Friday, October 11, 2019

एक्झाम वॉरियर्स - नरेंद्र मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लिहिलेले हे पुस्तक आहे, "एक्झाम वॉरियर्स". अगदी अपघातानेच हे पुस्तक हाती आले. परीक्षेला केंद्रभागी ठेवून लिहिलेले कदाचित हे पहिलेच 'सुटसुटीत' पुस्तक असावे. शालेय जीवनात विद्यार्थी अनेकदा परीक्षांना सामोरे जातात. परीक्षा हेच शालेय विद्यार्थ्यांच्या जीवनात भीतीचे सर्वात मोठे कारण असते. हीच भीती उद्भवू नये, म्हणून काय करावे? या प्रश्नाचे उत्तर या पुस्तकातून मिळते. परीक्षा म्हणजे नक्की काय? स्पर्धा, तंत्रज्ञान, विश्रांती, खेळ, झोप, ताणतणाव, आत्मविश्वास, शिस्त, शैली, कॉपी, आत्मचिंतन, प्रवास, तंदुरुस्ती अशा विविध अंगांना लेखकाने खूप उत्तम प्रकारे व सहजपणे हाताळले आहे. 


वरील काही शब्द वाचायला जरी जड वाटत असले तरी त्यांची शालेय विद्यार्थ्यांच्या दृष्टीने मांडणी छानपणे करण्यात आली आहे. हे पुस्तक विद्यार्थ्यांसाठी एक प्रकारे 'पर्सनल डायरी' सारखे काम करेल असेच आहे. जवळपास प्रत्येक धडा 'क्यूआर कोड'ने पंतप्रधानांच्या ऍपला जोडण्यात आलाय, जेणेकरून विद्यार्थी त्यांचे अनुभव थेट शेअर करू शकतील. पालक, शिक्षक व विद्यार्थी अशा तिघांनाही उद्देशून लिहिलेले हे पुस्तक शालेय विद्यार्थ्यांनी वाचायला हवे. पेंग्विन रँडम हाऊसने प्रकाशित केलेल्या मूळ इंग्रजी पुस्तकाचा मराठी अनुवाद पुण्याच्या अमेय इन्स्पायरिंग बुक्सने केला आहे.

वाचन प्रेरणेचे एक पाऊल

आजच्या डिजिटल तंत्रज्ञानाच्या युगात वाचनसंस्कृती रुजवावी, या हेतूने भारत सरकारने 2015 पासून भारताचे लोकप्रिय माजी राष्ट्रपती डॉक्टर ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीला अर्थात 15 ऑक्टोबरला वाचन प्रेरणा दिवस साजरा करण्याचा निर्णय घेतला. आजही सर्व मराठी शाळांमध्ये हा दिवस साजरा केला जातो. वाचनाची संस्कृती रुजावी आणि वाचनसंस्कृती वाढवावी, ही केवळ सरकारच नव्हे तर आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. असेच उद्दिष्ट लक्षात घेऊन मी आणि माझी पत्नी मागच्या चार वर्षांपासून विविध मराठी शाळांमध्ये वाचन प्रेरणा दिवस साजरा करतो. सदर उपक्रमांतर्गत विविध गरजू मराठी शाळांना आम्ही चरित्रपर, प्रेरणादायी, गोष्टींची, कवितांची, कोड्यांची, सुलभ विज्ञानाची तसेच अभ्यासक्रमातील पुस्तके भेट स्वरूपात देत असतो. साधारणतः 80 ते 90 पुस्तके या संचात असतात. विद्यार्थ्यांना शालेय वयातच छोट्या-छोट्या पुस्तकांमधून अवांतर वाचनाची गोडी लागावी व त्यातूनच त्यांची ज्ञानसमृद्धी व्हावी, हा आमचा या उपक्रमाचा मुख्य हेतू आहे. सण 2015 पासून नाशिकच्या एका मराठी शाळेतून आम्ही ही सुरुवात केली होती. यावर्षी सदर उपक्रमाची व्याप्ती वाढवून आम्ही तीन शाळांपर्यंत पोहोचणार आहोत.
हे सर्व इथे लिहिण्याचा उद्देश असा की आपणही आपल्या परीने आपल्या जवळच्या शाळेत सदर उपक्रम राबवू शकता. मराठी वाचन संस्कृती वाढविण्याच्या दृष्टीने आपले योगदान निश्चितच बहुमूल्य राहणार आहे.


Monday, September 30, 2019

गुरुत्वाकर्षण

विश्वात सर्वत्र संचार असणारे व सर्वात प्रभावी बल म्हणजे गुरुत्वीय बल होय. आज आपण सहजपणे 'गुरुत्वाकर्षण' म्हणतो! परंतु, या वैश्विक बलाची शास्त्रीय उकल करण्यासाठी गॅलिलिओ, न्यूटन आणि आईन्स्टाईन या मानवी इतिहासातल्या प्रतिभावान वैज्ञानिकांनी आयुष्यातील अनेक वर्षे घालविली. कोणत्याही आधुनिक तंत्रज्ञानाधारित साधनांचा वापर न करता त्यांनी ही उकल कशी केली, याची कहाणी दाखविणारा हा माहितीपट. शोध कसे लावायचे असतात? याची प्रेरणा या माहितीपटातून नक्कीच घेता येईल...!

https://www.youtube.com/watch?v=2_p2ELD7npw 



Wednesday, September 11, 2019

एक छोटीशी बोधकथा

मकरंद आणि विनय दोघे बालपणीचे मित्र. दहावीपर्यंत दोघेही एकाच वर्गात शिकलेले. शिवाय दोघांचे मार्कही जवळपास समान, अर्थात ६५ ते सत्तरच्या मधलेच. परंतु, दहावीनंतर दोघांनीही वेगवेगळ्या वाट निवडल्या.
आज दहा वर्षांनंतर मक्या अर्थात मकरंद आपल्या वडिलांसह वीटभट्टीवर देखरेखीचं काम करतो तर विनय एमपीएससीची परीक्षा पास होऊन पोलीस सब-इन्स्पेक्टर झालाय. त्या दिवशी सहजच गावात दोघांची भेट झाली. इतक्या वर्षांनी शाळेतला मित्र भेटला म्हटल्यावर दोघांनाही फार फार आनंद झाला. मकरंदला मात्र विनयच्या प्रगतीविषयी असूया वाटत होती. त्या भेटीत तो विनयला म्हणाला होता, 'असतो बाबा देव एकेकावर मेहेरबान... म्हणून तू आज पोलीस झालायेस...'


त्याच्या वडिलांना मात्र त्याचे हे बोलणे खटकले. ते म्हणाले, 'बाळा... खरं सांगू का, देव काही त्याच्यावर मेहेरबान नाहीये. जेव्हा तू गणपती अन नवरात्रात रात्री पॅन्ट फाटेस्तोवर नाचत होतास ना, तेव्हा तो अभ्यास करून आपल्या भविष्याची पेरणी करत होता... इतकंच... '

Thursday, July 18, 2019

कोण होते सिंधू लोक?

जगातल्या सर्वात प्राचीन संस्कृतींपैकी एक म्हणजे सिंधू संस्कृती होय. प्राचीन भारतीय लोक खरेच सुसंस्कृत होते, याचा पुरावा ही संस्कृती देते. याच सिंधू संस्कृतीतील अनेक रहस्यांची व प्रश्नांची उकल 'कोण होते सिंधू लोक?' या पुस्तकाने होते. इसवी सन पूर्व तीन हजार वर्षांपूर्वीची हडप्पा व मोहेंजोदडो येथील सिंधू संस्कृतीचा आढावा ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ .मधुकर ढवळीकर यांनी या पुस्तकातून घेतलेला आहे. सिंधू संस्कृती, वैदीक संस्कृती, पर्यावरण, कला, स्थापत्य व प्राचीन भारतीय लोकजीवन या सर्वांचा आढावा या पुस्तकात उत्तम रित्या घेतलेला दिसतो. कलियुगाची संकल्पना, सरस्वती नदीची कहाणी तसेच मेलुहाचे रहस्य या मला पडलेल्या प्रश्नांची उकल या पुस्तकातून झाली.


केवळ हडप्पा आणि मोहेंजोदडो हीच सिंधू संस्कृती नव्हती. अशी अनेक ठिकाणे भारतात सुद्धा उत्खननात सापडलेली आहेत. शिवाय या उत्खननातून इतिहास संशोधन कसे करावे, याचीही उत्तम माहिती मिळते. इतिहासाचा खरा आवाका किती मोठा आहे, याची उकलही या पुस्तकातून होते. एकंदरीत पुस्तकातून आपल्या पाच हजार वर्षांपूर्वीच्या पूर्वजांची कहाणी मन प्रफुल्लीत करणारीच आहे. त्यामुळे इतिहास, पुरातत्व आणि भारतीय संस्कृती बद्दल अधिक जाणून घ्यायचं असेल तर हे पुस्तक नक्की वाचा.

प्रकाशक: राजहंस प्रकाशन

https://www.akshardhara.com/en/itihas-jag/31681-Kon-Hote-Sindhu-Lok-Dr-Madhukar-Keshav-Dhavalikar-Rajhans-Prakashan-buy-marathi-books-online-at-akshardhara-9789386628619.html

https://www.rajhansprakashan.com/product/kon-hote-sindhu-lok/

https://www.amazon.in/Hote-Sindhu-Madhukar-Keshav-Dhawalikar/dp/9386628619

Wednesday, July 3, 2019

साहेबांचे महत्वाचे काम

दोन आठवड्यांपूर्वीची गोष्ट आहे. उपप्राचार्य साहेबांच्या केबिनमध्ये बसलो होतो. साहेब आपल्या कामात अतिशय गुंग झालेले दिसत होते. बाहेर विद्यार्थ्यांचा गोंधळ ऐकू येत होता. साहेबांची सही घेण्यासाठी विद्यार्थी बाहेर ताटकळत उभे होते. त्यांच्यावर खेकसत शिपाई बोलला, 'शांत बसा रे... सरांचं महत्वाचं काम चाललंय!' मग मुलांनी थोडा गोंधळ कमी केला. 

साहेब नक्की काय महत्वाचं काम करतायेत, हे पाहण्यासाठी मी थोडं डोकावून साहेबांच्या संगणकात दृष्टी घातली. पाहिले तर... साहेब आपले मेलबॉक्स उघडून अतिशय तन्मयतेने लेन्स्कार्ट, पैसा बाजार, पॉलिसी बाजार, क्रेडिट कार्ड, नौकरी.कॉमचे मेसेजेस डिलीट करत होते!

Monday, June 3, 2019

मोरांना हवंय हक्काचं निवासस्थान

भंडारा डोंगरावर मोरांची संख्या वाढल्याची बातमी नुकतीच वाचनात आली. उन्हाची तीव्रता वाढल्याने व पाणीसाठेही आटत चालल्याने दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी मोराची भटकंती चालू असल्याचे दिसते. मुळातच आपला हा राष्ट्रीय पक्षी लाजाळू म्हणून ओळखला जातो. त्यामुळे मनुष्य प्राण्याच्या संपर्कात तो सहजासहजी येत नाही. अगदी लहान मुलांनाही मोर दाखवायचा असेल, तर एकतर चित्रात किंवा प्राणिसंग्रहालयात नेऊन दाखवावा लागतो. पुणे जिल्ह्याचा विचार केल्यास येथे अशी बरीच छोटी-मोठी वने आहेत, जिथे मोरांचा अधिवास दिसतो. कळपाने राहत असल्याने मोरानी जंगल हेच आपले निवासस्थान मानले आहे. असे असले तरी त्यांना आपल्याकडून अजून सुरक्षित अभयारण्य मिळालेले नाही. अनेक ठिकाणी त्यांना इतर श्वापदांचा त्रास सहन करावा लागतो तर काही ठिकाणी तेच मानवी शेतात घुसून नासधूस करतात. आपल्या राष्ट्रीय पक्षाचे संवर्धन करायचे असल्यास त्यांच्यासाठी छोटी का होईना संरक्षित वने तयार करायला हवीत. जिथे अन्न व पाणी या दोन्ही सुविधा त्यांना उपलब्ध होतील. शिवाय दरवर्षी होणाऱ्या स्थलांतराची चिंताही मिटेल.


सोशल मीडिया आणि आपण

दहा वर्षांपूर्वीची गोष्ट आहे, सोशल मीडिया नुकतंच पसरू लागलं होतं. त्यावेळेस इंटरनेटच्या वेगळ्या वेबसाईट वर आपलं अकाऊंट असतं, ही गोष्टच खूप मन हर्ष करणारी होती. आज जवळपास प्रत्येकाकडे मोबाईल आहे आणि प्रत्येक जण सोशल मीडियातल्या विविध वेबसाईट वर ॲक्टिव दिसतो. परंतु गेल्या काही वर्षांपासून सोशल मीडिया हे व्यसन बनलेले दिसते. प्रत्येकालाच आपले अस्तित्व दाखवायचेय व त्यासाठी सोशल मीडिया सारखं स्वस्त आणि सहज उपलब्ध होणारे माध्यम नाही! अनेक जण तर आजकाल सतत ऑनलाईन असणाऱ्या जिवंत असं मानतात. अगदी रात्री दोन वाजता मेसेज केला तरी तो डिलिव्हर झाल्याचा दिसतो! व्हाट्सअप ,फेसबुकचं स्टेटस, इंस्टाग्राम च्या पोस्ट, ट्विटरचे ट्विट्स यातून आम्ही ऑनलाईन जिवंत आहोत. हे दाखवण्याची धडपड प्रत्येकजण करताना दिसतो. परंतु, प्रत्येक व्यसनाचा अंतर हा वाईटच असतो हे सर्वांना ठाऊक आहे. सोशल मीडियासंबंधी रोज एक तरी बातमी पेपरमध्ये वाचायला मिळते. अगदी कालच एक बातमी वाचली. 'जगावे की मरावे?' असा प्रश्न एका मुलीने इंस्टाग्रामच्या पोलमधून विचारला होता. त्याला 70 टक्के लोकांनी नकारात्मक मत दिले. मग या मुलीने आत्महत्या केली! अशा अनेक नकारात्मक बातम्या वाचायला मिळतात. व्हाट्सअप स्टेटस वरून मारामारी, फेसबुक वरच्या कमेंट वरून धमकावणे, गुन्हा दाखल करणे, अगदी खूनही करणे. अशा अनेक बातम्या रोज वाचनात येत असतात. यावरूनच या सोशल मीडियाचा आपल्या जीवनावर किती अवास्तव परिणाम होत चाललाय, हे ध्यानात येते. संवाद माध्यमे वेगवान आणि प्रभावी होत चालली आहेत. परंतु त्यामुळेच नकारात्मकता फावत चालल्याचे आढळते. खरंतर मानवी स्वभावच असा आहे की, कोणत्याही गोष्टीचं आपण नकारात्मक गोष्टी सर्वात आधी शिकतो. अर्थात सोशल मीडियाही याला अपवाद नाहीच. 



मी अनेक जण सोशल मीडियाच्या आहारी गेलेली पाहिली आहेत. त्यांनी माझं स्टेटस का नाही बघितलं? आणि माझी पोस्ट का नाही लाईक केली? असल्या फालतू गोष्टींवर दिवस दिवस विचार करत बसतात. त्यामुळे वेळ तर वाया जातोच आणि मानसिक ताणाने क्रयशक्तीही कमी होत असते. शेवटी या सर्व गोष्टी आपल्याच नियंत्रणात आहेत. आपण आपल्या सोशल मीडियाच्या वापरावर आणि मुख्यत्वे मन:शक्तीवर ताबा मिळवू शकलो तर सोशल मीडियाला केवळ मनोरंजनाचे स्थान आहे, हे पटवून घेऊ शकतो.