ओवा नावाच्या चित्रपटांमध्ये नक्की काय असेल? याची उत्सुकता मला देखील होती. अर्थात या नावाने जरी हा चित्रपट चालू झाला असला तरी कथेची सुरुवात करण्यासाठीची ती एक पार्श्वभूमी आहे.
कोकणातील एका खेडे गावामध्ये निवृत्त झालेला एक व्यक्ती आणि त्याची पत्नी निवांतपणे राहत असतात. खरंतर निवांतपणे हे विशेषण या ठिकाणी लागू पडणार नाही. त्यांचा त्यांचा एकुलता एक मुलगा नोकरीनिमित्त अमेरिकेमध्ये असतो.
चित्रपटाची सुरुवातच पावसाळ्यातील एका दिवसाने होते. तो व्यक्ती आपल्या घरी येतो तेव्हा लगेचच आपल्या पत्नीला भजी बनवण्याची ऑर्डर सोडतो. त्याच्या सातत्याने धाकाखाली असणारी ती लगेचच भजी बनवायला घेते. आणि काही मिनिटातच त्याच्यासमोर हजर करते. तो पहिला घास तोंडात टाकतो आणि तात्काळ भजनी भरलेली ती प्लेट फेकून देतो. कारण त्यामध्ये तिने ओवा घातलेला नसतो. त्याचा तो रुद्रावतार बघून ती तात्काळ ओवा आणण्यासाठी त्या पावसाळी संध्याकाळी घराबाहेर पडते. परंतु बराच वेळ वाट बघून देखील ती परतत नाही. दुसऱ्या दिवशी देखील ती घरी आलेले नसते. आपल्या पत्नी बरोबर तसेच इतर नातेवाईकांशी ही सातत्याने तुसडेपणाने वागणारा तो हळूहळू अस्वस्थ व्हायला लागतो. दुसरा पूर्ण दिवस देखील ती येत नाही. तिच्या आजूबाजूच्या मैत्रिणींकडे तो जाऊन येतो. आज हा मनुष्य आमच्या घरी कसा काय आला? असे प्रश्नचिन्हार्थक चेहरे पाहून तो घरी परततो. तोही दिवस तसाच जातो. आणि अखेरीस तो पोलिसांकडे जाण्याचा निर्णय घेतो. पोलीस देखील त्याची तक्रार लिहून घेतात. परंतु त्यांच्याकडून त्यांना फारशी अपेक्षा वाटत नाही. मग तो नातेवाईकांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करतो.. या नातेवाईकांना त्याने कित्येक वर्षांमध्ये कधीच फोन केलेला नसतो.. प्रत्येकाकडून त्याच्याबद्दलची मते त्याला समजायला लागतात. घरामध्ये तो एकटा पडलेला असतो. हळूहळू त्याला त्याच्या सहचरणीची किंमत कळायला लागते. लग्नापासून त्याच्या जीवनात घडलेले अनेक प्रसंग त्याला आठवायला लागतात. आपण आपल्या पत्नीशी कसे वागत होतो? या प्रश्नांची उत्तरे देखील तो स्वतःच शोधू लागतो. अनेकदा चुकांची जाणीव होते. मनामध्ये एका वेगळ्याच प्रकारची बेचैनी तयार होत असते. तिच्या बाबतीत आपण किती चुकीचे वागलो, याचे उत्तर देखील त्याला मिळायला लागते. ती नसेल तर आपले काय होते, याची त्याला प्रचिती येते. तिच्याशिवाय आयुष्य अपूर्ण आहे हे देखील त्याला जाणवते. हे सर्व घडतं फक्त एका ओव्याच्या मागणीमुळे. चित्रपटाचा शेवट आपण सहजपणे ओळखू शकतो.
मकरंद अनासपुरे हे या चित्रपटांमध्ये मध्यवर्ती भूमिकेमध्ये शोभून दिसतात. अर्थात त्यांचाच पूर्ण चित्रपटांमध्ये वावर आहे. विनोदी पद्धतीची भूमिका सोडून त्यांचा केलेला हा वेगळ्या वाटेचा प्रयत्न त्यांना उत्तमपणे शोभला आहे. चांगले मराठी चित्रपट पाहणाऱ्यांसाठी हा चित्रपट उत्तमच...
--- तुषार भ. कुटे

No comments:
Post a Comment
to: tushar.kute@gmail.com