Saturday, February 7, 2026

७० दिवस

मनुष्यप्राणी सर्वार्थाने पृथ्वीवरच्या अन्य प्राण्यांपेक्षा वेगळा आहे. हे त्याने सातत्याने विविध घटनांमधून दाखवून दिलेले आहे. माणसांमध्ये अंगभूत असलेली प्रखर इच्छाशक्ती काय करू शकते, हे दर्शविणारे पुस्तक म्हणजे '७० दिवस.' 


१२ ऑक्टोबर १९७२ रोजी दक्षिण अमेरिकेतील उरुग्वे एअरफोर्सच्या फेअरचाईल्ड २२७ या विमानाने ४५ प्रवाशांसह उड्डाण केले. रग्बी खेळाडूंचा हौशी संघ चिली देशाकडे निघाला होता. त्यांना दोन्ही देशांमध्ये असलेल्या उंचच उंच हिमाच्छादित अँडीज पर्वतरांगा ओलांडून जायचे होते. जेव्हा हे विमान पर्वतरांगांवरून जायला लागलं तेव्हा हवामान बिघडलेलं होतं. ढगांमध्ये शिरल्यानंतर हिमवर्षाव चालू झाला. आणि त्याला अचानक वादळांचा सामना करावा लागला. वाऱ्याचा वेग भयानक होता आणि त्यामुळेच हे विमान कोसळले. दुपारी साडेतीन नंतर या विमानाचा विमानतळाशी संपर्क तुटला. दोन्ही देशातील अधिकाऱ्यांनी या विमानाचा शोध घ्यायला सुरुवात केली. आठवडाभर अखंड प्रयत्न चालू होते. परंतु विमानाचा शोध लागला नाही. शिवाय इतक्या दिवसानंतरही या विमानामध्ये कोणी जिवंत असेल याचीही शक्यता त्यांना वाटली नाही. परंतु खरी गोष्ट निराळी होती. विमान अँडीज पर्वतरांगांमध्ये एका बर्फाच्छादित प्रदेशांमध्ये पडले. त्यातील २४ जण जिवंत होते. त्यांच्या आजूबाजूला सर्वच दिशेने बर्फाचे मोठमोठाले पर्वत दिसत होते. शिवाय बर्फवृष्टीही सुरू होती. तापमान सातत्याने शून्याच्या खालीच राहत होते. वाऱ्यामुळे वातावरणातील गारवा प्रचंड वाढलेला होता. अशा परिस्थितीमध्ये कोणीही दोन-तीन दिवस देखील टिकू शकणार नाही. परंतु रग्बी खेळाडूंच्या संघातील मुलांनी त्या प्रतिकूल वातावरणाशी झुंज दिली. पहिले दहा दिवस तर त्यांनी इथून सुटका होण्याचीच वाट पाहिली. परंतु तीही शक्यता मावळल्यानंतर त्यांनी स्वतः प्रयत्न चालू केले. जगण्यासाठीचा त्यांचा संघर्ष सुरू झाला. जिवंत राहण्यासाठी त्यांनी निवडलेले मार्ग खरोखर अकल्पनीय आणि शिसारी आणणारे होते. परंतु त्याशिवाय पर्याय नव्हता. हळूहळू एकेकाचा मृत्यू होत गेला. परंतु तरीदेखील अन्य मुले परिस्थितीशी झगडत जिवंत राहिली. अखेरीस दोघांनी काहीही करून पर्वतरांगा ओलांडून जायचे ठरवले. तोपर्यंत दोन महिने उलटून गेले होते. आणि अखेरीस चिली देशाच्या मानवी वस्तीमध्ये ते पोहोचले. अर्थात शेवटी १६ जणांची यातून सुटका झाली. 
या पुस्तकाला बोधकथा म्हणावे की संघर्षकथा ते समजत नाही. खरंतर ही संघर्ष कथा अधिक वाटते. कुठल्याही परिस्थितीमध्ये तग धरून ठेवण्याची मानवी क्षमता भयान संकटाच्या वेळी कामाला येते. काहीही करून जिवंत राहायचेच ही इच्छाशक्ती इतर कोणत्याही गोष्टीवर सहज मात करते. शिवाय असे अनुभव जीवनाला नवीन दिशा देखील देतात. स्वतःला ओळखण्याची ताकद देतात. 
पुस्तकातील एकेक प्रसंग डोळ्यासमोर उभा राहतो. ही वेळ जर आपल्यावर आली तर आपण काय करू? याही प्रश्नाचे उत्तर आपण शोधायला लागतो. माणसाच्या अंगभूत वैशिष्ट्यांमुळेच तो आज या पृथ्वीवर राज्य करतो आहे, याची देखील जाणीव होते. एका अर्थाने ही कथा बोधकथा आहे. असेही आपण म्हणू शकतो.

--- तुषार भ. कुटे 

#मराठी #पुस्तक 


No comments:

Post a Comment

to: tushar.kute@gmail.com