Wednesday, April 14, 2010

सुट्ट्यांच्या देशा...

गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये कधी सर्वात जास्त सुट्ट्या घेणाऱ्या देशाचे नाव टाकायचे झाले तर सर्वात प्रथम भारताचेच नाव येईल. कारण, आम्ही भारतीय सर्वात जास्त सुट्ट्या घेऊन आराम करण्यात माहीर आहोत.
आमच्या इथे दर आठवड्याला सुट्टी ही असतेच. अशा रविवारच्या साप्ताहिक सुट्ट्या धरून वर्षाला ५२ सुट्ट्या होतात. ह्या सर्वांच्या हक्काच्या सुट्ट्या आहेत. आता केंद्र सरकारी कार्यालयांमध्ये शनिवार-रविवार अशा दोन दिवस साप्ताहिक सुट्ट्या असतात. म्हणजे वार्षिक हक्काच्या सुट्ट्यांची संख्या ही १०४ इतकी होते. आयटी कंपनीत यापेक्षा काही वेगळी परिस्थिती नाही. पण, आमच्या सरकारी कर्मचाऱ्यांशी तुलना निदान आयटी कंपनीत काम तरी असते...! धर्मनिरपेक्ष देश असल्याने सर्वच धर्मातील सणांच्या सुट्ट्या ह्या आम्हाला द्याव्या लागतात. त्याचा फायदा अन्य धर्मातील लोकांनाही होतो. आधीच भारतीय सणांची संख्या फार मोठी आहे. त्यामध्ये राष्ट्रीय दिवसांची मोठी भर पडते. या कारणांस्तव सुट्ट्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे.
तसे पाहिले तर अनेक सणांना सुट्टी द्यायची गरजच नसते. खऱ्या अर्थाने केवळ १-२ टक्के लोकच पूर्ण दिवस सण साजरा करतात. बाकिचे सुट्टीचा आनंद उपभोगत पडलेले असतात. काहींना तर आज कशाची सुट्टी आहे, याचीही माहिती नसते. बहुतांश भारतीय सण हे संध्याकाळी साजरे केले जातात. मकरसंक्रांतीला कोणी दिवसभर तीळगूळ वाटत फिरत नाही किंवा दसऱ्याला कोणी दिवसभर सोने वाटत फिरत नाही. भारतीय सण हे दिवसभर साजरे होतच नसतील तर पूर्ण दिवस सुट्टी बहाल करून उपयोग काय? हा प्रश्न मला नेहमी पडतो. अशा सणांच्या दिवशी कार्यालये एक तास उशिरा चालू करता येऊ शकतील किंवा एक तास लवकर बंद करता येऊ शकतील. त्याकरीता पूर्ण दिवस वाया घालवायची काय गरज?
महापुरूषांच्या जयंती वा पुण्यतिथीला सुट्टी जाहिर करून आपले सरकार त्यांचा मोठा अपमान करत असते. महात्मा गांधी, डॉ. आंबेडकर, छत्रपती शिवाजी अशा महापुरूषांच्या जयंतीला आपण सुट्टी घेतो. त्यापेक्षा पूर्णवेळ काम करून त्यांना आदरांजली वाहायला हवी. कार्यालयांमध्ये विशेष कार्यक्रम घेऊन आदरांजली वाहता येऊ शकते. ज्या महात्म्यांसाठी आपण सुट्टी घेतो त्यांनी कधी आपल्या कामातून सुट्टी घेतली नव्हती. १५ ऑगस्ट व २६ जानेवारीला देखील सुट्टी द्यावी की नको यावर पुन्हा विचारमंथन होणे गरजेचे आहे.
मोठ्या प्रमाणात घेतल्या जाणाऱ्या सुट्ट्यांमुळे भारतीय माणूस हा जगात सर्वात आळशी प्राणी म्हणून ओळखला जातो. याउलट जपानमध्ये सर्वात कमी सुट्ट्या घेतल्या जातात. या कारणामुळेच मनुष्यबळ कमी असूनही जपान जगाच्या पुढे धावतो आहे. इकडे भारतात कोट्यावधींचे आळशी मनुष्यबळ मात्र तयार होत आहे. यावर आपण कधी विचार करणार आहोत का?

1 comment:

to: tushar.kute@gmail.com