Friday, April 6, 2012

आयपीएल मध्ये खेळणारे महाराष्ट्रीय खेळाडू


एकेकाळी भारतीय क्रिकेटवर महाराष्ट्राचे व विशेषत: मुंबईच्या खेळाडूंचे वर्चस्व होते. परंतु, कालांतराने क्रिकेटज्वर संपूर्ण भारतभर पसरल्यावर पूर्ण देशातून गुणवान खेळाडू तयार होऊ लागले आहेत. सध्या चालू झालेल्या आयपीएल मध्येही अनेक महाराष्ट्रीय खेळाडू आपली गुणवत्ता दाखवण्यासाठी सज्ज झालेले आहेत. आयपीएलच्या नऊ टीम्स मध्ये असणाऱ्या महाराष्ट्रीय खेळाडूंचा घेतलेला हा आढावा. तुमचा संघ कुठलाही असू द्या पण ह्या खेळाडूंना पाठिंबा द्यायला विसरू नका.

१.      मुंबई इंडियन्स (७)
-    सचिन तेंडुलकर
-    रोहित शर्मा
-    धवल कुलकर्णी
-    सुशांत मराठे
-    आदित्य तारे
-    सुजित नायक
-    अपूर्व वानखेडे

२.      पुणे वॉरियर्स इंडिया (फक्त ४)
-    धीरज जाधव
-    हर्षद खडीवाले
-    श्रीकांत वाघ
-    कृष्णकांत उपाध्ये

३.      राजस्थान रॉयल्स (५)
-    अजिंक्य रहाणे
-    अमित पौनीकर
-    अभिषेक राऊत
-    अंकित चव्हाण
-    अदित्य डोळे

 
४.      दिल्ली डॆयर डेव्हिल्स (४)
-    अजित आगरकर
-    उमेश यादव
-    अविष्कार साळवी
-    प्रशांत नाईक



५.      रॉयल चॅलेंजर्स बॅंगलोर (२)
-    झहीर खान
-    विजय झोल


६.      कोलकाता नाईट रायडर्स (०)
-    एकही नाही
७.      चेन्नई सुपर किंग्ज (०)
-    एकही नाही
८.      किंग्ज इलेव्हन पंजाब (३)
-    रमेश पोवार
-    अभिषेक नायर
-    सिद्धार्थ चिटणीस

९.      डेक्कन चार्जर्स (०)
-    एकही नाही

माझी पहिली इंग्रजी मुलाखत.

’बिट्स अ‍ॅण्ड बाईट्स’ या पुस्तकाच्या निमित्ताने माझी पहिली इंग्रजी मुलाखत झाली. नाशिकच्या ’The Day View' या दैनिकात ती रविवारच्या ’The Urban Hues' या पुरवणीत ती प्रसिद्ध झाली होती. सौ. स्मिता कावळे यांनी घेतलेल्या या मुलाखतीची ही झलक...
Click to view it large

Wednesday, March 21, 2012

फ़ेसबुक वापरताना....


इंटरनेटच्या माध्यमातून विश्वजवळ आल्याने त्याचा वापर गेल्या काही वर्षात वाढतच आलेला आहे. त्यातच गेल्या चार-पाच वर्षामध्ये सोशल नेटवर्किंग करणाऱ्या वेबसाईट्सचा वापर अतिशय मोठ्या प्रमाणात वाढत आहे. आज इंटरनेट वापरणाऱ्यांचे फ़ेसबुकवर अकाऊंट नसेल तर तो ’अडाणी’ मानला जातो. इतक्या मोठ्या प्रमाणात ’फ़ेसबुक’ ही सोशल नेटवर्किंग साईट जगात वापरली जाते. काही दिवसांपासून फ़ेसबुक व सोशल नेटवर्किंग निरनिराळ्या कारणांनी चर्चेत आहे. मागील काही महिन्यात बंगळुरु मध्ये लाखो फ़ेसबुक अकाऊंट्स चा पासवर्ड हॅक करण्यात आला होता. फ़ेसबुकवर आपण आपली बरीच माहिती देत असतो, त्यामौळे फ़ेसबुकची सुरक्षितता म्हणजेच आपल्या इंटरनेटवरील अस्तित्वाची सुरक्षितता मानली तर वावगे ठरणार नाही. नवख्या फ़ेसबुक युजर्सला त्याच्या विविध सेटिंग्जची माहीती नसते. ती जर जाणून घेतली तर आपले फ़ेसबुक अकाऊंट ’सेक्युअर’ करण्यास निश्चित मदत होईल.
-    फ़ेसबुकच्या Account Settings मध्ये आपला मोबाईल क्रमांक व पर्यायी ई-मेल पत्ता याची नोंद ठेवता येते. म्हणजेच आपण दोन वेगवेगळ्या ई-मेल पत्याद्वारे किंवा स्वत:च्या मोबाईल नंबरद्वारे सुद्धा फ़ेसबुक लॉग-इन करु शकतो. पुढे कधी फ़ेसबुकचा पासवर्ड जरी हॅक झाला तरी ई-मेल वरुन वा मोबाईलद्वारे तो पुन्हा रिसेट करता येतो. म्हणजेच पासवर्ड हॅकर्सला फ़ेसबुक अकाऊंट हॅककरण्यासाठी ई-मेलचा पासवर्ढी हॅक करावा लागेल.
-    नवे मित्र जोडणे हा अनेक जणांचा छंद असतो. परंतू तो फ़ेसबुकवर थोडा मर्यादित ठेवला तर नेहमीच फ़ायदेशीर ठरतो, जमलं तर आपण ओळखत असलेल्या व्यक्तिंचीच ’फ़्रेंड रिक्वेस्ट’ स्विकारली तर ते फ़ेसबुक अकाऊंटच्या सुरक्षितेशी फ़ायदेशीर ठरेल. आज फ़ेसबुकवर हिरो-हिरॉईनची छायाचित्रे वापरुन विविध नकली अकाऊंट्स तयार झालेली आहेत किंवा अनेक जण तुमच्या मित्र-मैत्रिणींचे नाव व हिरो-हिरॉईनचा फ़ोटो वापरुन तुमच्या फ़्रेंड लिस्ट्मध्ये प्रवेश करतात, अशी अकाऊंट्स आपल्या फ़्रेंड लिस्ट मध्ये असणे नेहमीच धोकादायक असते. शक्यतो मित्राचा मित्र च आपल्याला फ़्रेंड रीक्वेट पाठवेल अशी फ़ेसबुकमध्ये Privacy Setting करून ठेवा, अकाऊंट्सना मोठ्या प्रमाणात नकली अकाऊंट्समधून फ़्रेंड रिक्वेस्ट येतात, त्या न स्विकारणेच योग्य ठरेल.
-    फ़ेसबुकने लॉग-ईन अलर्ट्ची सुविधा उपलब्ध करुन दिलेली आहे. त्या करीता आपल्याला स्वत:चा मोबाईल क्रमांक रजिस्टर करावा लागतो. फ़ेसबुक अकाऊंट लॉगईन झाल्यावर आपल्या मोबाईलवर लगेचच फ़ेसबुकवरुन तसा मेसेज येतो. त्यामुळे सुरक्षित लॉगईन साठी या सुविधेचा उपयोग करणे योग्य ठरते. Privacy Settings मधे जाऊन या सुविधेचा वापर करता येईल.
-    वैयक्तिक संगणकाव्यतिरिक्त अन्य ठिकाणवरुन लॉग-ईन करताना विशेष खबरदारी घेणे महत्वाचे आहे. फ़ेसबुकच्या पहिल्या पानावरील पासवर्ड/लॉअगईन आयडी च्या शेजारी ‘Remember Password  असा  चेकबॉक्स असतो, त्या ठिकाणी कधीही ‘टिक’ () करु नये, तसे केल्यास आपला पासवर्ड त्या संगणकावर सेव्ह राहिल व दुसरा कोणीही संगणक वापरकर्ता त्या पासवर्ड्द्वारे आपले अकाऊंट सहज उघडू शक्केल. सहसा सार्वजनिक ठिकाणी फ़ेसबुक अकाऊंट न उघडणेच योग्य होय.
-    अनेकदा कामाच्या ठिकाणी कार्यालयात फ़ेसबुकसारख्या सोशल नेटवर्किंग साईट्स वर बंदी असते. शेरास सव्वाशेर म्हणून अनेक जण यावर ’खुष्किचा मार्ग’ वापरतात. Blocked sites उघडण्यासाठी अनेक वेबसाईट्स इंटरनेट विश्वात तयार झालेल्या आहेत. अशा साईट्सचा वापर फ़ेसबुक उघडण्यासाठी कधीच करु नये. तरे केल्यास अधिकृतपणे आपण फ़ेसबुकचे अकाऊंट त्या वेबसाईट्सकडे सोपवत असतो. सर्वात जास्त फ़ेसबुक अकाऊंट हॅक हे याच पद्धतीने होतात, त्यामुळे फ़ेसबुक उघडण्याच्या मोहात न पडता या साईट्सचा वापर न करणेच योग्य ठरेल.
-     शक्यतो दुसऱ्याच्या मोबाईल एप्लिकेशनद्वारे फ़ेसबुक लॉगईन करणे टाळावे. मोबाईल सेटिंग्ज ज्ञात नसल्यास आपला पासवर्ड त्या मोबाईलमध्ये सेव्ह राहण्याची शक्यता आहे. म्हणून जमलं तर फ़ेसबुक लॉगईन करिता स्वत:चाच मोबाईल वापरावा.

     - तुषार भ. कुटे

Monday, March 12, 2012

श्रेया घोषाल: मराठी टॉप टेन

 भारतातील आजची सहा प्रमुख भाषांतील पार्श्वगायिका श्रेया घोषाल यांचा आज वाढदिवस आहे. त्यांनी मराठी भाषेत मराठी मातृभाषिक गायकांनाही लाजवेल अशा सुरांत अनेक गाणी गायली आहेत. त्यातील टॉप टेन गाणी मी इथे देत आहे. जमलं तर ऐकुन बघा....


१. जीव दंगला (जोगवा)
२. अजुन तरळते (माझी गाणी-अल्बम)
३. मन रानात गेलं गं (जोगवा)
४. सूर आले शब्द ल्याले (सुंदर माझे घर)
५. मेंदी भरल्या पावुली (मस्त शरदीय रात-अल्बम)
६. चंचल हा मनमोहन (माझी गाणी-अल्बम)
७. गार गार हा पवन बावरा (अर्जुन)
८. डोहाळे पुरवा (इश्श)
९. मंगळागौरी (मणी मंगळसूत्र)
१०. ऐकुन घे ना रे मना (स्वप्न तुझे नी माझे)

====================================================================

Sunday, March 11, 2012

संगणकाचे प्रकार


मित्रांनो, मी सध्या नितीन प्रकाशनाच्या ’ज्ञानसागरातील शिंपले’ या पुस्तकांच्या श्रुंखलेतील पुढच्या पुस्तकाचे लेखन करित आहे. त्यात समाविष्ट असलेल्या एका लेखाचीच ही झलक-


७.      संगणकाचे प्रकार
संगणकाच्या आकारानुसार तसेच वेगानुसार त्याचे प्रामुख्याने चार प्रकार पडतात- सुपर कॉम्प्युटर, मेनफ्रेम कॉम्प्युटर, मिनी कॉम्प्युटर व मायक्रो कॉम्प्युटर इत्यादी. सुपर कॉम्प्युटर हा सर्वात वेगवान संगणक होय. हवामान अंदाज, उपग्रह प्रक्षेपण, मोबाईल कम्युनिकेशन यासारख्या विशिष्ट कामांकरिता हे संगणक वापरले जातात. त्यांचा वेग हा खूप जास्त असतो. तो ’फ्लॉप्स’ या एककात मोजला जातो. शासकिय संस्थांव्यतिरिक्त अनेक मोठ्या कंपन्यांमध्येही सुपर कॉम्प्युटर वापरले जातात. सीडॅकने तयार केलेला. ’परम’ हा भारताचा पहिलाच महासंगणक अर्थात सुपर कॉम्प्युटर होता. अशा संगणकांचा हाताळण्यासाठी विशिष्ट संगणक प्रणालीची गरज असते. सुपर कॉम्प्युटर पेक्षा आकाराने लहान व वेगाने कमी असणारा संगणक म्हणजे मेनफ्रेम कॉम्प्युटर होय. १९६० च्या दशकात मोठ्या प्रमाणावर अशा प्रकारच्या संगणकांची निर्मिती झाली होती. आजही अनेक कंपन्यांकडे असे संगणक उपलब्ध आहेत. जिथे सुपर कॉम्प्युटरची गरज नसून अधिक कार्य करायचे असते, अशा ठिकाणी मेनफ्रेमचा वापर होतो. मेनफ्रेमपेक्षाही कमी आकाराचा व कमी वेग असणारा संगणक म्हणजे मिनी कॉम्प्युटर होय. आज अशा प्रकारचे संगणक वापरले जात नाही. ८० च्या दशकात शेवटचा मिनी कॉम्प्युटर वापरण्यात आला होता. मेनफ्रेमपेक्षा कमी आकाराचा संगणक तज्ञांनी बनविल्याने त्याला मिनी कॉम्प्युटर असे नाव दिले गेले होते. आज मिनी कॉम्प्युटरचे नामोनिशान केवळ संग्रहालयांत दिसून येते. आपल्या घरी किंवा महाविद्यालयांत जो संगणक वापरण्यात येतो त्याला मायक्रो कॉम्प्युटर असे म्हणतात. सन १९८० नंतर वैयक्तिक संगणकाचे युग अवतरल्यावर त्याला मायक्रो कॉम्प्युटर असे नाव दिले गेले. पूर्वीच्या खोलीएवढ्या मोठ्या संगणकांपेक्षा हा संगणक अतिशय लहान असल्याने त्याला हे नाव सार्थक होते. मायक्रो कॉम्प्युटरचे डेस्कटॉप व लॅपटॉप असे दोन प्रकार पडतात. डेस्कटॉप म्हणजे टेबलावर व लॅपटॉप म्हणजे मांडीवर ठेवून वापरता येण्यासारखा कॉम्प्युटर होय. आता हाताच्या तळव्यावर मावेल असा पामटॉप नावाचा कॉम्प्युटरही लोकप्रिय होत आहे. काही वर्षांनी फिंगरटॉप नावाचे संगणक बाजारात आले तर आश्चर्य वाटायला नको.

Sunday, March 4, 2012

माझ्या पहिल्या पुस्तकाच्या निमित्ताने....


साधारणत: दहा वर्षांपूर्वी जेव्हा मी इंजिनियरिंगला शिकत होतो, तेव्हा मी कधी विचारही केला नव्हता की, मी एखाद्या पुस्तकाचा लेखक होईल. सन २००० मध्ये मी माझ्या मराठी लेखनाला सुरुवात केली होती परंतु, पुस्तक लिहिण्याचा विचार मनातही नव्हता. लेखन करणे, हे केवळ छंद म्हणून मी जोपासू लागलो होतो. आज त्याचे फलित मला माझ्या पहिल्या पुस्तकाच्या रूपाने समोर दिसत आहे.
इंजिनियर आणि तोही शिक्षक व मराठी लेखकही... हे समीकरण काहींना न समजणारे आहे. महाराष्ट्रातील सर्वोत्तम अभियांत्रिकी महाविद्यालयातून संगणक अभियांत्रिकीची पदवी घेऊन शिक्षक बनणाऱ्याला काहीजण मूर्ख म्हटले होते. त्यांच्या भावना मी समजू शकतो. परंतु, ’काही मिळविण्यासाठी काही गोष्टींचा त्याग करावा लागतो’, हेही तितकंच खरं आहे. माझ्या पहिल्या पुस्तकाच्या प्रकाशनानंतर मला मिळालेल्या प्रतिक्रियांत मी माझ्या विद्यार्थ्यांपेक्षा माझ्या महाविद्यालयीन मित्रांच्या प्रतिक्रिया महत्वाच्या मानतो. त्याचे कारणही तसेच आहे. त्यांनी मला घडताना पाहिले होते व मी काय करू शकतो, याची जाणीवही त्यांना होती. आज मागे वळून बघताना मला काहीही गमावल्याचे दु:ख वाटत नाही. असो... पुस्तकाच्या खऱ्या कथेकडे वळूयात.
 पूर्वी केवळ अलंकारिक लिहिणं वगैरे किंवा नव्या पिढिच्या प्रतिनिधीच्या भावना मांडणे, अशा कल्पनांतून मी पुण्याच्या दैनिक युवा सकाळमधून लिहिणे सुरू केले होते. सकाळ समूहाचे ते नुकतेच सुरू झालेले दैनिक होते. माझे लेख वृत्तपत्रांतून प्रकाशित होऊ लागल्यावर मला खरोखर नवा हुरूप मिळू लागला होता. पूर्वी पेपरात नाव आलं की खूप अभिमान वाटायचा. पण, आता त्याचं फारसं काही वाटत नाही. आता नावापेक्षा आपलं लिहिलेलं प्रसिद्ध झालंय, याची किंमत जास्त वाटू लागलीय. गेल्या बारा वर्षांची लेखन तपस्या आज ’बिटस न्ड बाईट्स’ या नितीन प्रकाशनाने प्रसिद्ध केलेल्या पुस्तकाद्वारे मला प्रकाशित करता आली. पूर्वीचं हलकंफुलकं लेखन गेल्या काही वर्षांत तंत्रज्ञानाकडे वळून गेलं व पुस्तकरूपी प्रकाशितही झालं. मला त्याचा विशेष आनंद वाटतो.
माझा सतत लिहित राहण्याचा छंद मला या पुस्तकासाठी कामाला आला. संगणक विषयावर वृत्तपत्रांत लिहावे, असे अनेक दिवसांपासून मनात होते. त्यासाठी सर्वप्रथम नाशिकच्या ’दैनिक गांवकरी’ ला संपर्क साधला. नोव्हेंबर २००८ मध्ये त्यांच्या कार्यालयातून फ़ोन आला. ’दैनिक गांवकरी’चे उपसंपादक श्री. शैलेंद्र तनपुरे यांच्याशी भेट निश्चित झाली. संगणकाच्या विविध हार्डवेअर व सॉफ़्टवेअर शोधामागील नक्की इतिहास काय आहे? हे समजावून सांगण्याकरीता दैनंदिन लेखमालिका तयार करण्याची संकल्पना तनपुरे सरांनीच मला सांगितली. संगणकाचा इतिहास माझा पक्का असल्याने मला या विषयी लिखाण करण्यास काहीच अडचण येणार नव्हती. माझ्या या दैनंदिन स्तंभाला मीच ’बिट्स अन्ड बाईट्स’ हे नाव सुचविले व तनपुरे सरांनीही त्याला तात्काळ होकारही दिला. वृत्तपत्रात दैनंदिन लिहिण्यासाठी मला मिळालेली ही पहिलीच संधी होती.
१ जानेवारी २००९ रोजी ’बिट्स अन्ड बाईट्स’ मधला पहिला लेख प्रसिद्ध झाला. महिनाभरातच उत्तर महाराष्ट्रातून अनेक फ़ोन व ई-मेल प्राप्त झाले. विशेष म्हणजे यात शहरी भागातून कमी तर ग्रामीण भागातून जास्त प्रतिसाद प्राप्त झाला होता. संगणकाविषयी वृत्तपत्रांमधून प्रथमच अशी दैनंदिन लेखमालिका प्रसिद्ध झाली होती. या मालिकेचा फ़ायदा जितका वाचकवर्गाला होत तितकाच तो मलाही झाला. संगणकाच्या एखाद्या भागाविषयी केवळ वरकरणी माहिती असून चालणार नव्हती म्हणून अनेक लेखांना समृद्ध करण्याकरीता मला इंग्रजीतील दर्जेदार पुस्तकांचा तसेच इंटरनेटवरील लेखांचा मोठा आधार घ्यावा लागला. त्यातून मला ही मोठी ज्ञान प्राप्ती झाली. शिक्षकी पेशात असल्यामुळे या ज्ञानाचा मला सतत फ़ायदा सतत झाला आहे. एखाद्या संकल्पनेला शिकवताना सुरुवात करतेवेळी मी यातील नक्की इतिहास काय आहे! अशा प्रकारच्या उत्तराने सुरुवात करतो. त्यामुळे विद्यार्थ्यांची उत्सुकता वाढत जाते. एकंदरीत लेखमालिका लिहताना मला तनपुरे सरांच्या सूचनांचाही मोठा फ़ायदा झाला आहे. या लेखमालिकेला पुस्तक रुपात आणण्याची संकल्पना मला त्यानीच दिली होती.
संगणक इतिहास मांडताना अनेक धडाडीच्या संशोधकांची व संगणक विकसकांची चांगलीच ओळख होते. प्रत्येक  क्षेत्रात व्यवस्थापन शास्त्राला वाव आहे, याची कल्पना येते. संगणकाचा मुलभूत विषय  मानला जाणारा ’कॉम्प्युटर र्गनायझेशन’ हा विषय शिकवताना मी विद्यार्थ्यांना नेहमी सांगतो. Computer is not a magic, but it is a logic!’ हे १०० टक्के खरे आहे. अनेक धडपड्या व ध्येयवेड्या संगणक तज्ञांनी आजचा परिपूर्ण संगणक तयार केला आहे यात वाद नाही. त्यांनी संगणकाच्या विविध संकल्पना तयार केल्या नसत्या तर आजचा संगणक अस्तित्वात आलाच नसता. एखादे हार्डवेअर वा सॉफ़्टवेअर वापरताना ते बनविण्याचे श्रेय कोणाचे आहे याची माहीती जवळपास कोणालाच नसते. पण त्यांचे योगदान आपण कधीच हिरावून घेऊ शकत नाही. जुन्या पिढीतील संगणक विकसकांनी जो संगणकाचा विकास केला आहे अशा ज्ञात व अज्ञात तज्ञांना माझा सावंद्य नमस्कार ! त्यांचे कार्य मराठी वाचकांना समजावे याकरीता मी केलेला हा एक प्रयत्न होय.
नितीन प्रकाशनाकडे जेंव्हा मी ’बिट्स अन्ड बाईट्स’ च्या पुस्तकरूपी प्रकाशनाचा प्रस्ताव मांडला तेंव्हा त्यांनी मला तात्काळ होकार दिला. आज नितीन प्रकाशन मराठीमध्ये तंत्रज्ञानाला आणू पाहत आहे, याचा मला अभिमान वाटतो. मराठीतील माझे पहिले पुस्तक प्रकाशित करत असल्याबद्द्ल मी श्री. नितीन गोगटे व श्री. अविनाश काळे यांना मन:पूर्वक धन्यवाद देतो.
प्रस्तावना लिहण्याकरीता मी अच्युत गोडबोले सरांना जेंव्हा विनंती केली तेंव्हा त्यांनी तात्काळ मला होकार दिला. माझ्यासारख्या नवोदित लेखकाला त्यांनी प्रोत्साहन दिले. त्यांचे शतश: धन्यवाद. मराठी तंत्रज्ञान लिखाणासाठी मी गोडबोले सरांना माझा आदर्श मानत आलो आहे. त्यांचीच प्रस्तावना माझ्या पुस्तकाला लाभली, हे मी माझे भाग्य मानतो.
माझ्यातील संगणक अभियंत्याची ओळख मराठी तंत्रज्ञान लेखक म्हणून दैनिक गांवकरी मुळे झाली. गांवकरी वृत्तपत्र समूहाचा मी ऋणी आहे. माझे धाकटे बंधू अमित व अमोल यांचे सहकार्य ही लेखमालिका व पुस्तक लिहिण्यासाठी खूप मोलाचे ठरले. याशिवाय क. का. वाघ तंत्रनिकेतन मधील तसेच संदिप तंत्रज्ञान संस्था व संशोधन केंद्र येथील सर्व सहकाऱ्यांचा मी आभारी आहे.
प्रत्यक्ष दिसत नसले तरी माझ्या सर्व यशात मोलाचा सहभाग असणारे माझी आई-वडील, काका-काकी, ज्यांच्या कडून मी लिखाणाचा वसा घेतला ते मामा विजय आवटे व नेहमीच मला प्रोत्साहित करणारे माझे इतर सर्व कुटुंबिय व लिखाणाबद्द्ल नेहमीच चौकस असणारे मित्र अर्जून, प्रमोद, माणिक व पत्रकार अशोक डेरे यांचही योगदान मोलाचं आहे, हे देखिल तितकच खरं.

Sunday, February 5, 2012

इंटरनेट कुणाच्या मालकीचे ?


कल्पना करा की, एका बंद खोलीत मोठ्या प्रमाणात माणसे बसलेली आहेत. प्रत्येकची मातृभाषा ही वेगळी आहे व त्यांना फ़क्त तिच भाषा समजते. अशा वेळी इतक्या सर्व माणसांसोबत संवाद साधण्यासाठी तुमच्याकडे काही प्रमाणित शब्दसंग्रह व व्याकरण तयार आहे. ज्याद्वारे तुम्ही सर्व प्रकारच्या लोकांनीन सहजतेने संवाद साधू शकता. हीच पद्धती तंतोतंत इंटरनेटमध्ये वापरण्यात आलेली आहे. संगणक विज्ञानाचा सर्वात मोठा आविष्कार असणारे इंटरनेट हे विविध प्रकारच्या संगणकाचा एकमेकांशी संवाद साधू देणारे एक मोठे माध्यम आहे.
’इंटरकनेक्टेड नेटवर्क’ चे लघुरुप म्ह्णजे इंटरनेट होय. त्याला इंटरनॅशनल नेटवर्क म्हणूनही आजकाल संबोधले जाते. अर्थात, जगातील सर्व संगणकांना जोडणारे नेटवर्क हे इंटरनेट होय. यावरुनच त्याचा पसारा किती मोठा असेल, याचा अंदाज बांधता येऊ शकेल. शिवाय जगात विविध प्रकारचे संगणकीय नेटवर्क अस्तित्वात आहेत. त्या सर्वांना जोडण्याचे काम इंटरनेटने केले आहे. कोणत्याही प्रकारचा व कोणत्याही परेटींग सिस्टिम असणारा संगणक यात सामावू शकेल, अशी इंटरनेटची व्याप्ती आहे. संगणकीय नेटवर्कचे हे एक वैशिष्ट मानता येईल. इंटरनेटद्वारे संगणक जोडणी करण्याकरीता काही नियम तयार करण्यात आलेली आहे. त्यांना तांत्रिक भाषेत ‘प्रोटोकॉल म्हणून संबोधले जाते. इंटरप्रिटर अर्थात दुभाष्या जे काम करतो, तेच काम संगणकासाठी प्रोटोकॉलद्वारे साध्य केले जाते. इंटरनेटच्या या विश्वात केवळ संगणकच नसून राऊटर नेटवर्क एक्सस पॉइंट सॅटेलाईट लाखो किलोमिटर्स च्या वायर्स तसेच वायरलेस राऊटर्स ह्यांचाही समावेश होतो. सातासमुद्रापार जाणारे सर्व देशांच्या सीमारेषा पार करणारे जगातल्या प्रत्येक माणसाला जोडू शकणारे इंटरनेट हे खऱ्या अर्थाने वैश्विक नेटवर्क आहे. त्याची वाढ दिवसेंदिवस मोठ्या वेगाने होत आहे. तसं पाहिलं तर इंटरनेट म्हणजे अनेक छोट्या सिस्टिमला जोडणारी एक मोठी सिस्टिम आहे. त्यामुळे अशा या वैश्विक पद्धतीच्या नेटवर्कचा मालक कोण असावा? हा प्रश्न आपल्या मनात येणे साहजिकच आहे. आज जगात अस्तित्वात असणाऱ्या प्रत्येक गोष्टींना कोणाची तरी मालकी असते, तशीच ती इंटरनेटलाही आहे का? या प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा घेतलेला हा आढावा-
इंटरनेट या संकल्पनेचा जन्म ‘आर्पानेट’ ह्या जगातील पहिला कॉम्प्युटर नेटवर्कने दिला. ज्या काळात संगणक केवळ मोठमोठी विद्यापीठे व संशोधन संस्थांकडेच असायचे त्या काळात संगणकांना नेटवर्कद्वारे जोडण्याची संकल्पना पुढे आली व ‘आर्पानेट’ चा जन्म झाला. हे नेटवर्क तयार करणा-या तज्ञांनी निरनिराळे प्रोटोकॉल्स तयार केले. हेच प्रोटोकॉल्स आजही इंटरनेटमध्ये वापरण्यात येतात. आर्पानेट मध्ये विविध कंपन्यांनी बनविलेल्या संगणकाचा समावेश होतो. त्यामुळे अशा विविध प्रकारच्या संगणकात सूसूत्रता साधण्यासाठी आदर्श नेटवर्क प्रोटोकॉल ची रचना तज्ञांनी केली. अमेरिकेच्या संरक्षण विभागाकडे सर्वप्रथम ‘आर्पानेट’ ची मालकी होती. अर्थात एकेकाळी अमेरीकन सरकार इंटरनेटचे मालक होते, असे मानायला हरकत नाही. असे असले तरी आज इंटरनेटचे मालक कोण? या प्रश्नाला दोन उत्तरे देता येतील. पहिले – ‘कुणीही नाही’ व दुसरे ‘खूप सारे लोक’ ते कसे आपण पाहूया.
इंटरनेट ही टेलिफ़ोन जाळ्यासारखीच एक रचना आहे. ज्याला कॉम्प्युटर नेटवर्कचे नेटवर्क म्हणता येईल. जगातील बऱ्याच संस्था व कंपन्या प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षरित्या इंटरनेटचे नियंत्रण करत असतात. त्यामुळे कोणीही एक जण असे म्हणू शकत नाही की, ‘इंटरनेट हे माझ्या मालकीचे आहे! एकेकाळी अमेरीकेत इंटरनेटची सुरुवात झाली असली तरी अमेरीकाही त्याची आज मालक नाही. दुसऱ्या एका दृष्टीकोनातून असेही म्हणता येईल की, इंटरनेटला खूप सारे मालक आहेत. कारण वरती नमूद केल्याप्रमाणे इंटरनेट हे संगणकाच्या नेटवर्कचे नेटवर्क आहे व या विविध कॉम्प्युटर नेटवर्कचे मालक मात्र तितकेच आहेत. प्रत्येकाच्या मालकीचे नेटवर्क इंटरनेटद्वारे जोडले जाते. एखाद्या नेटवर्कचे मालक त्याच्या दर्जाचे व नेटवर्कमधील अधिमारांचे नियंत्रण करीत असतात. त्यामुळे पुर्ण इंटरनेटचे मालक नसले तरी आपल्या इंटरनेट वापरावर त्यांचा प्रभाव मात्र निश्चित पडत असतो.
आयएसपी अर्थात ‘इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडर’ बद्द्ल आपण ऐकले असेलच. ग्राहकाला इंटरनेट सुविधा देणाऱ्या संस्था ह्या आयएसपी म्हणून ओळखल्या जातात. उदा. बीएसएनएल, एमटीएनएल, टाटा इंडिकॉम, एअरटेल, आयडीया ह्या कंपन्याद्वारे इंटरनेट सुविधा दिली जाते. म्हणजेच त्या आयएसपी होत. इंटरनेटला सामान्य ग्राहकांपर्यंत पोहचवण्याचे काम ह्या कंपन्या करत आसतात. ह्या कंपन्याही इंटरनेटच्या मालक नव्हेत. आपल्या वायर्स व केबल्सच्या जाळ्याद्वारे त्या अन्य कॉम्प्युटर नेटवर्कशी स्वत:ची जोडणी करतात व त्यातून ग्राहकांना इंटरनेटची सुविधा दिली जाते. प्रत्येक छोट्या-छोट्या कॉम्प्युटर नेटवर्क मध्ये संगणकाला दिलेल्या अधिकारानुसार इंटरनेटची सुविधा वापरली जाते. कसेही असले तरी इंटरनेटची काळजी घेण्याकरिता काही आंतरराष्ट्रीय संस्था कार्यरत आहेत. तसेच इंटरनेटची प्रमाणके ठरविण्याचे व प्रोटोकॉल तयार करण्याचे कामही ह्या संस्था करतात.
१)      इंटरनेट सोसायटी - इंटरनेटचे स्टॅंण्डर्ड्स ठरविण्याचे काम ही संस्था करते.
२)      इंटरनेट इंजिनिअरींग टास्क फ़ोर्स (IETF) कोणीही सभासद होऊ शकेल, अशी ही संस्था आहे. ह्या संस्थेचे अनेक गट कार्यरत आहेत प्रत्येक गट हा इंटरनेटच्या विशिष्ट बाबीवर कार्य करत असतो. उदा. इंटरनेट सुरक्षा कशी वाढवता येईल, याकरीता पॉलिसी ठरविण्याचे काम करणे. हे गट इंटरनेट्ची रचना व स्थैर्य अबाधित ठेवण्याचे काम करतात.
३)      इंटरनेट आर्किटेक्चर बोर्ड (IAB): इंटरनेटचे प्रोटोकॉल व प्रमाणके तयार करण्याचे काम ही समिती करते.
४)      इंटरनेट कॉर्पोरेशन फ़ॉर असाईन्ड एन्ड नंबर्स (आयकॅन):- इंटरनेट्वरील प्रत्येक वेबसाईटला डोमेन नेम असते. उदा. www.howstuffworks.com ह्या नावावरुन वेबसाईट्सची ओळख इंटरनेट वापरकर्त्याला येते. शिवाय ह्याच नावाला संगणकाद्वारे ओळखण्यासाठी त्याला एक विशिष्ट क्रमांकही दिलेला असतो, त्यास IP Address म्हणतात. आपल्या वेबसाईटला डोमेन नेम व IP Address देण्याचे काम ‘आयकॅन’ ही संस्था करते. डोमेन नेम उपलब्ध असेल तरच ते ग्राहकाला देता येते. त्यामुळे एकच डोमेन नेम जर उपलब्ध असेल तरच ते ग्राहकाला देता येते. त्यामुळे एकच डोमेन नेम दोन वेबसाइट्सला देता येत नाही.
इंतरनेटला कोणीतरी एकच मालक नाही मात्र त्यावर प्रभाव टाकणारे अनेक मालक आहेत. अर्थात, इंटरनेटला केंद्रशासन नाही. ते एक अत्यंत काळजीपूर्वक तयार केलेले वैश्विक संगणक नेटवर्क होय.