय ते...!

दक्षिण आफ्रिका इंग्लंडप्रमाणेच क्षमता असूनही एकही विश्वचषक जिंकलेला न्युझीलंड हा आणखी संघ होय. त्यांची कामगिरीही सर्वसाधारण दिसून आली. ’गटात अव्वल ठरलेल्या आफ्रिकेविरूद्ध त्यांना आता खेळायचे आहे. कांगारूंविरूद्ध सहज पराभव पत्करलेल्या न्युझीलंडने नंतर आपला खेळ बराच अंशी उंचावला. पाकविरूद्ध अंतिम पाच षटकांत केलेली फटकेबाजी विक्रम करून गेली. ’गटातील अव्वल ठरलेल्या पाकिस्तानला त्यांनी पराभूत केले, ही एकमेव त्यांची जमेच्या बाजू होय. फलंदाजीवर हाही संघ अवलंबून आहे. खेळ उत्तम केला तर यंदा प्रथमच विजयश्री त्यांच्या गळ्यात पडू शकते.

Friday, March 11, 2011

टॉरेन्ट म्हणजे काय?

इंटरनेटवरून विविध फाईल विशेषत: चित्रपट व नवनवे गेम्स डाऊनलोड करण्यासाठी गेल्या काही वर्षांपासून लोकप्रिय झालेला प्रकार म्हणजे टॉरेन्ट होय. हे टॉरेन्ट म्हणजे काय? ते जाणून घेऊयात.

आकाराने जास्त असलेल्या (साधारणत: जीबीमध्ये) असलेल्या फाईल्स इंटरनेटवरुन डाउनलोड करण्यासाठी बरेच निरनिराळे सॉफ्टवेयर्स वापरले जातात. परंतु, अशा सॉफ्टवेयर्सने फाईल डाऊनलोड करताना मोठी इंटरनेट बॅंडविड्थ वापरली जाते. या कारणाने इंटरनेटचा वेग कमी होतो. त्याला पर्याय म्हणून टॉरेन्ट हा नवा इंटरनेट प्रोटोकॉल तयार करण्यात आलेला आहे. तो साधा डाऊनलोडर म्हणूनच काम करतो. परंतू, एका वेगळ्या प्रकारे तो कार्य करतो. शिवाय त्यामुळे कोणत्याही प्रकारचे ’पॉप-अप ऍडव्हर्टाइझिंग’चा त्रासही होत नाही. टॉरेन्ट हे पूर्णत: व्हायरस फ्री सॉफ्टवेयर म्हणून काम करते. टॉरेन्टद्वारे फाईल डाऊनलोड करण्यासाठी ’बिटटॉरेन्ट, ’म्युटॉरेन्ट’ व ’अझ्युरियस’ ही लोकप्रिय सॉफ्टवेयर्स वापरली जातात. http://www.download.com वरून ती मोफत डाऊनलोड करता येतात. टॉरेन्टचे कार्य पाहण्यापूर्वी सर्वसाधारण फाईलचे डाऊनलोड इंटरनेटद्वारे कशा प्रकारे होते, ते पाहूयात.

इंटरनेटवरून परंपरागत डाऊनलोडिंग

ही ’क्लायंट-सर्व्हर’ डाऊनलोडिंग तंत्राद्वारे केली जाते. ती काहीशी अशा प्रकारे कार्य करते:

1. आपण इंटरनेटवर आपल्याला हवे ते पेज उघडतो वर त्यातील डाऊनलोड लिंकवर क्लिक करतो.

2. आपण वापरत असलेला वेब ब्राऊजर (जसे, इंटरनेट एक्सप्लोरर, मॉझिला फायरफॉक्स) हा सर्व्हरला (जिथे डाऊनलोड करायची फाईल ठेवलेली असते) त्याच्या फाईलची कॉपी पाठवायची विनंती करतो.

3. नंतर HTTP’ (Hyper Text Transfer Protocol) वा ’FTP’ (File Transfer Protocol) द्वारा ती फाईल सर्व्हरवरून आपल्या कॉम्प्युटरवर पाठविली जाते. शेजारच्या छायाचित्रात ही प्रक्रिया दाखविण्यात आली आहे.


अशी फाईल डाऊनलोड करताना तीचा डाऊनलोडिंगचा वेग हा बऱ्याच बाबींवर आधारित असतो. नेटवर्क प्रोटोकॉल, इंटरनेटवरची रहदारी, तसेच ती फाईल डाऊनलोड करत असलेले अन्य कॉम्युटर इत्यादि बाबी या प्रकारच्या डाऊनलोडिंगच्या वेगावर परिणाम करतात. जर एखादी फाईल खूपच लोकप्रिय असेल व ती अनेक कॉम्प्युटरवर डाऊनलोड करण्यात येत असेल तर तीचा आपल्या संगणकावर डाऊनलोडिंग वेग निश्चितच कमी होतो. आता टॉरेन्ट वापरत असलेली पीयर-टू-पीयर फाईल शेयरिंग कशा प्रकारे कार्य करते ते पाहूया.

पीयर-टू-पीयर फाईल शेयरिंग मध्ये वेब ब्राऊजर ऐवजी असा सॉफ्टवेयर प्रोग्राम वापरला जातो जो इंटरनेटवर असे कॉम्प्युटर्स शोधून काढतो जिथे आपल्याला हवी असलेली फाईल ठेवलेली आहे. अर्थात, आपल्याला हवी असलेली फाईल इंटरनेटवर एकापेक्षा अधिक संगणकांवर ठेवलेली असते, ती शोधायचे काम हा सॉफ्टवेयर करतो. अश्या अनेक संगणकांना ’पीयर’ म्हटले जाते. हे संगणक सर्व्हर नसून सर्वसाधारण संगणकच असतात. ही प्रक्रिया काहीशी अशा प्रकारे होते-

1. आपण आपल्या संगणकावरून पीयर-टू-पीयर फाईल शेयरिंगचे सॉफ्टवेयर (उदा. ग्नुटेला प्रोग्राम) रन करतो. हे सॉफ्टवेयर इंटरनेटवर आपल्याला हवी असलेली फाईल शोधण्यासाठी विनंती पाठवते.

2. ही फाईल शोधण्यासाठी आपले सॉफ्टवेयर पीयर-टू-पीयर फाईल शेयरिंगचे सॉफ्टवेयर वापरत असलेले अन्य संगणक शोधून काढते.

3. जेव्हा या सॉफ्टवेयरला आपल्याला हवी असलेली फाईल सापडते तेव्हा त्या संगणकावरून आपल्या संगणकावर डाऊनलोडिंग चालू होते. शिवाय या पद्धतीने अन्य संगणकांनाही त्यांना हवी असलेली फाईल आपल्या संगणकावरून डाऊनलोड करता येते!

4. ग्नुटेला प्रोग्रामने होणारी ही प्रक्रिया पुढील छायाचित्रात दाखवली आहे-

इथे दाखविल्याप्रमाणे एकच फाईल इंटरनेटवरच्या विविध संगणकांवर डाऊनलोड झालेली असते. अशा प्रकारे ही फाईल इंटरनेटवरच्या अनेक संगणकांवर साठविलेली असते. छायाचित्रात दाखविल्याप्रमाणे लाल रंगाच्या मार्गाने ही फाईल इंटरनेटवरच्या एका संगणकावरून दुसऱ्या संगणकांकडे पाठविली गेली आहे. त्या प्रक्रियेतील एका जरी संगणकाने आपले डाऊनलोडिंग बंद केले तर त्याच्या खालील संगणकांना ती फाईल डाऊनलोड करता येणार नाही. अर्थात त्या खालच्या संगणकांना परत वरच्या एखाद्या कार्यान्वित संगणकाला जोडावे लागेल. ज्या संगणकाने आपले डाऊनलोडिंग बंद केले अशा संगणकास ’लीचर’ असे म्हटले जाते.

हेच तत्व वापरून टॉरेन्ट सॉफ्टवेयर कसे कार्य करते ते पाहू...

टॉरेन्टमध्येही पीयर-टू-पीयर फाईल शेयरिंगच वापरले जाते. परंतु, याव्यतिरिक्त टॉरेन्ट हे ’तुम्ही जगा व दुसऱ्यांनाही जगवा’ अथवा ’जशास तसे’ या तत्वानुसारही काम करते. टॉरेन्ट प्रोटोकॉल हा आपल्याला हवी असलेली फाईल शोधण्यासाठी ’ट्रॅकर’ची मदत घेतो. ट्रॅकर्स हे आपली फाईल शोधुन टॉरेन्टला देतात व नंतर ती डाऊनलोड करण्याचे काम टॉरेन्टचे सॉफ्टवेयर करते. अर्थात डाऊनलोडिंग करत असनाच आपल्याला ती फाईल अन्य संगणकांनाही डाऊनलोडिंगसाठी द्यावी लागते. या प्रक्रियेद्वारे ती फाईल डाऊनलोड करण्यासाठी लागणाऱ्या ’पीयर्स’मध्ये आणखी एकाची भर पडते. टॉरेन्टच्या प्रक्रियेत फाईल डाऊनलोड होत असताना ती अपलोडही होत असते! यामुळे फाईलच्या ’लीचिंग’चा प्रश्न सोडविला जातो. जरी एखाद्या ’पीयर’ने अपलोडिंग थांबविली तर त्याची डाऊनलोडिंगही थांबविली जाते. जितके जास्त पीयर्स एखाद्या फाईलला लाभतात तितक्या अधिक वेगाने ती फाईल आपल्या संगणकावर डाऊनलोड होते. अर्थात, याच कारणाने इंटरनेटची बॅंडविड्थ योग्य प्रकारे वापरली जाते. टॉरेन्ट सॉफटवेयर हे विविध संगणकांवरून एकाच फाईलचे विविध भाग शोधुन आपल्या संगणकावर डाऊनलोड करते.

ही प्रक्रिया खाली दाखविली आहे-

1. आपण आपल्याला हवे असलेले वेब पेज उघडतो व डाऊनलोडच्या लिंकवर क्लिक करतो.

2. यानंतर बिटटॉरेन्टचे आपल्या संगणकावरील क्लायंट सॉफ्टवेयर ट्रॅकरद्वारे इंटरनेटवरील अन्य संगणक शोधुन काढते ज्यावर आपल्याला हवी असलेली फाईल बिटटॉरेन्टद्वारे डाऊनलोडिंगसाठी उपलब्ध आहे. ज्या संगणकांवर ही फाईल पूर्ण डाऊनलोड होऊन अपलोड होत असेल अशा संगणकांना ’सीडर्स’ असे म्हणतात.

3. ट्रॅकर्स द्वारे असेही संगणक शोधले जातात ज्यावर ही फाईल डाऊनलोडही होत आहे व अपलोडही होत आहे. याचा अर्थ या संगणकांवर ती फाईल काही टक्क्यांमध्ये डाऊनलोड झालेली असते. अशा संगणकांना ’स्वॉर्म’ म्हटले जाते. वरील छायाचित्रात हे दाखविण्यात आले आहे.

4. ट्रॅकर्सद्वारे सीडर्स व स्वॉर्मस मधुन आपल्याला हवी असलेली फाईल निरनिराळ्या भागांमधुन डाऊनलोड करण्यात येते. उदा. जसे वरील छायाचित्रात ही फाईल निरनिराळ्या सहा संगणकांवरून ३७ टक्के डाऊनलोड झालेली आहे. ३७% च्या पुढे दाखविण्यात आलेल्या प्रोग्रेस बारमध्ये सहा निळ्या रंगाचे भाग दाखविले आहेत, ते सहा संगणकांवरून घेण्यात आले आहेत. अर्थात सर्वसाधारण डाऊनलोडर्स प्रमाणे पहिल्या भागापासून शेवटच्या भागापर्यंत हे डाऊनलोडिंग होत नाही. एका वेळी अनेक संगणकांवरून आपल्या फाईलचे भाग घेत असल्याने इथे डाऊनलोडिंग सरळ होत नाही.

5. छायाचित्रात दाखविल्याप्रमाणे निळ्या रंगाचे बाण हे आपल्या संगणकातील डाउनलोडिंग दर्शवितात तर हिरवे बाण हे आपल्या संगणकातून होत असलेली अपलोडिंग दर्शवितात. पहिला संगणक अर्थात ’स्वॉर्म’ हा ७४ टक्के पूर्ण आहे त्यामुळे त्याला आपल्या संगणकावरून अपलोडिंग होत आहे तर दुसरा संगणक अर्थात सीडर हा १०० टक्के पूर्ण आहे, म्हणून त्यातून आपण केवळ डाऊनलोडिंग करत आहोत.

टॉरेंटद्वारे डाऊनलोडिंग करण्याची पद्धती:

1. सर्वप्रथम download.com या वेबसाईट वरून utorrent किंवा BitTorrent डाऊनलोड करून घेणे. इंस्टॉल करणे.

2. त्याचा हिरव्या रंगाचा आयकॉन उजव्या बाजुला खाली जिथे संगणकाची तारीख दिसते तिथे दिसतो. त्यावर डबल क्लिक केल्यावर तो मोठा होईल.

3. thepiratebay.org, alivetorrents.com, isohunt.com, kickasstorrents.com, mininova.org अशा टॉरेंट उपलब्ध करणाऱ्या वेबसाईटवरून आपल्याला हवे ते torrent (चित्रपट, गाणी वगैरे) शोधुन डाऊनलोड करून घ्यावे. ह्या फाइल्सला .torrent असे एक्सटेन्शन असते. त्याला डबल क्लिक केल्यावर ते आपल्या सॉफ्ट्वेयर (utorrent किंवा BitTorrent) मधुन उघडेल.

4. या नंतर डाऊनलोडिंग आपोआप चालु होईल. न झाल्यास दिसणाऱ्या torrent मध्ये उजवे क्लिक करून start download किंवा force download म्हणावे.

5. डाऊनलोडिंग च्या वेगानुसार तुमचे डाऊनलोड होण्यास वेळ लागेल. संगणक बंद करून चालु केला तरी आधी डाऊनलोड झालेली फ़ाईल आहे तेव्हढी डाऊनलोडेड राहते. अमर्याद इंटरनेटची सुविधा असणाऱ्या संगणकधारकांसाठी टॉरेन्ट हे डाऊनलोडिंगचे सुलभ साधन आहे.

Tuesday, March 8, 2011

संगणक क्षेत्रातील महिला संशोधक

अभियांत्रिकीच्या संगणक व माहिती तंत्रज्ञान क्षेत्रांमध्ये गेल्या काही वर्षांपासून महिलांचा मोठ्या प्रमाणात सहभाग वाढला आहे. करियरसाठी या क्षेत्रांना महिला मोठ्या प्रमाणात प्राधान्य देताना दिसत आहेत. संगणक इतिहासात डोकावले तर संगणक शास्त्र विषयांत संशोधन करताना अत्यल्प महिलांचे योगदान दिसून येते. असे असले तरी ज्या महिलांनी संगणकशास्त्रात योगदान दिले आहे, ते अत्यंत महत्वाचे ठरते. संगणक हार्डवेयर मध्ये तर महिलांचे योगदान शून्य टक्क्यांच्या जवळपास असले तरी सॉफ्टवेयर क्षेत्रामध्ये दोन महत्वाच्या संकल्पनांची मुहूर्तमेढ ही महिला संशोधकांनी रोवल्याचे दिसून येते...

या दोघी आहेत, ऑगस्टा अडा व ग्रेस हॉपर. जगातील पहिला कॉम्प्युटर प्रोग्राम हा ’ऑगस्टा अडा लेडी लव्हलेस’ यांनी लिहिला होता! संगणकाचे जनक म्हणून चार्लस बाबेज यांना ओळखले जाते. त्यांनी बनविलेला संगणक या यांत्रिकी संगणक या प्रकारातला होता. असे असले तरी हा संगणक चालविण्याकरिता कॉम्प्युटर प्रोग्रामची गरज पडली. त्यांनी बनविलेल्या ’ऍनालिटिकल इंजिन’ या संगणकासाठी प्रोग्राम लिहिण्याचे कार्य ऑगस्टा अडा यांनी पार पाडले. ’स्टोअर्ड प्रोग्राम’ प्रकारतला हा संगणक गणला जातो. त्यात सूचना आधीपासूनच लिहिल्या जात असत. त्यानुसारच संगणक कार्य करे. याच सूचनांचा संच संगणकीय भाषेत अडा यांनी लिहिला. ऑगस्टा अडा यांच्याबद्दल अधिक सांगायचे तर त्या प्रसिद्ध इंग्लिश कवि लॉर्ड बायरॉन यांच्या कन्या होत. १८१५ मध्ये जन्मलेल्या अडा यांना केवळ ३६ वर्षांचे आयुष्य लाभले. खरं तर लॉर्ड बायरॉनला मुलगा हवा होता, परंतु त्यांना कन्यारत्न प्राप्त झाल्याने बायरॉनने तिच्याकडे फारसे लक्ष दिले नाही. अर्थात अडाचे पालनपोषण हे त्यांच्या आईनेच केले. लहानपणापासूनच विविध आजारांनी ग्रासल्याने अडा आपल्य शालेय अभ्यासात फारश्या चमक दाखवू शकल्या नाहीत. १८२५ मध्ये त्यांचा विवाह विल्यम किंग यांच्यासोबत झाला. अभ्यासात गति प्राप्त करण्यासाठी ऑगस्टा अडा यांना आईची मात्र मोठी मदत झाली. आईमुळेच त्या विविध व्याधींवर मात करू शकल्या. वयाच्या १७ व्या वर्षापासून त्यांनी गणितात विशेष रूची वाटू लागली. त्यानंतर पूर्ण वेळ त्या गणितातच रमल्या. चार्लस बाबेज यांच्याशी त्यांची ओळख झाल्यावर अडाच्या गणिती कौशल्यावर तो भलताच खूष झाला होता. त्यांच्या या कौशल्याचा वापर बाबेज यांनी प्रभावेपणे करून घेतला. ’ऍनालिटिकल इंजिन’ या संगणकासाठी प्रोग्राम लिहिण्याचे काम अडा यांनी नंतर पार पाडले. पण, त्याचे श्रेय त्यांना मिळण्याकरिता १९५३ हे वर्ष उजाडावे लागले! अमेरिकेच्या संरक्षण विभागाने तयार केलेल्या एका संगणकीय भाषेला ऑगस्टा अडा यांच्या सन्मानार्थ ’अडा’ असे नाव दिले गेले होते.

संगणकाला समजत असलेली बायनरी भाषा ही सर्वसाधारण मनुष्यास समजणे फारच अवघड आहे. अर्थात संगणकाला बायनरी भाषेत सूचना देणे, हे अत्यंत अवघड काम असते. यावर उपाय म्हणून ’हाय लेव्हल प्रोग्रामिंग लॅंग्वेजची निर्मिती करण्यात आली. त्यात संगणकीय सूचना या मनुष्यास समजतील अशा भाषेत लिहिल्या जात. मग या सूचनांचा समूह अर्थात ’हाय लेव्हल प्रोग्रामिंग लॅंग्वेजचा प्रोग्राम’ संगणकला समजण्यासाठी तो बायनरी मध्ये रूपांतरीत केला जातो. व त्याकरीता लागणाऱ्या संगणकीय सॉफ्टवेयरला ’कम्पायलर’ असे म्हणतात. आज सर्वच संगणकीय भाषांचा स्वतंत्र कम्पायलर आहे. अशा प्रकारचा कम्पायलर बनविण्याचे काम सर्वप्रथम ग्रेस हॉपर या महिलेने केले होते. डॉ. श्रीमती ग्रेस हॉपर यांनी १९५२ मध्ये ’युनिव्हॅक’ संगणकासाठी, ’ए झिरो’ या संगणकीय भाषेकरिता हा कम्पायलर तयार केला. हा आजच्यासारखा परिपूर्ण कम्पायलर नसला तरी संगणकाचा पहिला कम्पायलर म्हणून त्याला मान्यता मिळाली. ’हॉर्वर्ड मार्क – १’ या संगणकावर पहिला कॉम्प्युटर प्रोग्राम त्यांनीच लिहिला होता. अमेरिकन नौदलात श्रीमती ग्रेस हॉपर काम करत होत्या. १९४९ मध्ये ’एकर्ट मॉकली कॉम्प्युटर कॉर्पोरेशन’मध्ये त्या कार्यरत झाल्या. ’ए झिरो’ या संगणकीय भाषेचे पुढच्या काळात अरिथमॅटिक, फ्लोमॅटिक व मॅथमेटिक अशा विविध सुधारित आवृत्या निघाल्या. नंतरच्या काळात प्रसिद्ध झालेली ’कोबोल’ ही संगणकीय भाषा हॉपर यांच्या फ्लोमॅटिकपासूनच तयार करण्यात आलेली आहे. १९७१ पासून ग्रेस हॉपर यांच्या नावाने दरवर्षी युवा संगणक अभियंत्याला पुरस्कार दिला जातो.

संगणक क्षेत्रात कार्य करणाऱ्या महिलांसाठी ऑगस्टा अडा व ग्रेस हॉपर ’माईलस्टोन’ बनून राहिलेल्या आहेत. त्यांचे कार्य महिला संगणक अभियंत्यांना प्रेरणादायी असेच आहे. आजच्या महिलादिनी त्यांना विनम्र अभिवादन...!!!