Showing posts with label satavahan. Show all posts
Showing posts with label satavahan. Show all posts

Sunday, March 30, 2025

गौतमीपुत्राचा विजयोत्सव

मराठी नववर्षाचा पहिला दिवस अर्थात गुढीपाडवा. हा दिवस का साजरा केला जातो, याविषयी समाजमाध्यमांवर विविध पोस्टच्या माध्यमातून वेगवेगळी माहिती प्रसारित होताना दिसते. अनेकांनी याला हिंदू नववर्षाचे नाव देखील दिलेले आहे. खरं पाहिलं तर गुढी उभारण्याची परंपरा फक्त महाराष्ट्राच्या अर्थात मराठी भाषिकांच्या प्रदेशांमध्येच दिसून येते. यासाठी कोणतेही धार्मिक कारण नाही. समाजमाध्यमांवरील विविध पोस्टमध्ये नानाविध भोळीभाबडी कारणे दिसून आली. तेव्हा महाराष्ट्राच्या प्राचीन इतिहासावर संशोधन करणाऱ्या काही महत्त्वाच्या संशोधकांच्या पुस्तकांचा मी संदर्भ घेतला. आणि त्यामधील माहितीच प्रमाण मानावी अशी दिसून आली.
सातवाहन राजवंश म्हणजे महाराष्ट्राचा निर्माणकर्ता. त्यांच्या साडेचारशे वर्षांच्या कारकिर्दीमध्ये महाराष्ट्राची सांस्कृतिक जडणघडण झाली. याच राजवंशातील विसावा राजा म्हणजे गौतमीपुत्र सातकर्णी होय. ज्याने इसवी सन ७८ मध्ये शकांचा पराभव केला. त्याच वर्षापासून शालिवाहन शक सुरू झाला. हे इतिहास संशोधकांनी सप्रमाण सिद्ध केले आहे. अर्थात इतिहास संशोधकांच्या प्रत्येक पुस्तकांमध्ये हीच गोष्ट नमूद केलेली दिसते. गौतमीपुत्र सातकर्णीचा विजयोत्सव आपण मागील १९४७ वर्षे साजरा करत आलेलो आहोत. ९९ टक्के पेक्षा अधिक मराठी लोकांना सातवाहनांच्या या राजाचे नाव देखील कदाचित माहीत नसावे. यानिमित्ताने एक गोष्ट मात्र अधोरेखित झाली की, गुढीपाडवा हा मराठी मातीतील खराखुरा मराठमोळा सण आहे.

सर्वांना गुढीपाडव्याच्या मनःपूर्वक शुभेच्छा.

— तुषार व कुटे.

संदर्भ:
१. मुसलमानपूर्व महाराष्ट्र, लेखक वासुदेव कृष्ण भावे, वरदा प्रकाशन, पान क्रमांक १८
२. महाराष्ट्राची कुळकथा,  लेखक डॉ. मधुकर केशव ढवळीकर, राजहंस प्रकाशन, पान क्रमांक ८५
३. सातवाहनकालीन महाराष्ट्र ,लेखक रा. श्री. मोरवंचीकर, प्रतिमा प्रकाशन, पान क्रमांक ७१
४. जुन्नरच्या परिसरात,  लेखक प्र. के. घाणेकर, स्नेहल प्रकाशन, पान क्रमांक १९९
५. Junnar Inscriptions, Author: Shobhana Gokhale, Page No. 17

 






Friday, December 6, 2024

नागणिका - शुभांगी भडभडे

महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये आपल्या मराठी प्रदेशावर सर्वाधिक काळ राज्य करणारे साम्राज्य म्हणजे सातवाहन साम्राज्य होय. जवळपास साडेचारशे वर्षे सातवाहन राज्यांनी महाराष्ट्राची राज्यव्यवस्था चालवली. एका अर्थाने त्यांनी महाराष्ट्र घडवलादेखील! पुरातन किल्ले, लेणी, वास्तु अशा विविध पुराव्यांद्वारे सातवाहनांचा इतिहास इतिहासकारांनी महाराष्ट्रासमोर आणला. परंतु आजही बहुतांश सातवाहन राजांचा इतिहास हा अज्ञातच आहे.
जुन्नरजवळचा नाणेघाट हा सातवाहन राजवटीमध्येच बांधला गेला. शिवाय सुमारे दोन ते सव्वा दोन हजार वर्षांपूर्वी कोरलेले शिलालेख आजही इथे वाचायला मिळतात. याच शिलालेखांमधून सातवाहनांच्या दुसऱ्या पिढीतील राणी नागणिका हिची ओळख इतिहासकारांनी महाराष्ट्राला करून दिली. येथील शिलालेखांद्वारे सातवाहनांच्या राज्यपद्धतीविषयी बरीचशी माहिती प्राप्त झाली. परंतु ती अजूनही नगण्य प्रकारातीलच आहे. दुसरे सातवाहन राजे श्रीसातकर्णी यांची पत्नी म्हणजे नागणिका होय. सुमारे शंभर वर्षांपूर्वी स्त्रियांना भारतीय समाजामध्ये प्रतिष्ठेचे स्थान नव्हते तर दोन हजार वर्षांपूर्वीची गोष्टच निराळी. अशा काळामध्ये एका स्त्री राज्यकर्तीने सातवाहनांच्या मराठी देशाचा कारभार चालवला होता, ही निश्चितच अत्यंत अभिमानाची आणि महाराष्ट्रासाठी गौरवाची बाब आहे. या शकनिका असणाऱ्या नागणिका राणीची काराकीर्द निश्चितच भूषणावह राहिली असणार, यात शंका नाही. हाच धागा पकडून शुभांगी भडभडे यांनी नागणिका राणीच्या कारकिर्दीवर प्रकाश टाकणारी ही कादंबरी लिहिलेली आहे!
कादंबरीची सुरुवात होते दुसरे सातवाहन राजे श्रीसातकर्णी यांच्या राज्यकारभारापासून. सातवाहनांच्या एकंदरीत राज्य रचनेची माहिती आपल्याला विविध घटनांद्वारे होते. सम्राट अशोकाचा मृत्यू झाल्यानंतर उदयास आलेल्या सातवाहन साम्राज्याचा उद्देश, ध्येय आणि प्रगती दिसायला लागते. श्रीसातकर्णी यांचा व्यापारविषयक, लष्करविषयक धर्मविषयक दृष्टिकोन आपल्याला समजून येतो. खरंतर सातवाहन काळामध्ये महाराष्ट्रातील बहुतांश बौद्ध लेणी स्थापन करण्यात आली होती. यामागील त्यांचे उद्दिष्ट देखील विविध संवादांद्वारे वाचायला मिळते. वैदिक धर्माचा अवलंब करत असले तरी बौद्ध आणि जैन धर्माविषयी सातवाहनांचा दृष्टिकोन लक्षात येतो. खरंतर बहुतांश ठिकाणी वैदिक धर्मातील त्रुटींवर मात करण्यासाठी सातवाहन काय करत होते, हे देखील समजते. जवळपास निम्म्यापर्यंत कादंबरी श्रीसातकर्णी यांच्या राजवटीवरच आधारलेली दिसून येते. कालांतराने सातकर्णी राजांचा मृत्यू होतो. दोघेही युवराज वेदिश्री आणि शक्तिश्री हे अल्पवयीन असतात आणि याच कारणास्तव सर्वात ज्येष्ठ राणी नागणिका सर्व कारभार हाती घेते. राज्याची घडी बसवायला सुरुवात करते. एका कुशल आणि सुसंस्कृत राज्यकर्तीप्रमाणे राज्यकारभार हाकायला लागते. श्रीमुख सातवाहन आणि श्रीसातकर्णी यांचा सहवास लाभला असल्याने नागणिकाला त्यांचा राज्याविषयक दृष्टिकोन आणि धोरणे पक्की माहीत असतात. त्यांचा अवलंब करत नागणिका सातवाहन राज्य सांभाळू लागते. यामध्ये तिला धाकट्या राणीचे, धाकट्या युवराजांचे तसेच अपरांत देशाच्या राजाचे बंड देखील झेलावे लागते. परंतु त्यातून ती सहीसलामत योग्य मार्ग काढून राज्यकारभार सुरळीत कसा होईल, याकडेच लक्ष देते.
सातवाहनांचा व्यापार मोठ्या प्रमाणात कल्याण व सोपारा या बंदरांद्वारे ग्रीक राजसत्तांशी होत होता. याकरिता सुलभ व्यापारी मार्ग बनवावा म्हणून ती स्वतः पुढाकार घेऊन जुन्नरजवळच्या सह्याद्रीच्या डोंगररांगांमध्ये घाट बनवायला सुरुवात करते. हाच नाणेघाट होय. कादंबरीच्या उत्तरार्धामध्ये नाणेघाटाचे बांधकाम सुरू असताना बऱ्याचदा विविध घटनांचा उल्लेख येतो आणि येत राहतो. अखेरीस शेवटच्या प्रकरणामध्ये हा व्यापारी मार्ग तयार होतो. नागणिकाराणी आणि तिचे इतर मंत्री घाट बघण्यासाठी जुन्नरला जातात. तो अतिशय उत्तम तयार झालेला असतो. त्याकरता तिने शिलालेख देखील लिहून घेतलेले असतात. ते वाचून ती समाधानी होते. सह्याद्रीच्या सौंदर्याकडे बघत बघतच कादंबरी समाप्त होते.
सातवाहन साम्राज्यावर आधारित असणारी कदाचित ही मराठीतील एकमेव कादंबरी असावी. जवळपास ८०% भाग हा संवादांनी व्यापलेला आहे. त्यातून तत्कालीन विविध व्यक्तिमत्त्वांचे दर्शन लेखिका आपल्याला करून देतात. तसं पाहिलं तर कादंबरीमध्ये फारशा नाट्यमय घटना नाहीत. केवळ नागणिका राणीची ओळख करून देणे, हाच एकमेव उद्देश असावा असे दिसते. ज्यांना सातवाहन राजांविषयी बऱ्यापैकी माहिती आहे, त्यांना घटना पात्रे आणि ठिकाणी व्यवस्थित उमजतील. त्यामुळे कादंबरी वाचण्याआधी सातवाहन राजांविषयी माहिती करून घेणे फायद्याचे ठरेल.
एका अर्थाने ही माहितीपूर्ण कादंबरी आहे. श्रीमुख सातवाहन, श्रीसातकर्णी, राजकुमार वेदीश्री आणि शक्तीश्री, महारथी त्रणकायीर ही पात्रे वगळता इतर सर्व पात्रे काल्पनिक आहेत. अर्थात इतिहासामध्ये त्यांच्या नावाविषयी कोणतेही पुरावे सापडलेले नाहीत. परंतु कथेची गरज असल्याने लेखिकेने त्यांचा अंतर्भाव कादंबरीमध्ये केला असावा. एकंदरीत भाषा सुंदर आणि ऐतिहासिक प्रकारातील आहे. ज्यामध्ये अन्य भाषांमधून आलेले कोणतेही शब्द वापरलेले नाहीत, हे विशेष. सर्व शहरांची नावे तसेच भागांची नावे जसे अपरांत, अश्मक, दंडकारण्य इत्यादी (जुन्नर वगळता) सातवाहनकालीन आहेत. म्हणूनच आपण कथेमध्ये गुंतून राहतो. एका ठिकाणी वैदिकधर्म ऐवजी हिंदू हा उल्लेख केलेला आहे. बाकी कादंबरी उत्तमच.
नाणेघाटातल्या एका शिलालेखावरून राणी नागणिकाची प्रतिमा कशी असेल, हे लेखिकेने उत्तमरीत्या या कादंबरीद्वारे वठवलेले आहे. व्यापारी मार्गाची आवश्यकता, बौद्ध विहारांची उपयुक्तता, कार्षापण या नाण्याचा विनीयोग अशा विविध मुद्द्यांवर उत्तम विवेचन लेखिकेने या कादंबरीद्वारे केल्याचे दिसते. एकंदरीत सातवाहनांविषयी कादंबरीद्वारे जाणून घेणाऱ्या वाचकांना हा एक उत्तम स्त्रोत ठरेल, यात शंका नाही.


 

Tuesday, May 28, 2019

गौतमीपुत्र सातकर्णी: एक युद्धाळलेला चित्रपट

सुमारे 2 हजार वर्षांपूर्वी महाराष्ट्रावर साडेचारशे वर्षे राज्य करणारे साम्राज्य म्हणजे सातवाहन होय. सातवाहनांचा विसावा राजा गौतमीपुत्र सातकर्णी हा सर्वांत पराक्रमी राजा होता. सातवाहनांच्या साम्राज्याचा मोठा इतिहास जुन्नरला असल्यामुळे त्यांचे मोठे आकर्षण मला नेहमीच राहिले आहे. शिवाय इतिहासातला सातवाहन हाच माझा सर्वात आवडता विषय होता व आजही आहे. गौतमिपुत्रा बद्दल इतिहासात अनेक गोष्टी वाचल्या आहेत. याच गौतमीपुत्र सातकर्णी वर 2017 मध्ये एक तेलगू चित्रपट तयार झाला होता. हा चित्रपट बघण्याची संधी नुकतीच मला मिळाली त्याचेच हे विश्लेषण.
प्रथमत: चित्रपट बघताना माझे पूर्ण लक्ष फक्त ऐतिहासिक घटनांवर राहिले होते. त्यामुळे हा चित्रपट केवळ इतिहास आहे, इतकेच माझ्या डोक्यात राहिले. म्हणूनच केवळ इतिहास म्हणून या चित्रपटाची मीमांसा करायला मी सुरुवात केली. पहिली गोष्ट अशी की 58 वर्षांचा नंदमुरी बालकृष्ण हा बिलकूलच गौतमीपुत्र सातकर्णी म्हणून शोभत नाही! त्याची आई म्हणून दाखवलेली हेमामालिनी ही जवळपास त्याच वयाची दिसते. तरीही ही गोष्ट थोडीशी बाजूला ठेवूयात. गौतमीपुत्राने भारतातील अनेक छोटी छोटी राज्य एकत्रित करून सातवाहनांचे मोठे साम्राज्य बनवले होते. ही गोष्ट खरी आहे आणि चित्रपटात येथे चांगल्या पद्धतीने दाखवली आहे. कल्याणचे युद्ध जिंकून कल्याणचा राजा सातवाहनांचा मांडलिक होतो व गौतमीपुत्राशीच  नंतर तो दगा करतो. याला ऐतिहासिक आधार मात्र दिसलेला नाही. कल्याणचा राजा म्हणून दाखवलेला मिलिंद गुणाजीचे दर्शन सुखावणारे ठरते. याशिवाय सातकर्णीने स्वतःला 'गौतमीपुत्र' म्हणवून घेणे व स्वतःच्या मुलाला 'वासिष्ठीपुत्र पुलुमावी' हे नाव प्रदान करणे, हे संदर्भ अत्यंत योग्य आहेत. गौतमी बलश्रीची भूमिका हेमा मालिनीने चांगल्या पद्धतीने साकारली आहे. परंतु या भूमिकेला फारसा वाव दिसत नाही. सातवाहन इतिहासात नागनिकेनंतर गौतमी बलश्री ही सर्वात ताकदवान स्त्री होती. त्याचे प्रतिबिंब चित्रपटात दिसायला हवे होते. परंतु, ते तसे दिसत नाही. शिवाय महाराणी वशिष्ठीची भूमिकाही फारशी प्रभाव पाडत नाही. एकंदरीत चित्रपटाचा पूर्ण फोकस गौतमीपुत्र सातकर्णी याच नावावर आहे. 

चित्रपटाची सुरुवात होते कल्याणच्या युद्धाने. मध्यंतरात नहपणाविरुद्ध युद्ध होते आणि शेवट होतो तो दिमित्रीयस सोबतच या युद्धाने नहपणासोबतचे युद्ध इतिहासात सर्वात गाजलेले युद्ध होते. त्याची रंजकता फारशी जाणवत नाही. एकंदरीत दक्षिण भारतीय चित्रपट असल्यामुळे फिल्मी स्टाईल ची मारामारी आणि युद्ध या चित्रपटात ठासून भरलेली आहेत. चित्रपटातील एकूण 60 ते 70 टक्के भाग हा फक्त युद्ध आणि युद्धाचे व्यापलेला आहे. अखेरीस दिमित्रीयस यासोबतच युद्धही फिल्म पद्धतीने दाखवलेले आहे. सातकर्णीवर ग्रीक योद्धा अथेना विषप्रयोग करते व दुसऱ्या दिवशी तो दुपारी युद्धात फिल्मी स्टाईलने उठून परत सामील होतो. हे मात्र अतिरंजक वाटते. 'क्षहरात वन्स निर्वंश करत' असे वर्णन नाशिकच्या एका लेण्यांमध्ये गौतमीपुत्राच्या केले आहे. हे मात्र चित्रपटात उठून दिसते. हेही खरे आहे की, गौतमीपुत्राने ग्रीकांना हरवल्यानंतर कित्येक शतके भारतावर परकीय आक्रमण झाले नव्हते. त्याचे श्रेय सातवाहनांच्या राजाला द्यायलाच हवे.
सातवाहन मूळचे महाराष्ट्रातले असले तरी आंध्र वासियांनी ते आमचेच आहेत, असे दाखवले आहे. शिवाय इतिहासकारांनी हे सिद्ध केले आहे की, सातवाहनांची राजधानी पैठण या ठिकाणी होती. तरीही ती आंध्रप्रदेशातल्या अमरावती येथे दाखवण्यात आली आहे. शिवाय नहपानासोबतचे युद्ध महाराष्ट्र मध्ये नाशिक परिसरात झाले होते. ते सौराष्ट्रात दाखवण्यात आले आहे. या चित्रपटातल्या ऐतिहासिक चुका होत. सातवाहन हे बौद्ध धर्माचे उपासक होते व रक्षणकर्ते होते. त्यामुळे युद्धखोर म्हणून दाखवलेल्या गौतमिपुत्राला बौद्ध भिक्खूंच्या विरोध होता. परंतु त्याने बौद्ध भिक्खूंना दिलेले स्पष्टीकरण मात्र चुकीचे वाटते. एकंदरीत चित्रपटांचे दिग्दर्शन करण्यापूर्वी दिग्दर्शकाने इतिहासकारांची मदत घ्यायला हवी होती. नुसती युद्ध टाकून कोणताही चित्रपट यशस्वी होत नाही. इतिहासकार तर हा चित्रपट केराच्या टोपलीत फेकून देतील असाच आहे.

चित्रपट ह्या युट्युब लिंकवर पाहू शकता:  https://www.youtube.com/watch?v=FhlsfkfZO38