Sunday, January 25, 2026

क्रांतीज्योती आणि प्रमोशन

मराठी चित्रपट तिकीटबारीवर चालत नाहीत, अशी अनेकांची बोंब असते. मराठी चित्रपट हे उत्तम असतातच. किमान ८० टक्के तरी! मग चित्रपटगृहामध्ये गल्ला जमवण्यासाठी ते कमी का पडतात? या प्रश्नाचे उत्तर कदाचित मराठी चित्रपटांच्या दिग्दर्शक आणि निर्मात्यांना माहीत असावे. परंतु तरीदेखील आपला चित्रपट चालावा, अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचावा, त्यांनी पहावा यासाठी ते कष्ट घेत नाहीत.
सन २०२५ मध्ये जेवढे मराठी चित्रपट चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाले त्या सर्वांची एकत्रित कमाई जवळपास ९८ ते ९९ कोटी रुपये होती. एवढी कमाई दक्षिणेतले अनेक चित्रपट सहज करत आलेले आहेत. मग मराठी चित्रपटांना हे साध्य का होत नसावे? मूलतः मराठी चित्रपट हे प्रमोशनसाठी कमी पडतात, हे निर्विवाद सत्य आहे. चित्रपट बनवला, नंतर वितरकांना दिला आणि थिएटरला लागला की लोक आपोआप आपला चित्रपट बघायला येतील, असे निर्मात्यांना वाटत असते. शिवाय अतिशय कमी बजेटमध्ये चित्रपट तयार झालेला असतो. त्यात चित्रपट महामंडळाचे अनुदान देखील असते. म्हणून थोडी का होईना लाखांमध्ये कमाई झाली तरी चित्रपटाचे पैसे वसूल होतात. कदाचित याच कारणास्तव चित्रपटाचे प्रमोशन करण्यास निर्माते, दिग्दर्शक कमी पडत असावेत. ही निर्मात्यांची मानसिकताच तयार झाली आहे, असं दिसतं. याउलट अन्य भाषेतील चित्रपट त्यांच्या प्रदेशामध्ये तसेच दूरचित्रवाणीद्वारे, रेडिओद्वारे आणि भेटीगाठी व कार्यक्रमांद्वारे देखील चित्रपटाचे मोठ्या प्रमाणात प्रमोशन करतात. ही गोष्ट मराठी चित्रपटांच्या बाबतीत अगदीच नगण्य आहे.
सध्या मराठी चित्रसृष्टीमध्ये कमाईचे कोटीच्या कोटी आकडे पार करणारा चित्रपट म्हणजे "क्रांतीज्योती विद्यालय मराठी माध्यम" होय. या चित्रपटाचा विषय उत्तम आहेच. मांडणी देखील छान आहे. विषय तर अप्रतिमच आहे. परंतु चित्रपटाच्या चमुने तो प्रदर्शित झाल्यानंतर ज्या वेगाने, सातत्याने, वैविध्याने त्याचे प्रमोशन केले आहे, त्यामुळेच अजूनही चित्रपटगृहात गर्दी खेचताना दिसतो. आज त्याची कमाई २० कोटीच्या वर गेलेली आहे. ती का? तर यामागे दिग्दर्शक हेमंत ढोमे, निर्माती क्षिति जोग आणि चित्रपटातील अन्य कलाकारांनी त्याच्या प्रमोशनवर घेतलेले कष्टच कारणीभूत आहेत. अनेकदा निर्माते आपल्या चित्रपटाचे प्रमोशन केवळ मुंबई आणि पुण्यासारख्या शहरी भागातच करतात. कारण या बाहेरील शहरांमध्ये त्यांना हव्या त्या सुविधा कदाचित मिळत नसाव्यात. किंबहुना मराठी प्रेक्षकच मराठी चित्रपटांविषयी अनुत्सुक असावेत. पण प्रेक्षकांपर्यंत पोहोचल्याशिवाय त्यांना आपला चित्रपट समजणार कसा? या प्रश्नाचे उत्तर त्यांनी शोधायला हवे. 'क्रांतीज्योती'च्या पूर्ण संघाने महाराष्ट्रातल्या विविध भागांमध्ये जाऊन चित्रपटगृहांमध्ये पोहोचून त्याचे प्रमोशन केले. शिवाय चित्रपटाच्या विषयाशी निगडित असणाऱ्या अनेक सेलिब्रिटींना, रिलस्टार्सना आणि समाज माध्यमांवर लोकप्रिय असणाऱ्या अनेक व्यक्तींना त्यांनी सोबत घेतले होते. त्या सर्वांच्या समाजमाध्यमांवरील पानांवर चित्रपटाचे प्रमोशन झाले. सातत्याने या चित्रपटातील कलाकार त्यांच्या समाजमाध्यमांवरील अकाउंटवर विविध पोस्ट करत होते. लोकप्रिय गाण्यांवरती रिल्स तयार होत होते. म्हणूनच चित्रपट अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचण्यास मदत झाली. आणि अजूनही हा चित्रपट चित्रपटगृहांमध्ये गर्दी खेचत आहे.
मागच्या वर्षी सर्व मराठी चित्रपटांनी केवळ ९८ कोटी कमावले होते तर यावर्षी पहिल्याच दिवशी प्रदर्शित झाल्याने चित्रपटाने २० कोटीपेक्षा अधिक कमाई केली आहे. हा मराठी चित्रपट निर्मात्यांसाठी एक धडा आहे आणि शिकवण देखील. केवळ 'माऊथ पब्लिसिटी'च्या जोरावर सर्वच चित्रपट लोकांपर्यंत पोहोचत नाहीत. आपल्या चित्रपट हे उत्तम असतातच. परंतु ते बनवून आणि चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित करून फायदा नाही. ते अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचायला हवेत. त्यासाठी प्रदर्शनापूर्वी आणि प्रदर्शनानंतरही प्रमोशनच्या विविध क्लुप्त्या त्यांना निश्चितच वापराव्या लागतील. लोकांना दिग्दर्शक आणि कलाकार माहीत झाल्यानंतर पुढील चित्रपटाची ते निश्चितच प्रतीक्षा करतील. हे समजून घेतले पाहिजे. बाकी मराठी चित्रपटसृष्टी गुणवत्तेच्या बाबतीत कोणाच्याही मागे नाही. फक्त आपल्याकडे जे आहे ते लोकांपर्यंत पोहोचणे गरजेचे वाटते.

--- तुषार भ. कुटे 

 


No comments:

Post a Comment

to: tushar.kute@gmail.com