Monday, March 9, 2020

वडे

वेळ: फेब्रुवारी २०२० मधील एक दिवस (शनिवार-रविवार वगळता)
स्थळ हिंजवडी आयटी पार्क मधील एक गजबजलेला चौक

संध्याकाळच्या वेळेस हिंजवडीतुन स्वतःची गाडी चालवत बाहेर पडणं म्हणजे सर्वात मोठे दिव्य! असे दिव्य पार करत एका चौकात आलो. एका छोट्याश्या हॉटेलात दोन तरुण काय खावे? याबद्दल चर्चा करत होते. बहुदा त्यातला पहिला तरुण मराठी व दुसरा तमिळ असावा.
"भाऊ काय खाणार तू?", पहिल्याने दुसऱ्याच विचारले.
"कुछ भी चलेगा." -दुसरा
"वडापाव खाणार?"
"वुई साउथ इंडियन डोन्ट इट ऑईली थिंग्स!", दुसऱ्याने किळसवाणे तोंड करून उत्तर दिले.
"मग ते भोक-भोकाचे वडे काय पाण्यात तळून खाता काय?",
पहिल्याने केलेल्या या प्रतिप्रश्नावर दुसरा निरुत्तर झाला व जबरदस्तीने हास्य तोंडावर आणू लागला.


Friday, March 6, 2020

हू इज सावित्रीबाई फुले?

दिनांक १४ फेब्रुवारी २०२० अर्थात व्हॅलेन्टाईन्स डे.
स्थळ: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे मुख्य प्रवेश द्वार.

पुणे शहरातील सर्वात रहदारी असणाऱ्या ठिकाणांपैकी हे एक ठिकाण होय. कमीत कमी दोन ते तीन वेळा सिग्नल हिरवा होतो तेव्हा कुठे आपला क्रमांक लागतो हा सिग्नल पार करण्यासाठी! त्यादिवशी असेच दिव्य पार करत सिग्नलला झेब्रा क्रॉसिंग पर्यंत पोहोचलो. डाव्या बाजूला विद्यापीठाच्या प्रवेशद्वारापाशी चार मुली सजून-धजून गप्पा मारत उभे असलेल्या दिसल्या. बोलण्यावरून परप्रांतातल्या वाटल्या. बहुतेक व्हॅलेन्टाईन्स डे च्या निमित्ताने त्यांच्या व्हॅलेंटाईन ची वाट बघत असाव्यात असे वाटले! २०-२२ व्या वर्षी युवापिढीच्या ज्या गप्पा मारते, त्याच गप्पांचा फड तिथे रंगला होता. एकीला कुणाचा तरी फोन आला व तिने तिचा ठावठिकाणा समोरच्याला सांगण्यासाठी आजूबाजूला पाहिले, तर समोर विद्यापीठाचे मुख्य प्रवेशद्वार नजरेस पडले. तिनेही त्यावरील नाव पूर्ण वाचून समोरच्या सांगितले व फोन बंद केला. ते ऐकल्यावर एकीने अत्यंत कुतूहलाने पहिलीला विचारले,
"हे! हू इस दिस सावित्रीबाई फुले?"
हे ऐकताच मीही चमकलो. तोच सिग्नल हिरवा झाला व आम्हाला पुढे जावे लागले. परंतु, एखाद्या भारतीय स्त्रीला असा प्रश्न का पडावा? हा प्रश्न आमच्याही मनात घोळत राहिला. व्हॅलेंटाईन डे सारख्या पाश्चात्य संस्कृतीचे अनुकरण करत असताना आपण कोणत्या गोष्टी विसरत चाललोय, याचे भान कदाचित आजच्या पिढीला नसावे. ज्या स्त्रीने समाज प्रवाहाच्या विरोधात जाऊन भारतीय स्त्रियांना शिक्षणाचा हक्क मिळवून दिला तिच्याबद्दल स्त्रियांनाच माहिती नसावी, यापेक्षा मोठे दुर्दैव कोणते?


Tuesday, March 3, 2020

लिफ्ट

स्थळ: पुण्यातील एक अभियांत्रिकी महाविद्यालय
 
पहिल्या मजल्यावरील काम संपून सातव्या मजल्यावर जायचं होतं म्हणून लिफ्टच्या दरवाज्यासमोर मी लिफ्ट खाली येण्याची वाट पाहत होतो. अर्थात लिफ्टचे वर जाण्याचे बटन दाबले होते. तेवढ्यात एकजण आला व त्याने खाली जाण्याचं बटन दाबलं. पहिल्या मजल्यावरून खाली जाण्यासाठी हा लिफ्ट वापरणार म्हणून मीही त्याच्याकडे कुतूहलाने पाहिले व विचारलं,
"तळमजल्यावर जायचं का?"
"नाही सिक्स्थ फ्लोअरला!" तो उत्तरला. 
"मग खालचं बटन का दाबलं?"
"लिफ्टला खाली आणण्यासाठी!"
मनातल्या मनात खुदकन हसवणारे उत्तर होते हे.
लिफ्ट आली आणि आम्ही आत गेलो. मग मी त्याला समजावून सांगितलं, "बाहेरची बटनं लिफ्ट कुठे न्यायची याच्यासाठी नसतात. आपल्याला कुठे जायचे? याच्यासाठी असतात".
"पण आली ना लिफ्ट खाली!"
त्याच्या या बोलण्यावर पुढे काय बोलावं, हे मला सुचेना. मी मात्र पु.ल.देशपांडे व द. मा. मिरासदार यांच्या कोणत्या पात्रात माझ्या लिफ्टमधील हे पात्र योग्यरीत्या बसेल, याचा विचार करत बसलो.


Saturday, February 15, 2020

बारा कथा

कविवर्य कुसुमाग्रज अर्थात वि. वा. शिरवाडकर यांचा मी वाचलेला हा पहिलाच कथासंग्रह. डॉ. बा. वा. दातार यांनी त्याचे संपादन केले आहे. नावाप्रमाणेच यात 12 कथा आहेत. सर्वच वेगळ्या विषयाला वाहिलेल्या. पहिल्या दोन-तीन कथा प्रेम व विरह यावर आधारित होत्या. त्यामुळे असं वाटलं की, नंतरच्या ही कथा अशाच असतील. परंतु शिरवाडकरांनी विविध विषयांवर हात घातल्याचे दिसते. यातील तीन कथा या रहस्य प्रकारात मोडणाऱ्या आहेत. लेखकाचे भाषेवर असलेलं प्रभुत्व सर्वच कथांतून प्रतीत होतं. कथा कशी असावी? याचे प्रात्यक्षिक उदाहरणच शिरवाडकरांनी त्यांच्या लेखणीतून दाखवून दिले आहे. कोणतीच कथा ही कंटाळवाणी वाटत नाही. अगदी एकाच बैठकीत संपून टाकावे, असे हे पुस्तक आहे. वाचनाला सलग वेळ मिळत नसल्याने मी कादंबरी ऐवजी कथासंग्रह वाचतो. अर्थात प्रत्येकाची पद्धत निराळी असतेच. परंतु, हे पुस्तक मी एकाच बैठकीत संपवले हे विशेष!

कवीचे भाषेवर जबरदस्त प्रभुत्व असते, हे शिरवाडकरांच्या साहित्यकृतीतून जाणवते. त्यामुळे कथा आणि साहित्यप्रेमींसाठी सदर पुस्तक मेजवानी ठरावे असेच आहे.

Friday, February 14, 2020

उबुंटू

आपण म्हणतो की, शिक्षण हे प्रत्येकाच्या हक्काचा आहे. यातील 'हक्क' या शब्दाचा नक्की अर्थ काय? कदाचित प्रत्येकाची व्याख्या ही वेगळी असू शकते. ग्रामीण व दुर्गम भागात आजही शिक्षणाला व शाळांना प्राथमिक स्थान न देता दुय्यम स्थान प्राप्त झालेले आहे. परंतु, शिक्षण किती महत्वाचे आहे व तेच प्राप्त करण्यासाठी आजही ग्रामीण विद्यार्थ्यांना किती कसरत व मेहनत करावी लागते, याचे चित्रण करणारा चित्रपट म्हणजे उबुंटू!


आजवर आम्ही 'उबुंटू' नावाची ऑपरेटिंग सिस्टिम वापरली होती. परंतु त्याचा शब्दार्थ या चित्रपटातून प्रतीत झाल्याचे दिसले. त्याची कथा सुरू होते ढोबळेवाडी नावाच्या एका दुर्गम गावातून. या गावातील शाळेत पस्तीस पटसंख्या असणारी शाळा आहे. परंतु मोठ्या अनुपस्थितीमुळे गावकरी शाळा बंद करण्याचा निर्णय घेतात. शाळेचे शिक्षक मात्र मेहनती व ध्येयवादी आहेत. ते त्यांचा प्रयत्न चालूच ठेवतात. पण काही महत्त्वाच्या कामानिमित्त त्यांच्या गावी त्यांना जावे लागते. मग पुढे शाळेतल्या हुशार विद्यार्थ्यांची शाळा टिकवण्याची धडपड चालू होते. गावातून बाहेर पडून ते शहराच्या ठिकाणी येतात तेव्हा शिक्षकांनी शिकवलेल्या ज्ञानाचा त्यांना पुरेपूर फायदा होतो. असा हा एकंदरीत चित्रपटाचा कथासार आहे. शिक्षण या विषयाला वाहिलेल्या मराठीतील काही चित्रपटांमधला हा एक चित्रपट होय. यातील गाणीही अत्यंत प्रभावशाली व प्रसंगानुरूप बोलणारी आहेत. तीच प्रेक्षकांच्या मनावर प्रभाव टाकून जातात.
या चित्रपटातील एक प्रार्थना खूप लोकप्रिय झाली होती. 


हीच आमची प्रार्थना
अन हेच आमचे मागणे
माणसाने माणसाशी
माणसासम वागणे

Thursday, February 13, 2020

प्लास्टिक पासून मुक्ती

महाराष्ट्रातील समुद्र किनारे प्लास्टिकच्या बारीक कणांमुळे अधिक प्रदूषित झाल्याचे निरीक्षण पणजी स्थित 'नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशनोग्रफी' या संस्थेतर्फे नोंदविण्यात आले आहे. शिवाय नेदर्लंड्सच्या एका प्रसिद्ध जर्नलमध्ये ही या संदर्भातला लेख प्रसिद्ध झाला आहे. मनुष्यप्राणी निसर्गामध्ये करत असलेल्या लुडबूडीचा व विशेषतः निसर्गाच्या हानीचा हा एक मोठा पुरावाच मानावा लागेल. रसायन शास्त्राने मानवाच्या हाती दिलेला एक घातक पदार्थ म्हणजे प्लास्टिक होय. तसा तो घातक नाहीये, परंतु मानव प्राणी ज्या प्रमाणे त्याचा वापर करत आहे ते पाहता तो घातकच बनत चाललाय! कोकणातल्या मुक्त समुद्रकिनाऱ्यांवर गेल्या काही वर्षांपासून पिकनिकच्या नावाखाली होणारी गर्दी वाढत चालली आहे. त्यामुळे मानवनिर्मित कचऱ्याचीही वाढ होत आहे. त्यात प्लास्टिक कचरा हाच सर्वात मोठ्या प्रमाणात समुद्रकिनाऱ्यांवर टाकला जातो. देशाचे 'सुजाण' नागरिक म्हणून निसर्गाची हानी आपण अशाप्रकारे करतच असतो. त्याची परिणिती किनाऱ्यावरील कचर्‍यात वाढ होण्यामध्ये झालीये. राज्यात लागू झालेल्या प्लास्टिकबंदी नंतरही ते वापरण्यात तीळमात्रही फरक पडलेला नाही. मुख्यतः शासनातही त्यात फारसे घेणेदेणे उरलेले नाही, असेच दिसते. निदान सर्वांनी या देशाचे 'सजग' नागरिक म्हणून तरी आपली जबाबदारी ओळखायला हवी व आपल्या सोबत निसर्गाचाही प्लास्टिक पासून मुक्ती द्यायला हवी. 


एरंडाचे गुऱ्हाळ - चि. वि. जोशी

शालेय अभ्यासक्रम संपल्यानंतर थेट एम. ए. च्या अभ्यासात चि.वि. जोशी यांचं नाव पुन:श्च ऐकलं. शिवाय त्यांनी सुमारे नव्वद वर्षांपूर्वी लिहिलेल्या 'एरंडाचे गुऱ्हाळ' या पुस्तका संबंधात फक्त ऐकीव माहिती होती.

अर्थातच चि. वि. जोशी यांचे मी वाचलेले हे पहिलेच पुस्तक! विनोद करणं ही खरोखर सर्वात आव्हानात्मक गोष्ट आहे.  त्यामुळे विनोदी लेखक, विनोदी कवी व विनोदी नट हे त्यांच्या क्षेत्रातले खरे राजे असतात.  पु.  ल.  देशपांडे यांच्या आधी चि. वि. जोशी यांनी मराठी विनोदी साहित्य विश्व सजवले. त्याच काळातील हे पुस्तक होय. विविध घटनांना जोशींनी अगदी खुमासदार पद्धतीने रंगवले आहे. कुठेही अतिशयोक्ती जाणवत नाही. यातील अनेक विनोदी कथा या संपादक व प्रकाशक या लेखनाशी संबंधीत दोन जातींची आहे. कदाचित चि. वि. जोशी त्यांना स्वतः मध्ये पाहत असावेत. इतकं मात्र नक्की की, आजच्या शतकानंतरही वाचावीशी अशी पुस्तके, तीही विनोदी फार कमी आहेत. त्यातीलच हे एक पुस्तक!

Tuesday, January 28, 2020

शालिवाहन शक - गोविंद नारायण दातारशास्त्री

महाराष्ट्रावर अनेक वर्षे राज्य करणाऱ्या परकीय शकांचा महाराष्ट्रीय सातवाहनांनी केलेला पराभव ही इतिहासातील एक मोठी घटना होती व त्यातील युद्धही ऐतिहासिकच होते. परंतु, आजवर या विषयावर वाहिलेली कादंबरी वाचनात आली नाही. हाच विषय घेऊन गोविंद नारायण दातारशास्त्री यांनी 'शालिवाहन शक' ही कादंबरी लिहिली आहे. सातवाहनांनी शकांचा महाराष्ट्रातून समूळ नाश केल्यानंतर महाराष्ट्रीय शके परंपरा चालू झाली. इसवी सन ७८ च्या सुमारास सदर युद्ध झाले होते. या युद्धास मध्यवर्ती ठेवून दातारशास्त्रींनी ही कादंबरी लिहिली आहे. विशेष म्हणजे पूर्ण कथा ही नाशिक व परिसरात घडल्याचे दिसते. ती सुरू होते सातमाळा रांगेतल्या पहिल्या अहिवंत दुर्गा पासून.
कथेची नायक-नायिका हे देवरात-कामंदकी आहेत. त्यांना या दुर्गावर बऱ्याच रहस्यमय गोष्टी आढळून येतात. त्याची उकल उर्वरित कादंबरीत करण्यात आलीये. देवरत व कामंदकीसोबत सेनापती शर्विलक हाही कादंबरीतील महत्त्वाचा नायक आहे. अहिवंत गडापासून सुरु झालेला प्रवास सप्तशृंगगड, बल्लीपुर, दंडपुर (दिंडोरी), पालखेड, रामशेज, नाशिक, अंजनीदुर्ग (अंजनेरी) ते गोवर्धनला येऊन विसावतो. दातारशास्त्रीनी त्यांच्या अनोख्या शैलीत ही कादंबरी रंगवली आहे. त्यामुळे इतिहास, पुरातनकाल व रहस्य यात विशेष रुची असणाऱ्यांनाही कादंबरी निश्चित आवडेल.


ऐतिहासिक संदर्भ:
१. क्षत्रप राजा नहपानाचा नाशिकच्या गोवर्धन येथे मोठा राजवाडा होता व तिथेच सातवाहन व शकांचे युद्ध झाले.
२. त्रिरश्मी अर्थात पांडवलेणी काही शकांनी तर काही सातवाहनांनी बांधली आहेत.
३. या युद्धात सातवाहनांनी शकांचा समूळ नाश केला होता.

बिगर ऐतिहासिक नाटकीय संदर्भ:
१. वासिष्ठीपुत्र पुळुमावीने क्षत्रप राजा नहपानाचा पराभव केला, असे कादंबरीत दाखवण्यात आलेले आहे. परंतु, प्रत्यक्ष इतिहासात गौतमीपुत्र सातकर्णीने नहपानाचा पराभव केल्याचे दिसते. पुळुमावी हा सातकर्णीचा मुलगा होता. महाराणी गौतमी बलश्री व सातकर्णी याचा उल्लेख नाशिकच्या पांडवलेणीत देखील आहेत. त्याचा संदर्भ इथे दिसत नाही.
२. चकोर, शिवश्री व हकुश्री सातकर्णी यांचे झालेले उल्लेख.
३. कामंदकी हिने 'कामंदकिय नीतिसार' लिहिल्याचे कादंबरीत म्हटले आहे. प्रत्यक्षात हा नीतिसार कामंदक की कामंदकिने लिहिले यात अजूनही इतिहासकारांत एकमत नाही. शिवाय सदर पुस्तक इसवीसन आठव्या शतकात लिहिले आहे. ते या कादंबरीत पहिल्या शतकात लिहील्याचे दाखवले आहे.
सदर युद्ध हे महाराष्ट्रातील सर्वात पहिले स्वातंत्र्ययुद्ध होते, यात शंका नाही. या ऐतिहासिक घटना आज महाराष्ट्राच्या अतिशय नगण्य लोकांना ज्ञात आहेत. 'शालिवाहन शक' या अनेक दशकांपूर्वी लिहिलेल्या पुस्तकामुळे निदान त्या महाराष्ट्रीय लोकांना समजतील अशी आशा बाळगायला हरकत नाही.