दख्खन अर्थात दक्षिण भारत म्हणजे भारत देशातील सर्वात समृद्धभूमी. आजही उत्तर आणि दक्षिण भारतामधला फरक ठळकपणे जाणवतो. बुऱ्हानपूरला दक्षिणेचे प्रवेशद्वार म्हणतात. म्हणजे एका अर्थाने इथून खालचा परिसर म्हणजे दख्खन म्हणता येईल. हजारो वर्षांपासून विविध राजवटींनी या भागावर राज्य केले. भारताच्या समृद्ध इतिहासामध्ये आपल्या कार्यपद्धतीने परिचित असणाऱ्या अनेक राजवटी दख्खनच्या परिसरातच उदयास आलेल्या होत्या. याच दख्खनचा मागच्या आठशे वर्षांपासूनचा इतिहास मनू पिल्लई यांच्या “रिबेल सुलतान” या पुस्तकामध्ये मांडण्यात आलेला आहे.
महाराष्ट्राच्या हृदयस्थानी असणाऱ्या देवगिरीवर शेकडो वर्षे यादवांचे राज्य होते. आपल्या राज्याला संपन्नता प्रदान करणाऱ्या राजवटींपैकी एक राजवट म्हणजे यादव राजे होय. परंतु तेराव्या शतकाच्या अखेरीस या राजवटीवर उत्तरेकडून आलेल्या परकीय आक्रमक अल्लाउद्दीन खिलजीची दृष्टी पडली. दख्खनवर झालेले हे पहिले परकीय इस्लामी आक्रमण होते. या अनपेक्षित आक्रमणामुळे यादव राजवट कोसळली. हा एक धडा होता… दख्खनवर राज्य करणाऱ्या मूळ भारतीय शासकांसाठी. परंतु पुढील कालखंडामध्ये देखील उत्तरेकडून आक्रमणे होतच राहिली. अशातच राजा हरिहर पहिला याने विजयनगरच्या साम्राज्याची स्थापना केली. ७०० वर्षांपूर्वी विजयनगर ही संपूर्ण भारतातील सर्वात समृद्ध राजवट होती. इतिहास सांगतो की पूर्ण जगामध्ये लोकसंख्येच्या दृष्टिकोनातून विजयनगर हे दुसऱ्या क्रमांकाचे शहर होते! त्या काळात भारतात येऊन गेलेल्या अनेक प्रवाशांनी विजयनगरच्या समृद्धीचे भरभराटीचे वर्णन केलेले आहे. चौदाव्या शतकाच्या मध्यामध्ये पहिला बहामनी सुलतान म्हणून हसन गंगू याचा देवगिरी अर्थात कालांतराने नामकरण केलेल्या दौलताबाद येथे राज्याभिषेक झाला. बहामनी आणि विजयनगरमध्ये लढाया होऊ लागल्या. कुरघोडी देखील होतच होत्या. या काळात मध्यपूर्वेतून अनेक इस्लामी आक्रमक भारताची कीर्ती ऐकून या भूमीच्या लालसेने येतच राहिले. अनेकांनी बहामनी राज्यासाठी सेवा बहाल केली. परंतु काळ काही थांबून राहत नाही. जवळपास सव्वाशे वर्षांच्या कालखंडानंतर बहामनी राज्य लयास गेले. आणि त्यातून पाच लहान-लहान राज्ये तयार झाली. निजामशाही, आदिलशाही, कुतुबशाही, इमादशाही आणि बरीदशाही यांनी आपले स्वतंत्र राज्य घोषित केले. मध्यंतरीच्या काळात गोमंतक प्रदेश परकीय आक्रमक असणाऱ्या पोर्तुगीजांच्या ताब्यात जात होता. राजा कृष्णदेवरायच्या कालखंडामध्ये विजयनगरच्या सुवर्णयुगास प्रारंभ देखील झाला होता. अजूनही विजयनगरचे राजे दख्खनवर आपली पकड मजबूत ठेवून होते. १६ व्या शतकाच्या पूर्वार्धात दिल्लीमध्ये मुघल साम्राज्याचा उदय झाला. दख्खनमध्ये आदिलशाही, निजामशाही आणि कुतुबशाही तसेच विजयनगरचे साम्राज्य अजूनही प्रबळ होते. सर्व इस्लामी राजवटींमध्ये रोटीबेटीचे व्यवहार होत होते. एका अर्थाने या कारणास्तव एकमेकांपासून संरक्षण देखील प्राप्त होत होते. १६ व्या शतकाच्या उत्तरार्धात राजा रामराया विजयनगरचा सर्वेसर्वा बनला. आणि त्याच्याच कालखंडामध्ये स्वतःच्या चुकीमुळे विजयनगरचे समृद्ध राज्य देखील लयास गेले. दख्खनवर राज्य करणाऱ्या तीनही इस्लामी राजवटींनी मिळून रामरायाचा पराभव केला होता. हळूहळू निजामशाहीचे देखील पतन झाले. सतराव्या शतकाच्या पूर्वार्धामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठ्यांचे स्वतंत्र राज्य स्थापन केले. हा प्रामुख्याने आदिलशाहीला मोठा दणका होता. मराठ्यांचे राज्य उत्तरोत्तर वाढतच गेले. हळूहळू आदिलशाही आणि कुतुबशाही देखील संपली. अठराव्या शतकाच्या सुरुवातीला मुघल बादशहा औरंगजेबाचा मृत्यू झाला आणि मुघल साम्राज्याच्या असताना सुरुवात झाली. १९ व्या शतकाच्या पूर्वार्धापर्यंत मराठा साम्राज्य भारताच्या बहुतांश भागावर राज्य करू लागले होते.
दख्खनच्या ८०० वर्षांच्या इतिहासाचा हा एकंदरीत सारांश या पुस्तकामध्ये वाचायला मिळतो. या कालखंडातील विविध राजवटीमध्ये अनेक राजे आणि सुलतान होऊन गेले. प्रत्येकाची राज्यपद्धती, कार्यपद्धती वेगवेगळी होती. अनेकजण स्वतःच्या चुकांमुळे संपुष्टात आले. त्यातून इतरांनी धडे घेतले नाही, हेही तितकेच बरोबर. शिवाजी महाराजांचा इतिहास मराठी जणांना माहीत आहेच. परंतु आपल्या भूमीवर राज्य करणाऱ्या इतिहासातील इतर राज्यकर्त्यांचा सारांशरुपी इतिहास या पुस्तकाच्या निमित्ताने समजून आला. प्रामुख्याने विजयनगरचा राजा कृष्णदेवराया, बहामनी सुलतान फिरोज शाह, हिंदू धर्माचा चाहता असणारा इब्राहिम आदिलशहा दुसरा, निजामशाहीमध्ये प्रभाव टाकणारी चांदबिबी, आफ्रिकेमधून गुलाम म्हणून भारतात आलेला आणि आपल्या कर्तृत्वाने निजामशाहीचा वजीर बनलेला मलिक अंबर यांच्याविषयी वेगळी आणि महत्त्वाची माहिती या पुस्तकातून मिळाली. एकंदरीत दख्खनच्या इतिहासाचा ‘बर्ड आय व्ह्यू’ देण्याचे काम हे पुस्तक करते, हे निश्चित.
— तुषार भ. कुटे.

No comments:
Post a Comment
to: tushar.kute@gmail.com