Saturday, February 26, 2011

मराठियांचा दिनू...


मराठीच्या मुद्द्याला राजकिय पटावर मोठे यश मिळू लागल्यावर सध्या सर्वत्र मराठी-मराठी म्हणूनच बोलबाला चालू आहे. २७ फेब्रुबारीला आंतरराष्ट्रीय मराठी दिन साजरा झाला. या दिवशी महाराष्ट्रातील राजकीय पक्षांनी विविधउपक्रमांनीआपणच मराठीचे कैवारी आहोत या थाटात कुसुमाग्रजांचा जन्मदिवस साजरा केला. लोकांच्या भावनेला हात घालण्याचे काम आजकालचे राजकीय पक्ष खूपच उत्कृष्टपणे करतात. त्यातल्या त्यात मातृभाषा म्हणजे अखिल जनांच्या अस्मितेचा विषय असतो. ज्यांना कुसुमाग्रजांचे मूळ नावही माहित नसेल, त्यांनी या दिवशी आपले प्रखर मातृभाषाप्रेम दाखवून दिले. आपल्या नाशिकमध्ये तरकुसूमाग्रजजयंतीनिमित्त खासवकृत्वस्पर्धा आयोजित केली होती. यातूनच आपल्या मराठी भाषेचे भवितव्य फारच उज्ज्वल आहे हेच दिसून येते!

गेल्या काही महिन्यांपासून मराठी भाषेचा मुद्दा खूपच प्रखरतेने राजकीय पक्षांनी मांडला. त्यात त्यांची चढाओढच चालू होती, यात वाद नाही. पण, त्यामुळे सर्वसामान्य मराठी माणसाची प्रतिमा राष्ट्र पातळीवर खराब होत होती, याचे कोणाला घेणे देणे नव्हते. सर्वसमावेशक म्हणून ओळखला जाणारा मराठी माणूस आज संकुचित वृत्तीचामहाराष्ट्रीयनम्हणून ओळखला जाऊ लागलाय, याचे एक मराठी म्हणून मला दु: वाटते. प्रत्येकाला आपल्या मातृभाषेचा अभिमान असावा, यात गैर काहीच नाही. पण, तो इतकाही ज्वलंत नसावा की, त्याने स्वभाषिकांची प्रतिमाच बदलून जावी. आज जे लोक नुसते मराठीच्या नावाने गळे काढतायेत त्यांनी आपल्या मराठीसाठी काय केले, याचे सर्वप्रथम उत्तर द्यावे. मराठी माणूस मराठीच्या प्रगतीसाठी फारसा हातभार लावत नाही, हे आजवर सिद्ध झालेले आहे. त्यामुळे, नुसता मातृभाषेचा अभिमान बाळगण्यात अर्थ नाही. त्यासाठी प्रत्येकाचे योगदान असणे महत्वाचे आहे.

कोणत्याही भाषेचे महत्व त्या भाषेत असणाऱ्या कला, साहित्य संस्कृतीने अधोरेखित होत असते. त्यासाठी मी थोडक्यात आकडेवारी इथे देत आहे. आपली मराठी ही मातृभाषा असणाऱ्या लोकसंख्येनुसार भारतात चौथ्या क्रमांकाची जगात १७ व्या क्रमांकाची भाषा आहे. ही निश्चितच अखिल मराठियांसाठी अभिमानाची बाब आहे. देशात लोकसंख्येनुसार हिंदी, बंगाली, तेलुगू, मराठी, तमिळ, उर्दू, गुजराती, कन्नड, मल्याळम, ओरिया, पंजाबी, आसामी, मैथिली, भिल्ली, संथाली, काश्मीरी, गोंडी, सिंधी कोंकणी असा क्रम येतो. जवळपास आठ कोटी भारतीयांची मातृभाषा ही मराठी आहे. मराठी भाषेतील साहित्यनिर्मीतीचा विचार केल्यास दक्षिण पूर्व भारतीय भाषा सोडाच पाच कोटी लोकसंख्या असणाऱ्या गुजरातीपेक्षाही कमी पुस्तके मराठी भाषेत प्रकाशित होतात!

ज्ञानपीठ हा भारतीय साहित्यविश्वातला सर्वोच्च सन्मान आहे. एखाद्या भाषेतील सर्वोत्तम कलाकृतीला सहित्यिकाला हा दरवर्षी पुरस्कार दिला जातो. मराठी भाषेला हा पुरस्कार १९६५ पासून आजपर्यंत केवळ तीन वेळा मिळाला आहे! याउलट हिंदी कन्नड भाषेत हा पुरस्कार प्रत्येकी सात वेळा, बंगालीला पाच वेळा, मल्याळम चार वेळा तर ओरिया गुजरातीला तो तीन वेळा मिळालेला आहे.

विविध कलांचा संगम म्हणून चित्रपटांकडे पाहिले जाते. भारत सरकारद्वारे दिला जाणारा राष्ट्रीय पुरस्कार हा चित्रपटांचा देशातील सर्वोच्च सन्मान मानला जातो. १९५४ पासून हा पुरस्कार दिला जातो. या प्रदीर्घ काळात केवळ दोनच मराठी चित्रपटांना पुरस्कार मिळाला आहे! परंतु, राष्ट्रीय पुरस्कार मिळणाऱ्या बंगाली चित्रपटांची संख्या आहे... तब्बल २२! तसेच १० हिंदी, मल्याळम सहा कन्नड चित्रपटांना राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाला आहे. केवळ काही हजारात लोकसंख्या असणाऱ्या संस्कृत भाषेतही हा पुरस्कार दोनदा मिळाला आहे. सर्वात लोकप्रिय चित्रपट म्हणून हिंदी बरोबर तमिळ चित्रपटांना सर्वाधिकवेळा पुरस्कार मिळालेत. परंतु, यात एकाही मराठी चित्रपटाचा समावेश नाही! भारताकडून ऑस्कर पुरस्कारासाठी पाठविण्यात येणाऱ्या चित्रपटांत तब्बल २८ हिंदी तमिळ चित्रपट होते. मागच्या पाच वर्षांत दोन मराठी चित्रपट ऑस्करची वारी करून आले, नाहीतर मराठीची ही पाटीही कोरीच राहिली होती! सर्वोत्कृष्ट पुरूष कलाकार म्हणून उपेंद्र लिमयेला मराठी चित्रपटासाठी प्रथमच राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. तिथेही हिंदी-१५, मल्याळम-११, तमिळ- बंगाली- अशी आकडेवारी आहे. स्त्री कलाकारांच्या बाबतीत तर आजही मराठीची पाटी कोरी आहे. या प्रवर्गात हिंदीला १७, बंगाली, तमिळ मल्याळमला प्रत्येकी पाच तेलुगू आणि कन्नडला प्रत्येकी तीन पुरस्कार मिळालेत. मराठी भाषक अभिनेत्री पैसा ग्लॅमर मिळविण्यासाठी केवळ हिंदी चित्रपटांत काम करत आहेत. हिंदीमध्ये अन्य भाषिक अभिनेत्रीही आहेत. परंतु, स्वभाषेची कास त्यांनी सोडलेली नाही. रेखा श्रीदेवीने अनेक कन्नड, तेलुगु तमिळ चित्रपटांतून काम केले आहे. रीमी सेन, रायमा सेन, कोंकणा सेन, राणी मुखर्जी, बिपाषा बसु, शर्मिला टागोर, यांचे बंगाली चित्रपटसृष्टीला मोठे योगदान आहे. याउलट आपल्या माधुरी दिक्षित उर्मिला मातोंडकरचे मराठी चित्रसृष्टीला काय योगदान आहे? याचे उत्तर मराठी भाषकांनी शोधावे. गोवारीकर, भांडारकर सारखे दिग्दर्शक हिंदीत चित्रपट काढून पैसे कमवितात पण त्यांना मराठीत साधा चित्रपट काढता येत नाही! याउलट प्रियदर्शन, मणिरत्नम, हृषिकेष मुखर्जी, अपर्णा सेन, कमल हसन यासारखे दिग्दर्शक स्वभाषेला प्रथम प्राधान्य देत चित्रपट तयार करतात. यातून मराठियांनी काही शिकण्यासारखे नाही का? याचा विचार करायला हवा.

आता थोडे भारतीय वृत्तपत्रांबद्दल पाहूया. मला सर्वात खेदाची गोष्ट इथे सांगावीशी वाटते की, सर्वाधिक खप होणाऱ्या देशातील पहिल्या ३० वृत्तपत्रांत केवळ एक वृत्तपत्र हे मराठी आहे! तर या यादीत १२ इंग्रजी, हिंदी, तर गुजराती, तमिळ, कन्नड, तेलुगू, मल्याळम भाषांच्या प्रत्येकी दोन वृत्तपत्रांचा समावेश होतो.

वरिल सर्व गोष्टी मराठियांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणाऱ्या आहेत. या सर्व भाषिकांनी कधीच स्वत:च्या भाषेच्या नावाने राडा केला नाही, तरीही त्यांच्या भाषांनी विविध उंची गाठल्या आहेत. याउलट, आम्ही मराठी भाषिक नुसता मराठीचा कट्टर अभिमान बाळगतो. पण, आमच्या भाषेच्या प्रगतीसाठी मात्र कधीच हातभार लावत नाही. आमच्या नाशिकमध्ये, हिंदी चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी तोबा गर्दी होते. त्याचवेळी, मराठी चित्रपटाकडे कोणी ढूंकूनही पाहत नाही. आमचे सई ताम्हणकर, श्रेयस तळपदे केदार शिंदे मराठी चित्रपट सोडून लगेच हिंदीतल्या ग्लॅमरकडे आकर्षित होतात, साधना सरगम सारखी मराठमोळी गायिका मराठी सोडून तमिळ भाषेत राष्ट्रीय पुरस्कार घेऊन जाते तर मूळची बंगाली असणारी मराठीवर नितांत प्रेम असणारी श्रेया घोषाल मराठियांना उत्तम मराठी गाण्यांचा नज़राणा देऊन जाते. मराठी लोकच मराठीचा आदर करत नाहीत तर नुसता मराठी दिन साजरा करून काय उपयोग? आपल्या पोकळ भाषाप्रेमाचे प्रदर्शन करून भाषेची प्रगती कधीच होणार नाही, हे मराठी भाषिकांनी ध्यानात ठेवणे गरजेचे आहे.

दुसऱ्या भाषेचा धिक्कार करून आपल्या भाषेची प्रगती कधीच होत नसते, उलट तीची नाचक्की होईल. त्यामुळे आपली भाषा कशी पुढे जाईल, याचा विचार मराठी भाषिकांनी करायला हवा, तरच वरती दिलेल्या आकडेवारीत मराठी भाषा मानाच्या स्थानी आपल्याला दिसून येईल...

(Republished Blog. Previous publication: 26/02/2010

पुन्हा अनुभवाचीच सरशी


विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या सुरुवातीलाच अनेक सामने एका भक्कम व एका दुबळ्या संघांमध्ये झाले. त्यामुळॆ त्यात फारशी उत्सुकता ताणली गेली नाही. पण, या आठवड्यात झालेल्या हॉलंड व आयर्लंडच्या सामन्यांमध्ये थोडीशी चुरस दिसून आली. इंग्लंड व हॉलंडमध्ये झालेल्या सामन्यात हॉलंडने इंग्लंडला चांगलीच धडक दिली होती .पण, हॉलंड मात्र ऐन वेळी अनुभवात कमी पडला. त्यामुळॆ त्यांना सामना जिंकता आला नाही. फलंदाजांच्या मेहनतीचे चीज गोलंदाजांना मात्र करता आले नाही. अशाच प्रकारे कालच्या बांग्लादेश वि. आयर्लंड मध्ये झालेल्या सामन्यात बांग्लादेशला आपल्या अनुभवाच्या जोरावरच विजय प्राप्त करता आला, हे मान्य करायलाच हवे.
बांग्लादेशचा संघ आता लिंबूटिंबू राहिलेला नाही, हे त्यांनी यापूर्वीच सिद्ध केले आहे. गतवर्षी त्यांनी न्युझीलंडला सरळ सरळ व्हाईटवॉश देत धूळ चारली होती. शिवाय विश्वचषकाच्या उद्घाटनाच्या सामन्यातही भारताला त्यांनी मोठी टक्कर दिली होती. शिवाय बांग्ला टायगर्सला घरच्या मैदानावर खेळत असल्याचा फायदाही होताना दिसत आहे. याची प्रचिती त्यांच्या दोन्ही सामन्यात आली. १०० पेक्षा अधिक सामने खेळलेले त्यांच्या संघात अनेक खेळाडू आहेत. २००० साली कसोटी दर्जा मिळाल्यानंतर त्यांच्या खेळाच्या दर्जात बरीच सुधारणा झालेली आहे. कसोटी संघांसोबत खेळण्याचा बांग्लादेशला मोठा फायदा मिळाला. असे असले तरी, त्यांच्या संघात २८ वर्षीय अब्दूर रझ्झाक हा सर्वात वयस्कर खेळाडू आहे! म्हणजेच बांगला टायगर्स हे सर्व संघांमध्ये सर्वात तरूण खेळाडू आहेत! याचा फायदा बांगला खेळाडूंना आगामी सामन्यात नक्कीच होईल.
कालच्या सामन्यात आयर्लंडने आपले गोलंदाजीतील कसब दाखवून बांगलादेशला बॅक्फूटवर आणून सोडले होते. मागील विश्वचषकात त्यांनी बांगलादेश बरोबरच पाकिस्तानलाही पराभवाची धूळ चारली होती. तीच पुनरावृत्ती या वेळी होते की काय, अशीच शंका पहिल्या डावानंतर वाटू लागली. परंतू, घरच्या मैदानावर खेळताना बांग्लादेशने आपली नाचक्की होऊ दिली नाही. दुसऱ्या डावात पहिल्या १०० धावांपर्यंत जरी सामन्याचे पारडे कोणा एका बाजूला कलले नव्हते तरी बांगला गोलंदाजांनी ठराविक कालावधीत बळी घेत सामन्यावर पकड प्राप्त केली. कसोटी खेळणाऱ्या कोणत्याही संघाची जी नीती असते तीच बांग्लादेशने या वेळी वापरली. व त्यात ते यशस्वीही झाले. दुसरीकडे आयर्लंड मात्र दुसऱ्या डावात एकेक पाऊल मागे टाकत गेले. बांग्लादेशी जल्लेषाचा परिणामही कदाचित आयर्लंडच्या मानसिकतेवर झाला असेल. परंतु, पहिल्याच सामन्यात त्यांनी विजयाची संधी गमावली. त्यामुळॆ आता हॉलंड विरुद्ध आयर्लंड सामना पाहणे मात्र औत्सुक्याचे ठरेल...

Friday, December 10, 2010

बायनरीशी दोस्ती...


बायनरी हा शब्द जेव्हा १०-११ वर्षांपूर्वी मी प्रथमच ऐकला तेव्हा तो काहिसा विचित्रच वाटला. बाय म्हणजे काहीतरी जीवशास्त्राशी निगडीत असावे असा माझा समज होता. प्रत्यक्षात ’बाय’ नव्हे तर ’बायो’चा संबंध जीवशास्त्राशी आहे, हे मला नंतर समजले. ग्रामीण विचारधारणेचे आम्ही या संकल्पनेशी जुळवून घ्यायला काहीसा वेळ लागला. संगणक अभियांत्रिकीच्या पदविकेला (मराठीत: कॉम्प्युटर इंजिनियरिंग डिप्लोमा) प्रवेश घेतला तेव्हा पहिल्याच वर्षी ’Introduction to Computer System’ हा विषय अभ्यासाला होता. आमचे माननीय शिरढोणकर सर तो विषय शिकवत. या विषयामध्येच बायनरी या संकल्पनेची प्रथम ओळख झाली. बायनरी म्हणजे दोन अंकांची अंकपद्धती असते, हे या विषयात पहिल्यांदा समजले. आपली अंकपद्धती ही ० ते ९ अशा दहा अंकांची असते तशीच बायनरी अंकपद्धती ही केवळ दोनच अंकांनी बनलेली आहे, हे मला प्रथम समजल्यावर मात्र मी चाटच पडलो. आमच्या सरांनी सांगितले की, आपला संगणक अर्थात कॉम्प्युटर याच दोन अंकांनी सर्व गणिते करतो...! माझा तर यावर प्रथम विश्वासच बसला नाही. केवळ शून्य व एक याच दोन अंकांचा वापर करुन बेरीज, वजाबाकी, भागाकार व गुणाकार करणे कसे शक्य आहे? हा मोठ्ठा प्रश्न मला तेव्हा पडला. कदाचित आपली कॉम्प्युटर इंजिनियरिंग असाच वेगळ्या पद्धतीने शिकावी लागणार हे मला तेव्हाच ज्ञात झाले. कॉम्प्युटरला आपली भाषा समजत नाही, हे मात्र मान्य होण्यासारखे होते. पण, तो केवळ शून्य व एक या दोनच अंकांमध्ये खेळतो, हे मात्र विस्मयास्पद वाटले.

आपण वापरतो ती दशमान अर्थात डेसिमल अंकपद्धती आहे. ती संगणकास समजत नाही. त्याकरिता अशा अंकांचे रुपांतर बायनरी मध्ये करावे लागते, हे सरांनी सांगितले व ते रूपांतर कसे करायचे, हेही शिकवले. मला अजुनही माझे हसू येते की, गणितात वापरल्या जाणाऱ्या कितीतरी संज्ञांना इंग्रजीत काय म्हणतात? हे मला माहितच नव्हते. त्यामुळे शिक्षकांनी दिलेले स्पष्टीकरण, नीटसे समजायचे नाही. न्युमरेटर म्हणजे अंश व डिनॉमिनेटर म्हणजे छेद हे मात्र लवकरच पाठ झाले. परंतु, भागाकारातील डिव्हीडंड, डिव्हायज़र, क्वोशंट व रीमेंडर या संज्ञा मात्र लवकर समजल्या नाहीत. त्यातल्या त्यात रीमेंडर हा नक्की काय प्रकार असतो तेच समजायचे नाही. माझ्यासोबत शिकणारे जवळपास सर्वच बारावी करुन आले होते. त्यामुळे त्यांना हा संज्ञा आधीच ज्ञात झाल्या होत्या. पण, माझ्या डोक्याचे मात्र इंग्रजीतल्या नव्या संज्ञांमुळे दही होत होत होते याची कल्पना केवळ मलाच होती. सरांनी डेसिमलमधुन बायनरी करण्यासाठी खालील एक उदाहरण दिले होते:

समजा २३ या क्रमांकाचा बायनरी काढायचा असेल तर त्याला दोनने भागत जायचे, ही पद्धत थोडीसी समजली होती. जसे...

२ । २३ । १

२ । ११ । १

२ । ५ । १

२ । २ । ०

२ । १

२३ = १०१११ (बायनरी)

जोपर्यंत ती संख्या १ होत नाही तोपर्यंत प्रत्येक वेळेस तीला दोनने भागत जायचे. पण, त्यासंख्येपुढे ० किंवा १ का लिहायचे? ही गोष्ट मात्र मला कळत नव्हती. तीला सर रीमेंडर म्हणून संबोधायचे. ह्या रीमेंडरचा नक्की उपयोग काय? ह्या प्रश्नाने माझे डोके हैराण झाले होते. शिवाय कोणाला विचारायचीही माझी हिम्मत होत नव्हती...! घरी आल्यावर ह्याच प्रश्नावर पुन्हा विचारमंथन सुरू केले. त्यानंतर थोडा क्लू मिळाला. जिथे मधली संख्या ही विषम असेल त्याच्यापुढे १ लिहायचा व जर सम असेल तर शून्य लिहायचा...! माझी ही मात्रा लागू पडली व डेसिमल मधुन बायनरी रूपांतर मला जमू लागले. माझे उत्तर जरी बरोबर असले तरी त्यामागचे लॉजिक मात्र चुकिचे होते हे मला खूप नंतर लक्षात आले. द्वितीय वर्षाला ’Digital Techniques’ हा विषय पूर्णपणे याच एक व शून्य अंकांवर आधारित होता. या दोन संख्यांशी कसे खेळायचे याचा खेळ या विषयात मांडलेला होता. या विषयात मला तब्बल ८८ गुण मिळाले होते. पण, गुण इतके मिळाले असले तरी या सर्व बायनरी फापटपसाऱ्याचा संगणकाला नक्की उपयोग कुठे? याचे उत्तर मात्र मिळाले नाही. “कॉम्प्युटर ऑर्गनायझेशन” या विषयात मात्र हे उत्तर मला मिळाले...! Computer is Logic but not a Magic ही गोष्ट पटली. एक व शून्य या डिजिटल अंकांचा वापर करून संगणकतज्ञांनी आपल्यासाठी हे किती अद्भूत यंत्र बनविले आहे, याचे ज्ञान मात्र मिळाले. माणूस खरोखर खूप हुशार प्राणी आहे, त्यात विशेषत: संगणक व त्याच्या तर्कशास्त्र निर्माण करणाऱयांना मी विशेष दाद देईल. संगणक बनविणे ही खरोखर मोठी विस्मयकारक बाब होती. पण, मानवाने ती प्रत्यक्ष आणून दाखवली. Hats off to all of them…!

त्यामुळेच बायनरी अंकगणिताची माझी दोस्ती पक्की झाली...! आजही बायनरीच्या विविध समस्या सोडवताना मला माझी ’बायनरी’ सुरूवात नेहमी आठवते. मला वाटते, ज्यांना खरोखर जाणून घ्यायचे असेल की संगणक ही चीज काय आहे, त्यांनी बायनरी अंकगणिताशी नक्की दोस्ती करावी. खरोखर तर्कशास्त्राचा कस लागावा अशीच ही एक गोष्ट होय....