Wednesday, April 14, 2010

देणाऱ्याचे हात हजारो...

पोटापुरता पैसा पाहिजे नको पिकाया पोळी,
देणाऱ्याचे हात हजारो दुबळी माझी झोळी,

हवास तितका पाडी पाऊस देवा वेळोवेळी,
चोचीपुरता देवो दाणा माय माउली काळी,

एक वीतिच्या वितेस पुरते तळ हाताची थाळी,
देणाऱ्याचे हात हजारो दुबळी माझी झोळी,

महाल गाद्या नकोत नाथा माथ्यावर दे छाया,
गरजेपुरती देई वसने जतन कराया काया,

गोठविनारा नको कडाका नको उन्हाचि होळी,
देणाऱ्याचे हात हजारो दुबळी माझी झोळी..

होते तितुके देइ याहुन हट्ट नसे गा माझा,
सौख्य देइ वा दुःख ईश्वरा रंक करि वा राजा

अपुरेपण हि ना लगे,.... ना लागे पस्तावाचि पाळि
देणाऱ्याचे हात हजारो दुबळी माझी झोळी.

जेव्हा जेव्हा या कवितेला साजेसे प्रसंग घडतात तेव्हा कवि ग. दि. माडगूळकरांनी लिहिलेली ही कविता मला नेहमी आठवते. ’देणाऱ्याचे हात हजारो दुबळी माझी झोळी’ या माडगूळकरांच्या मताशी मी पूर्ण सहमत आहे. जगामध्ये बऱ्याच लोकांना असे वाटत असते की देव फक्त माझ्यावरच अन्याय करतो. मीच का? असा प्रश्न अनेकजण देवाला विचारत असतात. अर्थात यातूनच मानवाची खरी स्वार्थी प्रवृत्ती दिसून तर येतेच तसेच त्याचा चूकीचा दृष्टीकोनही प्रतित होतो.
निसर्गाने कोणावरही अन्याय केलेला नाही. त्याला कोणत्याही विशिष्ट प्राण्याविषयी ममता नाही. तो सर्वांवर सारखाच न्याय करत असतो. अर्थात सर्वांनाच सारखे देत असतो व सारखे घेत असतो. आता कोणाची क्षमता किती आहे यावर त्याला काय मिळेल हे ठरते. पृथ्वीची निर्मिती झाली तेव्हा कोणी श्रीमंत वा गरीब म्हणून जन्माला आले नव्हते. काळानुरूप हे बदल होत गेले आहेत. जगातल्या प्रत्येक गोष्टीत, घटनेत वा प्रत्येक माणसाकडून काहितरी शिकण्यासारखे आहे पण आपल्याला त्याची मनिषाच नसेल तर देव मला काही देत नाही हीच त्याची भावना राहणार आहे.
जीवनात खूप काही शिकण्यासारखे आहे, पण आपण ते समजून घेत नाही. यास प्रत्येकाचा दृष्टीकोन कारणीभूत आहे. जी शिकवण आपल्याला आपल्या चहुबाजुंकडून मिळते जी घेण्याची आपली क्षमता वा इच्छाच नसेल तर आपण ज्ञानाने कंगालच राहणार आहोत. जगात तोच माणूस मोठा जो आपल्या दृष्टीकोनाने सतत ज्ञान ग्रहण करत जगत असतो. देणारा आपल्याला भरपूर काही देत आहे, पण स्वत:ची झोळी थोडी मजबूत केली तर खूप काही संचय करता येईल यात संदेह नाही.

1 comment:

to: tushar.kute@gmail.com