Showing posts with label khandekar. Show all posts
Showing posts with label khandekar. Show all posts

Tuesday, February 25, 2025

बुद्धाची गोष्ट

बऱ्याच दिवसांपासून मराठीतील जुन्या लेखकांचं काही वाचलं नव्हतं म्हणून वि. स. खांडेकर यांचा “बुद्धाची गोष्ट” हा कथासंग्रह वाचायला घेतला. अर्थातच खांडेकरांच्या सिद्धहस्त लेखणीतून अवतरलेल्या कथा मनात घर करणाऱ्या अशाच आहेत. एकूण नऊ कथांपैकी पुस्तकाचे शीर्षककथा असणारी “बुद्धाची गोष्ट” म्हणजे काहीतरी खासच.
सुरुवातीला वाटतं की गौतम बुद्धांविषयी ही कथा लिहिलेली असावी. परंतु प्रत्यक्षात गौतम बुद्धांच्या जीवनावर भाषण ठोकणाऱ्या एका लहान मुलाची ही गोष्ट आहे. लहान मुलांचं मन अर्थातच निरागस असतं. एका अर्थाने प्रत्येक गोष्टीकडे ते तटस्थपणे बघू शकत असतात. त्यांचा मेंदू शिकण्याच्या अवस्थेमध्ये असतो. आणि विशेष म्हणजे त्यांची सदसदविवेकबुद्धी देखील जागृत असते. बुद्धाचे जीवन आणि आपलं जीवन यामधील फरक त्याला समजायला लागतो. त्यातूनच बुद्धदेखील कळू लागतो. तो का महान होता? त्यांनी असं का केलं? अशा बऱ्याच प्रश्नांची उत्तरे तो स्वतःच शोधू लागतो. आणि यातूनच आपल्याला देखील बुद्ध कळतो. असा सारांशरुपी गोषवारा या कथेबद्दल सांगता येईल. याव्यतिरिक्त आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घटनांचे अवलोकन खांडेकरांनी प्रवाह, आकाश, फत्तर, वेग, पाप, अपघात, ओलावा आणि सूर्यास्त अशा विविध कथांमधून केले आहे. वाचनमग्न होत असताना आपण ही कथा समोरच पडद्यावर अनुभवत आहोत की काय, याची अनुभूती देखील येते.

--- तुषार भ. कुटे