Friday, March 12, 2010

मराठीकरणाची हाक


महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने गेल्या काही महिन्यांपासून मराठी प्रसाराचे जोरदार कार्य हाती घेतल्याचे दिसते. त्यामुळे मराठी प्रेमी निश्चितच आनंदी झालेले आहेत. राज ठाकरेंनी मागेच एका पत्रकार परिषदेत सांगितले की, महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रात मराठी सक्तीची करण्यासाठी ’मनसे’ पुढाकार घेणार आहे. मला असे वाटते की, प्रत्येक राज्याला स्वत:ची राजभाषा आहे व त्याच भाषेत त्या राज्याचे सर्व व्यवहार व्हायला हवेत. महाराष्ट्र त्याला अपवाद नाही.
महाराष्ट्र शासनाच्या कायद्यानुसार सध्या तरी बऱ्याच शासकीय संस्थांचे व्यवहार हे मराठीतच होत आहेत. ही समाधानाची बाब आहे. परंतु, आपल्या लोकांना इंग्रजी किंवा अन्य भाषांची आता सवय झाल्याने शुध्द मराठी अंगवळणी पडायला थोडा वेळ लागेल, असे वाटते. त्याचाच हा एक किस्सा...
मी पुण्यातल्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात शिकलो. आता आमचे महाविद्यालय हे शासकीय असल्याने तिथे बहुतांश मराठी वापरली जायची. अगदी इंजिनियरिंगच्या सर्वच डिपार्टमेंटची नावे ही मराठीत लिहिलेली होती! ’इंन्स्ट्रुमेंटेशन एण्ड कंट्रोल’ डिपार्ट्मेंटची इमारत आमच्या ’डिपार्टमेंटच्या’ अगदी मागेच होती. एक दिवस आम्ही मित्र याच इमारतीसमोर गप्पा मारत बसलो होतो तर डिप्लोमानंतर प्रवेश घेतलेली काही मुले, काहीतरी शोधत शोधत चाललेली दिसली. आमच्या जवळ आल्यावर त्यांनी विचारले,’ इंन्स्ट्रुमेंटेशन’ ची बिल्डींग कुठे आहे? याच इमारतीसमोर उभे राहिले असूनही ही असे का विचारतायेत, यामुळे आम्हाला हसू आले. त्यावर आम्ही सांगितले की, इंन्स्ट्रुमेंटेशन ची बिल्डिंग हीच आहे. अर्थात त्या मुलांचेही काही चुकले नाही, कारण आम्ही मागे वळून पाहिले तर या इमारतीवर लिहिले होते... ’उपकरणीकरण व नियंत्रण विभाग...!’ पण, एवढे मात्र नक्की की, तीन वर्ष डिप्लोमा करूनही त्यांना इंन्स्ट्रुमेंटेशनला मराठीत काय म्हणतात, हे माहित नव्हते...!
शुद्ध मराठीचा वापर आमच्या महाविद्यालयात सर्वत्रच होत होता. त्यामुळॆच आम्हाला यांत्रिकी, उत्पादन, स्थापत्य, विद्युत, विद्युतसंचरण व दूरसंचार, धातूशास्त्र, उपकरणीकरन अशा अभियांत्रिकीच्या विविध शाखांची ओळख झाली. हे केवळ एकच उदाहरण झाले. अशा बऱ्याच ठिकाणी मराठी भाषकांना मराठी पर्यायी शब्द माहित नाहीत. बॅंकांमध्ये तर हमखास हा प्रश्न उभा राहतो. अशी मराठी आधी त्यांना शिकविण्याची गरज आहे. मगच सर्वच क्षेत्रात मराठीकरणासाठी पावले उचलता येतील...

No comments:

Post a Comment

to: tushar.kute@gmail.com