Showing posts with label sunetra pawar. Show all posts
Showing posts with label sunetra pawar. Show all posts

Monday, February 2, 2026

सुनेत्रा पर्वाचा प्रारंभ

अजितदादांच्या आकस्मिक निधनाने सर्व महाराष्ट्रालाच धक्का बसला. महाराष्ट्रातील जवळपास प्रत्येक जणच हळहळ व्यक्त करत होता. एक कामसू आणि उमदे व्यक्तिमत्व आपण गमावले. परंतु या घटनेने पुढे काय? नावाच्या प्रश्नाला देखील सुरुवात झाली. या प्रश्नाचे उत्तर शोधणे गरजेचे होतेच. अजितदादानंतर मोठा आणि तगडा नेता त्यांच्या पक्षामध्ये नव्हता. आणि दोनच दिवसांमध्ये त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांची पक्षनेतेपदी तसेच उपमुख्यमंत्री पदासाठी घोषणा करण्यात आली. समाजमाध्यमांवर जेव्हा ही बातमी प्रसारित झाली तेव्हा यावर बऱ्याच संमिश्र प्रतिक्रिया वाचायला मिळाल्या. अजितदादा जाऊन अजून दहा दिवसही झाले नाहीत तोच त्यांची पत्नी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेत आहे, यावर बऱ्याच जणांचा आक्षेप होता. ही गोष्ट तशी पाहिली तर सामान्यच आहे. सामान्य लोकांच्या दृष्टिकोनातून कमीत कमी दहा दिवस तरी कौटुंबिक दुखवटा पाळला जातो. परंतु राजकारणासाठी हा नियम लागू होतो का? हाही महत्त्वाचा प्रश्न आहे. अजितदादा त्यांच्या पक्षाचे एकखांबी तंबू होते, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. त्यांच्या मूळ पक्षातूनच नवीन पक्षाची स्थापना झाली होती. त्यांच्या तंबूचा हा खांब पडल्याने तंबू कोसळण्याची परिस्थिती निर्माण झाली होती. त्यातल्या त्यात विरोधी गटाकडून लगेचच निरनिराळे दावे यायला लागले होते. आता अजितदादाच नसल्याने त्यांनाही त्यांचे उखळ पांढरे करून घ्यायची जणू घाई झाली होती, असे एकंदरीत वातावरण दिसून आले. याच कारणास्तव पडद्यामागील राजकारण आलेले असावे.
कधी कधी वाटतं आपण खूपच सामान्य लोक आहोत. आपण आपल्याच सामान्य विचारसरणीतून प्रत्येक घटनेकडे पाहत असतो. पडद्यामागील राजकारण आपल्याला समजत नाही. राजकारणी लोकांची दुःख ही वेगळीच असतात. त्यातूनच सुनेत्रा पवारांना उपमुख्यमंत्रीपदी नेमण्याचा निर्णय झाला असावा. यातून त्यांच्या पक्षाची घडी विस्कळीत होण्यापासून वाचेल, असे वाटते. कारण मृताच्या टाळूवरील लोणी खाण्यासाठी सध्यातरी विरोधी गटातील बरेच जण टपलेले दिसून आले. उपमुख्यमंत्रीपद हे संविधानिक पद नसले तरी त्यातून एक वेगळा संदेश अन्य राजकारण्यांना गेला आहे. अजितदादांचा पक्ष अजूनही स्वतंत्रच आहे आणि तो याही पुढे स्वतंत्रच चालू राहील. याकरिताच सुनेत्रा पवारांचा शपथविधी उरकला गेला. अतिशय विचित्र परिस्थितीमधून सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्रीपदी आल्या असल्या तरी महाराष्ट्राच्या इतिहासातील हा एक मैलाचा दगड ठरू शकतो. 
त्या काही कट्टर राजकारणी नाहीत. त्यांच्या एकंदरीत वागणुकीवरून राजकारणातले छक्के-पंजे त्यांनी अजून प्रत्यक्ष पाहिले नसावेत. परंतु अजितदादांकडून त्यांनी याचे अप्रत्यक्ष धडे घेतले असतील, अशी आशा वाटते. राजकारणात त्यांचा अनुभव त्यांच्या पक्षातील इतर नेत्यांपेक्षा कमी असला तरी सद्य परिस्थितीत केवळ त्यांचेच नेतृत्व पक्षाला एकसंध ठेवू शकते, अशी परिस्थिती आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात इतक्या उच्च पदावर आजवर एकही महिला गेलेली नाही. म्हणजे महाराष्ट्राने महिला राजकारण अनुभवलेले नाही. एका अर्थाने सुनेत्रा पवारांसाठी ही एक सुवर्णसंधीच आहे, असं म्हणावं लागेल. महाराष्ट्रासाठी एका नव्या दिशेचा हा प्रारंभ आहे. वाईट घटनांमधून काहीतरी चांगले होत असते. तशाच प्रकारची ही घटना आहे. इथून पुढची महाराष्ट्रीय राजकारणातील अनेक वर्षे सुनेत्रा पवार आपल्या कामगिरीतून गाजवतील, अशी आशा वाटते.
बघूया काय होतंय ते.

--- तुषार भ. कुटे