Saturday, April 24, 2010

आयपीएलचा वाद

गेल्या काही दिवसांपासून आयपीएलचा वाद भलताच रंगू लागला आहे. प्रत्येक राजकीय पक्ष आपल्या हक्काचं व्यासपीठ म्हणून त्यावर प्रतिक्रिया व्यक्त करत आहे. अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचण्याचे आयपीएल हे एक मोठे साधन असल्याने भारताची ही ’इंडियन पॉलिटिकल लीग’ सध्या भलत्याच रंगात आली आहे.
आयपीएलवर व आयुक्त ललित मोदी यांच्यावर सध्या जे आरोप होत आहेत, त्यात ते निर्दोष निश्चितच नाहीत, याची जाणीव सर्वाना आहे. भारतीय क्रिकेटचा त्यांनी खूप चांगला ’अर्थिक’ उपयोग करून घेतला व मोठ्या प्रमाणात क्रिकेटला ग्लॅमर मिळवून दिले शिवाय भारतीय क्रिकेटला जागतिक दबदबा प्राप्त करून दिला, यात शंका नाही. आयपीएल मध्ये ललित मोदींनी भ्रष्टाचार करून स्वत:चे उखळ पांढरे करून घेतले असेल तर त्यावर त्यांना योग्य ती शिक्षा निश्चितच व्हायला पाहिजे. व आयपीएल च्या सर्वच कारभाराची त्रयस्थपणे खोलवर चौकशी होणे गरजेचे आहे.

राष्ट्रीय पातळीवर आयपीएलचा प्रश्न ज्याप्रकारे पाहिला जात आहे, त्यावरून मात्र हसायला येते. स्वत: करोडोंचा भ्रष्टाचार करणारे नेते आयपीएलच्या मागे हात धुवून लागले आहेत. जणू काही त्यांना त्यांचा ’हिस्सा’ मिळालेला नाही! अन्य काही नेते आयपीएल मध्ये गुंतले असल्याचे सर्वांनाच ज्ञात आहे. ते आता सहजपणे सुटतील, याची १०० टक्के खात्री आमच्या सारख्या सर्वसामान्य क्रिकेटप्रेमींना आहे! परंतु, आयपीएल मध्ये हिस्सा असलेल्या नेत्यांनी जी काही ’कमाई’ केली असेल त्याची जलन सध्या अन्य नेत्यांना होत असल्याचे दिसते. त्यांनीच का खावे? आम्ही का नाही? अशी अन्य नेत्यांची भावना झाली आहे. त्यामुळेच ते आयपीएलच्या मागे हात धुवून लागले असावेत. बिहारमधल्या एका प्रसिद्ध नेत्याने आयपीएलच बंद करण्याचे फर्मान काढले होते. कदाचित, त्यांच्या पाटणासाठी नवा आयपीएल संघ मिळाला नसल्याने ते ’फ्रस्ट्रेट’ झाले असावेत.
आयपीएलवर आरोप करणारा प्रत्येक नेता मोठा भ्रष्टाचारी आहे. परंतु, सध्या ते स्वत:ला धुतल्या तांदळासारखे स्वच्छ असल्यासारखे भासवत आहेत. काहींनी आयपीएल सरकारच्या नियंत्रणाखाली आणण्याची मागणी केली आहे. जर असे झाले तर क्रिकेटच्या इतिहासातील तो एक वाईट दिवस असेल. देशातला प्रत्येक नेता कुत्र्यासारखे लचके तोडून खाण्याचा प्रयत्न करेल. सध्या तरी आयपीएलला राजकारण्यांपासून दूर ठेवणे गरजेचे आहे. तिथे एका प्रामाणिक व कुशल अधिकाऱ्याची नितांत गरज असल्याचे दिसते. आयपीएलवर बंदी हा कधीच उपाय होऊ शकत नाही.

No comments:

Post a Comment

to: tushar.kute@gmail.com