Wednesday, January 21, 2026

प्रिय हेमंत ढोमे

प्रिय हेमंत ढोमे,

तुझा "क्रांतीज्योती विद्यालय मराठी माध्यम" हा चित्रपट पाहिला.... नाही आवडला... 

कारण या चित्रपटामध्ये तू खूप सार्‍या चुका केलेल्या आहेत... 

तुला माहीत नाही का आम्ही मराठी लोक फक्त आडनावाने मराठी आहोत.... आम्हाला आमच्या भाषेशी काही घेणेदेणे नाही... आम्हाला ज्ञान नको आहे... आम्हाला फक्त चकचकीत गुळगुळीत दिसणाऱ्या आणि भरमसाठ सुविधा देणाऱ्या इंग्रजी शाळा हव्या आहेत... तू हे काही दाखवलं का?.... नाही ना.... मग तू चुकलास!

आम्ही जरी मराठी शाळेतून शिकलो असलो तरी आज विविध कंपन्यांमध्ये उच्चपदस्थ ठिकाणी काम करतो आहे. आम्हाला मराठीतून शिकल्याची लाज वाटते. म्हणूनच आमच्या मुलांना देखील आम्ही मराठी शाळेमध्ये शिकवत नाही.... आमच्यासाठी इंग्रजी म्हणजेच सर्वकाही... तू हे काही दाखवलं का?.... नाही ना.... मग तू चुकलास!

मातृभाषेतून शिक्षण म्हणजे आपुलकीचं आणि हसत खेळत शिक्षण... मीही असेच शिकलो... अनेकदा शिकत गेलो... अनुभव संपन्न झालो.... आमच्या भाषेतील शिक्षणातून आमचं व्यक्तिमत्व घडवलं.... पण आम्हाला आमच्या मुलांना यातलं काहीच द्यायचं नाहीये..... त्यांच्यामध्ये कृत्रिमता आणायची आहे.... त्यांच्याकडून सर्व काही रट्टा मारून, घोकून, पाठ करून घ्यायचं आहे... आणि काही वर्षानंतर त्याला खोऱ्याने पैसा ओढताना पाहायचं आहे.... हेही तू दाखवलं नाहीस... म्हणजे तू चुकलासच!

आम्हाला आमच्या शिक्षकांनी आत्मीयतेने शिकवलं. अवघड गोष्टी सहज आणि सोप्या करून दाखवल्या. आजही त्या आमच्या डोक्यामध्ये एकदम फिट बसलेल्या आहेत. पाढ्यांचा तर विषयच नाही... 'पाचा साते किती?' असं कोणी विचारलं तर लगेचच ३५ हे उत्तर येतं.... पण याचा वास्तविक जीवनात काही उपयोग आहे का?... नाही... आमच्या मुलांना आम्हाला हे सर्व काही द्यायचं नाहीये... त्यांच्या शिक्षकांनी शिकवावं आणि निघून जावं.... आमच्या मुलाचं नाव त्याने लक्षात ठेवलं नाही तरी चालेल... काय चाटायची आहे ती आत्मीयता?.... हेही तू दाखवले नाहीस.... ही पुढची चूक.... 

आमच्याकडे आहे भरपूर पैसा... आम्हाला तो उधळायचा आहे..  इंटरनॅशनल, युनिव्हर्सल आणि ग्लोबल स्कूलच्या नावाखाली... उद्या आमच्या मुलाने आम्हाला विचारायला नको की तुम्ही माझ्या शिक्षणावर खर्च का नाही केला?... म्हणून करतो आम्ही खर्च... म्हणून आम्हाला हव्या असतात इंटरनॅशनल शाळा आणि त्यातल्या एसीवाल्या क्लासरूम... हे सुद्धा तुझ्या चित्रपटात नाही... म्हणजे तू परत चुकला... 

मराठी शाळा टिकल्या तरच मराठी भाषा टिकेल... असं तू म्हणतोस.... 
काय करायचं आहे भाषा टिकून? मेली तर मेली.... फार फार तर काय होईल? मराठी संस्कृती नष्ट होईल.... महाराष्ट्राची ओळख नष्ट होईल.... आम्हाला काय त्याचं? आम्ही कणा नसलेली आणि मराठी आडनावे घेऊन मिरवणारी माणसं आहोत....

- तुझा चित्रपट न आवडलेला एक मराठी प्रेक्षक 

(तुषार भ. कुटे यांच्या लेखणीतून)


No comments:

Post a Comment

to: tushar.kute@gmail.com